Friday, 13 January 2017

आदरणीय मोदीजी...

आदरणीय मोदीजी,

मैं यह पत्र पहले हिंदी में लिखना चाहता था, लेकिन फिर आपकी हिंदीभाषाप्रभुता का खयाल आया तो सोचा की हिंदीको आपने ऐसी बुलंदी पे कायम किया है कि शायद मैं आपका अनुकरण करू तो कहीं मात्र हास्यास्पद प्रयास बनकर न रह जाए. इसलिए हमेशाकी तरह मराठीमेही लिख रहा हू.

चरख्यावर सूत कातताना तुमचा गांधीजींच्या पोजमधला फोटो प्रसिद्ध झाला आणि त्यावर टीकेची- संतापाची झोड सुद्धा उठली, हे तर आपण पाहत आहातच. हे असे का व्हावे हा प्रश्न तुम्हाला पडला आहे काय? गांधींचे अनुकरण तर तुम्ही आधीही झाडू हातात घेऊन स्वच्छता अभियान राबवून केलेच आहे. आता चरखा चालवून देखील अनुकरणच तर करीत आहात. मग हा विरोध का बरे? कारण गांधींचे अनुकरण करणे म्हणजेच गांधींच्या विचारावर चालणे हे तर केवळ कौतुकास्पद आहे. म्हणून तुम्ही काही मुद्द्यांचा विचार करावा असे वाटते.

गांधीजींची स्वच्छता फक्त हातात झाडू घेऊन दोन दिवस फोटोसेशन करण्यापुरती मर्यादित नव्हती. तो त्यांचा नित्य दिनक्रम होता आणि गांधी सहित त्यांचे अनुयायी दैनंदिन मैला-साफसफाई करण्याची कामे नित्यनेमाने करीत. दोन वर्षांत तुमचा असा एक मंत्री, सांसद, कार्यकर्ता दाखवा जो क्षणिक फोटोसेशन सोडून तुमच्या स्वच्छता अभियानाशी अविरत जोडलेला आहे? उलट स्वच्छतेची कामे करणारी माणसं तुमच्या गोरक्षकांकडून खुलेआम नागवली जातात असे भीषण वास्तव समोर आले आहे. त्यावर तुम्ही आणि तुमचे सरकार कमालीचे हतबल असल्याचे दिसून आले. केवळ सेल्फी इव्हेन्ट पुरतीच जर हि स्वच्छतेची गांधीगिरी मर्यादित असेल तर त्या गांधीगिरीवर विश्वास कसा ठेवावा, मोदीजी?

दुसरं, चरख्यावर सूत कातणारा गांधी उघड्या अंगाने वीतभर पंचा नेसून का बसला होता बरे ? हे समजलं तर लाखभर रुपयांच्या सुटाबुटात चरख्यावर फोटो काढायची नौटंकीची गरज काय ? तुमच्या नोटबंदीच्या निर्णयाने भारतातील कापडउद्योग म्हणजे हातमाग आणि यंत्रमाग ठप्प पडला आहे आणि त्याबाबत तुमचे सरकार कमालीचे असंवेदनशील आणि बेफिकीर असल्याचे दिसत आहे. चरखा, सूत, नीळ, मीठ, खादी ह्या माध्यमांतून देशी अर्थव्यवस्थेची नाडी ओळखणारा गांधी तुम्हाला कसा समजणार? स्वत:च्या व्यर्थ इमेज ब्रॅण्डिंगवर करोडो रुपये उधळणारा माणूस उघड्या अंगाच्या पंचातल्या गांधीचा अनुयायी कसा शोभेल, मोदीजी?

गांधी हा इव्हेन्ट नव्हे, झाडू चरखा पुतळा नव्हे...हे समजून घ्या. देशाचा स्वातंत्र्योत्सव साजरा होत असताना त्या इव्हेन्ट मध्ये गांधीबाबा सामील नव्हता. 'लालकिलेंकि प्राचीर' वगैरे सोडून तो महात्मा फाळणीच्या दंगली शमविण्यासाठी नौखालीत निर्भयपणे पदयात्रा करीत होता. ह्याउलट अशा दंगली आपल्या राज्यात भडकल्या तेव्हा आणि आज दंगलखोर भाषा बोलणारे आपल्या राज्यात राजरोस धुडघूस घालीत असताना तुम्ही कोणता राजधर्म निभावलात, मोदीजी ?

हे प्रश्न आहेत...गांधीगिरी करणाऱ्यांच्या मर्यादा ह्या उथळ होत्याच त्या सध्या ओंगळ होत आहेत, एवढेच. विरोधाच्या स्वराची पार्श्वभूमी अशी आहे. असो. गांधी हा असा एक विचार आहे जो जगभर प्रेरणादायी ठरला आहे. तुम्हालाही तो निश्चित प्रेरणादायी ठरेल.

अनेक शुभकामनाओंकेसाथ,

एक प्यारा देशवासी

Thursday, 12 January 2017

घबाडाची आयडिया!

गेल्या वर्षी जानेवारीत 'बिनलाभाचे घबाड' नावाचा लेख पी. चिदंबरम ह्यांनी लोकसत्तेत लिहिला होता.
क्रूड तेलाचे दर प्रति बॅरल ३४ डॉलर पर्यंत घसरल्याने 'भारतीय रुपयांमध्ये बचतीची रक्कम २ लाख ३३ हजार कोटी एवढी होते' हे सांगून त्यांनी "तेलदरातील घसरणीमुळे झालेल्या लाभातील सरकारचा वाटा ६० टक्के म्हणजे २ लाख ३३ हजार कोटी रुपयांपैकी १ लाख ४० हजार कोटी रुपये एवढा असावा, अशी माझी आकडेवारी सांगते." असा निष्कर्ष मांडला होता. "सरकारला गुंतवणुकीसाठी १ लाख ४० हजार कोटी रुपयांचे घबाड उपलब्ध झाले, तर त्याचा अर्थव्यवस्थेला किती लाभ होईल?" असाही प्रश्न त्यांनी विचारला होता.
थोडक्यात मोदीसरकारची तेव्हाची आणि आजवरची आयती उपलब्धी (!) म्हणजे हे २ लाख ३३ हजार कोटीचे घबाड होय. ह्या घबाडाने सरकारच्या घसरत्या आर्थिक आलेखावर पांघरूण घालण्यासाठी फायदा झाला असावा. त्यामुळे कदाचित आणखी अशी घबाडे शोधण्याचा प्रयत्न झाला असावा... आणि त्यातून नोटबंदीतून मिळणाऱ्या ३-४ लाख कोटी रुपयांच्या घबाडाची आयडिया ह्या घबाडी सरकारला सुचली असावी काय? असा प्रश्न पडलाय. प्यारे देशवासियो, तुम्हाला काय वाटते?