Monday, 28 October 2013

मोदींचा 'इतिहास'

 28/10/2013 (फेसबुक पोस्ट )

सिकंदरच्या विश्वविजेत्या सैन्याचा पराभव बिहारच्या भूमीवर बिहारींनी केला असे वक्तव्य मोदिनी केले , त्याबद्दल....

सिकंदरने इ.स.पूर्व ३२६ मध्ये सिंधू नदी ओलांडून भारतावर आक्रमण केले. त्याने पंजाब मध्ये राजा पोरसला पराभूत केले परंतु पोरसच्या शौर्याने सिकंदर थक्क झाला. इथेच त्याच्या सैन्याने पुढे जाण्यास नकार दिला.
सिकंदर इ.स.पूर्व ३२३ मध्ये परतीच्या मार्गावर बाबिलोन इथे मृत्यू पावला.


मगध (बिहार) मध्ये तेव्हा नंद साम्राज्य होते आणि ते भारतातील सर्वात शक्तिशाली राज्य होते.
चंद्रगुप्ताने इ.स.पूर्व ३२१ मध्ये नंद साम्राज्याचा पराभव केला.
चंद्रगुप्ताने इ.स.पूर्व ३०५ मध्ये सेलुकस निकेटर चा पराभव केला.
अर्थात सिकंदर किंवा अलेक्झांदर द ग्रेट ह्याचा मगध साम्राज्याशी युद्ध किंवा लढाई व्हायचा प्रश्नच उद्भवला नाही.


चंद्रगुप्ताने नंद साम्राज्य ताब्यात घेऊन ग्रीक सत्रापाना आणि सेलुकस निकेटर ला परास्त करण्याचा पराक्रम सिकंदरच्या मृत्युनंतर केला आहे.


म्हणून बिहारने (मगध) सिकंदरला पराभूत केले असे म्हणणे चुकीचे आहे. कारण सिकंदरचा नंद किंवा चंद्रगुप्त ह्यापैकी कुणाशीही संघर्ष झालाच नाही !
असो...


मोदींचे इतिहासाचे ज्ञान किंवा आकलन चुकीचे असू शकते आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार करता निवडून येण्याची क्षमता आणि निवडणूक जिंकण्याची क्षमता ह्या बाबी जास्त महत्वाच्या असल्याने 'ज्ञान' हा निकष फारसा महत्वाचा राहिलेला नाही. अशा ज्ञान विषयक मुद्द्यावर तथाकथित पंतप्रधान पदाच्या उमेदवारांचे बुरखे फाटले तर त्यात काही विशेष नाही;
 
...चालायचेच...समजून घ्या...

Thursday, 10 October 2013

सचिन निवृत्त होतोय....



 10/10/2013 (फेसबुक पोस्ट )
"I have seen God, he bats at no. 4 for India." -Matthew Hayden.
क्रिकेटचा देव निवृत्त होतोय.

सचिन निवृत्त होतोय....

निवृत्तीची हि प्रक्रिया बराच काळ सुरु होती. आधी एकदिवसीय सामन्यातून, मग IPL मधून, आत्ताच चाम्पियन्स लीग मधून आणि आज अखेर कसोटी मधूनही निवृत्तीची घोषणा. एक पर्व नव्हे एक युग संपतेय.

गावस्करच्या निवृत्तीने एक पर्व संपले होते तेव्हा क्रिकेट विश्वात सचिन चा उदय झाला. २५ वर्षांनी हे युग सरतेय.

सचिन म्हणजे क्रिकेट आणि क्रिकेट म्हणजे सचिन अशा झपाटलेल्या काळाचे आम्हीही साक्षीदार.

सुरुवातीच्या एकहाती सामने जिंकण्या पासून ते पुढे द्रवीड-गांगुली-लक्ष्मण ह्याना घेऊन जगात भारताचा दबदबा निर्माण करण्यापासून ते धोनीच्या यंग ब्रिगेडचा मार्गदर्शक पर्यंत चा सचिनचा प्रवास एकमेवाद्वितीयच.

आत्यंतिक अपेक्षांच्या बोज्यातून, कर्णधारपदाच्या ओझ्यातून, सततच्या दुखापतीमधून, फीक्सिंग च्या मनस्तापातून तो नेहमीच तावून सुलाखून पुढे जात राहिलाय.

लारा, वॉ, इंझमाम, पोंटिंग, इ. कुणीही समकालीन खेळाडू त्याच्या स्पर्धेत आम्ही सहन केला नाही. आणि टीकलाही नाही.

म्याकग्रा, डोनाल्ड, अक्रम इ. त्याला त्रासदायक ठरताना देखील आम्ही ठाम राहिलो आणि तेही टिकू शकले नाहीत.

२००४-०५ ची गोष्ट आहे. तेव्हा त्याची २५-३० शतके दोन्ही क्रिकेटमध्ये होती. माझ्या एका मित्राबरोबर मी पैज लावली होती कि सचिन १०० शतके करेल तसेच एकदिवसीय आणि कसोटी दोन्हीमध्ये ५०-५० शतके करेल. रु. १०,०००/- ची पैज.

आज त्याची शतके ४९ आणि ५१ आहेतच. म्हणजे १०० पूर्ण. १ शतक ट्वेंटी-२० मध्ये आहे.
पैज मी जिंकलो कि हरलो हे तुम्हीच ठरवा कारण वरील आकडेवारी तून उलट-सुलट निष्कर्ष निघतील...

पण सचिन नक्की जिंकला, क्रिकेट जिंकले आणि माझ्यासारखे चाहते हि सतत जिंकत राहिले.

कदाचित येत्या विश्व चषकासाठी त्याची गरज पडली तर तो पुन्हा येईल हि...(एक वेडी अपेक्षा !)

तोपर्यंत अलविदा सचिन.

Monday, 7 October 2013

नवा 'इझम' जन्माला येणे क्रमप्राप्त आहे



धर्म हि संकल्पना जशी कालबाह्य झाल्याचे दिसून येते, तीच गत सध्या काही सामाजिक आणि राजकीय विचारधारांची झालेली दिसते. अर्वाचीन  भारताचा इतिहास पाहता गांधीझम, सावरकरीझम आणि आंबेडकरीझम  असे तीन विचारप्रवाह सामान्यपणे देशात दिसून येतात.

१. गांधीझम च्या  तिरंगा चा मक्ता सेकुलर राजकारण करणाऱ्या काँग्रेस आणि तत्सम तथाकथित सेकुलर वाद्यांनी घेतलाय.
२. सावरकरीझम चा भगवा झेंडा हिंदुत्वाचे राजकारण करणाऱ्या संघ, भाजप ह्या राजकीय पक्षांनी तसेच विश्व हिंदू परिषद  इ. हिंदू धर्म संघटनानी खांद्यावर घेतला आहे.
३. आंबेडकरीझमचा निळा बावटा रिपब्लिकन, बसप, इ. राजकीय पक्षांनी आणि बौद्ध-नवबौद्ध समाजाने धारण केला आहे.

वरील तिन्ही विचारधारा मधील परस्परविरोधी ब्रिटीश काळापासून ते आजच्या स्वतंत्र भारत देशात सतत दिसून येतो. हा परस्परविरोध ब्रिटीश सरकारशी झालेल्या स्वातंत्र्य लढ्यात दिसून येतो तसेच ब्रिटीश सरकार शी वेळोवेळी होणार्या अनेक वाटाघाटी, कायदे मंडळे , इ. संदर्भात दिसून येतो.


ज्या काळात ह्या तिन्ही विचारधारा त्यांच्या निर्मात्यांनी मांडल्या त्या १०० वर्षापूर्वीच्या भारताचा विचार केल्यास तत्कालीन राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेच्या दृष्टीने विचार करूनच त्या विचार प्रणाल्या अस्तित्वात आल्या हे दिसून येते. त्यातून राष्ट्र-समाज-धर्म अशा विविध स्तरावर मानवी जीवन समृद्ध करण्याची सामान्य अपेक्षा असणारच.

इथे जिनाइझम च्या हिरव्या झेंड्याचा हि उल्लेख करावा लागेल ज्यांनी पाकिस्तान-मुस्लिम  ह्या राष्ट्र-धर्म वादासाठी कार्य केले परंतु स्वतंत्र भारताशी ह्या विचारधारेचा फारसा संबंध नसल्याने इथे त्याची चर्चा सयुक्तिक होणार नाही. तसेच सोशलीझम, कमुनिझम इ. मरणासन्न विचारधारा देखील चर्चेत नको.

असे दिसतेय कि ब्रिटीश काळातील ह्या तीन विचारधारा आजही तो  परस्परविरोध सोडत नाहीयेत. स्वातंत्र्य ,लोकशाही आणि राज्यघटनेची व्यवस्था देखील हा परस्परविरोध दूर करण्यात अयशस्वी झाली आहे. उलटपक्षी हा विरोध दिवसेंदिवस अधिकाधिक तीव्र होताना दिसत आहे.

विविध धर्म आणि त्यांचे  देव-प्रेषित ह्यांच्या मधून जसा आजही विस्तव जात नाही तीच परिस्थिती ह्या विचारधारांची आहे. राजकीय स्वार्थ सोडल्यास ह्या विचारधारा परस्पर सौहार्द जपताना दिसत नाहीत. त्याची परिणीती त्यांच्या अनुयायी वर्गाची एकमेकाविषयी असलेली द्वेष-संशयी वृत्ती बळावून स्वातंत्र्य-समता-बंधुता ह्या मूळ तत्वांचा तिलांजली देण्यात होते.

गांधी वाद्यांना सावरकर चालत नाही. आंबेडकर पटत नाही. सेकुलर तिरंग्याला गांधी सोडून इतर जमत नाहीत. त्यांचा गांधी हा देव. इतर दोघे अनुच्चाराने लांबच ठेवण्याची त्यांची प्रवृत्ती.

हिंदुत्व वाद्यांना गांधी-आंबेडकर अजूनही परके वाटतात. भगव्या झेंड्याचे अनुयायी ह्या दोघांना आजही शिवीगाळ करण्यातच धन्यता मानतात. त्यांच्यासाठी सावरकर मात्र देव. इतकेच नाही तर गोडसे देखील त्यांना देव म्हणून चालतो. पण गांधी-आंबेडकर मात्र त्याज्य!

आंबेडकर वाद्यांना गांधी अजिबात चालत नाही. सावरकरही नाही. निळ्या झेंड्याला आंबेडकर पलीकडे काही दिसत नाही. त्यांचा आंबेडकर हा देव. इतर दोघांना ठाम नकार!

खरे पाहता ह्या तिन्ही विचारधारा स्वतंत्र भारताचा ६५ वर्षाचा इतिहास पाहता त्यांच्या निर्मात्यांच्या नंतर पराभूतच  झाल्या आहेत. आणि त्यांचे अनुयायी किंवा समर्थक हेच त्याला कारणीभूत आहेत.

आपापले निर्माते महापुरुष 'देव' बनवून आणि त्या विचारधारेला 'धर्म' बनवून त्या संकल्पना कालबाह्य कशा होतील हेच आपण पाहत आलो.

परिवर्तनशीलता हा निसर्गाचा नियम आहे परंतु इथे बदल घडण्याची शक्यता च नाही. सारे काही जैसे थे. धर्म-देव जसे दोन-तीन हजार वर्षापूर्वीचे विचार-तत्वज्ञान पांघरून जुनाट बुरसटून राहिल्यात त्याचप्रमणे ह्या विचार प्रणाल्या देखील कालबाह्य होत आहेत. कारण देव आणि धर्म ह्यांना चिकित्सा आणि परिवर्तन सहसा मान्य होत नाही !

हे तिघेही निर्माते जर आज अस्तित्वात असते तर त्यांनी आजच्या राष्ट्र आणि समाज हिताच्या दृष्टीने आवश्यक पावले उचलून नवे विचार मांडून ह्या विचार धारा ची पुनर्रचना केली असती. अथवा जर अनावश्यक असतील तर बरखास्त देखील केल्या असत्या. उदा. गांधीजींची कॉंग्रेस बरखास्त करण्याची सूचना.

आजच्या परिस्थितीचा विचार केल्यास ह्या तिन्ही विचारधारेच्या अनुयायाना परिवर्तनशील राहून नव्या कालानुरूप बदल घडवून ह्या विचारधारांचे आधुनिकीकरण करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. अन्यथा व्यवहारी राजकारणाच्या दावणीला बांधून घेऊन त्यांचा अंत निश्चित आहे.
 
राजकारणाचा विचार केल्यास ह्या प्रमुख विचारधारांचा आजवरचा प्रवास हा निराशामय असल्याचे चित्र आहे अन्यथा आज सगळीकडे प्रादेशिक पक्षांचा सुळंसुळाट आणि आघाडी सरकारांचे चित्र दिसले नसते. तसेच समाजामध्ये गांधीवादी, हिंदुत्ववादी आणि आंबेडकरी जनतेमध्ये अशी उभी फूट पडली नसती.  

ह्या विचारधारांशी बांधिलकी असणारे जे विद्वान बुद्धिमंत, विचारवंत आहेत त्यांनी ह्या विनाश घंटेची दखल घेऊन राष्ट्र आणि समाज हिताच्या व्यापक दृष्टीकोनातून योग्य पाऊले उचलणे काळाची गरज आहे कारण नवा 'इझम' जन्माला येणे क्रमप्राप्त आहे.

राकेश पाटील.