Thursday, 29 January 2015

सोशालीस्ट आणि सेकुलर हे शब्द मोदीसरकारने का वगळले ?

हा देश कधीहि धर्म-निरपेक्षच नव्हता आणि नसेल, हि भाषा उलट अधिक उद्दामपणाची आहे.
कॉंग्रेस, भाजप किंवा शिवसेना ह्या राजकीय पक्षांना काय वाटते किंवा ते कोणत्या धर्मियांचे लांगुलचालन वैगैरे करतात हा ज्यांच्या त्यांच्या क्षुद्र राजकारणाचा भाग असेल तो असेल. पण हा देश आणि देशाची राज्यघटना सोशालीस्ट आणि सेकुलर आहे ह्यात काही वाद असण्याची गरज नाही.

मुळात बाबासाहेबांनी सोशालीस्ट आणि सेकुलर हे शब्द प्रिएम्बल मध्ये का घातले नाहीत ह्याचे तेव्हाच विश्लेषण केले होते कि आपली घटना मुळातच समाजवादी आणि धर्म-निरपेक्ष आहे! नंतर ते शब्द घटनेच्या प्रिएम्बलमध्ये मुद्दामहून घालावे लागले ह्यातून कदाचित त्या शब्दांचे महत्व आणि गांभीर्य लक्षात यावे. सध्याचे देशातील धर्मांध सत्ताकारण आणि त्यांची खोडसाळ वक्तव्ये लक्षात घेता घटनेतील समाजवादी आणि धर्म-निरपेक्ष ह्या शब्दांची आजच्या काळात अत्याधिक गरज असल्याचे लक्षात येते.

धर्मांधाना स्वत:चाच वर्चस्ववाद हवा असतो. त्यांना लोकशाही, सर्वधर्मसमभाव, समाजवाद प्रणीत शासन अभिप्रेत नसून धर्मांध हुकुमशाही सत्ता हवी असते. जगभर धर्मांधांनि, क्रूरकर्म्यांनि जो उच्छाद मांडला आहे तो लक्षात घेता भारतातील धर्मांधांच्या छुप्या आकांक्षाना सध्या कोंब फुटले आहेत हे उघड आहे. धर्माधारित राज्य म्हणून आपल्याच सोबत स्थापित झालेल्या पाकिस्तानची काय दुरवस्था झाली हे वेगळं सांगायला नको!

कालच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमातून राज्यघटनेतील (secular, socialist) सेकुलर, समाजवादी हे शब्द (चुकून) मोदीसरकारने वगळले आणि दिल्लीतील भाषणात ओबामांनी भारत धर्मांधतेच्या मार्गाने गेल्यास बरबाद होईल असा इशारा देताना त्यांनी महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, बाबासाहेब आंबेडकर, कैलाश सत्यार्थी ह्या महान भारतीयांसोबतच (अल्पसंख्यांक समुदायातील) शाहरुखखान, मेरीकोम, मिल्खासिंग ह्यांचा आवर्जून उल्लेख केला. ओबामांनी दिलेलि हि चपराक त्यांना आमंत्रित करणाऱ्यांनीच गांभीर्याने घ्यायला हवी. सोनारानेच कान टोचलेले बरे असतात, असं म्हणतात!

Friday, 23 January 2015

"मुस्लिम लोकसंख्यावाढीचा दर पाच टक्क्यांनी घसरला!"

"मुस्लिम लोकसंख्यावाढीचा दर पाच टक्क्यांनी घसरला!"

खरंतर अशी हेडलाईन असायला हवी होती. पण सध्याच्या सरकारची आणि त्यांच्या मीडियाची मानसिकता पाहता ज्या प्रकारच्या बातम्या आणि हेडलाईन आल्या त्यातून धार्मिक उन्माद आणि तेढ वाढविण्याचीच प्रवृत्ती समोर येते.

२००१-२०११ या दशकात लोकसंख्यावाढ किती झाली ह्याचा तो रीपोर्ट आहे.

देशातील मुस्लिमांची एकूण संख्या १३.४ टक्क्यांवरून वाढून १४.२ टक्के इतकी झाली आहे. म्हणजे ०.८% एवढी वाढ झाली.
देशातील लोकसंख्या वाढीचा सरासरी दर १८ टक्के आहे तर मुस्लिमांच्या लोकसंख्येत २४ टक्क्यांनी वाढ झाली आहे, असं ती आकडेवारी सांगते. 


पण १९९१-२००१ ह्या नव्वदच्या दशकापेक्षा सध्याच्या दशकात मुस्लिमांच्या लोकसंख्या वाढीचा दर पाच टक्क्यांनी घसरला आहे. 


हे जास्त महत्वाचे आणि स्वागतार्ह आहे, पण त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे का ? मुस्लिम समाजात देखील एकविसाव्या शतकाचे आणि ग्लोबलायझेशनच्या आधुनिकतेचे वारे वाहत असल्याचे ते लक्षण आहे. ह्या बदलत्या मुस्लिम मानसिकतेला अधिकाधिक बळ द्यायला हवे.

Thursday, 1 January 2015

'पिके'

काल 'पिके' पाहिला.

विषय महत्वपूर्ण असूनही त्यामानाने सिनेमा यथातथाच आहे. संवाद, अभिनय ह्या सर्वच स्तरावर 'पिके' सामान्य फिल्म आहे. तरीही सिनेमा एन्जॉय करण्यासारखा आहे आणि बर्यापैकी प्रबोधनात्मकही आहे. ह्या सिनेमावर 'विशिष्ठ' धर्मियांनी उठवलेला आवाज अवास्तव असल्याचे लक्षात येते. खरंतर असं करून 'पिके'च्या प्रसिद्धीत हातभार लावण्याचेच कार्य त्यांनी केले. 

'पिके' जगातील सर्व धर्मातील धार्मिक शोषण, धर्मांधता आणि अंधश्रद्धा ह्या महत्वाच्या विषयावर भाष्य करतो. पण तरीही सिनेमा त्या विषयाला योग्य न्याय देत नाही असं दिसते. 'पिके'च्या एलियनच्या भूमिकेतील अमीर देखील अभिनयात कमी पडलाय. परग्रहावरील एलियन ह्या संकल्पनेचा देखील भयंकर संकोच झाला आहे. शेवटी 'पिके' आणखी काही एलियन घेऊन परत येतोय असे दाखविल्याने सिनेमाचा शेवटही रटाळ झालाय.

मुळात धार्मिक शोषणाला उघडे पाडताना अमीर खानला 'पिके' नावाच्या एका 'एलियन'च्या मध्यवर्ती भूमिकेत दाखविले आहे. कदाचित इथेच सगळा घोळ झालाय. आमच्या धर्मावर भाष्य करणारा हा अमीर खान कोण लागून गेलाय? ह्या मानसिकतेचे शिकार असलेले लोक्स सालाबादप्रमाणे आपल्या धर्माचा बंडाचा झेंडा घेऊन उभे राहिले आणि त्यातून 'पिके'ला प्रचंड प्रसिद्धी आणि यशही मिळाले, असं म्हणावं लागेल.

पण ह्या 'विशिष्ठ' धर्मीयांची बोंब अवास्तव आहे कारण सिनेमा हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन आदि सर्व धर्मांतील अंधश्रद्धा आणि धार्मिक शोषण ह्या मुलभुत समस्येवर हल्लाबोल केला आहे. मंदिर, मशीद, चर्च आदि सर्व धार्मिक स्थळे आणि त्यातील धर्माचे ठेकेदार ह्यांनी ईश्वराच्या नावावर सामान्य माणसाचे शोषण करणारी जी समांतर व्यवस्था उभी केली आहे तिचा पर्दाफाश 'पिके' करतो.

धर्माच्या स्वयंघोषित ठेकेदाराच्या भूमिकेत दाखविलेल्या 'तपस्वी' (सौरभ शुकला) ह्या पात्राला 'पिके' अमीर खान आव्हान देतो आणि वादविवादात त्याला मात देऊन त्याचे ढोंग उघडे पाडतो. हा पर्दाफाश सर्वधर्मीय प्रातिनिधिक स्वरूपात दाखविला आहे. त्याच पद्धतीत तो अस्तित्वात आहे आणि तसंच ते अभिप्रेत आहे.

पण त्यावर 'विशिष्ठ' धर्माला टार्गेट केल्याचे आरोप केला गेला. त्यातच अनुष्का शर्मा (हिंदू) आणि सुशान्तसिंग राजपूत (मुस्लिम) ह्यांची बेल्जियम मध्ये प्रेमकथा दाखवून शेवटी त्यांचे मिलन हा आणखी लव्ह-जिहादचा मुद्दा ठेकेदारांना उपलब्ध झाला. तपस्वीचे थोतांड उघडे पडणे आणि त्यातून एक हिंदू-मुस्लिम किंवा भारत-पाक प्रेमकथेचा विजय होणे अशी थीम असल्याने 'विशिष्ठ' धर्मातील ठेकेदारांना 'पिके' सिनेमा झोंबला असल्याची शक्यता आहे.

खरंतर 'तपस्वी' सर्व धर्मातील ठेकेदारांचे प्रतिनिधित्व करतो. अलीकडेच आसाराम, निर्मलबाबा, रामपाल, इ. तपस्वींचे पेवच आपल्याकडे फुटल्याने तपस्वी 'विशिष्ठ' धर्मीय दाखविला असेल तर त्यात काही वावगे वाटण्याचे कारण काय?

बरं, ती 'आपली' अनुष्का शेवटी तिच्या प्रेमात पडलेल्या त्या 'पिके' अमीर खानशी प्रेम किंवा लग्न वैगैरे न करता 'आपल्या' सुशांत सिंगच्या प्रेमात पडते. तोही तिला धोका वैगैरे न देता, पाकिस्तानातून आपल्या देशात तिला भेटायला येतो, ह्यात लव्ह जिहाद वैगैरे हिंदू-मुस्लिम धोका आपल्या ठेकेदारांनी शोधून काढला, त्याबद्दल त्यांच्या संशोधनबुद्धीचे कौतुक करावे तितके थोडकेच! कारण ह्या मंडळीना अमीर, सलमान, शाहरुख ह्या मुस्लिम अभिनेत्यांनी पडद्यावर करण, अर्जुन, चुलबुल पांडे अशी हिंदू नावे घेऊन अभिनय केला तरीही तो लव्ह-जिहाद भासतो आणि हिंदू अभिनेत्यांनी (इथे सुशान्तसिंग) पडद्यावर मुस्लिम नावे (इथे सर्फराज) घेऊन अभिनय केला तरीही तो लव्ह-जिहाद वाटतो. ती  अभिनेत्री पडद्यावर हिंदू किंवा पडद्यामागे हिंदू असली कि झालं. म्हणजे, ह्या चारपैकी कोणतेही परम्युटेशन कॉम्बिनेशन असलं तरीही आपल्या 'विशिष्ठ' धार्मिक ठेकेदारांचा सनातन लोचा झालेला असतोच.

एकंदरीत एका महत्वपूर्ण समस्येवर भाष्य करणारा एक सामान्य दर्जाचा सिनेमा असंच 'पिके'चे विश्लेषण असेल तरीही तेवढाच डोस आपल्या 'विशिष्ठ' धर्माच्या ठेकेदारांना हादरवून सोडतो, हे उल्लेखनीय आहे. अशा सिनेमावर अवास्तव गदारोळ माजविणारे 'विशिष्ठ' धर्मातील ठेकेदार, त्यांच्या दुकानदारीवर 'पिके'ने केलेला हल्ला पचवू शकले नाहीत, हेच स्पष्ट होते! ह्यातच धार्मिक शोषणाच्या महत्वपूर्ण विषयाचे आणि त्यावर भाष्य करणाऱ्या 'पिके'चे यश सामावलेले आहे, एवढं नक्की.

( ता.क. : हा लेख लिहिताना 'विशिष्ठ' शब्दाच्या धार्मिक पार्श्वभूमीची सांप्रतकाळी अदलाबदल किंवा उलथापालथ होत असल्याचे सतत जाणवत होते.)