Wednesday, 2 December 2015

'भन्साळीचे दु:स्वप्न' ह्या जयराज साळगावकर ह्यांच्या लेखावरील प्रतिक्रिया



'भन्साळीचे दु:स्वप्न' हा जयराज साळगावकर ह्यांचा लेख रविवारच्या लोकरंग मध्ये प्रसीद्ध झाला आहे. त्यानिमित्ताने हा पत्रप्रपंच.

'पिंगा ग पोरी पिंगा' हे 'बाजीराव-मस्तानी' मधलं गाणं कोणत्याही हिंदी सिनेमाला साजेसं असं छानच आहे. एक नितांतसुंदर कलाकृती असंच त्या गाण्याचं वर्णन करावं लागेल. काशीबाईच्या भूमिकेतील प्रियांका चोप्रा आणि मस्तानीच्या रोलमध्ये दीपिका पदुकोन दोघींनी त्या गाण्याला योग्य तो न्याय दिलाय. हिंदी गाणं असूनही मराठी बाज टिकविण्यात दिग्दर्शक बऱ्यापैकी यशस्वी आहे. वेशभूषा कोस्चुम्स वगैरे देखील उत्तम. गाणं एका कौटुंबिक आणि मुख्यत: महिलांसाठी मर्यादित अशा प्रकारच्या कार्यक्रमातील आहे. व्यावसायिक हिंदी सिनेमा असल्याने सिनेम्याटीक लिबर्टी नृत्य-दिग्दर्शकाने घेतली असेल तर त्यात काही वावगं नाही. अगदी छानपैकी अंगभर नऊववारी वगैरे नेसून, सालंकृत मंगळसुत्रादि सौभाग्यलेणी आणि पारंपारिक अलंकाराभूषणे सजवून काशीबाईनि नृत्यकलानैपुण्य सादर केलं आहे. कुठेही ह्या गाण्याला 'आयटम सॉंग' चं सवंग स्वरूप नाही. उथळ, अश्लील अंगप्रदर्शन तर मुळीच नाही. नेहमीच्या पारंपारीकतेतून थोडा मोकळा श्वास घेवून एक मॉडर्न कलाकृती पेश केली आहे.

पण तरीही भन्साळीच्या 'बाजीराव-मस्तानी'वर वादंग माजला आहे आणि त्याचे उदाहरण म्हणजे साळगावकर ह्यांचा लेख. ते स्वत: बाजीरावाचे चरित्रकार असल्याने ह्या विषयातील त्यांची भूमिका गांभीर्याने घ्यायला हवी. मीडियामधील चर्चेत सुद्धा आपल्या भावनांशी खेळ वगैरे झाल्याने त्यांनी सदर प्रकरणात अत्यंत तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

ते म्हणतात, " ...काशीबाई आणि मस्तानी या एकत्र नांदल्याच नाहीत तर त्या एकत्र कशा नाचतील? ...पेशवा बाजीराव यांची पत्नी आणि मस्तानी ह्यांना पडद्यावर एकत्र नाचताना पाहून हसावे की रडावे ते कळत नाही. " आणि हाच सर्व विरोधक मंडळींचा मुद्दा आहे. पेशव्याची धर्मपत्नी काशीबाई त्या मस्तानीच्या बरोबर नाचते म्हणजे काय? तेही 'पिंगा ग बाई पिंगा' ह्या पारंपारिक कौटुंबिक कार्यक्रमच्या गाण्यावर नाचते ? इथे विशिष्ट समाजाच्या जातीय अस्मितेच्या वर्चस्ववादि भूमिकेतून हा वाद निर्माण झाल्याचे उघड आहे. "प्रस्तुत सिनेमातील गाणे ड्रीम सिक्वेन्स, स्वप्नवत किंवा सिनेमाच्या शेवटी ते एक गोड इफेक्ट म्हणून टाकले आहे, असा कोणत्याही प्रकारचा बचाव भन्साळी यांनी केला तरी तो मान्य होऊ शकत नाही." अशी टोकाची भूमिका साळगावकर ह्यांनी त्याचमुळे घेतली आहे.

अलीकडे एका चर्चेमध्ये "मस्तानी बाजीरावाच्या आयुष्यात फक्त १७ महिने होती." असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. बाजीराव पेशव्याचा जीवनकाल १८ ऑगस्ट १७०० ते २८ एप्रिल १७४० असा आहे. मस्तानीदेखील बाजीरावाच्या निधनानंतर लवकरच मृत्यू पावली. तिचा जीवनकाल १७०० ते १७४० असा आहे. बाजीरावाने छत्रसालच्या बाजूने बंगशचा पराभव केला तो १७२९ मध्ये. बाजीराव-मस्तानीचा विवाह तेव्हाच झाला असावा. त्यांचा मुलगा समशेर बहाद्दर ह्याचा जन्म १७३४चा. ह्यातून मस्तानी बाजीरावाच्या आयुष्यात फक्त १७ महिने होती हे गणित कसं सोडवायचं? कदाचित बाजीरावाच्या लष्करी मोहिमा-स्वाऱ्या ह्यांचा कालखंड वजा करून जर हे १७ महिने मस्तानीच्या वाट्याला उरत असतील! पण त्यातून इतिहासकारांना नक्की काय सिद्ध करायचंय? इतिहासात वैवाहिक सहजीवनाची गणितं अशी मांडायची असतात? दुसरं मस्तानी स्वत: छत्रसाल राजाची राजकन्या होती. तिची आई मुस्लिम असेल तरी मस्तानीदेखील बाजीराव पेशव्याची धर्मपत्नीच असल्याने तिचा इतिहास डावलण्याचे कारण काय?

"मी ‘अजिंक्य योद्धा बाजीराव’ हे बाजीरावाचे चरित्र लिहिताना मस्तानीबद्दल योग्य तो आदर बाळगून (असे पुस्तकात सुरुवातीला नमूद करून) तिचा उल्लेख टाळला आणि योद्धा बाजीरावाचे चरित्र लिहिले." असं साळगावकर म्हणतात. २० वर्षाच्या कारकिर्दीत ४१ लढाया जिंकणाऱ्या बाजीरावाच्या आयुष्यात सुमारे १०-१२ वर्षे आणि अखेरपर्यंत अविभाज्य अंग असलेल्या मस्तानीला वगळून बाजीराव पेशव्याचं चरित्र, इतिहास पूर्ण होतो? कि इतिहासाचा विपर्यास होतो? दुसरीकडे भन्साळीला "ऐतिहासिक सत्यापासून फार दूर जाऊन चित्रपटाची कथा रचण्याचे स्वातंत्र्य त्यांना नाही. ऐतिहासिक वास्तव तर ते डावलू शकत नाहीत. त्यात वाट्टेल ते फेरफारही करू शकत नाहीत." असा सल्ला द्यायचे मात्र ते विसरले नाहीत.

एकीकडे "इतिहासातील घटनांवर कथा, कादंबरी, नाटय़ किंवा चित्रपट लिहिताना तर अधिक संशोधन करावे लागते." असं ते म्हणतात आणि तिथेच "भन्साळी यांनी ना. सं. इनामदारांच्या ‘राऊ’ या कादंबरीवरच चित्रपट बेतण्याची मूलभूत चूक केली आहे. कारण सहसा कथा-कादंबऱ्यांतून बाजीरावाचे चित्रण हे बाजीराव-मस्तानी प्रेमप्रकरणापुरतेच मर्यादित असते." अशी उफराटी मांडणीहि स्वत:च करतात! बरं, इनामदारांच्या 'राऊ' विषयी कुणी आक्षेप घेतल्याचे ऐकिवात नाही. कदाचित आमच्या अस्मितेच्या इतिहासात आमच्या व्यतिरिक्त इतर कुणीही लुडबुड करू नये असा अंतस्थ मतप्रवाह असावा कि काय अशी शंका आल्याशिवाय राहत नाही. कारण "टॉलरन्सच्या नावाखाली काहीही सहन करीत राहिलो तर स्वाभिमानच काय, पण अस्तित्वसुद्धा गमवायची पाळी येईल!" असा इशाराही त्यांनी दिला आहे.

"त्या काळी दरबारातील नाचाची परंपरा ही एका समाजापुरती मर्यादित होती. राजघराण्यातील स्त्रिया तर निश्चितच नाचत नसत!" हे आणखी एक अजब तर्कट साळगावकरांनी मांडले आहे. खरंतर आपल्या महान संस्कृतीत अगदी प्राचीन रामायण-महाभारत काळापासूनच नृत्य-चित्र-गायन-वादन इत्यादी कलाप्रकारात राजघराण्यातील राजकन्या किंवा राजस्त्रिया पारंगत असल्याचे दाखले आहेत. पेशव्यांच्या कुलीन स्त्रियांना पेशवाईच्या काळातच नृत्यबंदी सुद्धा असेल तर तो एक वेगळाच मुद्दा!

शेवटी साळगावकर ह्यांनी मांडलेला सर्वात महत्वाचा मुद्दा हा कि, "मस्तानीला बाजीरावाच्या कुटुंबाने, अगदी त्याचे जिवलग बंधू चिमणाजी ह्यांनीसुद्धा अव्हेरले होते... चिमणाजींनी मस्तानीला अटक केली, ह्या धक्क्याने बाजीरावाने दूर रावेरला एकांतवासात जाऊन राहणे पसंत केले आणि नर्मदेच्या पुरात पजेपोटी उडी घेऊन जवळ जवळ आत्महत्याच केली. फुप्फुसात पाणी जाऊन त्यांना न्यूमोनिया झाला होता."

त्या काळातील पेशवाईतील धार्मिक-जातीय कट्टरता किती टोकाची असेल त्याचा आरसाच 'पिंगा'च्या निमित्ताने उघड झालेल्या ह्या जातीय अस्मितेने दाखविला आहे. स्वत: बाजीरावाने उद्वेगाने "मस्तानीपासून मुलगा झाला म्हणून काय झालं, त्याची मुंज झालीच पाहिजे!" असे उद्गार तेव्हा काढले होते! बाजीराव पेशव्यासारखा अजिंक्य योद्धा ह्या गृहकलहापुढे पुरता हरला, खचून गेला आणि ऐन चाळीशीत अकाली निवर्तला. मस्तानीचा घात करण्यासाठी अर्धांगिनी काशीबाई, बंधू चिमाजीअप्पा आणि सुपुत्र नानासाहेब ह्यांनी केलेली कटकारस्थाने देखील सर्वश्रुत आहेत. पेशव्याची धर्मपत्नी असूनही केवळ तीचं 'यावनी' असणे पेशवे खानदान आणि पुण्यातील कर्मठ वैदिकांच्या धर्मवेडेपणाच्या आड आल्यानेच बाजीराव-मस्तानीचा दुर्दैवी देहांत झाला हि वस्तुस्थिती साळगावकरांच्या वरील लिखाणातून स्पष्ट होते. संजय लीला भन्साळीने त्या दोघींच्या समूहनृत्यापेक्षा ह्या कळीच्या विषयाला चित्रपटात हात घातला असेल तर ते ह्या मंडळींच्या पचनी पडेल काय? आजही ह्या धर्मवेडेपणाच्या अस्मिता किती टोकदार आहेत ते लक्षात घेता साळगावकर म्हणतात त्याप्रमाणे "दुखावलेल्या मनांची जागा भडकलेली डोकी घेतील आणि हा एकंदर समाजस्वास्थ्याचा विषय होईल." !!!

बाजीराव पेशव्यासारखा एक कर्तबगार रणधुरंधर सेनानी ज्याच्या अजिंक्य शौर्याची तुलना नेपोलियनशी होते, त्याच्या वाट्याला तेव्हा जीवित आयुष्यात आणि सध्या चित्रपटातदेखील जी अवहेलना आली ती अत्यंत दुर्दैवी आहे. इथेच नेपोलियन आणि त्याला वैयक्तिक स्वातंत्र्य देणाऱ्या टॉलरंट कल्चरने आपल्या एत्तदेशीय संस्कृतीवर मात केली असावी!

राकेश पाटील (पालघर)

No comments:

Post a Comment