ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) ह्या मुळच्या हैद्राबादी पक्षाने महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका लढवून २ जागा जिंकण्याचा भीमपराक्रम करून दाखविला आहे. पैकी एक मराठवाड्यात तर दुसरी खुद्द मुंबईत जिंकली आहे. काही जागांवर त्यांचा निसटता पराभव झाला आहे. मुस्लिम मतांचे राजकारण करणारा ह्या पक्षाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडविली आहे. तसेच एमआयएमच्या महाराष्ट्रातील ह्या यशामुळे राजकीय पक्ष घोर चिंतेत पडले आहेत.
AIMIM चा पूर्वेतिहास
MIMचे पूर्ण नाव आहे
मजलिस-ए-इत्तेहादुल-मुसलमीन. स्वातंत्रयपूर्व काळात हैदराबाद संस्थानात १९२७ साली MIM ची स्थापना झाली. वेगळ्या हैदराबादच्या भूमिकेमुळे रझाकार
ह्या कासीम रिझवीच्या संघटनेशी संबध असल्याने हैदराबादच्या विलीनीकरणानंतर MIM वर बंदी घालण्यात आली. रझाकार लीडर कासीम रीझाविला १९४८ ते
१९५७ पर्यंत तुरुंगवास झाला आणि नंतर त्याची रवानगी पाकिस्तानात झाली. संघटनेची सूत्रे अब्दुल
वाहिद ओवैसी आल्यानंतर ऑल इंडिया
मजलिस-ए-इत्तेहादुल-मुसलमीन ह्या नावाने संघटना चालु राहिली. पुढे सुलतान
सलाहुद्दीन ओवैसी आणि सध्या असदुद्दिन ओवैसीच्या नेतृत्वाखाली AIMIM चे राजकरण चालू आहे.
AIMIM चा पहिला नगरसेवक १९६० मध्ये
हैदराबाद महापालिकेत विजयी झाला. सुलतान सलाहुद्दिन ओवेसी यांनी १९६२ मध्ये पथ्थरगट्टी आणि १९६७
मध्ये चारमिनारमधून अपक्ष आमदार म्हणून विजय मिळविला. १९७२ आणि १९७८ मध्येही ते
विजयी झाले. १९८४ ते २००४ पर्यंत ते हैदराबादमधून लोकसभेमधून सतत विजयी झाले.
त्यानंतर असदोद्दीन ओवीसी हे निवडून येत
आहेत. आंध्राशिवाय कर्नाटक राज्यातही या पक्षानं शिरकाव केला. AIMIM ने के. प्रकाशराव, ए.
सत्यनारायण आणि अल्लापल्ली पोचेयी या तीन हिंदू उमेदवारांना महापौर म्हणून संधी
दिली. ए. मुरलीधर रेड्डी यांनी एमआयएमच्या तिकिटावर आमदारकीची निवडणूक
लढविली. २०१३ मध्ये व्ही. भानुमती या
महिला उमेदवारानं AIMIM’च्या तिकिटावर स्थानिक स्वराज्य
संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या हाजिरा सुलताना यांचा १२०० मतांनी पराभव
केला.
मुस्लिम
संघटना म्हणून जातीयवादाचा ठपका असलेली हि संघटना हिंदुना प्रतिनिधित्व देते हे
लक्षणीय आहे. महापौर पदासाठी तसेच स्थानिक निवडणुकांमध्ये अनेकदा हिंदूना
प्रतिनिधित्व देऊन AIMIM ते दाखवून दिले आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीतील AIMIM चे यश आणि प्रतिक्रिया
महाराष्ट्राच्या विधासभेत प्रथमच AIMIMने २४ विधानसभेच्या जागा लढवून औरंगाबाद आणि भायखळा ह्या २ जागा जिंकल्या. एकूण ४,८९,६१४ इतकी ०.९% मते मिळविली. एकूण २४ उमेदवारांपैकी सुमारे २0% उमेदवार मुस्लिमेतर (हिंदू) समाजातील होते हे विशेष.
१. नांदेड दक्षिण मध्ये AIMIM ३४,५९० मते मिळवून तिसऱ्या
क्रमांकावर राहिली. शिवसेना (४५,८३६) विजयी,
भाजप (४२,६२९) दुसऱ्या तर काँग्रेस (३१,७६२) चौथ्या क्रमांकावर राहिली.
२. सोलापूर मध्य मध्ये कोंग्रेसच्या शिंदेना ४६,९०७ तर AIMIM ला ३७,१३८ मते मिळाली होती. शिवसेनेला ३३,३३४ मते तर भाजपला २३,३१९ मते मिळाली होती.
३. परभणीत AIMIM ला दुसऱ्या क्रमांकाची ४५,०५८ मते मिळाली होती. शिवसेनेला ७१,५८४ विजयी मते तर तिसऱ्या नंबरवर भाजपला ४२,०५१ मते मिळाली होती. राष्ट्रवादी आणि काँग्रेस चौथ्या आणि पाचव्या नंबरवर होते.
४. औरंगाबाद पश्चिम मध्ये AIMIM चे गंगाधर गाडे (३५,३४८) मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिले. शिवसेना (६१,२८२) विजयी , भाजप (५४,३५५) दुसऱ्या क्रमांकावर आणि काँग्रेस (१४,७९८) चौथ्या नंबरवर राहिली.
५. औरंगाबाद पूर्व मध्ये AIMIM ६०,२०८ मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर राहिली. भाजप (६४,५२८) विजयी , काँग्रेस (२१,२०३) तिसऱ्या क्रमांकावर आणि सेना (११,४०९) चौथ्या नंबरवर राहिली.
६. औरंगाबाद मध्य मध्ये AIMIM ६१,८४३ मते घेऊन विजयी झाली. सेना (४१,८६१) दुसऱ्या क्रमांकावर, भाजप (४०,७७०) तिसऱ्या, राष्ट्रवादी (११,८४२) चौथ्या, बसप (११,०४८) पाचव्या आणि काँग्रेस (९,०६३) सहाव्या नंबरवर राहिली.
७. वांद्रे पूर्व मध्ये AIMIM २३,९७६ मते घेऊन तीसऱ्या क्रमांकावर राहिली. शिवसेना (४१,३८८) विजयी , भाजपा (२५,७९१) दुसऱ्या आणि काँग्रेस (१२,२२९) चौथ्या नंबरवर राहिली.
८. व्हर्सोवा मध्ये AIMIM २०,१२७ मते घेऊन तीसऱ्या क्रमांकावर राहिली. भाजप (४९,१८२) विजयी, काँग्रेस (२२,७८४) दुसऱ्या नंबरवर राहिली.
९. मुंबादेवी मध्ये AIMIM १६,१६५ मते घेऊन तीसऱ्या क्रमांकावर राहिली. काँग्रेस (३९,१८८) विजयी, भाजप (३०,६७५) दुसऱ्या नंबरवर राहिली.
10. भायखळ्यात
AIMIM चे एड. वारीस पठाण २५,३१४ मतांनी विजयी झाले. भाजपचे मधु चव्हाण (२३,९५७) दुसऱ्या, कॉंग्रेसचे
मधु चव्हाण (२२,०२१) तिसऱ्या, अभासेच्या गीता गवळी (२०,८९५) चौथ्या आणि मनसेचे संजय
नाईक (१९,७६२) पाचव्या क्रमांकावर
राहिले.
वरील प्रमाणे सर्व २४ मतदारसंघात कमीअधिक प्रमाणात 'AIMIM' चे पहिल्याच प्रयत्नातील यश अधोरेखित होताना दिसते. एमआयएम’नं राज्य विधानसभा निवडणुकीत २४ जागांवर उमेदवार उभे केले होते. औरंगाबाद मध्यमधून इम्तियाज जलील आणि मुंबईतील भायखळा मतदारसंघातून वरीस युसूफ पठाण या दोघांनी ‘AIMIM’ च्या विजयाचा झेंडा फडकावला.
भायखळा मतदारसंघात काँगे्रसचे मधू चव्हाण व भाजपाचे मधू ऊर्फ दादा चव्हाण यांच्यात थेट लढत होती. शिवाय अखिल भारतीय सेनेच्या श्रीमती गीता गवळीसुद्धा रिंगणात होत्या. पण वारीस पठाण यांनी या तिन्ही मातब्बर उमेदवारांना धूळ चारली.
औरंगाबाद मध्यमधून AIMIMचे इम्तियाज जलील ६१,८४३ मते घेऊन विजयी झाली. सेनेचे प्रदीप जैस्वाल ह्यांना (४१,८६१) पराभवाचा फटका बसला. भाजप तिसऱ्या, राष्ट्रवादी चौथ्या, बसप पाचव्या आणि काँग्रेस सहाव्या नंबरवर राहिली.
औरंगाबाद पूर्व मतदारसंघात ‘एमआयएम’चे उमेदवार गफ्फार कादरी यांना मिळालेल्या भरघोस मतांमुळं शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांना अनामत रक्कम गमवावी लागली. सोलापूर मध्य मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना ‘एमआयएम’च्या उमेदवारामुळं अखेरपर्यंत झुंजावं लागलं.
‘AIMIM’ च्या महाराष्ट्रातील यशाचे विश्लेषण केल्यास कदाचित सर्वपक्षीय ‘AIMIM’ विरोधाचे रहस्य उलगडू शकेल. राज्य विधानसभा निवडणुकीत ‘AIMIM’ च्या २४ उमेदवारांपैकी १४ जण पहिल्या तीन क्रमांकामध्ये राहिले. ‘AIMIM’ ने दोन आमदार निवडून आणले. तीन मतदारसंघात त्यांचे उमेदवार दुस-या क्रमांकावर होते. सोलापुर शहर मध्य, औरंगाबाद पूर्व व परभणी या तीन मतदारसंघात ‘AIMIM’ चे उमेदवार क्रमांक दोनवर होते. आणखी पाच मतदारसंघात ‘AIMIM’ चे उमेदवार तिस-या नंबरवर होते. नांदेड दक्षिण, कुर्ला, वर्सोवा, वांद्रे पूर्व व मुंब्रा या मतदारसंघात ‘AIMIM’ चे उमेदवार तिस-या क्रमांकावर होते.
दलित आणि मुस्लिम हे बेरजेचे राजकारण देखील ‘AIMIM’ ने रिपाइं पँथरचे नेते गंगाधर गाडे यांच्याशी युती करून औरंगाबाद (प.) मध्ये यशस्वी करून दाखविले. निर्णायक यश मिळाले नसले तरी गंगाधर गाडे यांनी लक्षणीय मते घेऊन दलित+मुस्लिम राजकारणाची नवी समीकरणे उदयास घातली आहेत.
अर्थात, ‘AIMIM’ ला ह्या निवडणुकीत लक्षणीय यश मिळाल्याचे दिसते. त्यामुळे प्रस्थापित राजकीय पक्षांकडून 'AIMIM ' वर आगपाखड होताना दिसतेय.
'महाराष्ट्रातील या निवडणुकीत हिंदूंना संपविणारी देशविघातक शक्ती तोंड वर काढताना दिसते आहे. देशविघातक शक्ती वाढत असताना देशातील हिंदुत्ववादी विचारसरणीच्या सेना आणि भाजपने एकत्र राहण्याची गरज असल्याचे वक्तव्य सेनाप्रमुखांनी केले आहे. भाजपच्या प्रवक्त्याच्याही तोंडी तीच 'एमआयएमचा वाढता धोका' इत्यादी भाषा आहे. एकतर देशात हिंदुत्ववादाचे बहुमताचे सरकार आहे आणि राज्यातही हिंदुत्ववादी सरकार अस्तित्वात आले आहे. असे असताना एमआयएमच्या महाराष्ट्रातील शिरकावाने हिंदुत्वाने इतकं हादरून का जावं?
‘AIMIM’ची वादग्रस्त पार्श्वभूमी हे त्याचे कारण असेल. एकीकडे अकबरुद्दिन ओवैसीला त्याच्या धर्मांध वक्तव्यांमुळे ह्याआधी तुरुंगवास झाला आहे आणि त्याबद्दल त्याचा निषेधच व्हायला हवा. पण दुसरीकडे पक्षाचे अध्यक्ष असादुद्दिन ओवैसी हे लोकसभेत खासदार असून संसदेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना संसद रत्न पुरस्कार मिळाला आहे.
पण वादग्रस्त पार्श्वभूमीसाठी हिदुत्ववादी राजकीय संघटना देखील तेवढ्याच प्रसिद्ध आहेत. म्हणून लोकशाही मार्गाने राज्यातील जनतेने एमआयएमला कौल दिला असेल तर त्याचे स्वागत व्हायला हवे. हिंदू धर्माचे राजकारण करणाऱ्या भाजपला किवा सेनेला मिळणारा जनाधार ज्या लोकशाहीत आपण स्वीकारतो त्याच लोकशाहीत AIMIMला मिळणारा जनाधार चिंतेचे कारण का ठरावा?
AIMIMच्या यशाने कॉंग्रेसचेहि धाबे दणाणले आहेत. सुशीलकुमार शिंदेंच्या कन्या, सोलापुरातील आमदार प्रणिती शिंदे ह्यांचे वक्तव्य आणि त्याचे पडसाद सध्या चर्चेचा विषय आहे. AIMIM हा देशविरोधी पक्ष असून त्यांचे नेते भाषणात देशद्रोही किंवा दहशतवाद्यांपेक्षा वेगळं बोलत नाहीत. देशात विभाजन घडवण्याचाच त्यांचा प्रयत्न असल्यानं त्यांच्यावर बंदी घालावी", अशी वादग्रस्त मागणी प्रणिती शिंदे यांनी केली होती.
त्यावर प्रणिती शिंदे यांना ‘AIMIM’ने कायदेशीर नोटीस बजावली आहे. वादग्रस्त वक्तव्याबद्दल येत्या आठ दिवसात माफी मागा; अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्यासाठी तयार रहा, अशा आशयाची नोटीस आमदार शिंदे यांना पाठविण्यात आली आहे.
सोलापुरातील विधानसभा निवडणुकीत प्रणिती शिंदे विजयी झाल्या असल्या तरी तिथे ‘AIMIM’ ने कडवी झुंज दिली होती हे लक्षात घेण्यासारखे आहे. कोंग्रेसच्या शिंदेना ४६,९०७ तर ‘AIMIM’ ला ३७,१३८ मते मिळाली होती. शिवसेनेला ३३,३३४ मते तर भाजपला २३,३१९ मते मिळाली होती.
२००९ सालच्या निवडणुकीत प्रणिती शिंदे ६८०२८, नरसय्या आडम ३४६६४ आणि शिवसेनेचे पुरुषोत्तम बरडे यांना २६५६२ मते मिळाली होती. प्रणिती यांनी आडम यांच्यावर तब्बल ३३ हजार ३६४ मताधिक्याने विजय मिळविला होता. परंतु, त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे खासदार अॅड. शरद बनसोडे यांना प्रणिती यांच्या मतदारसंघातून सुमारे १९ हजार ३६८ मतांचे मताधिक्य मिळाले होते.
‘AIMIM’ चे ह्या यशाने काँग्रेससह इतरांची अडचण का होत आहे हे वरील आकडेवारीतून दिसेल. प्रणिती शिंदेना ‘AIMIM’ च्या शेख तौफिक इस्माईल ह्यांनी चांगलेच झुंजवले असे म्हणता येईल. तसेच कॉंग्रेसची लढत ‘AIMIM’ शी झाली आणि सेना-भाजप तिसऱ्या-चौथ्या नंबरवर फेकले गेल्याचेही दिसते. काँग्रेस आणि सेना-भाजपची इथेच पंचाईत होत असावी. आपल्याला ‘AIMIM’ शी झुंज देतेय हेच मुळात प्रस्थापित पक्षांना पचत नसावे.
‘AIMIM’ वर जातीयवादी
किंवा धर्मांध असल्याचा शिक्का मारला जातोय असे दिसते. त्यावर प्रतिक्रिया
देताना भायखळा इथून निवडून आलेले एड. वारिस पठाण ह्यांनी ‘AIMIM’
ने राज्यात दलित समुदायातील लोकांना
तिकिटे दिल्याचे सांगितले. तसेच पुढील काळात सर्व समाज घटकांना प्रतिनिधित्व देण्याचे संकेत दिले. ‘AIMIM’
ला ख्रिश्चन आणि जैन समुदायातील
लोकांनीही मतदान केल्याची माहिती त्यांनी दिली. ‘AIMIM’ सेकुलर पक्ष असून जातीयवादी
असल्याचा चुकीचा आरोप होत असल्याचे त्यांचे मत आहे.
कळवा-मुंब्रा ह्या मुस्लिमबहुल
मतदारसंघात राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड ह्यांनी ८६,५३३ मतांनी मोठा विजय मिळविला. तिथे सेना ३८,८५० मतांनी दुसऱ्या, ‘AIMIM’ १६,३७४ मतांनी तिसऱ्या,
भाजप मतांनी १२,८१८ चौथ्या क्रमांकावर राहिले. काँग्रेस पाचव्या क्रमांकावर
फेकली गेली. म्हणजेच जितेंद्र आव्हाड हा
पर्याय मतदारांना ‘AIMIM’ पेक्षाही अधिक विश्वासार्ह वाटला असे आपण म्हणू शकतो.
हिंदुत्ववादी राजकीय पक्षांना मिळालेला जनादेश जर आपण लोकशाहीत स्वीकारतो तर 'मुस्लीमवादी' असलेल्या ‘AIMIM’ ला लोकशाहीत मिळालेल्या यशावर टीका कशाला? बरं, हे लोकशाही मार्गाने, निवडणुकीच्या माध्यमातून आणि मतदारांनी मतपेटीतून दिलेले यश आहे. म्हणजेच हा जनादेश आहे. त्याचे स्वागत का व्हायला नको?
लोकशाहीतील मतदार सतत
पर्यायाच्या शोधत असतो. राज्यात ह्या आधी मनसे किंवा समाजवादी पार्टीला मिळालेला
जनाधार आणि आज ‘AIMIM’ ला
मिळत असलेला जनाधार ह्यात काही फरक आहे काय?
प्रस्थापित राजकीय पक्षांच्या आणि
व्यवस्थेच्या अपयशाचे प्रतिबिंब अशा नव्या पर्यायाच्या निवडीत उमटते,
एवढेच.
No comments:
Post a Comment