Thursday, 23 October 2014

मानवतेचा दीप कधी प्रज्वलित होणार हाच यक्षरात्रीच्या दिपोत्सवाचा यक्षप्रश्न


रात्रीच्या अंधाराला मिटवून प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दीप हा मंगलप्रतिक मानला जातो. ह्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दिपोस्तव साजरा करण्याची आपली परंपरा आहे. प्राचीन काळी दिवाळी यक्षांचा उत्सव असल्याने दीपावलीचे मुळचे नाव यक्षरात्री असे होते. अंध:कार दूर सारणारा प्रकाशदीप निर्माण करण्याच्या मानवी प्रतिभेचा हा उत्सव आहे असे म्हणायला हरकत नाही.

अश्मयुगातील रानटी मानव ह्या प्रकाशदिपाच्या सामर्थ्याने अंधारयुगातून बाहेर पडला. आज तेलाच्या त्या दिव्यापासून ते विजेवर चालणाऱ्या रंगीबेरंगी रोषणाईच्या जादुई दुनियेत मानवाने प्रगती केली आहे.

पण आजच्या त्या दीपोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मानवाला आत्मचिंतन करावे लागेल अशी भयावह परिस्थती आहे. भर दिवाळीत पाथर्डी तालुक्यात एका दलित कुटुंबातील तिघांची निघृण हत्या झाली आहे. त्यांच्या मृतदेहाचे छिन्न-विछिन्न तुकडे करून फेकून देणारे नराधम ह्या मानवी समाजात आजही अस्तित्वात आहेत. मग आपण कोणता दीपोत्सव साजरा करतोय?

खरंतर आपण आजही त्या अश्मयुगाच्या अंधारातच चाचपडत आहोत. सभोवताली रोषणाईची मायावी संस्कृती दिसत असली तरीही मनुष्यसमाज मानवतेच्या प्रकाशापासून दूर अंधारात आजही चाचपडत असल्याचे भीषण वास्तव आहे. मानवतेचा दीप कधी प्रज्वलित होणार आणि अमानुष अत्याचाराचा अंध:कार कधी फिटणार हाच यक्षप्रश्न आजच्या यक्षरात्रीच्या दिपोत्सवापुढे उभा राहिला आहे.

No comments:

Post a Comment