Thursday, 23 October 2014

राष्ट्रवादीची हाफचड्डीत उडी आणि सेनेचा दिल्लीत मुजरा


निवडणुकीत महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आणि धर्मनिरपेक्षतेसाठी मतदारांकडे जोगवा मागणारे सेना आणि राष्ट्रवादी निकाल लागताच सत्तेसाठी कसे पलटले ते पहा.

भाजप आणि संघाच्या हाफचड्डीच्या राजकारणावर सडकून टीका करणाऱ्या राष्ट्रवादीला जे मतदान झाले ते कोणत्या मुद्द्यावर? हाफचड्डीच्या विरोधातच ना?
भाजपच्या संधिसाधू राजकारणाला विरोध करून महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी दिल्लीत मुजरा करणार नाही अशी बाणेदार भूमिका घेणाऱ्या शिवसेनेवर मतदारांनी का विश्वास टाकला?
भाजपच्या विरोधातच ना?


पण आज हे दोन्ही पक्ष सत्तेच्या हव्यासापायी सर्व स्वाभिमान, नितीमत्ता गुंडाळून भाजपच्या सत्तेच्या वळचणीला जाताना दिसतात. आता त्यांच्या मतदारांची मानसिकता काय असेल? भाजपच्या, संघाच्या, मोदींच्या विरोधात राष्ट्रवादीला मतदान झाले हे तर सुस्पष्ट आहे. सेनेला सुद्धा भाजपच्या विरोधात मतदान झाले हे मान्य करावे लागेल. पण सेना आणि राष्ट्रवादी भाजपला पाठींबा देऊन त्या मतदारांचा विश्वासघात करीत नाहीत काय? म्हणजेच सेनेला आणि राष्ट्रवादीला मतदान करण्यापेक्षा सरळ भाजपलाच मतदान केल्यासारखे झाले नाही काय?

एकवेळ सेनेचे "घालीन लोटांगण... वंदिन चरण.." समजण्यासारखे आहे. त्यांची विचारसरणी साधारणत: एकच असून निवडणुकीपर्यंत त्यांची प्रदीर्घ युती होतीच. त्यामुळे स्वत:ची मोठ्या भावाची भूमिका सोडून आता छोट्या भावाची भूमिका स्वीकारणे एवढीच छोटीशी तडजोड करून भाजपच्या आश्रयाखाली ते गुण्यागोविंदाने नांदू शकतात.

पण टोकाचा विचारसंघर्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या धर्मनिरपेक्ष, सेकुलर, काँग्रेसी विचाराच्या मतदारांनी हा नवा घरोबा कसा पचवायचा ? संघाच्या धर्मांध हिंदुत्वाच्या विरोधात मतदान करणाऱ्या धर्मनिरपेक्ष मतदारांचे मतदान भाजपला परस्पर बहाल करणारे राष्ट्रवादी खुशाल हाफचड्डी घालून मोकळे झाले! खरंतर विरोधी पक्षात बसून भाजपच्या संघीय अजेंड्याला चाप लावायची भूमिका राष्ट्र्वादिने घेणे अपेक्षित आहे. तसे नसेल तर आता त्या धर्मनिरपेक्षतेच्या मतदारांनी काय करायचे?

No comments:

Post a Comment