Wednesday, 22 October 2014

काँग्रेस विचारसरणीची पीछेहाट का?


लोकसभेतील निर्णायक पराभवानंतर नव्या दमाच्या, मुत्सद्दी आणि धोरणी नेतृत्वाची राज्याला गरज होती. भाजपचा अश्वमेध रोखण्यासाठी समविचारी पक्षांची आघाडी केल्याशिवाय पर्याय नव्हता. युपी-बिहारमध्ये त्याची प्रचीतीही आली होती. पण विधानसभा निवडणुका आल्या तरी काँग्रेसचे राज्यनेतृत्व पराभूत मानसिकतेतून बाहेर पडू शकेले नाही हे वास्तव आहे. खरंतर महाराष्ट्रात कॉंग्रेसचे नेतृत्व सांभाळणारे रणधुरंधर स्वबळावर लढताना केवळ कागदी वाघ असल्याचे उघड झाले असे म्हणता येईल.

१. राज्यातील कॉंग्रेसच्या नेतृत्वाला जनमानसात काय किंमत आहे ते दिसते. प्रदेशाध्यक्ष स्वत:च्या मुलाची डीपोझीट वाचवू शकत नाहीत ह्यातून काय स्पष्ट होते? अशी व्यक्ती कित्येक वर्षे राज्याचे नेतृत्व करतेय जी स्वत:च्या जिल्ह्यात एकही आमदार निवडून आणण्याची जबाबदारी घेउ शकत नाही.
२. राज्याचे मुख्यमंत्री तरी आपल्या जिल्ह्यात किती प्रभाव पाडू शकले? त्यांना स्वत:ला निवडून येण्याची तरी खात्री होती का ह्याबद्दल संशय आहे.
३. प्रचारप्रमुख स्वत:तर पराभूत झालेच आणि त्यांच्या प्रभावक्षेत्रातूनहि कॉंग्रेसचे उच्चाटन झाल्याचे दिसते.

स्वत:च्या प्रभावक्षेत्रात हे नेते प्रभावशून्य झाल्याने राज्यातील काँग्रेस नेतृत्वाविना भरकटत गेल्याचे दिसते. ह्या निवडणुकीत काँग्रेस स्पर्धेतच नसल्याचे चित्र होते. कॉंग्रेसचा पारंपारिक मतदार आणि स्थानिक कार्यकर्ते, उमेदवारांनी नेतृत्वाशिवाय दिलेली लढत असेच ह्या निवडणुकीचे स्वरूप होते.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस नव्या उमेदीने निवडणुकीच्या तयारीला लागली आणि स्वत:चा प्रभाव टिकविण्यात बऱ्यापैकी यशस्वी ठरली. राष्ट्रवादीचे राज्यातील नेतृत्वाने आणि कार्यकर्त्यांनी हि अस्तित्वाची लढाई संपूर्ण ताकदीने लढविली हे मान्य करावे लागेल.

पण निकाल जाहीर होताच भाजपला बिनशर्त पाठींबा जाहीर करण्याची जी लगीनघाई दाखविली त्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये कोणता संदेश जातोय? ह्याचा विचार राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय नेतृत्वाला करायची गरज भासली नसावी. बरं, ह्या राष्ट्रीय नेतृत्वाची ताकद किती? ते स्वत: लोकसभेत पराभूत झालेच, पण आज त्यांच्या प्रभावक्षेत्रात राष्ट्रवादीचा एकही आमदार निवडून आलेला नाही, किंबहुना राष्ट्रवादी त्या सर्व मतदारसंघात दुसऱ्या नंबरच्याही खाली घसरल्याचे दिसून येते.

किमान भाजपच्या कच्छपि लागलेल्या पक्षांची आज काय स्थिती आहे ह्याचे तरी भान बाळगणे गरजेचे होते. महायुतीचे पांडव शेट्टी, आठवले वनवासात तर जानकर, मेटे अज्ञातवासात हद्दपार झाल्याचा ताजा इतिहास आहे. लोकसभेत मोदींना बिनशर्त पाठींबा देणारा मनसे सध्या महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरून झपाट्याने अदृश्य होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आहे. दुसरीकडे शिवसेनेचे आता लहान भावाच्या भूमिकेत अध:पतन झाले आहे. भाजपच्या नादी लागण्याचा नादानपणा राष्ट्रवादीला कुठे नेउन ठेवणार आहे ते येणाऱ्या काळात दिसलेच.

अर्थात, दोन्ही कॉंग्रेसनेतृत्वाच्या कचखाऊ धोरणाने, अविचारी निर्णयांनी आणि एकूणच प्रभावशून्य नेतृत्वाने काँग्रेस विचारसरणीची पीछेहाट झाली असे आपण म्हणू शकतो.

No comments:

Post a Comment