Monday, 22 June 2015

हातभट्टीच्या दारूतून विषबाधा होण्याचे रहस्य काय

हातभट्टीच्या दारूतून विषबाधा होऊन शेकडो लोक मृत्युमुखी पडल्याची घटना कालच घडली. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत हि घटना घडली. हि विषारी दारू ठाणे जिल्ह्यातून किंवा गुजरातमधून आल्याच्याही बातम्या प्रसिद्ध झाल्या. ह्या पार्श्वभूमीवर हातभट्टीच्या दारूतून विषबाधा होण्याचे रहस्य काय असा प्रश्न उभा राहतो.
महागडी देशी-विदेशी दारू न परवडणारा गरीब मजूर वर्ग गल्लीबोळातील हातभट्टीच्या दारूचा ग्राहक आहे. त्यामुळे हातभट्टी अर्थातच बेकायदेशीर असूनही तिचा मोठा पारंपारिक उत्पादक-ग्राहक वर्ग देशात अस्तित्वात आहे, हे वास्तव आहे. त्याची उत्पादनाची पद्धत गावठी तरीही वैज्ञानिक म्हणजेच उर्ध्वपातन म्हणजेच डीस्टीलेशनच आहे.

पारंपारिक हातभट्टीमध्ये उसाची मळी किंवा (काळा गुळ) आणि नवसागर (अमोनियम क्लोराइड NH4Cl )हे मिश्रण काही दिवस आंबवून त्याचे उर्ध्वपातन केले कि गावठी दारू तयार होते. ह्या 'पिव्वर दारू'त विशिष्ठ प्रमाणात पाणी मिक्स करून दारूचे उत्पादन ग्राहकांना उपलब्ध होते. ग्रामीण भागात आणि शहरी गल्लीबोळात हीच गावठी दारू बहुधा उपलब्ध असते. हातभट्टीच्या त्या मिश्रणात संत्री, मोसंबी, आंबा, जांभूळ, इत्यादी फळे टाकल्यास त्या त्या फळाच्या अर्काची चव प्राप्त होते.
मोह किंवा जांभळे टाकून उत्तम प्रतीची दारू बनविली जाते आणि दारूतले दर्दी शौकीन ह्या दारूला 'इंग्लिश दारू'पेक्षाही उच्च दर्जाची मानतात!
मग प्रॉब्लेम कुठे येतो? तर मोठ्या प्रमाणत (हजारो लिटर) ह्या हातभट्टीच्या दारूचे उत्पादन करणारे जे मोठे व्यावसायिक निर्माण झाले आहेत, त्यांनी ह्या दारूच्या उत्पादनाच्या पारंपारिक पद्धतीत लबाड्या करायला सुरुवात केली. त्यासाठी रसायनांचा भडीमार केला जाऊ लागला. युरिया सारखे खत आणि ब्याटरिची (सेल) पावडर देखील हातभट्टीत वापरले जाऊ लागले. अर्थात पारंपारिक उर्ध्वपातनाच्या शास्त्रात आधुनिक रसायनशास्त्राने मोठी घुसखोरी केली... आणि त्यातून विषारी रासायनिक दारूची प्रकरणे गेल्या काही वर्षात उद्भवली.
हातभट्टीच्या दारूत अलीकडे मिथेनॉल ह्या रसायनामुळे प्रचंड जीवघेणी विषारी भेसळ सुरु झाली. हे मिथेनॉल का वापरले जाते?

वर उल्लेख केल्यानुसार उर्ध्वपातनातून निर्माण झालेल्या 'पिव्वर दारू'त विशिष्ठ प्रमाणात पाणी मिक्स करून गावठी दारू ग्राहकापर्यंत पोहोचत असे. नेमका इथे मिथेनॉलने खेमिकल लोचा केला. ह्या 'पिव्वर दारू'त फक्त दोन थेंब मिथेनॉल टाकल्यास सुमारे सातपट जास्त गावठी दारू तयार होऊ लागली! 'थेंबाची दारू' ह्या नावाने हि मिथेनॉलदारू ओळखली जाते. आता खेडोपाडी आणि गल्लीबोळातून हे मिथेनॉल संशोधन पसरल्याने छोटेमोठे हातभट्टीवालेहि सर्रास मिथेनॉलदारूचे उत्पादन करू लागले. त्यातून मिथेनॉलचे 'थेंबाचे' प्रमाण साहजिकच अनियंत्रित होऊ लागले. मिथेनॉलच्या अनियंत्रित वापराने गावठी दारूचे जीवघेण्या विषारी दारूत रुपांतर होत गेले. ह्या विषारी मिथेनॉलदारूचे दुष्परिणाम मुंबईतील मालवणी येथील दुर्घटनेतून पुन्हा उघड झाले.

अर्थात, ह्या गावठी दारूच्या धंद्यावर (तो बेकायदेशीर असल्याने) बंदी आणून हा प्रश्न सुटेल हे फक्त स्वप्नरंजन आहे. हातभट्टीची हजारो वर्षांपासून परंपरा आहे आणि आजही ती टिकून आहे कारण त्याचे मागणी आणि गरजचे अर्थकारण. ग्रामीण (आणि शहरीही) भागातील मोलमजुरी करणाऱ्या फाटक्या लोकांना कायदेशीर कारखान्यातील दारू उपलब्ध आणि परवडणार असेल तर प्रश्नच नाही, परंतु तेही संपूर्ण दारूबंदिसारखे स्वप्नरंजनच आहे. एकीकडे दारूवर प्रचंड कर लादून ती महागडी करून टाकायची, दारूची कारखानदारी वाढवायची आणि दुसरीकडे गरीब श्रमिकांच्या श्रमपरीहाराला विषारीरसायनयुक्त जीवघेणं बनवायचं, ह्या मूर्खाच्या नंदनवनातून बाहेर येण्याचा उपाय काय?

No comments:

Post a Comment