Saturday, 12 September 2015

...आणि मग पुन्हा प्रा. शेषराव मोरेंना "कॉंग्रेसने आणि गांधीजीनी अखंड भारत का नाकारला?" सारखी सुंदर उपरती होईल

प्रा.शेषराव मोरे ह्यांचे "अखंड भारत का नाकारला?" हे संपूर्ण अभ्यासातून सिद्ध झालेले महत्वपूर्ण संशोधन आहे. प्रचंड सावरकरवादी असलेल्या मोरेंनी ह्या ग्रंथात अखंड हिंदुस्तान, फाळणी ह्या हिंदुत्ववाद्यांच्या, सावरकरवाद्यांच्या कळीच्या मुद्द्यावर अत्यंत अभ्यासपूर्ण विश्लेषण केलंय. काँग्रेस, गांधी-नेहरू, लीग, जिना, राष्ट्रवादी मुस्लिम, आझाद, बाबासाहेब, नेताजी इत्यादी सर्व घटकांना त्यांनी विस्तृत कव्हरेज देऊन आपले सिद्धांत पक्के मांडले आहेत. परंतु एक घटक ह्या ग्रंथात आश्चर्यकारकरित्या उपेक्षित राहिलाय, तो म्हणजे मोरेंचाच लाडका सावरकरवाद किंवा अखंडहिंदुस्तांवादी हिंदुत्ववाद!

त्यांच्या सध्याच्या वैचारिक गोंधळाला मोरेसमर्थक हिंदुत्ववादी 'विचारकलह' म्हणू शकतात. कारण मोरेमास्तर आधीच्या पुस्तकांत फाळणीला कॉंग्रेसला जिम्मेदार ठरवीत असत. पण पुढे त्यांनी फाळणीचा साद्यंत इतिहास अभ्यासला आणि सत्याच्या दिव्य प्रकाशात त्यांची बुद्धी दिपून गेली किंवा अक्षरश: वेड लागायची पाळी आली ( असं तेच म्हणतात) ...आणि मग "कॉंग्रेसने आणि गांधीजीनी अखंड भारत का नाकारला?" हि उत्कृष्ठ संशोधनात्मक साहित्यकृती प्रकाशित झाली.

अखंड हिंदुस्तान हा कळीचा मुद्दा असूनही प्रा..मोरेंनी आपल्या ग्रंथात  सावरकरवाद किंवा हिदुत्ववाद उपेक्षित का ठेवला हा प्रश्न महत्वाचा आहे. त्याचा मागोवा घेतल्यास ह्या ग्रंथातून काही तथ्ये स्पष्ट होतात.

ह्या ग्रंथात सुरुवातीलाच स्वत:च्या अखंड भारताच्या भाबड्या आणि भावनिक समजुतीबद्दल प्रा. मोरे मनोगत व्यक्त करताना म्हणतात...
"...पूर्वी आम्हीही कडवे अखंड भारतवादीच होतो... फाळणी करून कॉंग्रेसने देशाचा घात केला असे मानीत होतो...आमच्या १९८८च्या ग्रंथात तसे स्पष्ट लिहिलंय...पण तेव्हा आमचा फाळणी विषयक अभ्यासच झाला नव्हता...!" इति. प्रा. मोरे
पृष्ठ क्र. ४ (अखंड भारत का नाकारला? (मनोगत))

हि स्पष्ट कबुली देणारे प्रा. मोरे समस्त सावरकरवादी हिंदुत्ववादी विद्वानांचे प्रतिनिधित्वच करीत आहेत हे सुज्ञांच्या लक्षात आलेच असेल.

आपल्या स्वतंत्र भारतात अखंड हिंदुस्तान आणि फाळणीबद्दल आत्यंतिक जाज्ज्वल्य वगैरे राष्ट्रभक्ती बाळगून असलेले जी मंडळी आहे त्यांच्यासाठी ह्या महत्वपूर्ण ग्रंथात प्रा. मोरे लिहितात...

"...काँग्रेस व्यतिरिक्त अन्य हिंदू संघटनांनी व व्यक्तींनी ( अर्थात संघ, हिंदू महासभा, सावरकर प्रभूती) फाळणीचा पर्याय म्हणून मांडलेल्या अखंड भारताविषयी एखादे प्रकरण ह्या ग्रंथात असावे असा काही अभ्यासू मित्रांचा (?) सल्ला होता. पण ग्रंथ मर्यादेमुळे (???) तसे न करता सामारोपातच त्याची दखल घ्यावी लागली...!"
पृष्ठ क्र. १६ (अखंड भारत का नाकारला? (प्रास्ताविक))

...आणि समारोपात हा हिंदुत्ववाद्यांच्या हिंदुस्तानचा अस्तित्वाचा प्रश्न अवघ्या दोनचार ओळीत गुंडाळूनही टाकतात...!

"...सावरकरांच्या अखंड भारताच्या योजनेत मुस्लिमांना लोकसंख्येच्या प्रमाणात लोकसभेत वाटा मिळणार होता... त्यानुसार आजच्या लोकसभेत सुमारे ३८% खासदार मुसलमान असते...आजच्या राज्यघटनेत मुस्लिमांसाठी एकही राखीव जागा नाही...आजच्या राज्यघटनेची कल्पनाही हिंदुत्ववादी करू शकले नव्हते... सावरकरांचे 'हिंदुराष्ट्र' हिंदूंसाठी घातक ठरले असते!..." इति. प्रा. मोरे.
 ("...सावरकरांचे 'हिंदुराष्ट्र' हिंदूंसाठी अघातक ठरले नसते!..." असं मोरेंचे मूळ वाक्य आहे. मी ते सरळ भाषेत लिहिलंय.)
पृष्ठ क्र. ६८३ (अखंड भारत का नाकारला? (समारोप))

आता पाचशे-हजार पानांच्या ह्या ग्रंथात ग्रंथ-मर्यादा कुठून उद्भवली? मुस्लिम लीग, राष्ट्रवादी मुस्लिम ह्यांच्यावर चार-चार प्रकरणे लिहित असताना हिंदुत्ववादी आणि विशेषत: सावरकरवादी भूमिकेवर एखादे प्रकरण तरी सहज बसवता आले असते! पण ती भूमिका मुळातच फोल, भोंगळ असल्याने कदाचित ह्या ग्रंथात आणखी विस्तृतपणे मांडायची तर स्वत:च्याच विचारप्रणालीचे वाभाडे काढावे लागले असते. म्हणून ते अवघड काम त्यांनी दोनचार ओळीतच आटपून टाकले असावे. "...अखंड भारत का नाकारला?" हि अशी एक सुंदर उपरती आहे.

अलीकडे प्रा. मोरेंच्या सावरकरप्रेमाने अंदमानात पुन्हा उचल खाल्ली किंवा पुन्हा 'विचारकलह' सुरु झालेला दिसतोय. ह्यावेळी सावरकरबदनामीसाठी त्यांनी पुरोगामी, काँग्रेस आदि घटकांना जिम्मेदार ठरवून वैचारिक गोंधळ घातलाय. त्यासाठी पुरोगामी विचाराची  दहशतवादाशी तुलना करून ते स्वत:  'पुरोगामी' , 'सेक्युलर' इ. शब्दांवरदेखील हिंस्त्र हल्ला चढविणाऱ्या कंपूचे म्होरके झाले आहेत. 

वरील विवेचनातून एक गोष्ट स्पष्ट होईल कि प्रा. मोरे पुरोगामी विचार, गांधी हत्या आणि सावरकरवाद ह्या विषयाचा संपूर्ण अभ्यास करतील तर पुन्हा विचारकलहातून त्यांची मते बदलु शकतील. पूर्ण अभ्यासांती सावरकरांच्या कथित बदनामीची अकथित केंद्रे प्रा. मोरेंना उलगडतील आणि दहशतवादाची केंद्रेही सापडतील. पुरोगामी विचाराचा लक्ख इतिहास पुन्हा त्यांची बुद्धी उजळून टाकील!... आणि मग प्रा. मोरेंना कदाचित पुन्हा एक सुंदर उपरती होईल.

No comments:

Post a Comment