Thursday, 25 February 2016

मराठेशाही, राज्याभिषेक आणि कट-कारस्थाने

संभाजी राजांच्या हत्येतील वैदिक -अवैदिक किंवा वैदिक-शाक्त हा संदर्भ संजय क्षीरसागर ह्यांनी उलगडून दाखविला आहे. त्यावर प्रतिक्रिया:

शून्यातून स्वराज्य :

शिवचरित्र म्हणजे स्वराज्यनिर्मितीसाठी प्राणपणाने लढलेले अठरापगड जातीचे मराठे आणि त्यांचे नेतृत्व करणारा एक युगपुरुष राजा अशी अलौकिक रचना आहे. बाजीप्रभू(१६६०) मुरारबाजी(१६६३)तानाजी(१६७०) प्रतापराव(१६७४) असे एकाहूनएक सरस जानकुर्बान मराठे स्वराज्याच्या कार्यसिद्धीसाठी अखंड संघर्षरत दिसतात. स्वत: शिवराय अफझल(१६५९), शाईस्ता(१६६५), आग्रा(१६६६) सारख्या नाट्यमय प्रकरणात आघाडीवर संघर्षात आहेत. ह्या लष्करी व्यवस्थेपलीकडे राज्यव्यवस्था, न्यायव्यवस्था, महसुल-करव्यवस्था आदि दैनंदिन कारभारात फड-कारकुनी सांभाळणारे अंमलदार वगैरे देखील स्वराज्य-समर्पित आणि म्हणून रयतेचे राज्य अशी लोकप्रियता. ह्या सुवर्णकाळाचा साधारणत: शिवराज्याभिषेक हा महत्वाचा म्हणजे शेवटचा टप्पा असल्याचे दिसते. नेताजी पालकरांचे बंड हा एक अपवाद परंतु त्याचे पैलूही इतरत्र संबधित आहेत.

कटकारस्थानांचा काळ :

राज्याभिषेकाला झालेला विरोध. वैदिकांनी शुद्र म्हणून शिवरायांना केलेला विरोध सर्वश्रुत आहे. त्यातून काशीचे गागाभट्ट किंवा क्षत्रियकुलावतंस म्हणून राजस्थानहून आणलेली वंशावळ आणि तरीही निश्चलपुरी गोसावींनी केलेला शाक्त अभिषेक....(१६७४)
नंतर महाराज दक्षिण दिग्विजयात १६७६ ते १६७८ पर्यंत असताना रायगडावर संभाजीराजे आणि महाराणी सोयराबाई व अष्टप्रधान ह्यांच्यातील बेबनाव सुस्पष्ट आहे. महाराजांनी संभाजीराजे शृंगारपुर इथे प्रभानवल्लीच्या सुभ्यावर नेमणूक करून तिढा सोडविण्याचा(?) प्रयत्न केला. त्या परिस्थितीत युवराज संभाजीराजे बंड करून दिलेरखानाला जाऊन मिळाले. हे आणखी एक कृष्णकारस्थान.
ह्याआधी शिवाजी राजांवर एकदा विषप्रयोग झाल्याचा उल्लेख सापडतो. त्याचा आळ युवराजांवर आलेला... त्याआधी अण्णाजी दत्तो ह्यांच्या नात्यातील एका स्त्रीच्या चरित्राचा आळ... कारस्थानांची मालिकाच. 'दोषी कोण? कट कुणाचा? लक्ष्य कोण?' हे मुद्दे काहीही असले तरी कटकारस्थानांना प्रचंड वेग आल्याचे इथे स्पष्ट होते. ह्या आप्तस्वकीयांच्या कटांची मालिका इतकी गंभीर कि प्रत्यक्ष स्वराज्याची वाटणी करून संभाजीराजांना जिंजीचे स्वतंत्र राज्य देऊ पाहणारे हतबल महाराज!...
महाराज १६८० मध्ये ऐन पन्नाशीत निवर्तले आणि त्यांच्या देहाला भडाग्नी देण्याचे कारस्थान झाले. इथेही महाराजांवर विषप्रयोग झाल्याचे उल्लेख सापडतात. संभाजीराजांचा अभिषिक्त अधिकार डावलून परस्पर राजारामाला मंचकारोहण करण्यात आले. अण्णाजी दत्तो मोरोपंत पिंगळे आदि अष्टप्रधान मंत्री संभाजीराजांवर पन्हाळ्यावर चालून गेले.

महान सरनौबत हंबीरराव मोहिते: खणखणीत राजनिष्ठेचा एकमेवाद्वितीय खंदा पाईक

केवळ सरलष्कर हंबीरराव मोहिते ह्यांच्या सच्च्या राजनिष्ठ भूमिकेमुळे हे कारस्थान उधळले गेले आणि अण्णाजी-मोरोपंत वगैरे स्वत:च कैदेत पडले. सरसेनापती हंबीरराव ठामपणे युवराज संभाजीराजे ह्यांच्या पाठीशी उभे राहिले. रक्ताची बहिण-भाचा आणि त्यांना सामील मंत्रीगण ह्यांच्या अभद्र युतीत सामील न होता, अडचणीत असलेल्या परंतु स्वराज्याचा निर्विवाद वारस असलेल्या शंभूराजांना स्पष्ट पाठींबा देऊन त्यांच्या विरोधकांना धडा शिकविणारा हा महान सरनौबत. त्यानंतर शेवटच्या श्वासापर्यंत औरंगजेबाशी झुंजीत संभाजी महाराजांना वरचढ ठेवणारा हा रणधुरंदर सेनानी.
ह्या काळात संभाजी राजांवर विषप्रयोगाचा प्रयत्न झाला. नंतर संभाजीराजांचा आश्रित शहजादा अकबर ह्याच्या मार्फत सत्तांतराचा प्रयत्न झाला. ह्यावेळी संभाजीराजांनी सर्व कारस्थानी बंडखोरांना देहान्ताच्या शिक्षा दिल्या. स्वत: सोयराबाई कटात सामील असल्याने मृत्युमुखी पडल्या. ह्या धामधुमीच्या काळात संभाजीराजांची लष्करी बाजू मात्र औरंगजेबाला सर्व सामर्थ्याने सडेतोड जबाब देत होती. ह्याचे प्रमुख कारण म्हणजे सरनौबत हंबीरराव मोहित्यांचा शर्थीचा पराक्रम आणि अनन्यसाधारण राजनिष्ठा. पूर्वार्धात ह्या कटाच्या घटना घडल्या तरी नंतर ५-६ वर्षे संभाजीराजे आणि हंबीरराव मोहिते ह्यांनी मराठेशाहीला स्थिरस्थावर केल्याचे दिसते. मराठ्यांना असा विजीगिषु सरलष्कर पुन्हा क्वचितच मिळाला. हंबीरराव धारातीर्थी पडले(१६८७) आणि तिथेच संभाजीराजांची विजयपताकाही भेलकांडू लागल्याचे दिसते.

पुन्हा कट-कारस्थाने-फितूरी:

प्रल्हाद निराजी आणि इतर कारकून मंडळीनी पुन्हा उचल खाल्ली आणि संभाजी राजांच्या जागी राजाराम महाराजांना गादीवर बसवण्याचा कट उघड झाला. ह्याच काळात गणोजी शिर्के आणि इतर मराठे सरदार वतनदार औरंगजेबाच्या कच्छपि लागून स्वराज्याशी बंडखोरी करू लागले. औरंगजेब आदिलशाही-कुतुबशाही गिळंकृत करून सर्व शक्तीने शंभूराजांवर तुटून पडला. फितुरी, कट-कारस्थाने चरमसिमेवर पोहोचली आणि १८९ मध्ये संभाजीराजे आणि छन्दोगामात्य कविकलश संगमेश्वरी मुकर्रबखानाच्या कैदेत सापडले. तिथे रायगडावर संभाजी महाराजांना सोडविण्याचे कोणतेही गंभीर प्रयत्न न होता आणि संभाजीराजांना असहाय्य अगतिक मृत्युच्या तोंडी देऊन राजाराम महाराजांना गादीवर बसविण्यात धन्यता मानली गेली.

ह्यानंतर मराठ्यांचा इतिहास हा शिवरायांच्या स्वराज्य संकल्पनेपासून दूर दूर जात मोगलाई कट कारस्थानाच्या बंडखोरीच्या मालिकांचा इतिहास बनून गेलेला दिसतो. ह्याची सुरुवात मात्र स्वत: शिवाजीराजांच्या समक्ष राज्याभिषेकापासूनच झाल्याचे दिसते... कि राज्याभिषेक आणि त्यातील वैदिक-अवैदिक वादाची बीजेच ह्याला कारणीभूत आहेत, ह्यावर विचारविमर्श व्हायला हवा. एखादे अलौकिक स्वप्न पूर्ण करण्यासाठी कित्येकांनी जीवाची बाजी लावावी, परंतु स्वप्नपूर्ती झाल्यावर मात्र त्यांनीच एकमेकाच्या जीवावर उठावे, हा मनुष्यधर्मच असावा कदाचित!

1 comment:

  1. मुद्देसूद मांडणी ! आपण उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधावीच लागतील.

    ReplyDelete