Saturday, 29 October 2016

बलिप्रतिपदा हा बळीराजाचा उत्सव..

 बलिप्रतिपदा हा बळीराजाचा उत्सव...महान असुर संस्कृतीचा पुरातन उत्सव. त्याचा आढावा घेणारा हा एक लेख.

आजही ग्रामीण भागात जिथे सांस्कृतिक आक्रमण फारसे घडलेले नाही अशा दुर्गम आगरी खेड्यातील बलिप्रतिपदा कशी असते? त्याचे हे चित्रण आधी समजून घ्या...
भल्या पहाटे घरोघरी बळीपूजेची लगबग चालू होते. प्रत्येक घरातील केरकचरा जमा करून तो टोपलीत भरून रात्रीच तयार असतो. गावातील उत्साही मुलेदेखील अंघोळी करून कचरा नेऊन टाकायला घरोघर फिरतात. त्यांच्यासाठी फटाके, पैसे, खाऊ टोपलीसोबत तयार असतो. घरातील गृहिणी त्यापैकी एका मुलाला बोलावून आणते आणि तो कचरा घेऊन बाहेर पडतो. त्यावेळी त्या ठरलेल्या ओळी त्याच्या तोंडातून बाहेर पडत असतात...
"आरजो पिरजो
खैन जाय, खोकला जाय
आप जाय, ताप जाय
बळीराज्य... "

हा असा बळीमहिम्याचा उद्घोष करीत गावातील मुले गल्ल्याबोळातुन घराघरातून कचरा जमा करून तो गावाबाहेर जमा करतात. सकाळी प्रत्येक घराच्या पायरीजवळ महात्मा बळीची पूजा मंडळी जाते. त्यासाठी एका मोठ्या तांब्या पितळेच्या कलशात नारळ ठेवून त्याला हळदी कुंकू वाहिले जाते. त्यावर तीन काड्या रोवून त्यात रोजाची (झेंडू) फुले खोवली जातात. खाली नवे कापड मांडलेले असते. चारी बाजूला शेणाचे चार गोळे मांडून त्यातदेखील रोजाची फुलांच्या काड्या रोवून सुशोभित केले जातात. सभोवती पणत्या तेवत असतात. सोबत लामणदिवा वगैरे असेल तर उत्तम. त्यात रांगोळीची आरास एकूणच बळीपूजेची शोभा वाढवते.

शेतकरी कृषक आगरी समाज आपल्या पुरातन संस्कृतीच्या ह्या महान सम्राटाला बळीराजाला ह्या बलिप्रतिपदेच्या दिवशी मनाचा मुजरा करतो. दुसरीकडे घरातील सारी हत्यारे अवजारे, कोयते-कुऱ्हाडी-विळे इ. बाहेर काढून त्याची पूजा होते. त्यांना साफसूफ करून गेरूची लालशेंदरी बोटे लावून शस्त्रपूजा सिद्ध होते... बैल हा तर शेतकऱ्यांचा जीव कि प्राण. त्याला देखील बळी उत्सवात मनाचे स्थान आहे. बैलांना छान सजवून आणि त्यांच्या शिंगे गेरूच्या लालशेंदरी रंगाने रंगवली जातात. घराच्या बाजूला एव्हाना पेंढा वगैरे पेटवून आग लावलेली असते. त्यावरून लहानथोर सारे उड्या मारून एकप्रकारे अग्निपूजाही पार पडत असतात. ह्या आगीवरून उड्या मारण्याच्या परंपरेत बैलांचाहि समावेश असतोच! नव्या वर्षाचा स्वागताचा हा असा एकूण कार्यक्रम असतो. त्यात बळीराजाच्या महात्म्याचे अनन्यसाधारण असे स्थान आहे.

तर असा हा पुरातन परंपरेतील बळीउत्सव. आपल्या महान बळीराजा सम्राटाची हजारो वर्षे घराघरातून जपलेली स्मृती. म्हणजेच बलिप्रतिपदा. महान असुर संस्कृतीचा उत्सव. कार्तिक शु. प्रतिपदा ही बळीच्या स्मृतिप्रीत्यर्थ बलिप्रतिपदा म्हणून साजरी केली जाते.  तसेच  बळीराजा  आपल्या प्रजेला भेटावयास पृथ्वीवर परत येतो म्हणून आश्विन महिन्याच्या शुक्लपक्षात केरळमध्ये 'ओणम्' नावाचा सण साजरा केला जातो.

आता जरा ह्याचे सांस्कृतिक दृष्ट्या विश्लेषण पाहूया...

दशावतारात किंवा पुराणातील कथा म्हणते कि बळी नावाचा बलाढ्य, प्रजाहितदक्ष आणि दानशूर राजा होता. त्याने सारी पृथ्वी जिंकली आणि स्वर्गदेखील त्याच्या अधिपत्याखाली गेला . तेव्हा सारे देव विष्णूकडे गेले आणि विष्णूने बटू वामनाचा अवतार घेऊन बळीराजाकडे तीन पावलांची भूमी मागितली. हे दान देऊ नये म्हणून शुक्राचार्य झारीत जाऊन बसले होते. पण दानशूर बळीने वामनाला दान दिले आणि त्याने दोन पावलांत पृथ्वी आणि आकाश व्यापले. तिसरे पाऊल बळीराजाच्या शिरावर ठेवून त्याला पाताळात धाडले अशी हि पुराणकथा. पुराणकारांचे मिथ्थककथा बनविण्याचे आणि त्यातून आपली विचारधारा लादण्याचा हव्यास लक्षात घेतला तरी बळीराजा श्रेष्ठ महायोद्धा सम्राट होता आणि त्याच्या राज्यात  प्रजा अत्यंत सुखी होती, हे स्पष्ट दिसते.

आता बळीराजाचा साधारण इतिहास आणि भूगोल पाहू या. बळी हा प्रल्हादाचा नातू व विरोचनाचा मुलगा होय. प्रल्हादाचा पिता हिरण्यकश्यपूचा नरसिंह अवतारात आणि काका हिरण्याक्ष ह्याचा वराह अवतारात  विंष्णूने संहार केला अशीही पुराणकथा आहे. ते दोघेदेखील महाबलाढ्य आणि पृथ्वी व स्वर्ग ह्यांवर सत्ता गाजविणारे होते, हे पुराणकथाकारही मान्य करतात. बळीचा पुत्र बाणासुर ह्याची कन्या उषा हिचा विवाह कृष्णाचा नातू अनिरूद्धशी झाला होता. ह्या साऱ्या असुर राजांना शंकराने वर देऊन अपराजित बनविले होते असे पुराणे म्हणतात. म्हणजेच ते सारे असुर राजे हे शिवभक्त होते, लिंगपुजक किंवा मूर्तिपूजक होते हेदेखील दिसते. ते यज्ञविरोधक किंवा यज्ञविध्वंसक होते हे देखील  स्पष्ट आहे. ह्याचमुळे वैदिक धर्मीय ह्या असुरांच्या विरोधात होते. कारण वैदिक धर्मात मूर्तिपूजा, लिंगपूजा मान्य नाही आणि शिवशंकर हा त्यांचा देव नाही. त्यामुळे देव-असुर संघर्ष जो वैदिक साहित्यात दिसतो तो अर्थातच असुरविरोधी सांस्कृतिक संघर्ष आहे, असुर संस्कृतीला बदनाम करणारा आहे, हे सिद्ध होते.

बळीची घटना भृगूकच्छमध्ये (भडोच) घडली म्हणजे तो तेथीलच असावा असा एक अंदाज वर्तवला जातो व त्रिपाद भुमीची घटना घडल्यावर तो केरळात गेला असेही मानण्यात येते. महाबलीपुर ही त्याची राजधानी होती.  केरळमधील लोक आजही बळीला आपला राजा मानतात. कन्याकुमारीच्या दक्षिणेस कित्त्येक कोसांवर समुद्रात घुसलेल्या भुशिरावर बळीची राजधानी होती व नैसर्गिक उत्पातात महान बळीची राजधानी समुद्रात बुडाली असे उल्लेख प्राचीन तमिळ वाड्मयात येतात. शतपथ ब्राह्मणात वर्तमानकालीन देश म्हणून प्राच्य देश व लोकांचा उल्लेख येतो. निर्वासित वैदिक लोक भारतात आले तेंव्हा ते कुरु-पांचाल विभागात वसले व धर्मप्रचार  सुरु केला. प्राच्य देशात असूरांची राज्ये असून ते यज्ञ करत नाहीत व  त्यांचे स्वत:चे पुरोहित असल्याने वैदिकांनी प्राच्य त्याज्ज्य मानली. हा प्राच्य देश म्हणजे आजचे बिहार व त्यापलीकडील पुर्वेचा प्रदेश. वैदिकांना तेंव्हा तो भुगोल माहितच नव्हता. महाभारतात या भागांतेल अंग, वंग, कलिंगादि पाच राज्यांचा उल्लेख आला आहे व ही पाचही राज्ये बळीच्या त्याच नांवाच्या पुत्रांनी स्थापन केली असा उल्लेख आहे. त्यामुळे या प्रदेशाला "बालेय क्षेत्र" असे नांव होते. त्यामुळे असूर ही कविकल्पना न मानता ती खरीच वेगळ्या संस्कृतीची माणसेच होती असे मानावे लागते. असे प्राचीन संस्कृतीचे अभ्यासक आणि संशोधक संजय सोनवणी म्हणतात.

थोडक्यात असुर हे लिंगपुजक शिवभक्त असून प्राचीन भारतात त्यांचे सामर्थ्यशाली व लोकप्रिय राज्य अस्तित्वात होते एवढेच तात्पर्य निघते. हे असुर वैदिकधर्मियांना, यज्ञपूजकाना  थारा देत नसल्याने त्यांच्यात असलेला सांस्कृतिक संघर्ष पुराणकथांमध्ये प्रतिबिंबित झाला आहे, एवढेच.

असुर नावाचा जो महान वंश जगभर प्रसिद्ध आहे त्या 'असुर' शब्दालाही  ह्या संघर्षात बदनाम करून  टाकले गेले. असुर संस्कृतीचे अवशेष आज जगभर विखुरले आहेत. 'असिरीयन' संस्कृती अभ्यासून पहाता तेथील सर्व राजे स्वत:ला अभिमानाने असुर म्हणवून घेत असत. 'असुर' नावाचे शहर आजही अस्तित्वात आहे. झोरोष्ट्रीयान (पारशी) धर्मात अहूर (असुर) माझ्दा हे मुख्य दैवत मानले आहे.
भारतातही असुर संस्कृतीचा प्रचंड प्रभाव आहे. हिरण्यकश्यप, महिषासुर, रावण, बळी, नरकासुर ह्या असुरांचा पराक्रम तर देव-देवतानाहि पुरून उरला होता. खुद्द वैदिकांच्या ऋग्वेदात इंद्र, वरुण इत्यादी त्यांच्या देवताना 'असुर' अशा आदरार्थी नावाने संबोधिले आहे. नंतरच्या काळात मात्र  'असुर' वंश जाणीवपूर्वक बदनाम  केला गेला! ज्या बळीराजाची आपण आजही दरवर्षी पूजा करतो आणि "बळी राज्य येवो" अशी भल्या पहाटे गर्जना करतो त्या बळीराजाला विष्णूचा वामन अवतार पाताळात धाडतो किंवा त्याचा संहार करतो अशी वैदिक कथा रचून बळीचे महात्म्य भ्रष्ट करण्याचा प्रयत्न झाला हेच दिसून येते.

"बळी आजहि सर्व भारतीयांचा अधिराज आहे. त्याचा कोणी खून केला, पाताळात गाडले वगैरे वैदिकांनी आपले माहात्म्य वाढवण्यासाठी बनवलेल्या भाकडकथा आहेत. पण त्या वामनाची कोणी पुजाही करत नाही. बळीराजावर एकही महाकाव्य नाही. बळीचे पुराणही नाही. नाटक-खंडकाव्येही नाहीत. वामनाच्या नांवे मात्र संपुर्ण पुराण आहे, पण या देशात तो काही केल्या वंदनीय झाला नाही. बळीएवढी अपार लोकप्रियता भारतीय जनमानसात कोणाचीही नाही हेही वास्तव आहे. एवढी कि दिवाळीचा नुसता एक दिवस त्याला दिला आहे असे नव्हे तर नववर्षारंभच बळीच्याच नांवाने होतो. सात चिरंजीवांपैकी त्याला एक मानले जाते. हा एक चमत्कार आहे. असूर संस्कृतीचे अवशेष बळीच्या स्मृतीने कालजेयी ठेवले आहेत.  किंबहुना बळीराजा हा भारतीय संस्कृतीचे प्रतीकस्वरूप बनून बसला आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही." ह्या संजय सोनवणींच्या विश्लेषणाशी मी सहमत आहे. 

अर्थात, वामनाने बळीराजाला पाताळात धाडले किंवा विष्णूने वामनावतार घेऊन बळीराजाला ठार केले वगैरे केवळ भाकडकथा आहेत. वैदिकांनी असुर संस्कृतीवर केलेले सांस्कृतिक पोथीहल्ले इतकेच त्याचे स्वरूप. सामान्य लोकांनी मात्र आजवर हजारो वर्षे परंपरेतून आपल्या पुरातन संस्कृतीचे आणि महान बळीराजाच्या स्मृतींचे जे जतन करून ठेवले आहे, त्यापुढे वैदिक पोथीपुराणे ह्यापुढे टिकणार  नाहीत, हेच स्पष्ट होते.  तसेच " आमच्या पुर्वजांचा पराभव झाला होता" वगैरे न्यूनगंड जोपासने हे सुद्धा  चुकीचे आहे. देव -असूर युद्धे ही काल्पनिक भासली तरी ती एका सांस्कृतिक संघर्षाची प्रतीकरुपे आहेत. वैदिक-देव संस्कृती व अवैदिक-असूर संस्कृतीतील युद्धे फक्त रणात लढली गेली नाहीत तर साहित्यातुनही कशी लढली गेली याचे प्रत्यंतर येते... युद्धात जय कोणाचाही होवो, लेखणीत जो जिंकतो तोच कसा जिंकतो हेही दिसून येते... पण प्रत्यक्षात कोण अजिंक्य ठरले हे आपण आज जी 'बळीसंस्कृती' जपतो त्यावरुनही समजून येतेच !

सर्वाना दिवाळीच्या शुभेच्छा आणि 'बळीचे राज्य पुन्हा येओ'  हि सदिच्छा!

राकेश पाटील, खार्डी.

No comments:

Post a Comment