Wednesday, 9 November 2016

आमच्या बॅचच्या गेटटुगेदरची गोष्ट.


आमच्या  बॅचच्या गेटटुगेदरची गोष्ट.

1991. लोकनायक जयप्रकाश विद्यालय अगरवाडी शाळेची आमची 10 विची बॅच. आज बरोब्बर 25 वर्षे पूर्ण झाली. म्हणजे रौप्यमहोत्सवच... बरीच वर्षे आज भेटू उद्या भेटू म्हणता तसाच मागे पडलेला हा योग. तो आज जुळून आला. 6 नोव्हेंबर 2016... व्हाट्सएप च्या ग्रुपच्या माध्यमातून सारेजण एकत्र आले आणि ह्या स्नेहसंमेलनाची तयारी झाली. 1985 ते 1991 अशी जी सहा वर्षे ह्या मित्रमैत्रिणींसोबत गेली ती आयुष्यातली सर्वोत्तम 6 वर्षे आहेत असं माझे ठाम मत आहे. किंबहुना मी स्वतः:ला त्याच सहा वर्षातला आजही समजतो.

सफाळ्याच्या माहेर  रिसॉर्टवर हे संमेलन पार पडले. कार्यक्रमाची काहीएक रूपरेषा आखली होती. पण पंचवीस वर्षांनी पहिल्यांदाच भेटत असल्याने मनोगते व्यक्त करताना पूर्ण दिवसहि अपुरा पडला आणि तरीही हा एक अविस्मरणीय असा कार्यक्रम घडून गेला.

विनोद, चेतन, उमेश हे आमचे जिवलग मित्र ह्या पंचवीस वर्षात काळाच्या पडद्याआड निघून गेलेत. सुरुवातीला त्यांच्या स्मृतीला अभिवादन करून सर्व मित्रमैत्रिणींनी श्रद्धांजली वाहिली.

आमच्या वर्गमैत्रिणींपैकी फक्त 11 जणी उपस्थित होत्या. पण त्यातली गम्मत अशी कि त्यांचा तो आवाज , हसणं-खिदळणं ईतके ओरिजिनल होतं कि जणू 25 वर्षांपूर्वीचा आमचा वर्ग भरलाय कि काय असा माहोल तयार झाला होता. विद्या, रत्नप्रभा, वंदना, तृप्ती, सुनंदा, मेघना, प्रतिभा, रोशन, हरिता, हंसा, वंदना, प्रणोती, इत्यादी मैत्रिणी त्यांच्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे येऊ शकल्या नाहीत. पण आलेल्या 11 जणींनी किल्ला व्यवस्थित लढविला. कारण एकतर आमच्या ह्या वर्गात मुले विरुद्ध मुली असा उभा सनातन संघर्ष होता. अर्थात आता तो अस्तित्वात नाही... :)

मुली जवळजवळ सर्वच जणी पदवीधारक आहेत आणि साधारणतः: एकाच प्रकारच्या जीवनशैलीत मग्न झाल्याचे चित्र आहे.
जयंती (जयू) शिक्षण पूर्ण करून सध्या गृहिणीची जबाबदारी पार पडतेय.
माधवी एका शाळेची मुख्याध्यापिका आहे आणि अलीकडेच तिला शिक्षणक्षेत्रातील एका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. (y)
रेखा तिचं  शिक्षण पूर्ण करून सध्या आपल्या गृहिणीचा रोल निभावत आहे. तिच्या सौंदर्याच्या जुन्या आठवणी पुन्हा एकदा बंटीने उलगडून काढल्या. :)
मेघा सुद्धा आपले शिक्षण पूर्ण करून सध्या गृहिणीच्या भूमिकेत रममाण झालीय.
तनुजा शिक्षिका आहे आणि आपल्या संसारात रमलीय. प्रकृती ठीक नसतानाही ती आग्रहाने आली आणि ज्या हजर नव्हत्या त्यांची आता मोजून हजेरी घेतेय. :D
प्रीतीने शिक्षण पूर्ण झाल्यावर आधी एडिटिंग मध्ये आणि सध्या शिक्षणक्षेत्रात आपली कारकीर्द घडविली आहे.
अमिताने शिक्षण पूर्ण झाल्यावर आपल्या कौटुंबिक जाबदारीत स्वतः:ला वाहून घेतलंय.
वैशालीने उच्च शिक्षणाचे आव्हान स्वीकारून ते पूर्णही केले व सध्या आमच्याच शाळेत शिक्षिका आहे. मीनाने स्वतः:चा व्यवसाय सुरु करून  तो यशस्वीरित्या चालवून दाखविला आणि आज ती सेवानिवृत्ती घेऊन घरी बसलीय हा एक रेकॉर्डच आहे.  संपूर्ण कार्यक्रमात मीना आजही तिच्या खास शैलीतल्या विनोदबुध्दीसह हशा पिकवीत राहिली, हेही ओरिजिनलच. :p
प्राची म्हणजे आमच्या वर्गातील अत्यंत मितभाषी शांत बाहुलीच. तिची निरागसता आजही इतकी हळवी कि तिच्या बिगशॉट फॅमिलीची ओळख शेवटी आमच्या सूत्रसंचालकाला स्वतः:हुन करून द्यावी लागली. :)
अस्मिता मुबंईत नोकरी करतेय आणि सर्वात उशिरा का होईना पण ह्या कार्यक्रमासाठी आवर्जून आली. म्हणून तिला अध्यक्षीय भाषणाची जबाबदारी दिली गेली. :D   तिनेहि आपल्या त्याच लाघवी आवाजात मूळच्या लकबीसह सर्वांचा विश्वास सार्थ ठरविला. :)
दुपारी एकत्र जेवण करताना कधीकाळी शाळेतली वनभोजने आठवून गेली. आमच्या मैत्रिणी एकत्र टेबलवर हसतखेळत इतक्या एन्जॉय करीत होत्या कि हे संमेलन सर्वार्थाने यशस्वी झाल्याची ती पावतीच जणू!


शाळेतील दोन आघाडीचे विद्यार्थी म्हणून समीर आणि माझा उल्लेख होत असे. शाळेनंतरच्या काळातील उच्चशिक्षणासाठीचा संघर्ष आणि नोकरी-व्यवसाय ह्यामध्ये आपापल्या क्षेत्रात केलेली धडपड ऐकण्यासारखी होती. समीर रसायनशास्त्रातील पदवीधर असून त्याने टेक्स्टाईल आंतरराष्ट्रीय मार्केटिंग मध्ये स्वतः:चा जम बसविला आहे. माझा स्वतःचा प्रोसेस ऑटोमेशन मध्ये व्यवसाय आहे. आम्हा दोघांच्या शालेय जीवनातील अभ्यासातील स्पर्धेच्या आठवणींना सर्व मित्रांनी पुन्हा उजाळा दिला. आजही समीर आणि राकेश ह्यांच्यातील दोन दशकांपूर्वीची ती स्पर्धा मित्रांनी आठवणीत कायम जपून ठेवली आहे हे अचंबित करणारे होते. पुन्हा पुन्हा त्या स्पर्धेचा उल्लेख ह्या भेटीत अनेक मित्रांनी केला. समीरने एका मार्कांसाठी गणिताच्या मिस्त्रीसरांशी घातलेला वाद माझ्या स्मरणात नाही, समीरच्याही नसेल. पण आमच्या मित्रांनी त्या स्मृती जपलेल्या आहेत. आमच्यातले जे आज शिक्षणक्षेत्रात आहेत ते राकेश-समीरच्या अभ्यासाच्या आणि चढाओढीच्या कथा आजहि त्यांच्या विद्यार्थ्यांना ऐकवितात, हे मात्र खूप थोर आहे ! :)

बंटीने (हरेंद्र) एकूणच संमेलनाच्या आयोजनात सिंहाचा वाटा उचलला. त्याचे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाहून आमच्या मैत्रिणींना आदेश भाऊजींची आठवण झाली, नव्हे 'आदेश बांदेकरच बंटीची कॉपी करतो' हेहि प्रतिमने आवर्जून नमूद केले. :) बंटीच्या मनोगतातून एकेकाळी वर्गातील मागच्या बेंचवर बसणाऱ्या खोडकर प्रवर्गातील आमच्या मित्राला पुढील शिक्षणासाठी किती संघर्ष करावा लागला हे समजले. शिक्षक व्हायची त्याची मनीषा पूर्ण झाली नाहीच; पण त्या संघर्षाच्या काळात परिस्थितीसमोर  आपल्या प्रेमसंबंधाचाही त्याग करावा लागला, हे चुटपुट लावणारे होते. पण आज तो त्यावर मात करून उसरणी गावाचा सरपंच झाला आहे आणि राजकीय-सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे, हे त्याचे यश अभिमानास्पद आहे!

शिक्षक होण्याची इच्छा असलेला उल्हास आज एका सीए फर्म मध्ये यशस्वी कारकीर्द घडवतोय. शिक्षणक्षेत्रात येण्याचं त्याचं स्वप्न होतं. पण मुलाखतीत ठाणे जिल्ह्याची माहिती इंग्रजीत वर्णन करायला सांगणाऱ्या कुणा एका अधिकाऱ्याने ते पायदळी तुडविले होते. आपल्या शिक्षणक्षेत्रात कसले येडxx कलाकार भरले आहेत, त्याचं हे उदाहरण. कारण इंग्रजी हा काही उल्हासचा विषय नव्हता. पण उल्हासाचे सुरुवातीचे भाषण आणि मनोगत ह्या दोन्हीमध्ये त्याचे प्रेझेंटेशन केवळ पाहण्यासारखे होते.

एकूणच देश बंटी आणि उल्हास ह्या दोन उत्तम शिक्षकांना मुकला, एवढंच.  :(

वेढीचा अरुण पाचवीपासून ते दहावीपर्यंत माझ्याच बेंचवर बसत असूनही त्याला 25 वर्षानंतर मी ओळखू शकलो नाही हे विस्मयकारक होते. अपंगत्वार मात करून आज तो गावातल्या ग्रामपंचायतीत संगणक ऑपरेटरची नोकरी करतो. सरकारी नोकरी मिळाली नाही हा त्याच्या मनातला सल त्याने व्यक्त केला. परंतु आजहि अरुण आमच्यासोबत त्याच जिद्दीने सामील आहे, ह्यातच मला एक  प्रेरणादायी यशोगाथा दिसली. अरुणच्या व्हीलचेयरसोबत पळणाऱ्या मुलांपैकी वेढीचा दीपक उपस्थित नव्हता.

दीपेश म्हणजे शाळेतला एक भन्नाट उपद्व्यापी कलाकार. :)  दीपेशच्या जीवनातील चढउतार आणि त्यातून आज त्याने प्राप्त केलेले सुयश हेदेखील श्रवणीय होते. आमच्या व्हाट्सएप ग्रुपची स्थापना करण्यात त्याचा पुढाकार आहे. त्याचा रिअल इस्टेट आणि सामाजिक क्षेत्रातला चढता आलेख वाखाणण्याजोगा आहे.

दीपेश सोबतच आठवीत आमच्या वर्गात आलेला दुसरा एक एडवणकर म्हणजे संजय. त्याने आल्या आल्या कोणाकोणाला कोणत्या टोपण नावाने चिडवीत त्याचा घोष लावला होता. :D  कदाचित त्याचा सर्वात ज्यास्त फटका त्याला बसला असावा. ;) तसेच कधीतरी आमची झालेली भांडणे, मारामाऱ्या वगैरेच्या स्मृती त्याने उजळून काढल्या. सध्या तो त्याच्या आवडीच्या रेफ्रिजरेशन क्षेत्रात उद्योग करतो. त्याचं क्रिकेटर होण्याचे मनोरथ अपूर्ण राहिले तरी आज तो एमसीएचा पंच म्हणून क्रीडाक्षेत्रात कार्यरत आहे, हे काही कमी नाही.

सफाळ्याचा प्रशांत म्हणजे वर्गातील स्टार कलाकार. प्रशांत आमच्या वर्गात तसा उशिराच  आला आणि तेवढ्यातच सफाळे रेल्वे स्टेशनांवरून त्याचं अपहरण झाल्याची आठवण निघालीच. त्यातून त्याने  स्वतःच सुटका करून घेतली होती आणि योगायोगाने 'किडनॅप्प्ड' नावाचा एक धडा त्यावर्षी इंग्रजी पुस्तकांत होता...  त्याच्यासारख्या  व्हायब्रण्ट माणसाने एकाच नोकरीत टिकून राहणे म्हणजे नवलंच. :) पण आज तो कारकिर्दीत यशस्वी आहे. प्रीतमसह,  तो व इतर मित्र मिळून विरारमध्ये समाजकार्यातही अग्रेसर आहेत, हे उल्लेखनीय.

प्रीतम, प्रशांत, निलेश, जयप्रकाश हे आमचे चटाळे गावचे शिलेदार. जयप्रकाश शिक्षक आहे आणि त्यासाठी अत्यंत विपरीत स्थितीही त्याने शिक्षणासाठी दिलेला  स्फूर्तिदायक लढा ऐकला. प्रशांत एसटीत नोकरीला आहे आणि आपल्या वडिलांच्या सफाळे बाजारातील दुकानाचे रूपांतर एक मोठ्या शोरूम मध्ये करण्याचा त्याचा मानस आहे. निलेश आणि प्रीतम दोघेही सरकारी नोकरीत सुस्थित आहेत. निलेश आणि त्याच्या  पत्नीने मिळून कॅटरिंग चा व्यवसायही भरभराटीस आणला आहे. राजेशनाना माझा जिगरी दोस्त काही घरगुती कारणामुळे येऊ शकला नाही. तसेच अमोल, संदीप, विपीन, उपेंद्र, प्रवीण, रविकांत, उमेश, मनोज असे अनेक चटाळेमधले सवंगडी ह्यानिमित्ताने आठवले. ते पुढच्या वेळी नक्कीच भेटतील अशी आशा आहे.

धर्मा फक्त 10 वि पर्यंत शिकू शकला आणि पुढे गार्डनिंगच्या कामात गुंतून गेला. वनखात्याचा आलेला कॉल त्याच्या आईने झोपडीच्या झावळीत ठेवला आणि बाहेरगावी गेलेला धर्मा परत आला तोपर्यंत ती संधी हुकली होती, हे नेहमीच्या हसतमुख स्टाईलमध्ये धर्मा बोलून गेला. पण हे अत्यंत वेदनादायी होतं... :(

अनिल सुद्धा शिक्षण सोडून नोकरीच्या मागे लागला आणि सध्या आपल्या कुटुंबासह समाधानाचे आयुष्य जगतोय. अनिल, धर्मा इत्यादी तत्कालीन तगड्या मित्रांच्या भरवश्यावर आमच्या  'अ' वर्गाचा स्पोर्ट्समध्ये शाळेत निभाव लागत असे, हे मान्यच करावे लागेल!

तिघऱ्याचा महेश सुमारे दीड हजार विद्यार्थ्यांच्या एका शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यभार संभाळतोय. हे प्रशंसनीयच आहे. विळंगीचा अजय रेल्वेमध्ये नोकरी करतोय आणि नेहमीप्रमाणे आनंदीच दिसला.

अंबोड्याच्या सुधीर तांबेची भेट राहून गेली. तसेच विळंगीचा अनिल, तिघऱ्याचे परशुराम व नीलकंठ,  आगरवाडीतील गणेश, नीलकंठ, हंजारीमल, मनोहर व कमलेश, नगाव्याचा किशोर, उसरणीचा रमेश, डोंगऱ्याचा संतोष, वेढीचा दीपेश, खार्डीचे संदीप-विलास, दातिवऱ्याचे किशोर, सुरेश व विलास, दांडाखाडीचा अस्लम, मायखोपचे रघुनाथ व अनिल,  इत्यादी मित्र काही कारणांनी संमेलनाला येऊ शकले नाहीत. पण ह्या संमेलनाच्या यशानंतर हे सवंगडी पुढल्या वेळी नक्कीच भेटतील अशी खात्री आहे.

भूषण आयटी क्षेत्रात सॉफ्टवेअरमध्ये अग्रेसर आहे. कॉमर्सचा विद्यार्थी असूनही त्याने सेल्फस्टडीच्या जोरावर आयटी क्षेत्रात मोठी भरारी मारलीय, ती प्रेरणादायी आहे. काहीतरी इनोव्हेटिव्ह आयडियातून समाजकार्य करण्याची त्याची मनीषा आहे.

प्रतिम सुद्धा आयटी क्षेत्रातच  इन्फ्रास्ट्रक्चर आणि हार्डवेअर क्षेत्रातील तज्ञ  आहे. सध्या एका बँकेचा  आयटी मॅनेजर असून शक्यतो लवकर निवृत्त होऊन जास्तीत जास्त वेळ गावाकडे देऊन काही भरीव समाजकार्य करण्याच्या विचारात आहे.

सुधीर आमच्याच शाळेत अध्यापक आहे . तसेच शिक्षणक्षेत्रातील समुपदेशनामध्ये एक उत्कृष्ट व्याख्याता म्हणून त्याचा नावलौकिक आहे.  राजेश हा आणखी एक मित्र आमच्या शाळेतच शिक्षक म्हणून कार्यरत आहे, पण तो काही कारणाने हजर राहू शकला नाही.

सुभाषने अनेक अडचणींवर मात करून आणि आपला नोकरीधंदा सांभाळून स्वतः:चे प्रेमप्रकरणही यशस्वी करून दाखविले. अर्थात त्यासाठी प्रसंगी कराटे-कुंगफू वगैरे शिकायची तसदी घेतली हेदेखील थोर आहे! ;) आपली बायको 'बसून राहू नये' म्हणून तिला एका पाठोपाठ एक असं चारपाच वेगवेगळे करियर क्लासेस लावून देण्याची त्याची आयडियाहि भन्नाटच! :D

उसरणीच्या हेमंतने स्वतः:चा व्यवसाय उभा केला आहे आणि अर्थातच त्यात तो खूप समाधानी दिसला. विपेंद्र सुद्धा कन्स्ट्रक्शन क्षेत्रात व्यबस्थापक पदावर कार्यरत आहे. त्याची शाळेतली सुम्म लव्ह स्टोरी आणि त्यासाठीचा 13 वर्षाचा प्रदीर्घ प्रतीक्षा काळ, हा एक नमुनाच!  :)

शाहआलम शेवटच्या बेंचवर बसणार आमचा मित्र. अत्यंत सुस्वभावी आणि मेहनती माणूस.  आज आखातीदेशात कुवैत इथे स्वतः:चा फर्निचरचा व्यवसाय यशस्वीरीत्या चालवतोय. म्हणजे तो आमच्या बॅचचा अनिवासी भारतीय उद्योगपतीच! शाहआलम कुवैतसे (y) :D

बंटीच्या आदेश बांदेकर फेम सूत्रसंचलनामध्ये सुभाष आणि संजयने मनोगत व्यक्त करणाऱ्यांना  काही मार्मिक प्रश्न  विचारून,  खोचक टिप्पण्या करून लै मजा आणली. :) उदाहरणार्थ, प्रीती म्हणाली कि तिला कोणी ओळखेल कि नाही अशी शंका होती. त्यावर सुभाषने लगेच "तुला कदाचित ओळखले नसते पण तुझ्या गालावरच्या खळ्या (त्याच्या शब्दांत 'खड्डे') कसे विसरणार?"  अशी कोटी केली आणि एकंच हास्यकल्लोळ उडाला. :D

संध्याकाळी सर्वांना आपल्या घरी सोडण्याची व्यवस्था पार पडल्यावर उरलेल्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी व्यवस्थापकीय समितीचे मेंबर्स श्रमपरिहारासाठी 'बसले'. ;)  तेव्हा '91's 90s' ;) नावाची एक कोअर कमिटी बनवून  पुढील संमेलनाच्या रूपरेषा ठरविण्यासाठी लवकरच काही बैठका घेण्याचा निर्णय रात्री उशिरा जाहीर करण्यात आला ! ;) :) :D 


35 मित्र मैत्रिणींची मनोगते ऐकताना 91 नंतरचा 25 वर्षांचा काळपट समोर उलगडत होता.
25 वर्षे...? काळ कसा झर्रर्रकन निघून गेला हे सर्वांनाच कोड्यात टाकणारे होते. उदाहरणार्थ, तनुजा म्हणाली कि तिचा मुलगा आठवीत आहे, म्हणजे 13 वर्षांचा झालाय. पण मी तर तिच्या लग्नाला फक्त पाच-सहा वर्षांपूर्वीच गेलो होतो कि काय असेच आज वाटतेय. हा 25 वर्षांचा मध्यबिंदु पकडला तरी आधीची निम्मी वर्षेही तशीच झपाट्याने पळून गेली. सर्वजण फोटोसाठी एकत्र जमले तेव्हा मात्र कधीकाळी ताडमाड भासणारे धर्मा आणि अनिल उंचीने कमी झाले कि काय असे वाटावे , इतका फरक इतरांच्या उंचीत नक्कीच पडल्याचे जाणवले, हाच काय तो काळाचा महिमा! :D

एकूणच साऱ्यांच्या मनोगतातून पुढच्या शिक्षणातील संघर्ष, नोकरी-धंद्यातील धडपडी, चढउतार, यश-अपयश ह्यांचा धागा समान जोडलेला दिसला. वैयक्तिक आयुष्यातही अनेकांनी चढउतार अनुभवले. काही प्रेमप्रकरणे फलद्रुप झाली तर काही काळाच्या ओघात मागे पडली. त्यातले काही वीरमहारथी सपाटून आपटले तर काही सुमडीतकोंबडी मैदान मारून गेले. ;)  कुणाची लग्नें उशिरा झाली तर कुणाची झटपट 10 वि 12 वि मधेच, तर कुणाचे संसार मोडून ते पुन्हा उभे राहिलेत.... कुणाची मुलं कॉलेजात तर कुणाची अजून नर्सरीत... कुणाच्या जीवनात शेवटच्या क्षणापर्यंत टोकाची पातळी गाठली गेली. पण त्या अंतिम रेषेला स्पर्श करून ते सुखरूप  परतले. (y)  आमचे तीन मित्र मात्र त्या रेषेपलीकडे कायचमचे मार्गस्थ झाले, त्यांच्या स्मृती नेहमीच हुरहूर लावतील.  :( 
...परंतु ह्या जीवनसंघर्षातून तावून सुलाखून आज प्रत्येकजण ताठ मानेने आयुष्याच्या लढ्याला पुरून उरलाय, एवढेच काय ते खरे! आमच्या मित्रमैत्रिणींच्या जीवनानुभवांची 35 समृद्ध पाने... यशापयशाचे माप प्रत्येकाच्या पदरात कमीअधिक प्रमाणात पडले असेल, परंतु एक मात्र निश्चित कि प्रत्येकाचे पाय आजही जमिनीवरच ठाम आहेत. ... आणि 25 वर्षांनीही मैत्रीचा हा धागा अधिक प्रगल्भ आणि व्यापक करीत त्याला सामाजिक जाणिवेचा आशय देण्याचा मानस सर्वांचाच आहे हे अधिक महत्वाचे. पुन्हा एकदा शाळेत 'माझ्या जीवनातील अविस्मरणीय क्षण' असा निबंध लिहायची वेळ आलीच तर ह्या स्नेहसंमेलनावर तो लिहिला जाईल, नाही का?

तुम्ही जिंकलंत रे मित्रांनो आणि मैत्रिणींनो! 91 बॅच रॉक्स...! (y) (y) (y)

No comments:

Post a Comment