Friday, 25 November 2016

नोटबंदीची क्षणचित्रे

ऑफिसच्या खालच्या मजल्यावर बॅंक ऑफ बडोदा... तिथे रोजची तळमजल्यापासून पहिल्या मजल्यावर जिन्यावरून कॉरिडॉर मधून अस्ताव्यस्त पसरलेली लाईन... शेकडो बायाबापडे दिवसभर ताटकळत उभे... मधेच गलबला वाढतो, आवाज टिपेला पोहोचतात...रांगेतली भांडणं ...पुन्हा साळसूद सावरासावर... बॅंकमॅनेजर बाई म्हणजे ब्युरोक्रसीचा नमुना आहे...साडेतीनला व्यवहार बंद... एक शिपाई इमानेइतबारे दरवाजात उभा राहून गर्दी कंट्रोल करायचा निष्फळ प्रयत्न अविश्रांत करतोय... बाजूच्या कंपनीमधला शिपाई कापसेसुद्धा तिथे पोलिसिंगची हौस भागवून घेतो...गर्दीतल्या एकेकाला सरळ करायचा विडाच उचललाय पट्ठ्याने... पहिल्या दोनतीन दिवसांची हजारोंची रांग गेलं दहा दिवस शेकड्यावर येऊन स्थिरावलीय, इतकाच नोंद घेण्यासारखा फरक... मागे बँकेला सुट्टीच्या दिवशी रविवारी सोसायटीच्या सोयीसुविधा म्हणजे सुरक्षा, पाणी तसेच लाईटवाल्या साहेबांशी संपर्क साधून पॉवर वगैरे व्यवस्था लावून दिली...साहेबांचे पैसे लाईनशिवाय बदलून दिले गेले... तीनचार दिवसाआधी रांगेतल्या एकाकडून २७००० रुपयाची रोकड घेऊन रांगेतला दुसरा देशभक्त पळालाय...त्याला सोसायटीच्या सीसीटीव्हीतून शोधण्याचा पोलिसांचा प्रयत्न निष्फळ झालाय...
(नोटबंदीच्या डायरीच्या पानातून )

No comments:

Post a Comment