Wednesday, 12 July 2017

नववीच्या इतिहासाचे पुस्तक: आक्षेप

नववीच्या इतिहासाचे पुस्तक सध्या चर्चेत आहे. इतिहासाची अलीकडली शालेय पुस्तके नाविन्यपूर्ण डिझाईनची, रंगीबेरंगी, इंटरॅक्टिव्ह वगैरे बऱ्यापैकी प्रयोगशील आहेत. इतिहास आणि राज्यशास्त्र मिळून इयत्ता नववीच्या पूस्तकात सन १९६० ते २००० पर्यंतच्या भारताची माहिती दिली आहे. त्यावरील आक्षेपाचे मुद्दे आधीच मीडियात चर्चेत आहेत, त्यांचा उहापोह एका कमेंट मध्ये केला होता. त्याचीच हि पोस्ट Mandar Kale Hanumant Pawar Manas Pagar.

'कारगिलमध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केला' हे वाक्य वाजपेयींच्या माहितीमध्ये येते. पण दुसरीकडे इंदिराजींच्या माहितीत पाकिस्तानचा बांगलायुद्धातील निर्णायक पराभव मात्र स्पष्टपणे लपवला गेलाय. (!) लालबहादूर शास्त्रीजींच्या माहितीमध्येही पाकिस्तानच्या पराभवाचा उल्लेख टाळला गेलाय.(!)
बांगला युध्दातील ऐतिहासिक आणि दिग्विजयी कामगिरीपेक्षा कारगिलच्या चकमकीतून विद्यार्थ्यांना कोणती मोठी प्रेरणा मिळणार आहे काय ?

नेहरूंच्या जागतिक अलिप्ततावादी धोरणाच्या जोडीने वाजपेयींच्या चीन धोरणाचेहि उदाहरण पुढे करण्यामागचा हेतू काय? अशी छोटीमोठी परराष्ट्र धोरणे इतर पंतप्रधानांनी आखली नाहीत काय ?
सन २००० पर्यंत असे किती काळ वाजपेयी प्रधानमंत्री होते आणि त्यामानाने त्यांची जितकी माहिती दिली गेली, त्याअनुषंगाने व्हीपी सिंग, चंद्रशेखर, देवेगौडा,गुजराल किंवा मोरारजी देसाई ह्यांना किती स्पेस मिळाली? ह्या प्रधान मंत्र्यांचे फोटो/चित्रे पुस्तकात वाजपेयींच्या प्रमाणेच का समाविष्ट केले नाहीत?
ऑपरेशन ब्लु स्टार किंवा सुवर्णमंदिरावरील कारवाईची माहिती दिली जाते, इंदिराजींच्या हत्येचा उल्लेख येतो, नक्षलवादाची माहिती दिली जाते, काश्मिरी पंडितांच्या विस्थापनाचाही उल्लेख होतो. पण रथयात्रा, बाबरी मशीदीचा विध्वंस, मुंबईतल्या दंगली आणि एकूणच राममंदिर प्रश्नाच्या अनुषंगाने देशात निर्माण झालेली जातीय-धर्मांध तेढ आणि सामाजिक सलोख्यातली उभी फूट ह्यावर मात्र भाष्य करण्याचे सोयीस्कररीत्या टाळले गेले आहे! ह्यातून कोणाच्या इतिहासातील हितसंबंधांची काळजी वाहिली जातेय?
पुस्तकातील ह्या घोडचुकीच्या समर्थनासाठी म्हणून 'दंगलींचे उल्लेख सामाजिक सौहार्दासाठी टाळण्याची' मंडळाची भुमीका भाबडी आहे कि बोगस आहे?

'२०१४' साली 'ऍक्ट ईस्ट' ह्या 'लूक ईस्ट' च्या जागी नाव बदललेल्या धोरणाचा उल्लेख करून नेमके काय साध्य होते? मग नियोजन आयोग आणि पंचवार्षिक योजना ह्यांची विस्तृत चर्चा करताना २०१४ साली नियोजन आयोग गुंडाळून 'नीती आयोग' हा बदल कोणी व का केला, ह्याचे राज्यशात्र का उलगडले गेले नाही? बरं, शिक्षणक्षेत्राविषयीच्या माहितीमध्ये २०१४ नंतर मानवसंसाधनाची शैक्षणिक 'धोरणे' कोणी व का बदलली त्याबद्दल हे राज्यशास्त्र अवाक्षरही का बोलत नाही?
पुस्तकाच्या इतिहासकाळाची सन २००० पर्यंतची मर्यादाही अशाप्रकारे सोईस्कररित्या वापरलेली नाही काय?
काँग्रेसचा 'दारुण' वगैरे पराभव झाला ह्याचा उल्लेख जर केला जाऊ शकतो तर त्यांच्या 'दणदणीत, विक्रमी' दैदिप्यमान वीजयांचाही उल्लेख 'पुन्हा सत्तेवर आले' अशा जुजबी वाक्यरचनेत का? राजीव गांधी आणि कथित बोफोर्स भ्रष्टचार प्रकरणाचा उल्लेख हा पुस्तकातील सुनियोजित शाब्दिक करामतींच्या पांडित्याचा नमुनामात्र आहे! हा शब्दच्छल पुस्तकाच्या मार्फत विद्यार्थ्यांमध्ये नेमका कोणता इतिहास रुजवू पाहतो?
म्हणून 'त्याकाळातील काँग्रेसच्या इतिहासाची सर्वाधिक दखल ह्या पुस्तकात घेतल्याचे' दाखले दिले जातात ते फसवे आहेत. कारण सन १९६० ते २००० ह्या कालखंडाचा काँग्रेसचा जो आहे तो इतिहास आहेच. परंतु कुणाचातरी नसलेला इतिहास पेरण्यासाठी दुसऱ्याचा इतिहास खुजा करण्याची प्रवृत्ती पुस्तकातून प्रकर्षाने जाणवल्याशिवाय राहत नाही, त्याचे काय करायचे? मुद्दा कुणा एका व्यक्तीचा नाही तर ह्या प्रवृत्तीचा आहे, त्यामागील 'धोरणांचा' आहे!

असे अनेक प्रश्न पुस्तकातील इतिहासातून निर्माण होत आहेत आणि ते कुठल्याही पक्षीय अभिनिवेशापेक्षा वस्तुनिष्ठ अभ्यासातून पुढे येतात. पुस्तकातील इतिहास हेतुपुरस्सर तोकडा, त्रोटक आणि त्यातून कुणाच्यातरी अडचणीची झाकापाक करणारा, कुणालातरी पुढेपुढे करणारा आणि अर्थात कुणाच्यातरी छुप्या अजेंड्याची री ओढणारा आहे, ह्यात शंका आहे काय? कारण तसे स्पष्ट भगवेकरणाचे धोरणच राज्यकर्त्यांचे आहे आणि सातवीच्या इतिहासाच्या भगव्या मुखपृष्ठावरून जे खुलेआम दिसते, त्यात नवीन काय आहे?

Monday, 3 July 2017

अकबराचा सहिष्णू, पुरोगामी, प्रागतिक विचार : 'औरंगजेब- शक्यता आणि शोकांतिका'

अकबराच्या काळात हिजरी कालगणनेनुसार १५५१ मध्ये इस्लामला १००० वर्षे पूर्ण होणार आणि त्यानिमित्ताने १२वा इमाम पुन्हा जन्म घेऊन इस्लामची पुनर्स्थापना करणार असा समज पसरला होता. त्यामुळे सर्वसामान्य मुस्लिम जनता मुस्लिम सनातनि धर्मपंडितांची सर्रास टिंगलटवाळी करू लागले होते. तेव्हा अकबराने फत्तेपूर शिक्रीमध्ये इबादतखाना नावाची एक इमारत बांधून दर गुरुवारी तिथे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, पारशी, इत्यादी धर्मपंडितांच्या खुल्या चर्चा घडवून आणल्या. त्यातून 'दिन ईलाही' ह्या नव्या धर्माची स्थापना केली. अर्थात तो धर्म काही भारतात फारसा प्रभाव पडू शकला नाही. परंतु त्यानिमित्ताने अकबराचे विचार आणि त्याने अंमलात आणलेले नवे कायदे अत्यंत महत्वाचे आहेत.

१ . हिंदुस्तानच्या शेतीमधील गाई व बैल ह्यांचे महत्व लक्षात घेऊन कायद्याने गोवधबंदी जाहीर केली.
२. हिंदू, ख्रिस्ती लोकांना राज्यात देवळे व चर्च बांधण्यास परवानगी दिली.
३. हिंदूंच्या देवस्थाने, यात्रा, जत्रा यांवरील कर रद्द केला.
४. सर्व समाजांना आपापले सण उत्सव साजरे करण्याची मुभा दिली.
५. 'जिझिया' कर जनतेला राजनिष्ठ न राहण्याची सवलत देतो म्हणून जिझिया कर रद्द केला.
६. हिंदू विधवांच्या पुनर्विवाहास मान्यता दिली.
७. सतीच्या प्रथेतील स्वेच्छेने सती जाण्याचा अधिकार मान्य केला परंतु सतीची बळजबरी केल्यास देहदंडांच्या शिक्षेचे फर्मान काढले.
८. एका जैन साधूच्या विनंतीवरून स्वतः मांसाहार सोडला व ईदच्या दिवशी होणाऱ्या पशुहत्येवर बंदी आणली.
९. पारशी समाजाची कालगणनेची पद्धत सर्वाधिक शास्त्रशुद्ध असल्याने राज्यात ती लागू करण्याचा हुकूम काढला.
१०. 'हज' यात्रेला जाणे म्हणजे आपली निष्ठा देशाबाहेर ठेवणे असे जाहीर करून हज यात्रेवर बंदी घातली.
११. कुत्रा व डुक्कर हे प्राणी 'नापाक' असल्याच्या समजुतीत तथ्य नाही असे जाहीर केले.
१२. मुस्लिम समाजातील चुलत व मावस भावंडातील लग्नाची पद्धत अशास्त्रीय ठरवून बाद केली.
१३. कायद्याने लग्नासाठी मुलाचे वय १६ व मुलीचे १४ ठरवून दोघांची संमती घेणे कायद्याने बंधनकारक केले.
१४. वयाच्या ५२व्या वर्षी दहा वर्षाच्या आयेषाशी लग्न करणारा आणि स्वतः:च्या मुलासारख्या झैदीच्या पत्नीशी त्याला तलाक घ्यायला लावून स्वत: लग्न करणारा पैगंबर प्रेषित असू शकत नाही असे त्याने जाहीर केले.

अकबराचे हे विचार आणि त्याचे कायदे म्हणजे कुराणवादी इस्लामची उघडउघड पायमल्ली होती. ह्या काफर देशात राहणे नको म्हणून अनेक मुस्लिम धर्मगुरूंनी हिंदुस्थानाला कायमचा रामराम ठोकला आणि मक्केला निघून गेले. तर काही मुल्लामौलवींनी शहजादा सलीमला हाताशी धरून बंडाचा झेंडा फडकविला.
अकबराने हि बंडखोरी निष्ठुरपणे मोडून काढली. बंडखोर मौलवींना ठार मारले किंवा त्यांना काबूलच्या बाजारात गुलाम म्हणून विकले.

एकूणच हिंदुस्तानच्या इतिहासात इस्लामला अकबराच्या काळात जी दैनावस्था प्राप्त झाली त्याचे कारण म्हणजे राजसता आणि धर्मसत्ता ह्यांची स्पष्ट फारकत करण्याचे अकबराचे धोरण होय.
अकबराच्या ह्या धोरणाने कुराणपंथी धार्मिक मुसलमान किती गोंधळून गेले ह्याचे उदाहरण म्हणजे दरबारातील इतिहासकार बदायुनी ह्याचे उद्गार. बदायुनी लिहितो " सण १५७८ पर्यंत बादशाह पुरेसे धार्मिक होते. पण पुढे ते इतके बिघडले कि त्यांनी मला रामायण व महाभारत ह्या संस्कृत धर्मग्रंथांचे फारसीत भाषांतर करायला सांगितले. कुराणाच्या आज्ञेच्या विरोधात वर्तन करायची आपत्ती माझ्यावर अली आणि राजाज्ञेमुळे मला ते काम करावे लागले!"

अकबराची पट्टराणी महाराणी जोधाबाई हिने अनेक राजपूत, हिंदू चालीरीती मोगल दरबारात आणल्या. मंगलप्रसंगी राजाला ओवाळणे, कपाळावर कुंकुमतिलक लावणे, मौल्यवान वस्तुंनी तुला करणे, वाढदिवस साजरा करणे, रयतेला दर्शन देणे , इ. हिंदू प्रथा दरबारी रीतिरिवाज म्हणून स्वीकारल्या गेल्या. ह्यापुढे बादशाहच्या जनानखान्यातून हिंदूंचे राजदरबारातील प्रस्थ वाढले आणि हिंदूंच्या विरोधातील वटहुकूम काढण्यास तेथूनच विरोध होऊ लागला. हिंदू राजकन्यांशी लग्न करण्याच्या प्रथेचा मोगल दरबारावर असा प्रभाव पडला.

हिंदू रयत मुसलमान बादशाहाला 'जगद्गुरू' तर त्याच्या बेगमेच्या 'जगतगोसाईन' म्हणू लागले.
अकबर सुन्नी मुसलमान होता. त्याचा गुरु बहिरामखान शिया. सल्लागार अबुल फैजी व अबुल फजल मुसलमान परंतु नास्तिकतेकडे कल असणारे, सेनापती राजा मानसिंग, बिरबल, राजा तोडरमल इत्यादी विश्वासू सहकारी हिंदू अशी सरमिसळ होती. बहुसंख्य रयत हिंदू तर बहुसंख्य सैन्य-मनसबदार इराणी-तुराणी-अफगाणी मुस्लिम. राजकीय धोरण म्हणून त्याने अनेक राजपूत राजकन्यांशी विवाह केले. शाहजाद्यांचे विवाह राजपूत मुलींशी करून दिली. स्वतः:च्या मुली/नाती राजपुतांना द्यायची तयारी दर्शविली.
परंतु असे असले तरी अकबराच्या ह्या आधुनिक धोरणांचा मुद्रणकलेच्या, प्रसारमाध्यमांच्या अभावी किंवा अडाणी जनतेमुळे असेल परंतु ह्या पुरोगामी विचारांचा प्रसार भारतात फारसा झालेला दिसत नाही.

इबादतखान्यातील घडामोडी जनतेत पसरल्या त्या तोंडी सांगोपांगी विकृत स्वरूपात आणि त्यामुळे हिंदुस्तानातील वैचारिक गोंधळात भर पडण्याचेच काम झाले. तत्कालीन युरोपातील विचारस्वातंत्र्याचे वारे हिंदुस्तानात अकबराच्या धोरणानेसुद्धा वाहू शकले नाहीत. युरोपातील मार्टिन ल्युथर हा धर्मसुधारक अकबराचा समकालीन असला तरी अकबराचे धार्मिक सुधारणांचे विचार, मानवी मूल्यप्रणित धोरणे अधिक प्रभावित करणारे दिसतात. युरोपमधील सर्व ज्युना ठार मारले पाहिजे किंवा हाकलून दिले पाहिजे, चेटक्याना जिवंत जाळले पाहिजे, इ. प्रतिगामी बाजूही असलेल्या युरोपियन सुधारणवादापेक्षा अकबराचा सहिष्णू आणि पुरोगामी विचार अधिक सक्षम प्रागतिक असल्याचे दिसते. परंतु हिंदुस्तानातील एकूण समाज-राजकीय परिस्थिती मात्र गोंधळाची आणि ह्या प्रागतिक दृष्टिकोनाच्या संवर्धनासाठी उपयुक्त नव्हती, हे दुर्दैव.

'औरंगजेब- शक्यता आणि शोकांतिका' (लेखक रवींद्र गोडबोले)
पान नं. सत्तावीस, अठ्ठावीस, एकोणतीस

Saturday, 1 July 2017

GST : At the stroke of the midnight hour...

पंडित नेहरूंच्या १५ ऑगस्ट १९४७च्या "Tryst with Destiny" ह्या भाषणातील "At the stroke of the midnight hour, when the world sleeps, India will awake to life and freedom. " ह्या जगप्रसिद्ध उद्गारांची जादू जनमानसावर इतकी कोरली गेलीय कि त्यांच्या जन्मजात विरोधकांनाहि त्याची अफाट भुरळ पडते.
तर इव्हेन्ट बहाद्दर हो, 'हौसेला मोल नसते' पण 'फजितीला वेळ नसते' हे नोटबंदीच्या निमित्ताने दिसलंय आणि ते अठराव्या अध्यायात भगवान श्री कृष्णाने स्वत:च लिहून ठेवलंय, बरं...