Friday, 30 August 2013

सावरकरांचा माफीनामा आणि आग्र्याहून सुटका.



सावरकरांच्या माफीनाम्याचा प्रश्न निघाला कि सावरकरभक्त सतत थेट शिवाजी महाराजांचा आधार घेतात! ह्याला माझा आक्षेपच आहे कारण कोणत्याही क्रांतिकारकाची तुलना शिवरायांशी  करणे हे खरेतर वैचारिक दिवाळखोरीचेच लक्षण आहे.

ब्रिटीश विरोधी लढ्यात ज्या क्रांतीकारकांना तुरुंगवास झाला त्यापैकी काहीनि माफीनामे लिहून दिले आणि आपली सुटका करून घेतली हे खरे आहे उदा. सावरकर तर काहींनी असे माफीनामे न लिहिता फासावर जाणे पसंत केले उदा. भगतसिंग.
माफीनामे लिहून सुटका झाल्यावर सदर क्रांतिकारकांनी जर आपले सशस्त्र आंदोलन पुढे चालू ठेवले असते तर त्या माफिनाम्याकडे एक राजकारण म्हणून पाहता आले असते.

असेच राजकारण शिवरायांनी अग्र्यातून सुटकेच्या वेळी यशस्वी रित्या खेळले होते. इ.स. १६६६. सुमारे ३ महिने राजे आग्रा इथे कैदेत होते. बादशाहने फौलाद्खानाला राजांना विठ्ठल दासाच्या हवेलीत नेउन ठार मारण्याचे आदेश हि दिले होते. आपले राज्य सोडून त्यांना असे कैदेत खितपत पडून राहणे परवडणारे नव्हते, त्यामुळे येनकेन मार्गे बादशाहाकडून सुटका करून घेण्याचे राजकारण त्यांनी सुरु केले. आणि ते एक राजे होते त्यामुळे बादशाहाला अशी पत्रे लिहून त्यातून आपले राजकारण साध्य करणे नित्याचेच होते. अशीच पत्रे त्यांनी आदिलशहाला देखील लिहिली होती. तसेच अफझलखान, शायिस्तेखान, दिलेरखान, जयसिंग अशा मातब्बर शत्रू सरदाराना देखील ह्याच प्रकारची राजकीय पत्रे एक राजकारण म्हणून त्यांनी लिहिली आहेत. अफझलखान प्रकरण राजांच्या राजकारणाचे आणि  मुत्सद्देगिरीचे असेच एक उत्कृष्ट नमुना आहे.



मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेरखान ह्या मुघल आक्रमणासमोर स्वराज्याचा टिकाव लागत नाही हे पाहून राजांनी  यशस्वी माघार घेतली असेच पुढील इतिहासावरून स्पष्ट दिसते. त्यातून आग्रा भेट आणि पुढील कैदेचे प्रकरण उद्भवले. त्यातून पार पडल्यावर राजांनी औरंगझेबाचे मांडलिकत्व स्वीकारले नाही. पंचहजारी/सप्तहजारी मनसबदारी पत्करून सरदारकी केली नाही. उलट थोड्याच काळात तह झुगारून दिला आणि आपले सर्व किल्ले आणि भूप्रदेश परत जिंकून घेतले. १६७१ मध्ये मुघलांचा साल्हेर च्या युद्धात मोठा पराभव केला आणि १६७४ मध्ये राज्याभिषेक करून सार्वभौम स्वराज्याची स्थापना केली. म्हणजेच कोणत्याही परीस्थित आपल्या स्वीकृत कार्यापासून फारकत घेतली नाही. तर प्रतिकूल परीस्थित यशस्वी माघार घेऊन अजून जोराने स्वराज्याचे कार्य सतत चालूच ठेवले.

शिवरायांच्या आग्रा सुटकेनंतर २५० वर्षानंतर सावरकर ब्रिटीश कैदेत पडतात आणि जे माफीनामे लिहितात त्यांची तुलना शिवरायांनी आग्रा इथे औरंगझेबाला त्याच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी जी पत्रे लिहिली त्या राजकारणाशी करून आपण आपलीच दिशाभूल करून घेत आहात हे लक्षात घ्या.


मध्ययुगीन कालखंडात आग्रा इथून औरंगझेबासारख्या बलाढ्य आणि धूर्त बादशाहच्या हातावर तुरी देऊन, केवळ अक्कलहुशारीने राजकारण करून, सहीसलामत महाराष्ट्रात परतणे हे फक्त तो युगपुरुष शिवाजीच करू शकतो. असे उदाहरण जागतिक इतिहासामध्ये कुठेही असल्याचे दिसत नाही.

एकतर सावरकरांनि अंदमान कैद हि त्यांनी स्वत:हुन ओढवून घेतली होती कारण त्यांना अटक होणार हे माहित असूनदेखील  फ्रान्समधून लंडन ला येण्याची काही गरज नव्हती. तशी सूचना त्यांना श्यामजी कृष्ण वर्मा ह्यांनी केली होती. पण ते लंडन ला आले, पकडले गेले आणि मग मार्सेलिस बंदरात ती उडी घेऊन त्यांनी फ्रान्समध्ये जाण्यचा अयशस्वी प्रयत्न केला. हा विरोधाभास त्यांच्या राजकीय बुद्धिमत्तेवरच प्रश्नचिन्ह उभे करतो.

अंदमानात कैद झाल्यावर त्यांना सोडवण्यासाठी लो. टिळक, महात्मा गांधी, विठ्ठलभाई पटेल हे पुढारी ब्रिटीश सरकारकडे प्रयत्नशील होतेच. तसेच इंडिअन पिनल कोड च्या कायद्याप्रमाणे त्यांना सरकारविरुद्ध लढणे शक्य होते कारण हा कालखंड विसाव्या शतकातला आहे , मध्ययुगीन नाही. हे सोयीस्कररीत्या विसरले जाते.

कायदेशीर मार्गाने सुटका करून घेणे उदा. माफीनामे इ. ह्याव्यतिरिक्त ब्रिटीश कैदेतून पळून जाण्यासाठी त्यांनी कुठलाही मार्ग अवलंबल्याचे दिसत नाही. अंदमानात हि नाही, रत्नागिरीत हि नाही आणि येरवड्यात हि नाही. उलटपक्षी आपल्या क्रांतिकारकाच्या भूमिकेचा त्याग करून त्यांनी ब्रिटीश अनुनयाची भूमिकाच स्वीकारल्याचे दिसते. (१९१०-१९२४).

पुढे तुरुंगातून सुटका झाल्यावर आणि रत्नागिरी इथे स्थानबद्ध  असतानादेखील (१९२४-१९३७)त्यांनी स्वत:ची सुटका करण्याचा प्रयत्न केलेला दिसत नाही.  तसेच १९३७ मध्ये संपूर्ण सुटका झाल्यावर देखील भारताबाहेर जाऊन सशस्त्र क्रांतीकार्य करणे, इ. मार्ग चोखाळणे अपेक्षित होते परंतु त्यांनी ब्रिटीश अनुनयाचे धोरणच पुढेदेखील राबवल्याचे दिसते.

त्यांच्या सैनिकीकरण किंवा अस्पृशता निवारण ह्या भूमिका केवळ वेगळ्या चर्चेचा विषय आहेत. म्हणून इथे लिहित नाही.
अर्थातच आपल्या स्वीकृत कार्याचा म्हणजेच सशस्त्र क्रांतीच्या लढ्याचा  त्याग करून ब्रिटीश सरकार अनुनयाचे धोरण स्वीकारून त्या अंतर्गत समाजसुधारणा , सैनिकीकरण, हिंदुत्वाचे राजकारण असे कार्य सावरकरांनी केले. त्याची चिकित्सा करता येईल  किंवा समर्थन करता येईल किंवा त्याला विरोध हि असेल.

एकंदरीत वरील सर्व माहितीवरून सावरकरांच्या माफिनाम्याची तुलना शिवरायांशी करणे हास्यास्पद आणि बालिश पणाचे लक्षण असल्याचे दिसते. सावरकर प्रेमींनी अशी थोतांडे लिहून सावरकर इतिहासाला शेंदूर थापून त्यांचे विकृतीकरण करण्याचे उद्योग केले आहेतच. तसे न करता निरपेक्ष बुद्धीने सावरकरांच्या इतिहासाची चिकित्सा अपेक्षित आहे.



शिवाजी महाराज, त्यांचे कार्य, विचार, कार्यपद्धती आणि त्यातून निर्माण झालेले स्वराज्य हा एकमेवाद्वितीय असा इतिहास आहे. त्यांच्याशी इतर ब्रिटीश कालीन क्रांतीकारकांची तुलना करण्याचा मोह टाळायला हवा. 


शिवराय ह्या सर्व क्रांतिकारकांचे प्रेरणास्थानच होते ! म्हणूनच शिवाजी महाराज हे एक युगपुरुष म्हणून मान्यता पावले आहेत.


राकेश पाटील