Friday, 23 August 2013

धर्म हि संकल्पना कालबाह्य झाली आहे का?



"धर्म म्हणजे अफूची गोळी आहे" असे कार्ल मार्क्स म्हणाला होता. 

धर्म ह्या विषयावर आतापर्यंत साधक बाधक चर्चा, वादविवाद शतकानुशतके घडत आले आहेत. निरीश्वरवाद, एकेश्वरवाद, नास्तिकवाद, इ. प्रवाह धर्म ह्या संकल्पनेला आव्हान देत निर्माण हि झाले परंतु विविध धर्म, त्यातील अनेकविध पंथ, त्यातील जाती-जमाती अजूनही समाजात ठाण मांडून आहेत! 

धर्म ह्या संकल्पनेचा प्रवाह थेट अश्मयुगातील रानटी मनुष्य प्राण्यापासून ते आजच्या अतिप्रगत  मानवापर्यंत अव्याहत चालू आहे.

हिंदू , यहुदी आणि पारशी धर्मांची  स्थापना इसवी सनापूर्वी २-३ हजार वर्षापूर्वी झालि. बौद्ध आणि जैन धर्म इसवी सनाच्या पूर्वी चवथ्या आणि नवव्या शतकात झाली. कॅथोलिक धर्माची स्थापना पहिल्या शतकात तर इस्लाम ची स्थापना सहाव्या शतकात आणि शीख धर्माची स्थापना पंधराव्या शतकात झाली. 

तसेच धर्मात कालांतराने अनेक पंथ उदा. प्रोटेस्तंत, कन्फ़ुसिअन, शिंतो, वैदिक, शैव, वैष्णव, नाथ, लिंगायत, इ. स्थापन झाले. काळाच्या ओघात जुने धर्म कालबाह्य होऊन नवे धर्म -पंथ त्यांची जागा घेत राहिले. अश्म युगा पासून मध्य युगापर्यंत धर्म ह्या संकल्पनेची अशीच वाटचाल होत राहिली असे दिसून येते.

आजच्या आधुनिक काळात मात्र नवीन कुठल्याही धर्माची स्थापना झाल्याचे दिसत नाही. कदाचित  तशी गरजच मानवाला भासली नाही. किंवा आहेत ते धर्म विविध मानव समूहांना पुरेसे पडले असावेत. तरीदेखील ह्या धर्म-पंथामध्ये कमालीची अस्वस्थता सध्या दिसून येते. मानवाला शांती आणि सत्य अशा तत्वांची शिकवण देण्यासाठी धर्म निर्माण झाले आहेत. परंतु असे लक्षात येते कि शेवटी हेच धर्म मानवाला हिंस्त्र बनवून सोडतात.

आजच्या एकविसाव्या शतकात ह्या धर्म-पंथांची खरोखर  आवश्यकता आहे का? आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान यांनी सुसज्ज अशा आधुनिक जगात सर्व धर्म-पंथ कालबाह्य झालेत का

अश्मयुगात भारतीय मानवाला पृथ्वी शेष नागाच्या फण्यावर स्थिर आहे असे वाटत होते. आणि भारतीय उपखंडा पलीकडे असलेले अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इ. जग त्याला माहित नव्हते! तसेच युरोपिअन मानवाला पृथ्वी केंद्रस्थानी आहे आणि सुर्य व इतर सर्व ग्रह तारे तिच्याभोवती फिरतात असे वाटत होते! अशा अज्ञानातून सर्व धर्म-पंथ आणि त्यातील देव-ईश्वर, स्वर्ग-नरक ह्या कल्पना हि उगम पावल्या होत्या! त्यमुळे सारासार विचार केला तर आजच्या आधुनिक जगात ह्या कल्पना निरुपयोगी ठरल्या आहेत!

विज्ञानाने  धर्म हि संकल्पनाच कालबाह्य ठरवली परंतु तरीही धर्म हि संकल्पना आधुनिक होऊन टिकून राहिली किंवा धर्माला आधुनिक रूप देऊन तो टिकवण्याचा प्रयत्न सतत चालू आहे.  मध्ययुगापर्यंत सर्व सामाजिक, राजकीय, आर्थिक, सत्तास्थाने धर्माचार्यांच्या ताब्यात होती. लोकशाही राज्याव्यवस्थेने ह्या अनियंत्रित सत्तेला सुरुंग लागला. परंतु अप्रत्यक्ष पणे धर्म आणि  धर्मगुरू हे आजही सत्ताधीश आहेतच. सामान्य लोकांना विभिन्न जाती- धर्म-पंथाच्या विद्वेषक लढ्यामध्ये गुंतवून आपला कार्यभाग आजही साधत आहेत.

साधारण पणे एकोणिसाव्या शतकापासून मानवाने विज्ञान युगात प्रवेश केला असे समजायला हरकत नाही. आधीच्या पाच-दहा हजार वर्षात धर्म ह्या संकल्पनेतून जी मानवजातीची सामाजिक प्रगती झाली तीचा  आलेख पाहता विज्ञानाने जी प्रगती झाली त्याच्याशी तुलनाच होऊ शकत नाही अशी प्रचंड तफावत आढळून येते.

इसविसनपूर्व ३००० ते इसविसन १५०० पर्यंतच्या अश्मयुग, ब्रान्झ्युग, लोहयुग ते मध्ययुग ह्या ४-५ हजार वर्षाच्या व्यापक कालखंडात जगभर अनेक संस्कृतींचा उदयास्त झाला. उदा.  सिंधू , हरप्पा-मोहेन्जेदारो, इजिप्तशियन, मेसोपोटेमियन, माया,पर्शियन, रोमन, ग्रीक, इ. आता ह्या संस्कृती किती प्रगत होत्या ते माहित आहेच. त्यांची प्रगती हि एका मर्यादेत उत्क्रांतिवादा प्रमाणे होत राहिली. मानव भटक्या जंगली जीवनातून स्थिर नागरी जीवन, शेती, व्यापार, इ. मार्गाने पुढे सरकत राहिला. राजेशाही, धर्मशाही पर्यंत मजल गेली परंतु साधारण मानवी जीवन उत्क्रांतिवादा प्रमाणे पुढे जात राहिले.

त्यामुळे विज्ञानाने जी गती मानवी समाजाला मिळाली त्याची तुलना ह्या हजारो वर्षाच्या मानवी इतिहासाशी होऊ शकत नाही. विज्ञाननिष्ठ मानवाने वाफेचे इंजिन, विमान, मोटार, आगगाडी, वीज, रेडियो, दूरदर्शन, फोन, यंत्रे, कारखाने, औषधे, शस्त्रक्रिया, कॉम्पुटर, मोबाईल, अणुउर्जा, अवकाश याने, इ. एकापेक्षा एक सरस संशोधने करून अवघ्या १००-१५० वर्षाच्या अत्यल्प काळात स्वत:ला अत्याधुनिक बनविले. अक्षरश:  तीमिरातुनी तेजाकडे अशी वाटचाल केली कारण विजेचा शोध त्याला एकोणिसाव्या शतकात लागला तोपर्यंत तो अंधार युगातच होता! युरोपिअन मानवाने विज्ञान निष्ट दृष्टीकोन स्वीकारला आणि त्यातून मानवाला आजची विज्ञानयुगाची अतिप्रगत संस्कृती निर्माण करता आली. नाहीतर आजही आपण मध्ययुगीन अंधारात खितपत पडलो असतो.

विज्ञान तंत्रज्ञानाने मानवाची गेल्या १०० वर्षात क्रांतिकारक प्रगती घडवून आणली आहे ती धर्म ह्या संकल्पने तून हजारो वर्षात देखील घडली नाही हे कटू सत्य आहे. 

म्हणून ज्या विज्ञाने मानवाला रानटी- मागास-अप्रगत अशा संस्कृती संक्रमणातून अत्याधुनिक आणि अतिप्रगत अशी संस्कृती निर्माण करण्यास मदत केली ते विज्ञान हाच श्रेष्ठ धर्म आहे असे मला वाटते. आणि अर्थातच पारंपारिक धर्म-पंथ ह्या संकल्पना कालबाह्य झाल्या आहेत असे स्पष्ट होते.

ह्या जुनाट धर्म पंथामुळे आजही  जाती-धर्म-पंथाचे संघर्ष पेटले आहेत. प्राचीन काळी हिंदू सनातन किंवा वैदिक धर्म कर्मकांडे मानवाला जाचक वाटू लागला तेव्हा बुद्धाने नवीन बौद्ध धर्म मानवाला दिला. नंतर बौद्ध धर्माला आव्हान देत आदि शंकराचार्यांनी पुन्हा हिंदू धर्म नव्याने प्रस्थापित केला. तसेच येशु ख्रिस्ताने जुन्या प्रस्थापित धर्माला आव्हान देऊन नव्या धर्माची स्थापना केली.  मोहम्मद पैगंबराने अरबस्तानात दगडांचे देव पुजाणारे अने धर्म पंथ मोडून काढून इस्लाम ची स्थापना केली. 


पण हे सर्व धर्म मानवाला परिपूर्ण करू शकले का? विविध मानव समुह ३-४ हजार वर्षाचा कालखंड हे सर्व धर्म पंथ अनुसरतोय परंतु आजही आपण समता, बंधुता, मानवता या तत्वापासून लांबच जात आहोत. गौतम बुद्धाला, येशु ख्रिस्ताला, शंकराचार्यांना, मोहम्मद पैगम्बराना, महावीराना, अभिप्रेत असलेला धर्म अस्तित्वात आला का? आज देखील हे विविध धर्म मानवाला परिपूर्ण करू शकले का? उत्तर नाही असे आहे. धर्म हिंसेला प्रवृत्त करतो असे सतत दिसून येते! म्हणून नव्या प्रगत मानवाने धर्म ह्या संकल्पने पलीकडे विचार करणे गरजेचे आहे.

हिंदू - मुस्लिम, कॅथोलिक- प्रोटेस्तंत, शिया-सुनी, हिंदू - बौद्ध, वैदिक आणि अवैदिक, शैव - वैष्णव, ब्राह्मण - ब्राह्मणेतर, ब्राह्मण - बहुजन, आर्य - मूलनिवासी असे कित्येक संघर्ष आज समाजात पेटले आहेत. माझे असे प्रामाणिक मत आहे कि आपण सर्वांनी ह्याचा सारासार विचार करून धर्म ह्या संकल्पनेला आता तिलांजली द्यावी. ह्या सर्व संकल्पना कालबाह्य असल्याने त्यांचा सर्वांनी त्याग केला तर नवा जाती-धर्म विरहित समाज निर्माण करता येईल आणि त्यातच सर्वांचे कल्याण आहे असे मला वाटते!
मला खात्री आहे कि आधुनिक मानव एके दिवशी हि बुरसटलेली जुनाट अशी धर्म पंथ प्रणीत संस्कृती सोडून नव्या जात-धर्म विरहित विज्ञाननिष्ठ विचारधारेचा स्वीकार करेल. त्यासाठी आवश्यक विचारधनाची पेरणी सर्व विचारवंतांकडून आतापासूनच होणे गरजेचे आहे!

राकेश पाटील

No comments:

Post a Comment