एका "वेडया"
कृष्णाजी भास्करच्या निमित्ताने....
अलीकडे कृष्णाजी भास्कर
ज्याने महाराजांवर वार केला तो एक ब्राह्मण होता म्हणून तमाम ब्राह्मण समाजाला
त्यासाठी दोषी धरून त्यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न होतो. त्याबद्दल थोडेसे..
अफझलखान भेटीदरम्यान
शिवाजी महाराजांनी खानाला चारी मुंड्या चित केले आणि महाराज परत निघाले , इतक्यात खानाचा वकील कृष्णाजी भास्कर याने महाराजांवर वार केला. अर्थात
राजांनी त्यालाही लोळवले आणि प्रतापगडाचे प्रसिद्ध युद्ध जिंकून आदिलशाहीला मोठा
हादरा दिला.
इथे प्रश्न हा उपस्थित
होतो कि कृष्णाजी ब्राह्मण होता म्हणून तो दोषी ठरतो का? माझ्या मते तो खानाचा वकील होता आणि आपल्या मालकावर जीवघेणा हल्ला झाल्याचे
दिसताच त्याने खानाच्या बाजूने ह्या लढाईत उडी घेतली. खानाच्या सेवकाकडून अजून काय
अपेक्षा करणार? तो त्याच्या खाल्ल्या
मिठाला जागला. त्याच्या कृत्यांचे खापर त्याच्या जातीवर फोडून त्यासाठी एका विशिष्ट
समाजाला लक्ष करणे हि वैचारिक दिवाळखोरी नाही का?
महत्वाची बाब हि आहे कि
खानाच्या भेटीत राजांचा वकील गोपीनाथ पंत बोकील हा देखील ब्राह्मण होता आणि त्याने
मोठ्या शिताफीने खानाला जावळी मध्ये आणून नंतर प्रतापगडावर खेचण्याचे मोलाची
भूमिका पार पडली होती.
खानाचा अंगरक्षक सय्यद
बंडा हादेखील ह्या चकमकीत जीव महालाच्या हातून मारला गेला आणि इतर अंगरक्षक जे
शामियान्या बाहेर उभे होते ते देखील ह्या चकमकीत मारले गेले.
लक्षात घ्या कि खानाच्या
वतीने ह्या युद्धात अनेक मराठे सरदार शिवाजी राजाच्या विरोधात लढले कारण ते आदिलशाहीचे
चाकर होते. उदा. जगदाळे, पांढरे, मोरे, घोरपडे, भोसले.इ. पैकी घोरपडे आणि
भोसले हे तर महाराजांचे आप्तस्वकीय. स्वत: शहाजी राजे आदिलशाही मध्येच बंगळूरू इथे
नियुक्त होते.
महाराजांच्या सैन्यामध्ये
कान्होजी जेधे, नेताजी पालकर, मोरोपंत पिंगळे, राघो अत्रे, नूर खान बेग ह्यांचा समावेश होता. राजांच्या अंगाराक्षाकामध्ये संभाजी कावजी, जीव महाला , सिद्दी इब्राहीम, काताजी इंगळे, कोंडाजी कंक, येसाजी कंक, कृष्णाजी गायकवाड, सुरजी काटके, विसाजी मुराम्बक आणि संभाजी कारवर इ. सामील होते. राजांच्या योजनाबद्ध युद्ध
शैलीने अफझल खान आणि आदिलशाही पुरती नेस्तनाबूत झाली; हा इतिहास सर्वश्रुत आहे.
वरील माहितीवरून असे
दिसून येते कि शिवाजी-अफझलखान ह्या लढ्याचे स्वरूप जातीय किंवा धार्मिक लढ्याचे
नव्हते. तर ते एक राजकीय युद्धाचे होते.
तत्कालीन राजकीय परिस्थितीमुळे हिंदू लढवैये आणि ब्राह्मण बुद्धीजीवी इस्लामिक
दक्खन राजवटी मध्ये आदिलशाही,कुतुबशाही कडे चाकरी करत
होते. विजयनगरच्या अस्ताबरोबर दक्षिणेमध्ये देखील राजकारण पुरते इस्लामिक झाले
होते. उत्तरेत तर ते आधीच झाले होते त्यामुळे राजपूत, जाट इ. क्षात्र समाज आणि ब्राह्मण बुद्धीजीवी दिल्लीच्या मुघल अधिपत्याखाली
चाकरी करत होतेच.
हे लक्षात न घेता सध्या
नवइतिहास संशोधक सरसकटपणे कृष्णाजी भास्कराच्या शिवाजी राजांवरील वाराला
ब्राह्मणविरोधी भूमिकेतून पाहताना दिसतात आणि त्याचा वापर ब्राह्मण समाजा विरुद्ध
दुष्प्रचार करण्यासाठी करतात! शिवाजी राजांच्या स्वराज्य स्थापनेला हिंदू विरुद्ध
मुस्लिम असा रंग देण्याची जी चूक पूर्वाश्रमीच्या इतिहासकारांनी केली त्याचीच
पुरारावृत्ती होताना दिसते. इतिहासाचे विकृतीकरण जे झाले आहे ते दूर करायचे सोडून
त्याला प्रतिक्रिया म्हणून अजून विकृतीकरण करून काय सध्या होणार आहे?
गेल्या वर्षी अशाच एका
फेस बुकीय इतिहासकाराने कुठल्यातरी कृष्णाजी भास्करचा शोध लाऊन अफझलखानाच्या
कृष्णाजीचा त्या कृष्णाजीशी बादरायण संबंध जोडून नवा शोध लावला होता! त्यातून बराच
गदारोळ होऊन मग ते तथाकथित संशोधन मागे घेतले गेले. कृष्णाजी भास्कर चे उदात्तीकरण
करण्याच्या पूर्वग्रहदुषित वर्णवर्चस्ववादी भूमिकेतून मांडणी करण्याचा तो प्रयत्न
होता. अशाने सामाजिक विद्वेष वाढवण्याचे काम आपण करतो त्याचे काय? इतिहास तटस्थ बुद्धीने अभ्यासाला तर अशा चुका होणार नाहीत. तसेच
निरपेक्ष बुद्धीने इतिहास संशोधन करून सत्यशोधक वृत्तीने असे अपसमज दूर करणे
गरजेचे आहे.
असाच एक 'वेडा' वीर कृष्णाजी भास्कर
प्रतापराव गुजर ह्यांच्या सहा शिलेदारामध्ये मला आज सापडला! आता त्याची जात कंची, ते मला ठाव नाय बा!
पण 'वेडात' जे सात मराठे वीर दौडले त्यात एक 'वेडा' कृष्णाजी भास्कर हि होता! नेसरी मध्ये जे सहा शिलेदार सरनौबत प्रतापराव गुजर ह्यांच्या वरील स्वामीनिष्ठेने बहलोल खानाच्या १५ हजाराच्या फौजेवर चालून गेले, त्यात एक कृष्णाजी भास्कर होता. मग कदाचित तो
ब्राह्मण हि असेल!
तसेच ह्या सात वीरांमध्ये
एक सिद्दी हिलाल हि होता! आपल्या सेनापतीच्या मागे इमानदारीने दौडताना आणि समोर
बेहलोल खानाचा वीस हजाराचा तळ दिसत असताना काय विचार आले असतील ह्या मुस्लिम
सरदाराच्या मनात!
त्याचा मुलगा सिद्दी
वाहवा हा महाराज पन्हाळ्यावर अडकले होते तेव्हा नेताजी पालकर च्या बरोबर होता आणि
त्यांनी जो प्रतीहल्ला केला होता त्यात गंभीर जखमी झाला होता.
मुद्दा हा आहे कि शिवाजी
महाराजांनी जाती धर्म ह्यापलीकडे विचार करून स्वराज्य निर्मिती केली. मध्ययुगीन
काळात इस्लामिक राजवटीमध्ये त्यांनी हे कार्य पार पाडले आणि त्यामध्ये हिंदू, मुस्लिम, मराठा, ब्राह्मण, प्रभू, कोळी-आगरी-भंडारी, महार, रामोशी, आदिवासी, इ. अठरापगड जातीधर्माचे लोक सामील करून घेतले.
आपण मात्र एकविसाव्या
शतकात देखील जाती धर्माच्या चष्म्यातूनच इतिहासाचे अवलोकन करायचा व्यर्थ खटाटोप
करतोय असे दिसते.
राकेश पाटील.
Chhan Patil Saheb!!!
ReplyDeleteधन्यवाद , राकेश पवार जी.
Delete