Wednesday, 27 November 2013

समाजातील अभिजनवर्ग आणि त्यांच्या सामाजिक जाणीवा.

समाजातील अभिजनवर्ग आणि त्यांच्या सामाजिक जाणीवा.

अलीकडे लता मंगेशकर ह्यांच्या हॉस्पिटलच्या उद्घाटनाची  बातमी वादग्रस्त झाली होती. 
लताबाई नि नरेंद्र मोदी ह्यांना बोलाविले आणि ते पंत-प्रधान व्हावेत अशी मनीषा जाहीर केली. त्यांनी हिंदुत्ववादी, सावरकरवादी  विचारसरणी स्वीकारावी किंवा मोदींचे गुणगान गावे हा त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे. मुद्दा हा आहे कि अशा प्रसंगी व्यासपीठावर साधारणपणे राजकीय-पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवण्याची प्रथा आहे. बातमी मध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे देखील व्यासपीठावर असल्याचे दिसते. त्या हॉस्पिटलसाठी राज्य सरकारने केले सहकार्य लक्षात घेता
मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान, केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार ह्यांची उपस्थिती असणे उचित ठरले असते. प्रचलित रिवाजाला फाटा देऊन मंगेशकरांनी 'चूक' केली हेच दिसून येते.

दुसऱ्या एका बातमीत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या स्मारकासाठी शिवसेनेने मा. पवारसाहेबांना पुढारी केले. ह्यात उद्धव ठाकरेंची प्रगल्भता दिसली. सदर स्मारक समितीमध्ये पवारसाहेबांनी लताबाईना घेण्याची सूचना केली असे समजले! मंगेशकरांची मागील भूमिका मनात न ठेवता पवार साहेबांनी दाखविलेला हा मनाच्या मोठेपणा महत्वपूर्ण आहे. हि सामाजिक जाणीव सर्वांनी ठेवायला हवी.

सचिनच्या निवृत्तीनिमित्ताने झालेल्या पार्टीला विनोद कांबळी उपस्थित नव्हता हि बातमी पहिली होती. त्या पार्टीला सचिनच्या जवळचे, सहकारी क्रिकेटपटू , स्टार, राजकारणी, इ. झाडून सगळे मान्यवर उपस्थित राहतात मग कांबळी का नाही हा मुद्दा लक्षात घ्या. मध्यंतरी विनोदने त्याच्या क्रिकेट कारकीर्दीच्या अपयशाबद्दल बोलताना सचिन ने त्या अडचणीच्या काळी आपल्याला 'मदत' केली नाही असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. हे जर विनोदच्या पार्टीला न येण्याचे कारण असेल तर हि दुर्दैवाची बाब आहे. सचिन ने 'चूक' केली असे म्हणावे लागेल. विनोदच्या तळतळाट गैर-वाजवी नाही कारण तो सिस्टम चा  बळी ठरला हे उघड सत्य आहे. द्रविड-गांगुली-लक्ष्मण ह्यांची कारकीर्द बहरत असताना विनोद अक्षरश: खड्याप्रमाणे बाहेर  फेकला गेला होता. म्हणून सचिनने त्या वक्तव्याचा राग धरून बसणे उचित नाही. तसे असेल तर, सचिन १९४ वर खेळत असताना डाव घोषित करणाऱ्या द्रविड-गांगुलीचे काय? अर्थात हा केवळ अंदाज आहे, तथ्य काय आहे ते विनोद आणि सचिन लाच ठाऊक!

कालच्याच बातमीत न्यायालयाने मुंबई क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष शरद पवार ह्यांच्या  कामकाजावर बंदी आणून गोपीनाथ मुंडे ह्यांच्या बाजूने निर्णय दिला. खरे पाहता मुंडे ह्यांना निवडणूक लढविण्यापासून रोखण्याचे काही कारण नव्हते. पवारसाहेबच विजयी झाले असते. परंतु काहीतरी तांत्रिक बाबीचा बागुलबुवा उभा करून मुंडेंच्या निवडणूक लढविण्याच्या अधिकारावरच गदा आणली गेली. लोकशाहीची मुस्कटदाबी करायचा तो सोयीस्कर प्रयत्न होता. न्यायालयाने त्याला चपराक देऊन पवारसाहेब आणि MCA  ह्यांची 'चूक' होती हे दाखवून दिले!

वरील सर्व उदाहरणे हि तथाकथित अभिजन वर्गाने केलेल्या चुकांची किंवा चूक-दुरुस्तीची आहेत.   समाजशास्त्राप्रमाणे बहुजन-अभिजन हे जे अभिसरण होत असते त्यातून घडलेला हा अभिजनवर्ग आहे. आपल्या समाजात क्रिकेट-सिनेमा-राजकारण ह्या क्षेत्रात हे अभिसरण अधिकच वेगाने होत असल्याचे चित्र आहे. अभिजन वर्गाने बहुजन वर्गापुढे आपल्या कर्तुत्वाने, विचाराने आदर्श निर्माण करावा जेणेकरून बहुजन वर्ग त्यांना अनुसरून वाटचाल करू शकेल. तरच ते अभिसरण यशस्वी होत राहील.
 

No comments:

Post a Comment