Thursday, 5 December 2013

OBC-बौद्ध धर्मांतर: मुद्दे आणि गुद्दे



OBC च्या बौद्ध धर्मांतराचा मुद्दा सध्या ऐरणीवर आहे. त्याचा विचार करता काही मुद्दे मांडावेसे वाटतात.

धर्मांतर काही विशिष्ठ नियमात कायदेशीर ठरविले गेले आहे हि वस्तुस्थिती आहे. त्यामुळे कुणी बौद्ध व्हावे , कुणी ख्रिश्चन व्हावे हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा  वैयक्तिक अधिकार आहे. तसे स्वातंत्र्य घटनेने भारतीय नागरिकास प्राप्त झाले आहे.
धर्म किंवा धर्मांतर हे  विज्ञानयुगातील लोकशाहीतील आधुनिक मानवाच्या जीवनात काही विशेष बदल घडवू शकतील का, हा चिकित्सेचा विषय आहे. तरीही धर्मांतर ह्या विषयाचा उहापोह होणे गरजेचे आहे.

अलीकडील काळात भारतात ख्रिश्चन धर्मांतराचे प्रमाण सर्वाधिक असावे असा माझा अंदाज  आहे.
हिंदू, मुस्लिम , जैन, शीख इ. धर्म धर्मप्रसाराच्या बाबतीत बऱ्यापैकी उदासीन असावेत असेही म्हणायला हरकत नसावी. बौद्ध धर्म धर्मांतराच्या विषयात अतिशय जागृत आहे हेदेखील स्पष्ट आहे. अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्या महामानवाच्या ऐतिहासिक धर्मांतराची त्यास पार्श्वभूमी आहे!

ख्रिश्चन धर्माचे धर्मांतर हे एक जागतिक स्तरावरील अभियान असल्याने त्याची व्याप्ती आणि परिणामकारकता सर्वाधिक आहे हे सत्य आहे. तम-मन-धन ओतून ख्रिश्चन धर्मीय धर्मप्रसाराच्या कार्यात वाहून घेतात असे दिसून येते. 

ईशान्य भारत, केरळ, ओरिसा-आंध्र किनारपट्टी, दुर्गम आदिवासी प्रदेश, कोकण किनारपट्टी, इ. ठिकाणी ख्रिश्चन धर्मियांनी मोठ्या प्रमाणात  धर्मांतर घडवून आणले आहे हि वस्तुस्थिती आहे. ते त्यांचे धर्मप्रसाराचे यश आहे. प्रसंगी त्यासाठी त्यांना मोठी किंमत देखील चुकवावी लागली आहे.

मुंबईत ख्रिश्चन धर्मप्रसाराच्या लागलेल्या काही जाहिराती विषयी सध्या गदारोळ उठला होता. फेसबुकवर देखी चर्चा झाल्या परंतु कुणी  ख्रिश्चन धर्मीय तिथे विरोधासाठी उभा राहिला असे दिसत नाही. त्या जाहिरातीचे काय होईल ते पुढील काळात दिसेल परंतु सामाजिक सहिष्णुता किंवा सौहार्द कायम राहिल्याचेच दिसून येते. 

धर्मांतराने कुणाचे सामाजिक, आर्थिक जीवनमान सुधारत असेल आणि त्यासाठी लोक स्वखुशीने धर्मांतर करीत असतील तर ती एक नैसर्गिक प्रक्रियाच समजावी लागेल.

महत्वाचे हे आहे कि धर्मप्रसार करणार्यांनी ह्या सामाजिक सलोख्याच्या  जाणिवेचे पालन करणे अत्यावश्यक आहे. धर्मांतर घडवून तुम्ही स्वधर्माचा फायदा तर इतर धर्माचे नुकसान करीत असता हा साधा व्यवहारी नियम आहे. समोरच्या धर्माच्या अस्मितेला धक्का पोहोचणार नाही ह्याची जबाबदारी देखील लक्षात घाय्याला हवी. तरच धर्मांतर सहजशक्य होईल अन्यथा अस्मितेसाठी पेटून उठलेला समाज आपल्या तुमच्या धर्मप्रसाराला खीळ घालू शकतो, हा सरळ हिशेब आहे.

हे समजून घेऊनच  ख्रिश्चन धर्मियांनी  धर्मप्रसाराचे कार्य यशस्वी केले आहे असे सिद्ध होते.

आमच्या गावातील काही मंडळी अलीकडे ख्रिश्चन धर्माच्या प्रार्थना इ. साठी जात असल्याचे दिसून येत होते. धर्मांतराची ती सुरुवातीची प्रोसेस असावी. गावातील एक तरुण 'नेता' त्यासाठी पुढाकार घेत होता. काही दिवसांनी गावकर्यांनी ह्याला विरोध केला, लोकांचे प्रबोधन केले आणि हे धर्मांतर टळले !

तसेच शेजारील गावातील एक कुटुंब धर्मांतरित झाले आहे, स्वखुशीने! त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारून घरातील पूर्वीचे देव काढून टाकले.  परंतु समाजातील लोकांशी ते संबंध ठेऊन आहेत. कुठलाही गाजावाजा नाही कि काही समारंभ नाही, अवडंबर नाही. कुणाला त्यांच्या धर्मांतराविषयी  फारसे कळतही नाही कारण त्यांनी आपले जुने  नाव देखील कायम ठेवले आहे.

OBC -बौद्ध धर्मांतराविषयी हिंदू धर्म (?) किंवा समाज ज्याचे धार्मिक नुकसान होतेय, तो कमालीचा उदासीन आहे. हिंदू धर्माचे  तथाकथित धर्मगुरू ह्या विषयावर ब्र देखील काढताना दिसत नाहीत. तसेच स्वघोषित हिंदू धर्म संघटना, हिंदू राजकीय पक्ष, इ. मुग गिळून गप्प बसल्याचे चित्र आहे. हि उदासीनता आहे कि मग्रुरी आहे, कि सोयीस्कर दुर्लक्ष आहे कि जाणीवपूर्वक कारस्थान आहे ह्याचीदेखील चिकित्सा व्हायला हवी. धर्मलंडानि आपापले कोर्ट-खटले, कर्मकांडे, इ. मधून वेळ काढून आपली भूमिका स्पष्ट करायला नको का

OBC च्या बौद्ध धर्मांतराच्या निमित्ताने सध्या रान उठविले जात आहे. फेसबुक देखील त्यात आघाडीवर आहे. ह्या धर्मांतराचे सर्वेसर्वा श्री. हनुमंत उपरे हे आहेत. त्याला श्री. संजय सोनवणी ह्यांनी दैनिकात तसेच फेसबुकवर लेख लिहून ह्या धर्मांतरास  विरोध केला होता. त्या निमित्ताने काही बौद्ध धर्मियांनी फेसबुकवर श्री. सोनवणी ह्यांच्या विरुद्ध शिवीगाळ करायची एक मोहीमच उघडली. एखाद्या व्यक्तीचे आपल्या समाजाप्रती असलेले योगदान विसरून धर्मांतराला विरोध (मुद्द्यावर आधारित) केला म्हणून त्याला अश्लाध्य टीकेचे लक्ष करण्याची हि प्रवृत्ती कुतघ्नतेची नाही का?

इथेच ह्या तथाकथित धर्मांतराच्या वैचारिकतेचि मर्यादा स्पष्ट होते. इथे धर्मांतर हा मुद्दा आहे कि त्या निमित्ताने दळभद्री राजकारण करून आपापली पोळी भाजण्यात काही मंडळीना रस आहे हा प्रश्न देखील उपस्थीत  होतो! OBC -बौद्ध धर्मांतर हा खरच मुद्दा असेल तर संबधित धर्मप्रसारकांनी ख्रिश्चन धर्माकडून आदर्श घ्यावा. अन्यथा, ह्या धर्मांतराचे जे अवडंबर माजविले जात आहे  त्याला आमच्या आगरी भाषेत मांजरांच 'हिकाट' कमी आणि गोंगाट जास्त असे म्हणतात.

धर्मांतर हा विषय यशस्वीपणे हाताळणारे एकमेव भारतीय म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. तत्कालीन धर्मातील विषमता आणि सामाजिक अन्याय ह्याविरुद्ध बंड करून  त्यांनी एका समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी तो क्रांतिकारक मार्ग स्वीकारला होता.  परंतु आजच्या लोकशाहीच्या आणि विज्ञान युगाच्या एकविसाव्या शतकात त्या महामानवाने धर्मांतर हाच विषय राबविला असता? कि त्या दृष्ट्या नेत्याने समाजाला कोणती दिशा दिली असती, कोणता नवा विचार दिला असता ह्याविषयी आत्मपरीक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे!

राकेश पाटील

No comments:

Post a Comment