Monday, 23 December 2013

मोदींच्या सभेचा रिपोर्ट

 23/12/2013 (फेसबुक पोस्ट)

काल पुन्हा मोदींचे भाषण ऐकायचा योग जुळून आला. रविवार असल्याने चिकन बिर्याणीवर आडवा हात मारून जरा कुठे आडवा होवून भारत-आफ्रिका टेस्ट पाहत होतो तर मुंबईत मोदीगर्जना सभा सुरु झाली.

मस्त धमाल येणार म्हणून पाहू लागलो तर आधी नमनाला घडाभर तेल तसे मुंडे, गडकरी, फडणवीस इ. मंडळी बोल बोल बोलत सुटले. नंतर राजनाथ सिंग ह्यांनी त्यांचे कीर्तन-प्रवचन आळविले. शेलार नामक कुणी अध्यक्ष बसलेल्या चिरक्या आवाजात आपली हौस भागवीत होतेच. कंटाळवाण्या होत चाललेल्या सभेला मोदी कधी एकदा आग ओकतात त्यात खरे स्वारस्य होते. मलादेखील!

सभेला बाहेरून ट्रेनने आणलेल्या दोन अडीच लाख लोकांची विक्रमी गर्दी होती. सामान्य गरीब श्रोते रणरणत्या उन्हात तर श्रीमंत श्रोते मंडपात अशी वर्णाश्रम पद्धतीची रचना शोभून दिसत होती.

देशाच्या राजकीय आणि सामजिक हिताचे खालील अत्यंत महत्वाचे मुद्दे त्यांनी मांडले.

१. सुरुवातीलाच छत्रपति शिवराय, फुले-शाहू-आंबेडकर हि पुरोगामी नावे घेवून आणि सावरकर, हेडगेवार, गोळवळकर, ठाकरे ह्या हिन्दुत्वाच्या अर्ध्वर्युना अन्नुलेखानेच मारल्याने त्यांनी तथाकथित हिंदुत्वाच्या फुग्याला जीवघेणी टोचणी लावली. तसेच व्होट फॉर इंडिया अशी घोषणा दिल्याने इंडिया शायनिंग च्या कटु आठवणि चाळविल्या गेल्या. तसेच हिंदुस्तान, हिंदू राष्ट्र इ. सुसंस्कृत भाषेचे प्रेम असलेल्या हिंदू राष्ट्रवादी संस्कृतीरक्षक मंडळींचा जीव टांगणीला लावला.

२. गुजरात आणि महाराष्ट्र ह्या राज्यांची निर्मिती एकाच दिवशी होवूदेखील आज पर्यंत गुजरातचे फक्त १४ तर महाराष्ट्राचे तब्बल २६ (!) मुख्यमंत्री झाले (?) त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणाचा बट्ट्याबोळ झाला असल्याचा नवा गणिति सिद्धांत त्यांनी मांडला.

३. चले जाव चळवळीच्या धर्तीवर त्यांनी काँग्रेस चले जाव चा नारा दिला! ब्रिटीश सरकारशी १९४२ साली चले जाव चळवळीत काँग्रेसच लढत होती तेव्हा संघ आणि हिंदुत्ववादी कोणते उद्योग करीत होते ह्याबाबत ते पुढील सभेत नवीन संशोधन मांडणार आहेत असे समजते !

४. वंशवाद, संप्रदायवाद संपविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी जाहीर केल्याने संघ-भाजप मध्ये अस्वस्थता पसरली . तसेच भ्रष्ट्राचार मुक्त भारत च्या घोषणे मूळे व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांच्या पोटात गोळा आल्याचे लक्षात आले.

५. गुजरात आणि महाराष्ट्र ह्यांच्यामधील प्रगतीची प्रचंड दरी त्यांनी त्यांच्याकडील जगप्रसिद्ध अमेरिकन आकडे वारीसाहित सिद्ध करून दाखविली!

६. सरदार पटेलांचे त्यांनी यशस्वी राजकीय अपहरण केले आहेच. त्यांचा दाखला देवून त्यांनी भाषावार प्रांत रचनेवर देशात फुट पडल्याचे टीकास्त्र सोडले! मराठी भाषिक राज्यासाठी जीवाचे रान करणारे त्यांच्याच मंडळीनि नाक दाबून बुक्क्यांचा मार सहन केल्याची चर्चा आहे.

७. वन्दे मातरम ने सभेची शेवट करताना श्रोते पळून गेल्याने व्यासपीठावरून नेतेमंडळीनि घोषणा देवून खिंड लढविली. तरीही नेहमीप्रमाणे वन्दे, वन्दे ,वन्दे असे चढत्या फ्रीक्वेन्सीने बडबडून त्यांनी शेवटी सभेला रंगत आणलीच !

मध्यंतरी बिर्याणीच्या अमलाखालि अमळ डोळा लागल्याने मोदिपुराणातिल थोड्याश्या अध्यायाना मुकलो त्याचा मला खेद आहे! तसेच इतिहास संशोधन हा विषय त्यांनी ह्यावेळी कटाक्षाने टाळला त्यामुळे माझ्यासारख्या इतिहासप्रेमी ची घोर निराशा झाली.

अहो आश्चर्यम! मोदी नावाची मुलुख मैदानी तोफ अगदीच फुसकी निघाली कि काय ? !

No comments:

Post a Comment