Monday, 9 December 2013

दिल्लीचा निवडणुकांच्या निकालाचे परिणाम

09/12/2013 (फेसबुक पोस्ट )

दिल्लीचा निवडणुकांच्या निकालांनी भल्याभल्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीच्या मतदानाची आकडेवारी खालीलप्रमाणे:
भाजप : ३३%
आम आदमी पार्टी : ३०%
कॉंग्रेस: २५%

मागील निवडणुकीत आम आदमी पार्टी अस्तित्वात नव्हती तेव्हाची आकडेवारी खालीलप्रमाणे:
भाजप : ३६ %
कॉंग्रेस: ४० %

दिल्लीत आम आदमी पक्षाला भरघोस मतदान झाले असून दोन्ही प्रस्थापित पक्षांची मतदान टक्केवारी कमी झाल्याचे दिसून येते.
सक्षम नवीन पर्याय उपलब्ध असल्यास जनता प्रस्थापित पक्षांच्या सरंजाम शाहीला झुगारून देण्यास कटिबद्ध असल्याचे सिद्ध झाले आहे.
आम आदमी पार्टी ला लोकांनी भरगोस मतदान करून भारतीय जनतेचा कौल स्पष्ट केला आहे. लोक नव्या दमाच्या, उमेदीच्या, विचाराच्या राजकारणासाठी मतदान करणार हे दाखवून दिले आहे. प्रस्थापित सर्वच पक्षांना हा स्पष्ट इशारा आहे.

काँग्रेस आणि भाजप व्यतिरिक्त विश्वासार्ह पर्यायाच्या शोधत भारतीय जनता आहे ह्यावर शिक्का मोर्तब झाले आहे.

आम आदमी पक्षाच्या अरविंद केजरीवाल ह्यांना आणि त्यांच्या सहकार्यांना शेवटच्या क्षणी अडचणीत आणणारे अण्णा हजारे आणि टीम अण्णावाले विचारवंत तसेच स्टिंग ऑपरेशन करणारे मिडीयावाले ह्यांची तोंडे पाहण्यासारखी झाली असतील. समाज सुधारणेच्या मोठ्या मोठ्या गप्पा मारणारे लोक ते काम कुणीतरी इमानदारीने आणि आपल्यापेक्षाही अधिक हुशारीने करतोय म्हटल्यावर किती संकुचित आणि दळभद्री वागू शकतात हे दिसून आले. ह्या सर्वाना मतदारांनी आपली ताकद आणि अक्कल दाखवून दिली आहे.

तिसर्या आघाडीच्या पर्यायी व्यवस्थेला पुन्हा एकदा धुमारे फुटणार हे येत्या काळात दिसेल.

काँग्रेस वाल्यांचा सुपडा साफ झाल्याने राहुल गांधी सोडून दुसरा कोण अशी चर्चा सुरु झाली आहे.
आळस सोडून इमानदारीत मेहनत करावी लागणार हे सत्ताधारी पक्षाला स्पष्ट समजले आहे. लोकांना गृहीत धरून चालणार नाही. भाजपच्या जातीयवादाचा बागुलबोवा दाखवून लोकांना आपल्याशिवाय कुणी वाली नाही अश्या भ्रमात राहून चालणार नाही हे देखील स्पष्ट झाले आहे.

मोदी नावाची कोणतीही लाट अस्तित्वात नाही आणि धर्माच्या नावाखाली कोणतेही ध्रुवीकरण इ. शक्य नाही हा स्पष्ट संदेश भाजप-संघ वाल्यांना दिला गेला आहे. पुढील काळात त्यांना आपली जातीय-धार्मिक डावपेचावर आधारित समीकरणे बदलणे भाग आहे.

दिल्लीच्या जनतेने तमाम भारतीय जनतेला, आणि एकूणच भारताच्या राजकारणाला नवीन दिशा दाखविली आहे. येत्या लोकसभेच्या निवडणुकीत ह्या नव्या समीकरणांचा प्रभाव दिसून आल्याशिवाय राहणार नाही.

No comments:

Post a Comment