Saturday, 18 January 2014

गर्दीची मानसिकता आणि चेंगरा-चेंगरीचे भीषण प्रकार

18/01/2014 (फेसबुक पोस्ट)

 
मलबार हिल परिसरात बोहरा समाजाचे धर्मगुरु डॉ. सय्यदना मोहम्मद बुहरानुद्दीन यांच्या अंत्यदर्शनाच्या वेळी चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत हि घटना जितकी दुर्दैवी तितकीच संताप जनक आहे.

सतत होणार्या अशा चेंगराचेंगरीच्या अपघातातून आपण भारतीय कधी शिकणार आहोत कि नाही?

अलीकडील काही घटना:
१. मध्य प्रदेशात रतनगढ मंदिराजवळ दसरा उत्सवात पुलावर चेंगराचेंगरी: ८९ ठार, १०० जखमी
२. कुंभ मेळ्यात नाशिक इथे चेंगराचेंगरी: ४० ठार, १२५ जखमी.
३. सातारा इथे मांढरा देवी मंदिरात चेंगराचेंगरी: ३५० ठार, २०० जखमी
४. हिमाचल प्रदेशात नैनादेवी मंदिराजवळ चेंगराचेंगरी: १६० ठार, ४०० जखमी
५. राजस्थान मध्ये चामुंडा देवी मंदिराजवळ चेंगराचेंगरी: १२० ठार, २०० जखमी
६. उत्तर प्रदेशात राम जानकी मंदिराजवळ चेंगराचेंगरी: ६३ ठार, १०० जखमी
७. लालबागच्या राजाच्या दर्शनातील महिला अत्याचाराची घटना

उत्सव, यात्रा, इ. धार्मिक गर्दीच्या ठिकाणी जमणारी गर्दी मध्ये सुव्यवस्था राखणे कोणत्याही व्यवस्थापनाच्या मर्यादेपलीकडे होऊन जाते हे वास्तव आहे. बर्याचदा व्यवस्थापन अस्तित्वातच नसते. अशा ठिकाणी गर्दीची एक वेगळी आणि विचित्र मानसिकता असते. त्या गर्दीत सामील व्हाल तर ती मानसिकता आपसूक तुमच्यावर स्वार होऊन जाते! माणूस गर्दीचा केवळ एक भाग बनून जातो. गर्दीत हरवून जातो. गर्दी सुखरूप आटोक्यात आली तर आली अन्यथा चेंगराचेंगरी, चोरी-मारी, अत्याचार, विनयभंग, मारामारी, खून-दरोडे, इ. नाना लफडी गर्दीच्या ठिकाणी स्वाभाविकरीत्या होतातच. कारण सरकारी यंत्रणा अशा धार्मिक गर्दीच्या व्यवस्थापनात गंभीर असतातच असे नाही.

आम आदमी पार्टीने अलीकडे जनता दरबारात झालेल्या गर्दीच्या धसक्याने तो दरबार कायमचा गुंडाळून टाकला हे फार मोठे शहाणपण आहे. उद्या जनता दरबारात चेंगराचेंगरी झाली किंवा घडवून आणली तर किती मोठे नुकसान होऊ शकते ते केजरीवाल आणि कं. ने अचूक ओळखले.

मोदींच्या बिहारमधील सभेच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणले होते हे देखील लक्षात घ्यायला हवे. राजकीय सभा आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणारी लाखोंची गर्दी आणि त्यांचे व्यवस्थापन हा गंभीर मुद्दा असतो आणि सरकारी यंत्रणा अशा गर्दीच्या ठिकाणी अत्यंत सतर्क असते. परंतु दुर्घटना होणारच नाही ह्याची शाश्वती कुणीही देवू शकत नाही हे भीषण वास्तव आहे.

एकंदरीत विचार करता सामान्य माणसाने गर्दीची ठिकाणे टाळावीत हेच उत्तम. देवदर्शन असो कि अंत्यदर्शन कि नेतादर्शन; ते त्याच विशिष्ठ दिवशी व्हायलाच पाहिजे असे बंधन स्वत:वर लादण्यात काही अर्थ नाही. ती गर्दीची वेळ टाळणे हाच गर्दीच्या मानसिकते पासून मुक्ती मिळविण्याचा योग्य मार्ग आहे!

No comments:

Post a Comment