Wednesday, 29 January 2014

राहुल गांधीना खुले पत्र!



राहुल गांधीची पहिलीच मुलाखत अलीकडे अर्नब गोस्वामी नावाच्या एका पत्रकाराने घेतली आणि लगेच राहुल गांधीवर संपूर्ण मीडियातून प्रचंड हल्ला सुरु झाला. त्या निमित्ताने राहुल गांधीना हे खुले पत्र!







राहुल गांधी

तुमची मुलाखत ज्यांनी वाचली किंवा पहिली असेल त्यांना योग्य तो संदेश गेला असेल. त्यातून जो अनर्थ काढायचा तो काढण्याचे काम विरोधक करणारच; त्यांचे तेच काम आहे. मात्र मिडिया त्या मुलाखतीतून सोयीस्कर अर्थ काढून एक हवा तयार करण्याचा डाव खेळत आहे हेदेखील ह्या निमित्ताने दिसून येते. तुमची मुलाखत वाचल्यानंतर मला वाटते कि सध्याची देशातील राजकीय परिस्थिती पाहता तुमची मुलाखत हा एक आशेचा किरण आहे!

राहुल, तुमच्या नावातच गांधी-नेहरू असल्याने काही विशिष्ठ लोकांची पंचाईत होते. ते स्वाभाविकच आहे. गोस्वामी असो कि स्वामी; त्यांची विवंचना, कुचंबना आपण समजून घ्यायला हवी. त्या महाभागांना हे कसे कळणार कि राहुल गांधीचा जन्म गांधी-नेहरू घराण्यात झाला ह्यात तुमची काही चूक नाही. गांधी आडनावाच्या राहुल ने राजकारण करावे किंवा कॉंग्रेसने त्या राहुलला नेता बनविणे ह्या त्यांच्या दृष्टीने घराणेशाहीच्या बाबी आहेत. मात्र तीच घराणेशाही त्यांच्या पक्षामध्ये त्यांना चालून जाते.

तुमच्या मुलाखतीवर चौफ़ेर टीका होत असल्याचे चित्र निर्माण केले गेले. राजकीय दृष्ट्या कुचकामी, कॉंग्रेसलाच अडचणीत आणणारी, कणखर नेतृत्वाचा अभाव इ. कारणे देत मोदीच्या समोर तुम्ही टिकू शकत नाही असे चित्र जाणीवपूर्वक निर्माण करणारी मंडळी मिडिया मध्ये आघाडीवर आहेत. त्यांचे वैयक्तिक आणि व्यवसायिक हितसंबंध ते सांभाळतातच परंतु सध्याची मिडिया मानसिकता हि एका विशिष्ठ वर्गाच्या जातीय-वैचारिक अस्मितेनेदेखिल पोखरून निघाल्याचे स्पष्ट होते. त्याचे मुळ कारण आहे कॉंग्रेसची पीछेहाट, मोदी-भाजप ची गेल्या काही दिवसातील आगेकूच, त्यातून निर्माण झालेला रा.स्व.संघाचा वरचष्मा आणि त्यातून पेटून निघालेल्या काही वर्णाभिमानी अस्मिता. हा छुपा वर्चस्ववाद सर्व आघाड्यावर सुप्तपणे जपला जातो, हे काही नवीन नाही.

अलीकडेच बऱ्याच वृत्तवाहिन्यांचे पत्रकार, विचारवंत- विश्लेषक, सेफ़ोलोजिचे आकडेबहाद्दर, इ. मंडळीनी रंग बदलायला सुरुवात केल्याचे तुमच्या निदर्शनास आले असेलच! अर्थात, निवडणुका आल्या कि ज्याची सरशी दिसत असेल त्या बाजूने काही सरडे रंग बदलतात हे हि तुम्हाला माहित असेल. परंतु इथे परिस्थिती थोडी वेगळी आहे. मागील वेळच्या (१८%) निवडणुकीपेक्षा १५% मते भाजपला जास्त मिळणार असे अंदाजाचे पतंग उडविणारी हि मंडळी एकदम दुप्पट मते भाजपला देत आहेत हा प्रचंड मोठा विनोद आहे. खरे पाहता ५-६ % मते कमी जास्त झाल्याचे आपण नेहमी पाहतो आणि त्यातून जो बदल घडायचा तो घडतो हा इतिहास आहे. मिडीयाने एवढी प्रचंड मते देवून देखील जागा मात्र मोदीला २०० च देत आहेत हे अधिक  हास्यास्पद आहे.  कारण १५% मते स्विंग केल्यावर जागा ३००-३५०च्या वर जायला हव्या होत्या! म्हणजेच हे आकडे बहाद्दर कुणाच्या तरी इशाऱ्यावर हे पतंग उडवीत आहेत हे स्पष्ट आहे.

हि अशी हवा तयार करून आपापल्या पोळ्या भाजायचे हे धंदे भांडवलशाही च्या आहारी गेलेली सध्याची पत्रकारिता करीत आहे. त्याला खतपाणी घालणारी वक्तव्ये तथाकथित विचारवंत विद्वान विश्लेषक हि करीत आहेत. हि हवा तयार करून वातावरण दुषित करायचा पूर्वग्रहदुषित बुद्धीने केलेला हा युफोरिया आहे हे समजून घ्या. काल-कालपर्यंत मोदीला झोडपणारे बुद्धिमंत अचानक त्या आकड्यांना पाठींबा देत मोदीच पंतप्रधान होणार अशी पलटी मारून मोकळे झाले! आपल्याला हे सर्व आधीच माहित असल्याची अहमहमिकाच दलबदलू विचारवंत वर्गात लागली आहे! 

राहुल, तुमच्यामध्ये निर्ढावलेपणा नाही हि वस्तुस्थिती आहे. मुलाखत घेताना त्याचा फायदा अर्नब गोस्वामीलाहि झाला. तसेच कॉंग्रेसच्या ज्या चुका झाल्या आहेत त्यामुळे तुमच्यावर मुलाखतीत अडचणीत टाकणारे प्रश्न विचारले गेले; नव्हे भडीमार केला गेला. मुलाखत घेणाऱ्याला जे काही सिद्ध करायचे होते त्या मानसिकतेतून तो तेच तेच प्रश्न विचारीत होता. मोदी, दंगली, भ्रष्टाचार इ. तेच तेच मुद्दे पुन्हा पुन्हा उगाळून तो मुलाखत घेत होता कि उलट तपासणी, हे देखील लोकांना दिसले.

महत्वाची गोष्ट हि आहे कि पहिलीच मुलाखत देणारे राहुल गांधी हे तरुण नेतृत्व आम्हाला समजून घेता आले. खरे तर हि सुरुवात आधीच व्हायला हवी होती. स्वत:ला सोयीस्कर मुलाखत ठरउन देणारे, गेंड्याची कातडी असलेले नेते, सर्रास खोटे बोलणारे पंतप्रधान पदाचे उमेदवार, कोणतेही नवे व्हिजन, नवा विचार नसलेले धर्मांध नेतृत्व आणि त्यांचीच पोपटपंची करणारे बिकाऊ पत्रकार-विद्वान  ह्याची देशात काही कमी नाही. इथे नवीन परिवर्तनवादी विचार, सळसळते नेतृत्व हवे आहेत. बदल हवा आहे, बदला नको! त्या मुलाखतीमधून तुमच्या नेतृत्वातील पारदर्शकता, आधुनिक दृष्टीकोन आणि नवा विचार मांडायचा सातत्याने केलेला प्रयत्न हे ठळक मुद्दे प्रकर्षाने दिसून आले. ते अजून विस्तारित करायचे काम मुलाखत घेणाऱ्याला करता आले असते. परंतु त्यांचा अजेंडा वेगळा आणि ठरलेला होता. असो.

मुलाखतीत तुम्ही जे मुद्दे सतत मांडायचा प्रयत्न केलात तेच आजच्या काळात महत्वाचे मुद्दे आहेत. सिस्टीममधील बदल, ग्रामविकास, महिला सक्षमीकरण, सत्तेचे विकेंद्रीकरण, उत्पादन-निर्माण, इ. मुद्दे तुम्ही सातत्याने मांडलेत. परंतु आजच्या भ्रष्ट व्यवस्थेला परिवर्तनाची भूमिकाच नको आहे. त्यांना तेच जुनाट बुरसटलेले राजकारण हवे आहे. त्यात विरोधकही आले, तुमचा पक्षही आला आणि इतरही सर्व आले. तसेच त्यात मिडिया आणि पत्रकार-विचारवंत हि आले. कॉंग्रेसचे जे प्रवक्ते मीडियासमोर ह्या मुलाखती बाबत बोलण्यासाठी आले त्यानाही तुमची परिवर्तनाची आणि तरुण नेतृत्वाची भूमिका कितपत पचली असेल ह्याविषयी शंका आहे! कारण हे सर्वच घटक भांडवलशाहीच्या आहारी जाऊन त्यांच्या गुलामगिरीत अडकले आहेत हे विदारक वास्तव आहे. परंतु हे निर्विवाद सत्य आहे कि परिवर्तन हाच आजचा मुळ मुद्दा असायला हवा. तुम्ही तो लाऊन धरलात तर जनता देखील तुमच्यामागे उभी राहीलच. अलीकडे आम आदमी पार्टीला जे यश मिळाले त्याचे कारण हेच होते कि त्यांनी प्रस्थापित राजकीय व्यवस्था बदलायची भूमिका घेतली होती, हे विसरून चालणार नाही.

एकंदरीत पहिलीच मुलाखत देणारा राहुल गांधी आम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त परिपक्व आणि विश्वासार्ह वाटला. वेगळी भूमिका, तरुण नेतृत्व आणि व्हिजन असलेला नेता म्हणून ह्या मुलाखतीने राहुल गांधीची प्रतिमा पहिल्यांदाच जनतेसमोर आली. हि प्रतिमा अधिकाधिक उजळून निघायला हवी त्यासाठी पुढील काळात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही आपली परिवर्तनवादी भूमिका अधिक ठामपणे आणि सातत्याने मांडत राहायला हवी. पत्रकार परिषदा, मुलाखती, प्रचारसभा ह्य सर्व माध्यमातून नवा विचार मांडणारा तरुण नेता संपूर्ण देशात प्रस्थापित व्हायला हवा. देशाला नव्या विचाराची गरज आहे हे सूर्यप्रकाशा इतकेच सत्य आहे आणि मिडीयाने कोंबडे झाकून ठेवले म्हणून सूर्य काही उगवायचे सोडणार हि नाही.

राहुलजी, देश अत्यंत धोकादायक वळणावरून जात आहे, हे वास्तव आहे. कॉंग्रेसच्या भ्रष्टाचाराने जनता वैतागली आहे. परंतु मोदी विश्वासार्ह पर्याय होवू शकत नाही हे देखील जनता ओळखून आहे. भाजपने संघाच्या नादाला लागून ती संधी दवडली आहे. हि जी पोकळी निर्माण झाली आहे तिची झलक दिल्लीत मिळाली आहे. परंतु देशाच्या राजकारणात सध्यातरी 'आप' हा पर्याय नाही. अर्थात जनता पुन्हा धर्मनिरपेक्षते कडेच म्हणजेच काँग्रेस विचारसरणीकडे वळेल त्यावेळी राहुल गांधी हा सक्षम पर्याय उपलब्ध असेल असा विश्वास तुम्हाला पुढील काळात लोकांना द्यावा लागेल!

धन्यवाद.

राकेश पाटील.

No comments:

Post a Comment