Monday, 24 February 2014

'फँड्री' : सिनेमाचा 'पॅराडाईम शिफ्ट' करण्यासाठी भिरकावलेला 'मैलाचा दगड'

 'फँड्री'
नागराज मंजूळे कृत 'फँड्री' ने वेगळी वाट चोखाळून मराठी सिनेमाची परिमाणे बदलून त्याची उंची वाढविण्याचे काम केले आहे. हल्ली मराठीत बोकाळलेल्या आणि रेकोर्ड-ब्रेकिंग म्हणवून पब्लिकच्या कपाळात मारलेल्या तद्दन मसाला चित्रपटांच्या भाऊगर्दीतून एक सकस सामाजिक चित्रपट मराठीत प्रदर्शित झाला हे स्वागतार्ह आहे.

'फँड्री' पिढ्यानपिढ्या पिचलेल्या सामाजिक विषमतेवर आधुनिक जगाच्या बदलत्या संदर्भातून खऱ्या अर्थाने भाष्य करतो. मागास वर्गातील कुटुंबात जन्मलेला शाळकरी जब्या नव्या समाजात स्वत:ला सामावून घेण्याच्या प्रोसेसमधून जाताना त्याच्या मानसिकतेच्या फोकस मधून सिनेमा उलगडत जातो. शेवटी त्या मानसिकतेच्या स्फोटातून जब्या प्रस्थापित समाजव्यवस्थेला त्याच्या परीने आव्हान देतो आणि म्हणून जब्याने भिरकावलेला दगड आपल्या डोक्यात वर्मी प्रहार केल्याशिवाय राहत नाही.

जब्याला सतत टोचणार्या विषमतेला कारणीभूत असलेल्या वर्गाचा वेध त्या दगडाने घेतला कि नाही हे फारसे महत्वाचे नाही. परंतु जब्याच्या भूमिकेतून कधी काळी गेलेला (आणि जब्याला सहज विसरून गेलेला) जो वर्ग आहे त्याच्या डोक्यात मात्र हा दगड लागतोच!


सिनेमा प्रतीकात्मकतेमधुन समाजव्यवस्थेवर भाष्य करीत राहतो. 
उदा. जब्या आणि शालुमध्ये एकही संवाद नसूनही त्यातील एकतर्फी प्रेमाच्या माध्यमातून जातीव्यवस्थेवर केलेले भाष्य, काळ्या चिमणीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अपरिहार्य अंधश्रद्धेवरील भाष्य, जब्याच्या सायकलवरून कुल्फी विकण्याच्या उद्योजगतेतून शहरीकरण आणि सुधारित सैल समाज व्यवस्थेवर केलेले भाष्य, केवळ फोटोग्राफीतून पुरातन ऐतिहासिक अवशेषांचे गावाच्या हागनदरीत झालेले रुपांतर आणि त्यातून इतिहासाच्या विकृतीकरणावर केलेले मार्मिक भाष्य, डुक्कर शिवल्याने गोमुत्र-स्नान करणारा समाज आणि डुकराच्या धक्क्याने देवाची पालखी पडल्याने हतबल होणारा समाज ह्यांच्या बुरसटलेल्या मानसिकतेवर डूक्कराच्या माध्यमातून केलेलं भाष्य, डुक्कर पकडणार्या जब्याच्या कुटुंबाच्या पिढ्या-न-पिढ्या झालेल्या अवहेलनेला आधुनिक जगातील ट्याब वर डाऊनलोड करून केलेले भाष्य, शेवटी जब्याचे कुटुंब डुक्कर वाहून नेते तेव्हा फुले-शाहू-आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रावर महापुरुषांचे फोटो दाखवून केलेले भाष्य, इ. 

नागराज मंजुळे ह्यांचे हे दिग्दर्शक म्हणून निखळ यश सिनेमा सृष्टीला 'पॅराडाईम शिफ्ट' करायला लावणार! 'फँड्री' मैलाचा दगड ठरला आहे.


"आणि कच-या साकारणा-या किशोर कदमला सलाम. एकच प्रसंग. शाळेत राष्ट्रगीत सुरु होते...जब्या बाजुलाच...तो ताठ उभा राहतो...बापालाही नाईलाजाने उभे रहावे लागते...डुक्कर अगदी आटोक्यात...सहज पकडता येईल असे...आणि राष्ट्रगीत सुरु असल्याने हलताही येत नाही...ती तगमग...तो आविर्भाव...ती जीवघेणी तडफड किशोर कदमांनी ज्या पद्धतीने अभिव्यक्त केली आहे केवळ तेवढ्याच साठी त्यांना ओस्कर मिळाले पाहिजे!
किशोर कदमांना...जो बाप त्यांनी साकार केला...बाप माणुस...ओस्कर मिळायलाच हवे असा महान कलावंत..." --संजय सोनवणी.






सोनवणींसारख्या सारख्या जेष्ठ साहित्यिक-समीक्षकानी किशोर कदम विषयी लिहिल्यानंतर 'फँड्री' मधील अभिनयाबद्दल अजून काय लिहायचे हा विचार येतो. तरीही एक सामान्य प्रेक्षक म्हणून मला काय वाटले?
 'फँड्री' मध्ये अभिनय हा विषय जर कुणी कोळून प्याला असेत तर तो किशो कदम ने अस मला आवर्जून सांगावेसे वाटते. जब्या, शालू आणि इतर सर्वांच्या सहज सुंदर अभिनयाबद्दल अभिनंदनच; परंतु 'फँड्री' ने किशोर कदम नावाचा उंचीचा कलावंत मराठी सिनेमाला दिला ह्यबद्द्ल दुमत नाही.

माझ्या सारख्या सामान्य प्रेक्षकाला फोटोग्राफी, पार्श्वसंगीत, इ. टेक्निकल बाजुविषयी जास्त माहिती नसेल तरीही 'फँड्री' मध्ये हे सर्व घटक केवळ एक प्रवाह म्हणून सामील होतात असे वाटते. हलगी वाजविणे, पिरतीचा इंचू मला चावला, इ. देखील प्रवाहातील वाहून गेलेल्या बाबी वाटतात.

अभिनय ह्या बाबतीत मात्र लक्षात राहतो तो किशोर कदम नावाचा बाप माणूस. 'कचरु' ची भूमिका तो खर्या अर्थाने जगला आहे, नव्हे त्यांच्यासाठीच ती भूमिका लिहिली गेली होती. कैकाडी म्हणून गावातील हलकी कामे आजही इमाने-इतबारे करणारा सामाजिक विषमतेचा बळी कचरु, ग्रामसभेत बाहेर जागता पहारा देऊन सर्वांच्या चहापाण्याची वेळेवर व्यवस्था करणारा लोकशाहीतील कचरु, लेकीच्या लग्नात हुंड्याच्या ओझ्याखाली वाकलेला बाप, पैशासाठी दारोदार लोकांचे उंबरठे झीझवणारा बाप, निराश होऊन रात्री दारू पिउन उपाशीपोटी झोपणारा बाप, गुडघे दुखीने विकलांग होऊनही डुक्कर पकडण्यासाठी जीवाचे रान करणारा बाप, राष्ट्रगीतासाठी हातातोंडाशी आलेले डुक्कर सोडून देणारा बाप, तोपर्यंत पोरावर हात न उगारणारा परंतु जब्याची कामचुकारी पाहून त्याला गावासमोर झोडपून काढून त्याची भीड मोडून काढणारा बाप!
ह्या भूमिकेत दुसर्या कुणाचा आपण विचार तरी करू शकतो का? तुलनात्मक दृष्ट्या निळू फुलेंच्या ताकदीने किशोर कदम ह्यांनी 'फँड्री' चे आव्हान पेलले असे म्हणू या. 


किशोर कदम हा एक अभिनयसंपन्न सच्चा कलावंत सिनेसृष्टीत 'फँड्री' च्या माध्यमातून प्रस्थापित झाला. खर आहे
संजय सोनवणी सर, "ओस्कर मिळायलाच हवे असा महान कलावंत..." 

नागराज मंजूळेचा 'फँड्री' आपल्या सर्वाना विचार करायला भाग पाडतो आणि ह्यातच फँड्रीचे सिनेमा विषयक तसेच सामाजिक यश सामावले आहे.


मन:पूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद!

--राकेश पाटील


1 comment:

  1. achuk vishleshana baddal dhanyavad...pl. keep on writing ....

    ReplyDelete