Saturday, 26 July 2014

भारतातील विविध आगरी जमातींचे परस्परसंबंध आणि त्यांचे आरक्षणातील स्थान

भारतातील विविध आगरी जमातींचे परस्परसंबंध आणि त्यांचे आरक्षणातील स्थान

१. पश्चिम भारत :

महाराष्ट्रात प्रमुख्याने ठाणे, मुंबई, नाशिक  आणि रायगड अश्या किनारपट्टीच्या प्रदेशात
आगरी समाजाचे वास्तव्य असून त्यांना आगळे, खारपाटील, मिठागरि, पाथरवट असेही म्हटले जाते.
आगरी समाज हा प्रमुख्याने मीठ उत्पादक तसेच शेतीप्रधानहि आहे. ह्या जमातीत स्त्री-पुरुष समानता असून हुंड्याची पद्धती नसल्याचा मातृसत्ताक इतिहास आहे. 

असुरराज रावणाचे संगीत-वादक अशीही त्यांची ओळख असल्याची आख्यायिका आहे. अगस्ती ऋषीचे  दोन पुत्र आगळा आणि मंगळा ह्यांच्यापासून आगळे (आगरी) आणि मांगेले (कोळी) समाज निर्माण झाल्याचीही एक वदंता आहे. मुंगीपैठणच्या बिंब राजाविषयी अशीच आख्यायिका प्रसिद्ध अहे. 

गुजरातमधील कच्छ मध्ये 'आगरीया' जमात हि मीठ उत्पादक आहे. आजही तेथील 'आगरीया' जमात पारंपारिक मिठागारांचा व्यवसाय करीत आहे. भूज आणि मांडवी इत्यादी प्रदेशात 'आगरीया' जमात मुस्लिम धर्मीय असून आगरी समाजातून त्यांचे धर्मांतर झाल्याचे सांगितले जाते. तत्कालीन मुस्लिम राज्यकर्त्यांनी स्रियांसाठी त्यांना कैदेत टाकले होते. परंतु पुढे सुफी संत मोइनुद्दिन चीस्तीचे नातू फिरसाद ह्यांनी त्यांची सुटका केली आणि त्या कृतज्ञेतून त्यांनी इस्लाम स्वीकारल्याची दंतकथा आहे. 

दादरा नगर हवेली इथेही आगरी समाज अस्तित्वात आहे.
गुजरात आणि महाराष्ट्रातील आगरी समाजातील चालीरीतीमध्येहि साधर्म्य आढळते. 'आगरीया' जमातीचा संबंध 'आग्रा' शहराशीही जोडला जातो.

पश्चिम भारतातील आगरीया समाजाला इतर मागासवर्गीय (OBC) प्रवर्गामध्ये समाविष्ट केले आहे.

२. उत्तर-मध्य भारत:

'आगरीया' हि जमात मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि उत्तर प्रदेशातही आढळून येते. मिर्झापूर परिसरातील 'आगरीया' जमात खाणकाम आणि लोहारकामासाठी प्रसिद्ध आहे. गुजरात आणि महराष्ट्रातील मीठ उत्पादक आगरी जमातीशी ह्या आगरीया समाजाचे सामाजैतिहासिक संबंध तपासून पाहता येतील.

उत्तर-मध्य भारतातील आगरीया समाजाला अनुसूचित जमातीमध्ये (ST) समाविष्ट केले आहे.

तसेच राजस्थान, दिल्ली इथेही आगरी समाज अस्तित्वात असल्याचे दिसते. 
 
३. पूर्व भारत:

'आगरीया' हि जमात पश्चिम बंगाल आणि झारखंड मध्ये 'असुर' नावाने प्रसिद्ध आहे. असुर समाज जगातील एक प्राचीन धातुविद्याप्रविण समुदाय आहे.

हि जमात प्राचीन असुर समाजाशी संबंधित आहे. महिषासुर हे ह्या जमातीचे आराध्य असून दुर्गापूजेच्या काळात ते शोक व्यक्त करतात.  देव-देवतानि महिषासुराच्या सामर्थ्याच्या दहशतीने कारस्थान करून एका स्त्रीच्या (दुर्गेच्या) हातून त्याला कपटाने मारले अशी वदंता आहे. आगरी समाजातील स्त्री-दाक्षिण्याचा इथेही प्रत्यय येतो.

पूर्व भारतातील आगरीया-असुर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये (ST) समाविष्ट केले आहे.

४. दक्षिण भारत :

ओरिसामध्ये आगरीया-असुर जमातीला इतर मागासवर्गीय (OBC) प्रवर्गामध्ये समाविष्ट केले आहे. दक्षिण भारतातील राज्यांतील द्रविडीयन संस्कृतीमधील आगरी समाजाचे काय स्थान आहे ह्याबाबत अधिक संशोधनाची आवश्यकता आहे.

वरील माहितीच्या विश्लेषणातून असे दिसून येते कि आगरी/आगरिया/असुर समाज हि भारतातील आदिम जमात असून प्राचीन कालखंडापासून ते आजवर विविध सामाजैतिहासिक स्थित्यंतरातून आणि भौगोलिक विस्थापानातून हि जमात संपूर्ण भारतभर पसरली असावी. धातुशास्त्रातील,लोहउद्योगातील प्राविण्यापासून ते मीठ-शेती-मासेमारी अशा विविधांगी कौशल्यातून उपलब्ध परिस्थितीनुसार आगरी समाजाने मानवी जीवन-इतिहास-संस्कृतीत आपले योगदान दिले आहे.

अनुसूचित जमातीचे सर्व आयाम-नियमांमध्ये नैसर्गिकरीत्या अंतर्भूत असूनही काही प्रदेशात (गुजरात, महाराष्ट्र, ओरिसा) आगरी समाजाला अजूनही अनुसूचित जमातीचा दर्जा मिळालेला नाही हे वास्तव आहे. ह्या आदिम, मागास, आगरी समाजाला इतर मागासवर्गीय प्रवर्गात ढकलणे हे सामाजिक न्यायाच्या दृष्टीने कितपत योग्य आहे ह्याचा विचार सरकारने आणि आरक्षणाच्या अभ्यासकांनी करायला हवा!

राकेश पाटील.


प्रसिद्ध लेखक आणि संशोधक संजय सोनवणी ह्यांचा आगरी-कोळी समाजाचा इतिहास ह्या ब्लॉगवर वाचा: मीठाच्या इतिहासात लपलाय आगरी समाजाचा इतिहास!

No comments:

Post a Comment