Friday, 30 May 2014

हिंदुत्ववावादाचा धर्मांध सांस्कृतिक दहशतवाद आणि पुरोगामी धर्मनिरपेक्ष विचारधारेचा भावी संघर्ष



स्वतंत्र भारताच्या इतिहासात स्पष्ट राजकीय उलथापालथ झाली आहे. लोकशाहीने एका अशा पर्यायाला निर्विवाद सत्ता सोपविली आहे ज्याच्यावर पुरोगामी नसण्याचा किंवा मुलतत्ववादी असण्याचा शिक्का मारला गेला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हिंदुत्ववादी विचारधारेशी जोडलेल्या भारतीय जनता पार्टीला निर्णायक बहुमत आणि सर्वसमावेशक धर्मनिरपेक्ष पुरोगामी विचारसरणीच्या काँग्रेसचा ऐतिहासिक पराभव अशी अभूतपूर्व राजकीय उलथापालथ घडलि आहे.

धर्मांध सांस्कृतिक दहशतवाद आणि पुरोगामी धर्मनिरपेक्ष विचारधारेचा संघर्ष सनातन आहे. सत्यमेव जयते ह्या न्यायाने विचाराने अविचारावर सातत्याने मातहि केली आहे. प्रतिक्रांतीतूनही शेवटी पुरोगामी विचारच तावून सुलाखून बाहेर आल्याचे दिसते. धार्मिक मुलतत्व् वादावर सहिष्णुतेच्या  विजयाचाच इतिहास आहे. सम्राट अकबर असो कि छत्रपती शिवराय असो, त्यांची महानता त्यांच्या पुरोगामी विचारातूनच प्रतिबिंबित झाली.

निवडणुकीतील राजकीय पराभवामुळे एखादी विचारधारा पराभूत ठरते का? काँग्रेसच्या पराभवाचे विश्लेषण  वैचारिकलेव्हल पेक्षा राजकीय पातळीवरच करायला हवे. धर्म-निरपेक्षता, पुरोगामीत्व  इ. प्रागतिक विचारसरणीचा पराभव झाला असे म्हणणे चुकीचे आहे. भाजपने तरी निवडणुकीत हिंदुत्व हा मुद्दा कुठे मांडला होता? त्यांनीदेखील विकास, सुशासन इ. प्रागतिक मुद्द्यावरच निवडणूक लढविली होती! जाहीरनाम्यात हिंदुत्ववादी काही कलमे शेवटच्या पानावर शेवटच्या दिवशी नाईलाजाने घाई-घाईत घुसविली होती. मोदिनी स्वत: प्रचारातही हिंदुत्व किंवा तत्सम जातीयवादी दृष्टीकोन क्वचित अपवादाने दाखविला असेल. म्हणजेच निवडणुकीपुरता का होईना, हिंदुत्ववाद्यांना पुरोगामी विचारसरणी स्वीकारावी लागले असे दिसते. आता हे ढोंग आहे का आणि असल्यास ते किती काळ टिकणार ते त्यांची पूर्ण बहुमताची सत्ता आल्याने पुढील काळात दिसेलच. सध्यातरी संघ सुद्धा समलिंगी संबंध, आर्थिक धोरण इ. मुद्द्यावर प्रागतिक भूमिका घेताना दिसतोय. मात्र त्याच वेळी कलम ३७० ची राळ उडवून संघाचा अजेंडा राबविला जाईल का असा संभ्रमही निर्माण केला आहे.

स्मृती इराणी किंवा तत्सम कुणीही संघविचाराची व्यक्ती मानव संसाधन मंत्रालयात कोणती भूमिका घेणार हे पाहावे लागणार आहे. मोदिनी तर पाठ्यपुस्तकात कोणत्याही जिवंत व्यक्तीची माहिती  असण्यापेक्षा थोर महापुरुषांचे चरित्र असावे अशी सावध भूमिका घेतल्याचे दिसते. तेव्हा पुढील काळात संघ, भाजप आणि मोदी सरकार हिंदुत्ववादाच्या त्यांच्या मुळ विचारधारेकडे वळतात कि त्यांच्यात  प्रागतिक परिवर्तनाची प्रोसेस सुरु राहते ते पाहणे औत्सुक्याचे असेल. समजा, त्यांनी त्यांचा मार्ग बदलण्याची भूमिका घेतली तर एका अर्थाने तो पुरोगामी विचारसरणीचा विजयच नसेल काय? अर्थात हे स्वप्नरंजन ठरण्याचीच जास्त शक्यता आहे. गेल्या शतकभरातील हिंदुत्ववादाच्या पराभूत इतिहासाच्या पार्श्वभूमीवरील सध्याच्या बहुमताच्या वळीवाने त्यांच्या पारंपारिक विचारधारेला धुमारे फुटणेच जास्त सयुक्तिक आहे.

जनतेने सध्यातरी भाजपला पर्यायी राजकीय सत्ता दिली आहे. त्यांची सांस्कृतिक आणि धार्मिक मुल्ये काय असतील इत्यादी मुलभुत बाबींवर लोकांनी विचार केला का? तर तो मुद्दाच नव्हता. मुळातच कॉंग्रेसला विरोध म्हणून मोदींना मत अशी स्पष्ट लढाइ झाली. वैचारिकता, विचारधारा, हिंदुत्ववाद, मुलतत्ववाद, पुरोगामी, धर्म-निरपेक्षता, इ. विषय बाजूला पडले होते. खरतर काँग्रेस विरुद्ध भाजप हा  सरळसरळ दोन विचार धारांचा संघर्ष आहे. परंतु मोठ्या शिताफीने निवडणुकीचे ते स्वरूप पद्धतशीर  टाळण्यात आले. व्यक्तीकेंद्रित आणि विद्वेषयुक्त असे भ्रष्टाचारमुक्त भारत, मोदी विरुद्ध राहुल, घराणेशाहीमुक्त भारत, काँग्रेसमुक्त भारत, परिवर्तन, इ. विचारधारारहित राजकारण लोकांच्या गळ्यात प्रभावीपणे उतरविले गेले आणि ऐतिहासिक सत्तांतर घडून आले. 

अर्थात,  संघाचा आणि भाजपचाही धर्मांध हिंदुत्ववाद आणि सांस्कृतिक दहशतवाद ह्यावर आधारित छुपा अजेंडा जर काही असेल तर तो उघड होण्याची सर्वाधिक शक्यता आताच आहे. तो उघड होत जाईल तशी जनतेची प्रतिक्रिया देखील येईल. खरा संघर्ष इथेच सुरु होईल. विचारधारांचा संघर्ष! हिंदुत्ववावादाचा धर्मांध सांस्कृतिक दहशतवाद आणि पुरोगामी धर्मनिरपेक्ष विचारधारेचा हा भावी संघर्ष असेल.  त्यासाठी पुरोगामी, प्रागतिक विचाराच्या लोकांनी प्रतिबद्ध असणे गरजेचे आहे. मग ते कॉंग्रेसचे असोत, कि राष्ट्रवादी असोत कि समाजवादी असोत कि साम्यवादी कि इतर कुणीही मुलतत्वविरोधक! पुरोगामी विचारसरणीच्या निर्णायक लढ्याच्या विजयाकरिता सर्वांनी एकत्र येण्याची सर्वाधिक आवश्यकता आज आहे.

No comments:

Post a Comment