प्रस्थापित राजकीय व्यवस्थेच्या विरोधातील जे आंदोलन 'आप' च्या केजरीवाल ह्यांनी अण्णा हजारे आणि मिडीयाला सोबत घेऊन छेडले होते, त्याचा अंतिम निकाल लागला आहे. जनआंदोलनाच्या मार्गाने प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध लाट उत्पन्न झाली होति. चार राज्यातील विधानसभा निवडणुकीत त्या लाटेचा प्रभाव दिसला होता. दिल्लीत केजरीवाल स्वत: त्या लाटेवर यशस्वीरीत्या स्वार झाले होते. कॉंग्रेसला भुईसपाट करणाऱ्या त्या लाटेत तेव्हाही भाजपने तीन राज्यात हात धुवून घेतले होते. लोकसभेच्या निवडणुकीत देखील त्याच लाटेची पुनरावृत्ती झाली. भाजप सत्ताधारी आणि इतर विरोधक असे राजकारणाचे चित्रच अंतर्बाह्य पालटल्यावर 'आप'ची गरज तरी कुठे उरली आहे?
काँग्रेसच्या अंदागोंदी कारभारावर अण्णा आंदोलनाच्या माध्यमातून निर्णायक हल्ला चढविणारे केजरीवाल आणि त्यांची टीम ह्यांना जनतेने दिल्लीत प्रायोगिक तत्वावर तो कौल दिला होता. मात्र लोकसभा निवडणुकीच्या लोभाने दिल्लीतील सरकारला लाथ मारून आप ने विश्वासार्हता घालवली. पर्यायाने जनतेने भाजपच्या पारड्यात निर्णायक यश घालून 'आप'लाही रस्ता दाखविला आहे.
इथे हे लक्षात घेणे गरजेचे आहे कि अण्णा आंदोलनातून देशातील एकूणच राजकीय व्यवस्थेला जनतेने आव्हान दिले होते. तो जनक्षोभ केवळ सत्ताधाऱ्यांच्या विरोधातच नव्हे, तर विरोधी पक्षाच्याही गलथान पणाविरुद्ध होता. प्रस्थापित राजकीय पक्षांविरोधातील ती लाट एका नवीन सशक्त पर्यायाच्या शोधात होती. भाजप किंवा मोदी ह्यानादेखील त्या लाटेने तेव्हा स्वीकारले नसते कारण सर्वच राजकीय पक्षांच्या विरोधातील ती लाट होती.
अण्णांच्या नेतृत्वात ती धमक नव्हती म्हणून त्यांनी सक्रिय राजकारणात न उतरण्याचा मार्ग निवडला. केजरीवाल ने मात्र 'आप'च्या स्वरुपात तो पर्याय लोकांना देण्याची चतुराई दाखविली होती. परंतु राजकीय प्रगल्भतेच्या अभावापायी दिल्लीतील सरकार सोडण्याचा आत्मघातकी निर्णय घेतला गेला. दुसरी महत्वाची बाब हि कि दिल्लीतील निवडणूकीपेक्षा राष्ट्रीय पातळीवर निवडणुका लढविण्यासाठी संघटनात्मक जाळ्याची प्रचंड गरज होती, जी 'आप'कडे मुळातच नव्हती. त्यामुळे प्रस्थापित राजकीय व्यवस्थेच्या विरोधाचे सोयीस्कर रुपांतर ऊत्तरोत्तर काँग्रेस विरोधात होत गेले आणि भाजप किंवा मोदी हा नवीन पर्याय जनतेने स्वीकारला. ह्या निर्णायक वळणावर मिडीयाने देखील 'आप'ला ठेंगा दाखवून मोदींची तळी उचलली.
एकूण परिस्थितीचा विचार करता असेही लक्षात येते कि कॉंग्रेसने अण्णा आंदोलनाचे जे फुकटचे लाड केले ते त्यांना नडले. रामदेव बाबाला जसा हाकलून दिला होता तशीच अण्णाचीही वेळच्या वेळी उचलबांगडी करायला हवी होती. त्याच १५ दिवसात मिडीयाने अण्णाला डोक्यावर घेऊन देशभर काँग्रेसविरोधी वातावरण तापवले आणि पुढेही तापवत ठेवले. कॉंग्रेसचा पद्धतशीर काटा काढला गेला.
हे वातावरण मोदी किंवा भाजप कधीही तयार करू शकत नव्हते. कारण जनता त्यांच्याही (सर्वच राजकीय पक्षांच्या) विरोधात गेली होती. प्रस्थापित राजकीय व्यवस्थाच उलथवून टाकण्याची लोकांची मानसिकता होती. काँग्रेस सत्ताधारी असल्याने काँग्रेस विरोधाची तीव्रता अधिक होती. परंतु एकदा लोकांची काँग्रेस विरोधी मानसिकता तयार झाली कि ती कशी एक्सप्लोइट करायची त्यासाठी भाजपची कुटनीती सुनियोजितपणे कार्यरत राहिली. आज जरी मोदिचा उदोउदो होत असेल तरी मोदी हा दुय्यम विषय असल्याचे दिसते. मोदी किंवा स्वराज किंवा जेटली असे कोणताही समर्थ नवा चेहरा चालून जाणार होता.
अण्णांचा विरोध पत्करून त्या काँग्रेस विरोधी लाटेवर दिल्लीत केजरीवालहि स्वार झाला होता. परंतु राष्ट्रीय पातळीवर तेवढी कुवत नसल्याने सहाजिकच ती लाट आता मोदीच्या सोबत गेली. अण्णांच्या स्टेजवरचे किती कलाकार आज भाजपच्या गोटात आहेत ते पाहता अण्णाही कुणाच्या इशाऱ्यावर नाचत होते तेदेखील स्पष्ट होते. किंवा अण्णांना सुनियोजितपणे वापरले गेले असे म्हणता येईल.
ती लाट जेव्हा भाजपच्या पाठी परिवर्तित केली जात होती तेव्हा अण्णाला वैचारिक सपोर्ट करणारे किती लोक विचारधारेच्या मुद्द्यावर काँग्रेस सोबत परतले? हे पुनरागमन किती जणांना जमणार होते? विचारधारा, इतिहास, मुलतत्ववाद, धर्मनिरपेक्षता, विद्वेषवाद, धर्मांध जातीयवाद ह्या मुलभुत तत्वांशी किती जणांना आज देणेघेणे आहे? आपली लोकशाहीच मुळात किती प्रगल्भ आहे???
अर्थात, केजरीवाल आणि आम आदमी पार्टीने इंजिनियर केलेली लाट कंट्रोल करण्याची क्षमता त्यांच्यात नव्हती असे सिद्ध होते. म्हणून ती काँग्रेस विरोधी वातावरणाची लाट भाजपच्या पाठीमागे गेली, इतकेच! ती लाट जंतरमंतर वर निर्माण होताना घोंगडे भिजत ठेऊन बघ्याची भूमिका घेण्याची पारंपारिक प्रवृत्तीच काँग्रेसच्या ऐतिहासिक राजकीय पराभवास कारणीभूत ठरली.
No comments:
Post a Comment