Friday, 16 May 2014

२०१४ चे सत्तांतर घडून आले आहे

२०१४ चे सत्तांतर घडून आले आहे.

स्वतंत्र भारताच्या लोकशाहीच्या इतिहासात पहिले सत्तांतर झाले ते १९७७ च्या निवडणुकीत. जनता पार्टीचे आघाडी सरकार (जनसंघासह) इंदिरा गांधीना पराभूत करून तेव्हा सत्तारूढ झाले होते. मात्र अंतर्गत बेबनावामुळे २-३ वर्षात गडगडले आणि १९८० साली पुन्हा इंदिरा गांधीना सत्ता मिळाली.

काँग्रेसने पुढे दोन टर्म सरकार चालवले आणि १९८९ मध्ये सत्तांतर होऊन जनता दलाचे व्ही. पी. सिंग सरकार भाजपच्या पाठींब्यावर अस्तित्वात आले. परंतु वर्षभरात हेही सरकार गडगडले आणि १९९१ मध्ये काँग्रेसचे नरसिंह राव सरकार दिल्लीत आले. १९९६ मधेही कॉंग्रेसच्या पाठींब्यावर देवेगौडा सरकार दिल्लीत बसले. १९९८ मध्ये ते सरकार पडल्यावर १९९८ आणि १९९९ मध्ये भाजपचे NDA प्रणीत वाजपेयी सरकार अस्तित्वात आले.

२००४ मध्ये वाजपेयी सरकार पराभूत झाले आणि काँग्रेसचे UPA सरकार पुढील दोन टर्म दिल्लीत अस्तित्वात होते.

२०१४ मध्ये पुन्हा सत्तांतर झाले आहे.

सर्वसाधारण पणे कॉंग्रेसला दोन टर्म सरकार चालवायला दिल्यानंतर एक टर्म विरोधी पक्षांना देण्याची भारतीय लोकशाहीची आणि मतदारांची मानसिकता किंवा परंपरा असल्याचे दिसते. भारतीय जनता सत्ता-परिवर्तनातून आपले वर्चस्व सत्ताधाऱ्यांवर सातत्याने ठेऊन असल्याचे लक्षात येते.

मोदींच्या भाजपने लक्षात घ्यायला हवे कि मतदारांनी त्यांना त्या मानसिकतेतूनच सत्ता सोपवली आहे. त्यांना मिळालेला अभूतपूर्व जनादेशाचा रा.स्व.संघ किंवा तथाकथित हिंदुत्ववादाशी तिळमात्र नसल्याचेही इथे नमूद करावे लागेल. संघाचे हिंदू राष्ट्रवाद, राममंदिर, धर्माधारित जातीय राजकारण, मुस्लीमविरोध, इ. मुलतत्ववादी मुद्दे गुंडाळून ठेवून विकास, सुशासन, गुजरातचे विकास मॉडेल, मोदींची विकासपुरुष प्रतिमा, इ. मुलभुत मुद्द्यांवर आधारित प्रचारावर भाजपने हे जन-समर्थन मिळविल्याचे स्पष्ट होते.

कॉंग्रेसच्या विरुद्ध असलेली प्रचंड anti-incumbancy , मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराचे आरोप, जागतिक मंदीमुळे घसरलेली अर्थव्यवस्था, महागाईचा प्रकोप, इ. प्रतिकूल वातावरणामुळे काँग्रेससाठी हि निवडणूक कठीण झाली होतीच. त्यात मोदींनी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जवळजवळ वर्षभर प्रचंड मेहनत करून देशभर अभूतपूर्व प्रचाराची विजयी आघाडी घेतली होती. मतदारांनी आपली परिवर्तनाची मानसिकता आणि परंपरा कायम राखली आणि मोदींच्या पारड्यात ऐतिहासिक विजय टाकला.

भारतीय लोकशाहीतील हे सत्तांतर किती काळ कायम ठेवायचे तो निर्णयही भारताचा हा सुजाण आणि जागृत मतदारच पुढील काळात घेणार हे सत्ताधारी आणि विरोधक दोघांनीही लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

No comments:

Post a Comment