Monday, 19 May 2014

वाघ्याचा टायगर व्हायला हवा!


झालं ते झालं. पण काहीही करून हा कुत्रा वाचविला पाहिजे. कसाही असला तरी इमानदार आहे हा श्वानराज. थोडा आळशी आहे पण इमानदार आहे, विश्वासू आहे. भरवशाचा आणि माणसाळलेला आहे. आळशीपणामुळे जरा बिघडलाय म्हणून काय झालं? सुधरेल कि!

झालं काय, कि कालपरत्वे हा आमचा कुत्रा फारच आळशी बनत गेला. गावातली उनाड, भटकी, गावठी कुत्री हळूहळू अंगणात शिरली. ह्याने दुर्लक्ष केले. नंतर ती ओट्यावर फिरू लागली. तरीही हा ओट्यावर कोपऱ्यात मस्त ताणून झोपून राहिला. ह्याच्या रोजच्या खाण्यामधेही त्यानी वाटा मिळविला तरीही हा ढिम्म हलेना! आता हि भटकी कुत्री चांगलीच माजल्यात. त्यात त्यांचं टोळक तयार झालंय. त्यात शेजारची इंग्लिश,  संकरीत कुत्रीहि त्यांच्या टोळक्यात शिरल्यात.

कालपरवा तर हद्द झाली. ह्या सर्व आगंतुक कुत्र्यांनी मिळून जीवघेणा हल्ला चढविला आमच्या वाघ्यावर. साफ ओरबाडून काढलाय त्याला. जखमी होऊन जीव घेऊन तो कुठे पळालाय ते शोधतोय. सोबत तो स्प्रे घेतलाय. कुठेतरी बसला असेल अंधाऱ्या कोपऱ्यात निपचित. असेल तिथून त्याला घरी आणणार आहे. त्याच्या जखमा साफ करून त्यांना मलमपट्टी करू या. पुन्हा तो ठाम उभा राहिलाच पाहिजे.

अहो, ह्याच कुत्र्याने वर्षानुवर्षे आमचे रक्षण केले आहे. बाजूच्या रानावनातील लांडगे त्याच्याच धाकाने गावात फिरकत नाहीत. मागे काही विदेशी कुत्र्यांची झुंड गावात घुसली तेव्हापण हाच वाघासारखा लढला त्यांच्याशी. जीवावर खेळून त्यांना हुसकाउन लावले गावाबाहेर. साली तेव्हा कुठे गेली होती हि भटकी कुत्री? तेव्हा त्या विदेशी कुत्र्यांच्या झुंडीत सामील झाली होती!

काय आहे, ह्या भटक्या कुत्र्यांच्या झुंडीचे काही खर नाही. साली कधी पिसाळतील त्याचा नेम नाही. त्यातील काही रक्ताला चटावलेली असतात. बाजूच्या जंगलातील लांडगेहि त्यांच्यात छुपून असतात. आणि आता आमचा श्वानराज गलितगात्र पडलाय म्हटल्यावर हे शेजारील वखवखलेले लांडगे आणि विदेशी कुत्र्यांची झुंड पुन्हा जोर धरू लागतील.

ते एक प्रसिद्ध डॉक्टर आहेत कुत्र्यांचे. सर्व जातीची कुत्री त्यांनीच वेळोवेळी सुधरवली आहेत म्हणे. पण त्यांनी हल्ली दिल्लीत दवाखाना टाकलाय. गावाकडे आले असतील तर त्यांचीही ट्रीटमेंट घेतो. पण आता ह्याला एखाद्या ट्रेनरकडेहि पाठवायला हवे. हि आधुनिक कुत्री अशी ऐकायची नाहीत. आमचाही कुत्रा त्यासाठी सुसज्ज व्हायला हवा. वाघ्याचा टायगर व्हायला हवा!

राकेश पाटील
(श्वानराजकीय अभ्यासक)

हेही वाचा: मतदानाचा एक दिवस

No comments:

Post a Comment