Friday, 9 May 2014

कुणीही चालेल...पण त्या अमेरिकन कंपनीचे आधुनिक अराजक नको...!

खरतर भाजपला अत्यंत अनुकूल असे राजकीय वातावरण निवडणुकीपूर्वी तयार झाले होते. जागतिक मंदीमुळे कोलमडेली अर्थव्यवस्था, वाढती महागाई , कॉंग्रेसच्या सरकारवर झालेले घोटाळ्यांचे आरोप आणि भ्रष्टाचाराविरुद्ध अण्णा आंदोलन, आम आदमी पार्टी ह्यांनी देशभर उठवलेले रान, इ. घटना कॉंग्रेसला पराभूत करण्यात पुरेश्या होत्या. त्याची झलक चार राज्यातील विधानसभा निवडणुकीत दिसली होतीच. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपाला फक्त आपण केंद्रात काँग्रेस विरुद्ध सक्षम पर्याय देऊ शकतो एवढेच लोकांसमोर ठेवायचे होते. त्यासाठी वाजपेयी टाईप एखादा सर्वसमावेशक चेहरा मिळणे सहज शक्य होते.

एकट्या पक्षाने सरकार स्थापण्याचे दिवस इतिहासजमा झालेत आणि इतिहासातही केवळ कॉंग्रेस मधेच ती ताकद असल्याची वस्तुस्थिती आहे. असे असताना देखील भाजपने NDA ला सक्षम करण्याचे सोडून एकट्याच्या ताकदीवर जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याची रणनीती का आखली ?

त्यासाठी रा.स्व. संघाने स्वत:ची ताकद पणाला लावून मोदींना पुढे केले. सरकार तर येणारच आहे मग पुढे आपला अजेंडा कसा राबविता येईल त्यासाठी संघाने सुनियोजितपणे आपली फौज रणांगणात उतरवली. भाजप हा पक्ष मुळातच संघाचेच पिल्लू असल्याने इतर नेते स्वयंसेवक शिस्तीने सुतासारखे सरळहि आले. सक्रिय राजकारणात कधीही ना उतरणारा संघ खुलेआम प्रचारात का उतरला ?

इथेच भाजप हा पक्ष मागे पडला. कॉंग्रेसला सक्षम पर्याय देणारा भाजप आणि NDA गुंडाळून ठेवला गेला. आणि सुरु झाले नमो..नमो...मोदी एके मोदी! अभूतपूर्व अशी प्रचार यंत्रणा ह्या निवडणुकीत मोदिनी राबविली. मोदिनी प्रचंड मेहनत घेतली आणि प्रचारात भयंकर आघाडीही मिळविली. परंतु ह्या विविधतेने नटलेल्या खंडप्राय देशाच्या नेतृत्वासाठी जी विश्वासार्हता आणि स्वीकार्यार्हता लागते ती कुठून मिळविणार?

सुप्रीम कोर्टाने गुजरात मधून तडीपार केलेल्या अमित शहाला उत्तर प्रदेशातील निवडणुकीची जबाबदारी सोपविली गेली! उत्तर प्रदेश आणि बिहार मधून जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी स्वत: मोदी वाराणसी सारख्या धार्मिक स्थळी उभे राहिले. जाहीरनाम्यात राम-मंदिर आणि मुस्लिमविरोधी इतक कलमे पुन्हा अंतर्भूत करण्यात आली. धर्माच्या आधारावर ध्रुवीकरण करून निवडणुका जिंकण्याचे नव्वदच्या दशकातील फंडे पुन्हा खेळले गेले.

विकासपुरुष, गुजरात मॉडेल, इ. गोष्टीच्या बुरख्याआड आपले हिंदुत्ववादी वर्चस्व देशात प्रस्थापित करण्यासाठी संघाने ह्या निवडणुकीत पद्धतशीरपणे भाजपला वापरले. त्यासाठी शक्य त्या सर्व उचापती केल्या. जो येईल तो भिडू सोबत घेतला. तरीदेखील २५ पक्षांच्या NDA मध्ये प्रत्यक्षात शिवसेना आणि अकाली दल हे पुर्वापारचे भिडू सोडून कुणी खास दिसत नाही. हो ना करता शेवटी चंद्राबाबूचा तेलगु देसम मात्र त्यांच्यासोबत आला आहे.

परंतु ह्या संघवादी प्रवृत्तीने NDA च्या संकल्पनेलाच बाद केले आहे. बिहारमध्ये नितीशकुमारचा जदयु बाहेर पडल्याने आज तरी बिहार मध्ये आवश्यक ते संख्याबळ भाजपला मिळण्याची परिस्थिती नाही. उत्तर प्रदेशातही सध्यातरी अपेक्षित यश भाजपला मिळताना दिसत नाही. उलटपक्षी ध्रुवीकरण व्हायचे ते झाले परंतु ते काँग्रेससाठी आणि भाजप विरोधकांसाठी अधिक अनुकूल असल्याचे लक्षात येते. मोदी विरोधाच्या अपरिहार्यतेतून कॉंग्रेसला अनुकूल वातावरण बनत गेल्याचे दिसते.

निवडणुकीचे निकाल लवकरच लागतील. व्यक्तिकेंद्रित राजकारणाला देशातील मतदाराने नाकारल्याचे सिद्ध होईल. एक अत्यंत अनुकूल संधी दवडल्याचे भाजपच्या लक्षात एव्हाना आले असले. धार्मिक उन्मादाच्या राजकारणापायी रा.स्व.संघाच्या हातातील केवळ बाहुले बनून राहिलेल्या भाजपचे पुढील काळात देशातील भवितव्य काय? हा यक्षप्रश्न १६ मे च्या निकालाच्या दिवशी भाजपच्या चाणक्यांसमोर दत्त म्हणून उभा राहिला असेल!


 अगदी सुरुवातीपासून मोदिनी प्रचारात प्रचंड आघाडी घेतली होती. मिडिया आणि सोशल मिडिया साठी त्यांनी केलेली 'म्यानेजमेंट' आजही सर्वत्र दिसत आहे. त्यांच्या अमेरिकन जाहिरात एजेन्सिचे हि खूप नाव झाले. मोदिनी साम, दाम, दंड आणि भेद अशा सर्व नीती-अनीती वापरून आक्रमक प्रचार केला आणि हे त्यांचे निर्विवाद यश आहे असेही आपण म्हणू शकतो.

ओपिनियन पोल, न्यूज, प्रचंड सभा, मुलाखती, चर्चा, इ. सर्व मिडिया प्रोग्राम मधून वातावरण मोदीमय करण्यातही त्यांच्या अमेरिकन एजेन्सिने यश मिळविले. प्रचाराची हि आधुनिक पद्धत अतिशय प्रभावी आणि अभूतपूर्व अशी आहे ह्यात देखील काही वाद नाही.

परंतु ह्या अमेरिकन प्रचार स्टायीलच्या नादाने मतदानाच्या प्रत्येक टप्प्यात केवळ लोकांच्या भावना भडकावून जात्यंध, धर्मांध, संधिसाधू, भावनिक आणि आक्रमक प्रचार करण्यासाठी भाजपने नितीमत्ता गुंडाळून घाणेरड्या राजकारणाची परिसीमा हि ओलांडली.

१. मागील टप्प्यात प्रियांका गांधीच्या 'नीच राजनीती' ह्या शब्दाला मोदिनी त्यांच्या तथाकथित 'नीच जातीशी' जोडून मतांचे अत्यंत घाणेरडे राजकारण केले.
२. राम मंदिर आणि श्री राम ह्यांच्या प्रतिमा प्रचारसभेत वापरून नियमांचे उल्लंघन करूनही धार्मिक प्रचार साध्य केला.
३. ह्या टप्प्यात वाराणसी मध्ये निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीवर खोटेनाटे आरोप करून आणि गंगापुजेचेहि 'नीच राजकारण' करून पुन्हा जनतेच्या धार्मिक भावनांना हात घातला.
४. त्याआधीच्या टप्प्यात गुजरात मध्ये मतदान केंद्राबाहेर मीडियाशी संवाद करण्याच्या बहाण्याने क्यामेऱ्यासमोर 'कमळ' नाचवून गलिच्छ राजकारण खेळले.
५. एकीकडे मतदान चालू असताना वाराणसीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याच्या बहाण्याने प्रचंड रोड शो करून मिडीयातून मतदारांना प्रभावित करण्याचा क्षुद्र संधिसाधुपणा केला.

वरील घटना मधून मोदी आणि भाजपने प्रचार यंत्रणा किती प्रभावीपणे वापरली असेही मांडले जाऊ शकते आणि ते खरेही आहे. परंतु त्या निमित्ताने मोदी आणि भाजप ह्यांचा विकासाच्या आडचा विद्रूप चेहराही समोर आला. छुपा अजेंडा कसा असतो तेही उघड झाले. लोकशाहीतील संसदीय संस्था, कायदे-कानून, घटना ह्याविषयी त्यांची बेमुर्वत बेबंदशाहीही समोर आली. राजकीय फायद्यासाठी सर्व नितीमत्तेला फाटा देऊन अत्यंत खालच्या पातळीवरचे घटिया राजकारण करण्यात त्यांचा हातखंडा असल्याचेही स्पष्ट झाले. अरुण जेटली सारखा भाजपचा आधुनिक विचाराचा चेहराही ज्या आक्रमक मूडमध्ये निवडणूक आयोगावर घसरला ते पाहता पुढील काळात देशासमोर काय वाढून ठेवले आहे त्याची कल्पनाही करू नये.

त्यांच्या हि जी शेवटच्या टप्प्यातही प्रचाराची हाराकिरी आणि तडफड चालली आहे ती पाहता विजयाची शाश्वती त्यानाही मुळीच नाही हे देखील दिसते.

ज्या मिडीयाने ह्या घाणेरड्या राजकारणात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी होऊन त्या अमेरिकन एजेन्सीच्या प्लान बरहुकूम भूमिका निभावली त्यांची विश्वासार्हता किती राहिली आहे ह्याचे त्यांनी आत्मपरीक्षण करावे. अर्थात, जर त्यांचे अस्तित्व पुढील काळात अबाधित राहिले तर!

कोणत्याही परिस्थितीत देशात ह्या अशा मोदीचे किंवा आजच्या भाजपची सत्ता येता कामा नये. काँग्रेस, डावे, पवार, मुलायम, माया, जयललिता, ममता, इ. कुणीही चालेल!

परंतु त्या अमेरिकन कंपनीचे आधुनिक अराजक नको.

No comments:

Post a Comment