Saturday, 26 April 2014

मतदानाचा एक दिवस

पहाटे साडेचार वाजता उठणे म्हणजे माझ्या सारख्या सूर्य-पूजकाला मोठे आव्हान होते. प्रीतीची मतदान केंद्र-अधिकारी म्हणून नेमणूक झाल्याने हे आव्हान उभे राहिले होते. साडेपाच वाजता नाला सोपारा विभागातील आचोळे गावातील शाळेत प्रीतीला पोहोचायचे होते. नाला सोपारा स्टेशन पर्यंत तिला इतर निवडणूक अधिकाऱ्यांसोबत सोडून परत फिरलो. घरी येउन पुन्हा ताणून दिली.

तासभर झोप काढून केळवा रोडला जायची तयारी सुरु केलि. तिथे मामाकडे लग्न आहे. तिथून आमच्या खार्डी गावात जाऊन मतदानहि करायचे होते. ११ ची डहाणू लोकल पकडण्यासाठी विरार रेल्वे स्टेशन मध्ये पोहोचलो. ट्रेन अजून आली नव्हती. ओव्हर ब्रिज वरील गर्दी पाहून सब-वे कडे मोर्चा वळविला. त्या अंधार्या सबवे मधून बाहेर पडत असताना पायरी जवळ एक कुत्रा शांत झोपल्याचे पहिले. त्याच्याकडे पाहत पायऱ्या चढत होतो...काहीतरी चुकल्यासारखे वाटले. तो शांत झोपला नव्हता...निपचित पडला होता! जखमी आणि असहाय्य!

अरेरे...बिच्चारा...हा काही जगात नाही आता असे मनात आले. कुत्तेकी मौत!
'कुत्तेका पिल्ला' गाडीखाली आला तरी मनाला चटका बसणारा आपला संवेदनशील समाज हि उगाच आठवला!

मी फलाटावर आलो. पाच मिनिटात ट्रेन येणार होती. मला लोकशाहीतील महत्वपूर्ण मताधिकार पार पाडण्यासाठी जायचे होते. जागृत नागरिक असल्याचे कर्तव्य बजावायचे होते. एव्हाना मित्रांची मतदाने आटपून फेसबुकवर फोटोही अपलोड झाले होते! साला आपल्याला का हे वेळेवर काम करणं जमत नाही?

लोकशाही, निवडणूक, मतदान ह्याचे विचार डोक्यात घुमत असताना मनाच्या कोपर्यातून पुन्हा त्या असहाय कुत्र्याची वेदना उफाळली.
काय होईल त्याचं? जगेल कि मरेल? आपण काय करू शकतो?
काहीतरी करायला पाहिजे!

पावले पुन्हा सबवे च्या दिशेने वळली. तो गलितगात्र कृष्णवर्णी श्वानराज तसाच पडून होता. जवळ जाऊन परिस्थिती पहिली. अवघड जागी झालेली दुर्धर जखम पार चिघळली होती. नाकाच्या वर झालेल्या जखमेने एव्हाना एक डोळाहि जायबंदी केला होता. अशा अवघड जागी झालेल्या जखमेने बिच्चारा काळूराम अगदीच निकामी होऊन गेला होता. थोबाड पोखरून त्याचा ताबा परजीवी किड्यांनी घेतला होता! किती दुर्दैवी असहाय्यता!

क्षणभरात मी निर्णय घेतला. माणुसकीने नागरिक शास्त्रावर मत केली. मी ट्रेन सोडली. सबवे मधून सरळ  विरार पश्चिमेला बाहेर पडलो. उन्हाळा मी म्हणत होता.
छ्या...निवडणुका मार्चमध्ये घ्यायला हव्या होत्या...

घामाघुम होऊन दोन तीन मेडिकल स्टोर पालथी घातली तेव्हा कुठे एक औषधी स्प्रे उपलब्ध झाला. २०० रुपयात काम झाले. पुन्हा स्टेशन गाठले. सब वे कडे आलो. काळूराम निपचित पडून होता. जवळ जाऊन त्याच्या जखमेवर स्प्रे फवरला! तो तिरमिरून उठला आणि पळू लागला. मी त्याचा पाठीमागे...पायऱ्या चढून तो बाहेर पडत होता तोपर्यंत मी पुन्हा-पुन्हा स्प्रे फवारला. तो बाहेर पडून रोडच्या कडेला गेला. तिथेही जाऊन शक्य तेवढा स्प्रे वापरला. बस्स...!

अजून जास्त काही करणे शक्य नव्हते. मी परतलो. सबवेतून स्टेशनवर आलो. साडे अकराची शटल लागली होती. फर्स्ट क्लास मध्ये शिरलो. घामाने शर्ट ओलाचिंब झाला होता आणि नखशिखांत भिजलो होतो. पाण्याने स्वच्छ हात, चेहरा धुवून बसलो.

वाचेल का तो? माझा प्रयत्न किती अपुरा होता! त्याची गरज खरतर फार मोठी होती. मी शक्य तेवढी मदत केली होती. तो वाचायला हवा!

क्षणभर मनात विचार आला... किती रुबाबदार आणि इमानदार प्राणी...कुत्रा! परंतु किती भयानक असहाय्यता!

लोकशाहीलाही कुणीतरी लुत-भरल्या कुत्र्याची उपमा दिली आहे!

देशाच्या लोकशाहीची तरी काय वेगळी परिस्थिती आहे? तिलादेखील किती पोखरून टाकली आहे! हा देश अशाच परपोशी किड्यांनी पोखरून टाकला आहे. पार घायकुतीला आला आहे. अगदी असहाय्य आहे...काळूराम सारखाच.

धर्मांध दंगलखोरी, भ्रष्टाचार, सामाजिक-आर्थिक विषमता, गरिबी-बेकारी, कुपोषण, आतंकवाद, इ. समस्यांनी आमच्या लोकशाहीच्या इमानदार कुत्र्याला खल्लास केले आहे. खरतर भारतीय लोकशाही हि एखाद्या अवाढव्य हत्तीप्रमाणे आहे. परंतु अवघड जागी झालेल्या दुर्धर जखमांनी हा हत्ती जराजर्जर झाला आहे.

क्षुद्र आणि घाणेरड्या किड्यांनी त्या हत्तीच्या शरीरात त्यांच्या किळसवाण्या वस्त्या उभ्या केल्या आहेत. तरीही त्या किड्यांना पिढ्या-न-पिढ्या आपल्या शरीरावर पोसून हा हत्ती वणवण करतोय.
चला...इथेही आपल्याला स्प्रे मारायला हवा. व्होटिंग मशीनवर बटन दाबून मी तो स्प्रे मारू शकतो!

लोकशाहीच्या अंगावरील चिघळत्या जखमेत दडून बसलेल्या धर्मांध दंगलखोर किड्यांवरती तो स्प्रे मारायला हवा.

केळवा रोडला पोहोचलो. लग्नाची तयारी पहिली. दुपारी रणरणत्या उन्हाची काहिली संपून सूर्य पश्चिमेला ढळला आणि आम्ही निघालो. मतदान केंद्रावर साडेपाच वाजता पोहोचलो आणि बटन दाबले. लोकशाही, धर्म-निरपेक्षता, स्वातंत्र्य-समता-बंधुता, राज्यघटना ह्यांना साक्षी ठेऊन मतदान केले. स्प्रे मारल्याचे समाधान मिळाले!

माझ्या स्प्रे मुळे परजीवी घाणेरडे किडे मारतील का? चिघळलेली जखम बरी होईल? अशा किती जखमा लोकशाहीच्या हत्तीच्या किंवा इमानदार कुत्र्याच्या अवघड जागी चिघळून राहिल्या आहेत. किळसवाण्या किड्यांच्याही वस्त्या नव्हे सरंजामशाह्या लोकशाहीच्या जखमेत नांदत आहेत. माझा स्प्रे त्या परजीवी किड्यांचा किती बंदोबस्त करणार? हे प्रश्न अनुत्तरीत आहेत. परंतु काळूराम असेल किंवा लोकशाहीचा हत्ती असेल, दोघानाही आज माझ्या स्प्रेची गरज होती. ते कर्तव्य पार पडल्याचे समाधान माणूस म्हणून, नागरिक म्हणून, मला मिळाले!


हेही वाचा: वाघ्याचा टायगर व्हायला हवा!

No comments:

Post a Comment