Wednesday, 31 December 2014

मानवाने नव्याने उत्क्रांत व्हावे... अर्थात माणसाची 'घरवापसी'

मानवाने नव्याने उत्क्रांत व्हावे... अर्थात माणसाची 'घरवापसी'
पहिल्याप्रथम...

सर्वांनी घरवापसी करावी
अहिन्दुंनी सनातन हिंदू व्हावे
शूद्रातिशूद्र हिंदुनी स्वगृही परतून
मूलनिवासी बौद्ध व्हावे
जैनशीखद्रविड व्हावे,
शैवनागअसुर व्हावे
धर्माची झापडे गच्च बांधावी
कुणी मुस्लिम, कुणी ख्रिश्चन, ज्यू व्हावे
धर्माचे झेंडे गाडावेत... माणसाच्याच उरावर!


अवैदिकांनी वैदिक, आर्यांनी अनार्य व्हावे
मिथ्यासंस्कृतीखुळात 
सप्तसिंधू, हप्तहिंदू...जे वाटेल ते व्हावे
सेमेटिक पगान व्हावे
सुन्नी-शिया, प्रोटेस्टन्ट-केंथलिक व्हावे
माया, असिरियन, सुमेरियन व्हावे
अंतत: हरप्पा-मोहेंजोदरोत लुप्त व्हावे

कोसळावे उध्वस्त व्हावे
पार पुरातन अतिप्राचीन व्हावे
आदिम भटके टोळीवाले
जंगली रानटी होमोसेपियन व्हावे


रानटी जीवन जगावे
कच्चे मांस, कंदमुळे खावीत
पाने-फुले ल्यावी
गुहेत, झाडावर राहावे
माकड-वानर व्हावे
मस्त हिंस्त्र पशु व्हावे
कुणाचीही पिलं प्रसवावी


हाणामाऱ्यादंगे-चकमकी कराव्या
लुटमार, जाळपोळ करावी
माणसं गुलाम बनवावी
बायका पळवाव्यात
बलात्कार अत्याचार करावे
गर्भस्तने छाटून उन्मादावे
शिगा भोसकाव्या
वासनाकांडे करावीत
हत्याकांडे जळीतकांडे
नरसंहार करावेत
माणसे करवतीने चिरून फेकावी
मुले-बालके रांगेत चिरडावी
क्रौर्यकिळसतळ गाठावा


जे निघृण ते करावे
मनुष्यप्राण्याचं मांस खावं
मानवी रक्त प्यावं
पाशवी परिसीमाच गाठावी
कि पशुत्वाचाच स्फोट व्हावा
बिगबँग कि शून्यस्थित व्हावे


संस्कृतीसभ्यतेचे बंध तुटावे
जातीधर्माची कुंपणे नसावीत
राज्यबिज्य, देशबिश
उच्च-नीच, गरीब-श्रीमंत
भाषिक-प्रांतिक
साऱ्या कृत्रिम मर्यादा तुटाव्या
साऱ्या भानगडी नष्ट व्हाव्यात
सारी हार्डडिस्कच फ़ॉर्म्याट करावी






सरतेशेवटी...

वंष-वर्ण, अमकी संस्कृती,
तमका धर्म, राष्ट्र-इतिहास,
भूगोल-सीमा सारे सोडून द्यावे
सारं विस्मृतीत गाडावे


कुणी देवाचा अवतार, देवाचा पुत्र नसावा
कुणी प्रेषित, धर्मसंस्थापक नसावा
कुणी महापुरुष, युगपुरुष नसावा
महात्मा, महामानव नसावा
भीती नसावी, द्वेष नसावा
जुन्या शेपट्या गळून पडाव्या


आणि माणसाने नव्याने उत्क्रांत व्हावे
नव्याने माणूस व्हावे
माणसा-माणसांनी एकत्र यावे
अवघी सृष्टी, अवघे विश्व
आकाशापासून समुद्रापर्यंत
पृथ्वीपासून सूर्यापर्यंत
केवळ माणूसमय व्हावे

माणसांचे जग निर्माण व्हावे
माणसांची शेती करावी माणसाने
मानवता पेरावी, माणसं उगवावी
वैश्विकसुक्त रचावे माणुसकीचे
मानवतेचे मिळून गाणे गावे
माणसाची घरवापसी व्हावी
केवळ माणूसमय व्हावे

--
राकेश पाटील
(
नामदेव ढसाळ स्मृतीप्रेरणा) 

Tuesday, 30 December 2014

ओबीसी धर्मांतर का?

 लोकसत्तामधील बातमी "हिंदू धर्मातील ओबीसींचे इस्लाम मध्ये धर्मांतर" अशी असती तर?

काही निरीक्षणे:


तमाम ओबीसीं समाजाला असं नागवंशीय किंवा पुर्वबौद्ध म्हणून लेबल चिकटवणं पटत नाही. ओबीसी हा प्रवर्ग अगदी अलीकडे आरक्षण संदर्भात पुढे आला. विशिष्ठ जातींचा मागास समूह. प्रत्येक जातीच्या चालीरीती, परंपरा, देव-देवता, पुजपद्धति, बोलीभाषा वेगवेगळ्या, प्रत्येक कोसावर बदलणाऱ्या. प्रचंड मत-मतांतरे. ओबीसी हिंदू धर्म मानीत असले तरी हिंदू हि जीवनपद्धती आहे असं म्हणायला लागते ते ह्यामुळेच.

धर्मांतराच्या अजेन्ड्याखाली असं सरसकट एखादा वंश (नाग) म्हणून किंवा पूर्वधर्म (बौद्ध) म्हणून प्रचंड मोठ्या मानवसमूहाच्या डोळ्यात धूळफेक होते कि काय असा प्रश्न पडतो. तसा ओबीसी हा मुळातच अत्यंत बेफिकीर, तेवढाच अज्ञानी, भोळाभाबडा समाज आणि म्हणून सर्वांचे सोफट टार्गेट.


हिंदू धर्मातून ओबीसींना बौद्ध धर्मात धर्मांतरित करण्याच्या बातमीवर फारसा गहजब माजलेला दिसत नाही. आधीही ह्या विषयात हिंदूंच्या कैवारी समजल्या जाणार्यांनी उदासीनताच दाखविल्याचे दिसेल किंवा त्यांची मूकसंमती असावी.

हेच हिंदूधर्मकैवारी मुस्लिम किंवा ख्रिश्चन धर्मांतराविषयी किती जागरूक असतात हे वेगळं सांगायला नको. अलीकडेच ह्या धर्माभिमान्यांचे घर-वापसीचे उद्योग प्रसिद्धीत आहेत.

कदाचित जे धर्म हिंदुस्तानोद्भाव आहेत उदा. बौद्ध, जैन, शीख, इ. त्यामध्ये हिंदूंचे धर्मांतर त्यांना मान्य असावे. अर्थात इस्लाम, ख्रिश्चन इ. धर्म हिंदुस्तान-बाह्य (आक्रमक) असल्याने त्यांना विरोध असावा.

किंवा कदाचित एकूण जागतिक लोकसंख्येच्या गणितात इस्लाम, ख्रिश्चन आणि हिंदू ह्या तिघांमध्येच विभागणी असल्याने आणि इतर धर्मीय त्यामानाने अल्पसंख्य असल्याने कदाचित तशी मानसिकता बनली असावी.

म्हणजेच हिंदूमधील ह्या ओबीसी मागासवर्गीय किंवा शूद्रांच्या धर्मांतराविषयी हिंदू-कैवार्यांना कळवळा आहे का? अर्थात नाही.

त्यांचा विरोध त्या इस्लाम-ख्रिश्चन विरोधी क्षुद्र मानसिकते पुरताच मर्यादित असल्याचे दिसून येईल. "पिके" मध्ये अमीर खान नावाचा यवनी नायक आहे म्हणून विरोध पण परेश रावल असता तर विरोध नाही!

बाबासाहेबांनी धर्मांतर केले तेव्हाही हिंदू धर्मकैवार्यानी घेतलेली भूमिका हि "इस्लाम-ख्रिश्चन नको, पण बौद्ध-शीख चालेल" अशीच क्षुद्र मानसिकते पुरती मर्यादित होती.

मुळात ओबीसी किंवा मागासवर्गीय किंवा कथित हिंदू धर्मातील जतिसमुह ह्यांचा धर्म कोणता? हिंदूंच्या धर्मकैवार्यांना त्यांचा कळवळा का नाही, त्याचे उत्तर तिथेच स्पष्ट होते. हे धर्म कैवारी किंवा सवर्ण हिंदू ज्या वैदिक किंवा सनातन धर्माचा जागर करतात त्याचा ओबिसिंशी काडीचाही संबंध नाही हे सिद्ध होतेच.

आणि त्या ओबीसींचा कोणताही नागवंश किंवा बौद्ध धर्माशीही दुरान्वये संबंध नाही हि देखील काळ्या दगडावरची रेख आहे.

हे सर्व विविध जात समूह भिन्नभिन्न कुलपुरुष, कुलदैवते, मातृका, ग्रामदैवते, शिवलिंगे, देव-देवता पूजणारे मूर्तिपूजक समाज आहे हे त्यांच्या आजही अस्तित्वात असलेल्या परंपरा, धर्म-श्रद्धांतून सिद्ध होते.

कदाचित त्या प्रत्येक जातीसमुहाचा स्वतंत्र धर्म असल्याचे विधान केले तरी त्यात काही वावगे ठरू नये. आणि ह्या सर्व धर्मांचे कडबोळे म्हणजे प्रचलित कथित हिंदू धर्म असे विश्लेषण होऊ शकते. म्हणूनच हिंदू हा धर्म नसून, ती एक जीवनपद्धती असल्याचा निष्कर्ष प्रसिद्ध आहे.

असो.

मूळ मुद्दा हा आहे कि हिंदू-बौद्ध धर्मांतर चालते आणि हिंदू-मुस्लिम किंवा हिंदू-ख्रिश्चन चालत नाही ह्यातूनच त्या ओबीसी मागास्वर्गीयानी आपली धार्मिक ओळख नक्की करावी. नाहीतर आगीतून फुफाट्यात एवढेच त्या धर्मांतराचे स्वरूप असल्याचे पुढे लक्षात येईल. कारण इथे तो महामानव बाबासाहेब नाही; तर कुणीतरी उपरे नावाचा फक्त एक सामान्य माणूस तो धर्मांतराचा बुरसटलेला मुद्दा घेऊन उभा आहे! आज जेव्हा धर्म हा विषयच बाद व्हायला हवा, तेव्हा हे धर्मांतर म्हणजे (गुलजारने म्हटल्याप्रमाणे) एक्सपायरी डेट संपलेल्या औषधाची विषारी मात्रा आहे, एवढेच.



Saturday, 20 December 2014

एका विमानप्रवासाची गोष्ट

९७ मधली गोष्ट. तेव्हा मी मुंबईत एका कंपनीत ज्युनियर प्रोजेक्ट इंजिनियर होतो. आमची कंपनी ऑटोमेशन सोल्युशन्स आणि सिस्टम्स बनवीत असे. हिंदुस्तान पेट्रोलीयम (एचपीसीएल) हा आमचा एक प्रेस्टीजियस कस्टमर. देशभर त्यांच्या एलपीजी बॉटलिंग प्लांटसाठी आम्ही फायर फायटिंग सिस्टमचं ऑटोमेशन करीत होतो. तो प्रोजेक्ट मी पाहत होतो.

तर, चेन्नईच्या बॉटलिंग प्लांटसाठी मी एक दोनदा तिथे जाऊन आलो होतो. दादर चेन्नई एक्स्प्रेस किंवा चेन्नई मेल पकडून सेकंड क्लासने दोन दिवसाचा प्रवास मी मजेत करीत असे.आमची कंपनी तिकीट बुकिंग वैगैरे सर्व जबाबदारी अस्मादिकांवर टाकत असे. त्यामुळे कन्फर्म तिकीट मिळणं म्हणजे फारच दूरची गोष्ट. मी वेटिंग च्या तिकिटावर निभावून नेत असे. मग ट्रेनमध्ये टीटीला पटवून सीट मिळविणे आणि नाही मिळाली तरी तसंच पुढे निघून जाणे ह्यात मी माहीर होतो. दोन सीटच्या मध्ये पेपर टाकून ताणून दिली कि सकाळी उठेपर्यंत बराच पल्ला कापलेला असे. एकदा तर सोलापूरला फलाटावरून चादर विकत घेवून ट्रेनमध्ये थंडीचा मुकाबला केल्याचे आठवते. परत येताना चेन्नई स्टेशनच्या बाहेर वेलंकिनी आणि चोलामंडलम अशी टिपिकल ट्राव्हल एजंटची दुकानं होती. तिथून मी ट्रेनची बुकिंग करून घेई. त्यातही एकदा दुसऱ्या दिवशीचं तिकीट त्या बहाद्दराने माझ्या हातात टाकलं होतं. ट्रेन पुढे निघून गेल्यावर ते लक्षात आलं. मग तसंच त्याच तिकिटावर पुढचा प्रवास पार पाडला.

पहिल्या चेन्नई व्हिजीट मध्ये मी दोनतीन दिवसात काम संपवून पळालो होतो. पटापट काम आटपून एकदाचं पळण्यात पण मी निष्णात होतो. मात्र दुसर्यांदा एचपीसीएलच्या इंजिनियर्स आणि व्यवस्थापक वर्गाशी छान मैत्री जमली होती. मग त्या भेटीत चांगलं पंधराएक दिवस माझं कमिशनिंगचं काम सुरूच होतं.तिथल्या रोडवर एका टपरीवजा हॉटेल मध्ये मिळणारे सुग्रास जेवण आजही आठवते. साध्या पत्र्याच्या शेडमध्ये कडप्पा टाकून केलेल्या बैठकीत व्हेज आणि नोन व्हेज दोन्ही प्रकार भन्नाट बनवून मिळत. आजही कधीतरी जाऊन ती चव अनुभवावी...

चेन्नई पासून साधारण दोनेक तासाच्या ट्रेनच्या अंतरावर गुमेड्डीपुंडी ह्या ठिकाणी तो प्लांट आहे. मी चेन्नई स्टेशनच्या एका हॉटेल वर राहत होतो आणि रोज प्लांट मध्ये अप-डाऊन करीत असे. पण एचपीसीएलच्या मित्रांनी माझी सोय त्यांच्या गेस्ट हाऊसवर केली. नवीन प्लांट सेटअप होत असल्याने तेही सर्वजण प्रोजेक्ट पूर्ण होई पर्यंत तिथे राहत होते.निघायचं नावच मी घेत नव्हतो आणि माझे मित्रही मला सोडत नव्हते. आणि इथे कंपनीत साहेब लोक माझ्या नावाने खडे फोडत होते! शेवटी मी एकदाचा मुंबईला परतलो.

काही दिवसांनी त्या एलपीजी प्लांटचं उद्घाटन होणार होतं. पी. चिदम्बरम ह्यांच्या हस्ते, बहुतेक. ...
आणि आदल्या दिवशी आमच्या ऑफिसमध्ये संध्याकाळी एचपिसिएल च्या मुंबई ऑफिस मधून फोन आला कि ऑटोमेशन सिस्टम फंक्शन करीत नाहीये. चेन्नैला ताबडतोब इंजिनियर पाठवा. अर्जंटली, बाय एअर, टुडे इटसेल्फ !
आमच्या साहेबानी इतक्या महत्वाच्या कामगिरीसाठी माझ्या सिनियरची निवड केली. तसंही संध्याकाळी मला घरी जायचे वेध लागत. बोरिवलीत सातची ट्रेन पकडून मी आठ वाजता केळवा रोड ला पोहचत असे. माझा सिनियर चेन्नई व्हिजीट साठी तयारीत आणि मी घरी जायच्या तयारीत असताना पुन्हा एचपिसिएल मधुन कॉल आला कि आम्हाला कुणीही सिनियर इंजिनीयर नको. वि वांट राकेश पाटील ओन्ली, द सेम इंजिनियर हु व्हिजिटेड लास्ट टाईम!

आता मात्र प्रकरण माझ्यावरच शेकलं होतं. एकतर अजूनतरी माझी कॉन्फ़िडन्स लेव्हल जरा कमी होती आणि दुसरं म्हणजे मला घरी निरोप देण्याचं काही साधन नव्हतं. तेव्हा मोबाईल नव्हते आणि आमच्या मामाकडे जिथे मी राहत होतो, त्या केळवा रोडच्या घरी फोनही नव्हता. मुळातच अशा परिस्थितीत चेन्नईला जायची मानसिकताच नव्हती. म्हणून माझ्या सिनियरवर ढकलून मी बाजूला झालो होतो. पण आता समोरून एचपिसिएलने दोर कापल्यावर काही पर्याय नव्हता.
मी कुठूनतरी घरी निरोप पोहोचविण्याची व्यवस्था केली. कंपनीचा लापटॉप घेतला आणि निघालो. तेव्हा लापटॉप देखील कृष्णधवल प्रकारचा असे! एचपिसिएलने एअर तिकीट पोहोचवलं होतं, ते घेतलं.
आणि हो, हा पहिला विमानप्रवास होता!

मुंबई एअरपोर्टवर सहा वाजताची फ्लाईट होती, बहुतेक. पण ती लेट होती, तीनचार तास.. पहिल्यांदा विमानातून उड्डाण केलं आणि अंधाऱ्या आभाळातून मागे पडणारी झगमगीत मुंबई पाहिली. चेन्नैला पोहोचलो तोच मध्यरात्रीच्या सुमारास. तिथून चेन्नई सेन्ट्रल ऑटोने आणि पुढे लोकलट्रेनने गुमेड्डीपुंडी. रात्री दोनच्या सुमारास.हिंदुस्तान पेट्रोलीयमचे सर्व अधिकारी आणि इंजिनियर मित्र माझी वाटच पाहत होते. त्याच वेळी आम्ही कामाला लागलो आणि थोड्याच वेळात फायर फायटिंग सिस्टम मधील चुका सुधारवून ऑटोमेशन सिस्टम सुरळीत केली. एअर प्रेशर कमी असल्याने सिस्टम मालफंक्शन करीत होती. बाकी काही विशेष प्रोब्लेम नसल्याने ट्रायल व्यवस्थित पार पडली. हे सर्व पार पडून नंतर पहाटे थोडा आराम केला. दुसऱ्या दिवशी मंत्री महोदय उद्घाटन करणार होते.

अर्थात, उद्घाटन यथासांग पार पडलं.
संध्याकाळी मीही निघायचं ठरवलं. हिंदुस्तान पेट्रोलीयमने माझं परतीचं एअर तिकीट बुक केलं होतं. फक्त मला ते चेन्नैतून पिकप करायचं होतं. पुन्हा दुपारची ट्रेन पकडली. चेन्नई सेन्ट्रलला पोहोचताना चार वाजले.. पाचची फ्लाईट. त्यात ते तिकीट घ्यायचं होतं. अवघा एक तास हातात.
तिथेच एक रिक्षावाला अण्णा भेटला. अगदी टिपिकल अण्णा! कृष्णवर्णीय कर्लीकेसधारी. त्याला जेमतेम हिंग्लिश मध्ये रूट सांगितला. त्यानेही आव्हान स्वीकारले. आणि तो जो सुटलाय... कितीतरी सिग्नल आणि लाल दिव्याच्या गाड्याहि पठ्ठ्याने बिनधास ओव्हरटेक केल्या. उलट जाऊन ते तिकीट मिळवलं आणि परत सुलट येउन एअरपोर्टवर रिक्षा पाचच्या आधी टच केली. मी मध्ये शिरतोय तर चेन्नई-मुंबई फ्लाईट अनाउन्समेंट होत होती ... माझ्यासाठीच झालेली खास उद्घोषणा.. मला घेऊन धावाधाव करणारे विमानतळावरील कर्मचारी... लास्ट पासेंजर फोर फ्लाईट नंबर... कि असंच काहीतरी...

धन्य तो अण्णा आणि धन्य ती रिक्षा.
चेन्नईहून सायंकाळी छान पैकी मावळता सूर्य ढगांच्या वरून पाहिला...
मुंबईला पोहोचलो. पुन्हा रिक्षा आणि लोकल ट्रेन पकडताना ह्या विमानप्रवासाची गम्मत वाटत राहिली. आजही वाटते. एकीकडे अलिशान विमानप्रवास आणि त्याला जोडून लगेच दुसरीकडे रिक्षा -ट्रेनचा खडतर प्रवास.
त्यात चेन्नईतला तो अण्णा रिक्षावाला आजही तसंच आठवतो. त्या टपरीवरची ती चव जिभेवर आजही घुटमळते.
आणि हो, हिंदुस्तान पेट्रोलीयमचा तो प्रोजेक्ट आणि तिथले ते मित्रही अगदी खासच.

Wednesday, 17 December 2014

दहशतवाद आणि गांधीगिरी






(कट्टरतावाद आणि धर्मांध दहशतवाद ह्यावर शाश्वत इलाज गांधींच्या अहिंसेच्या मार्गाने शक्य असल्याचे म्हणतात. पण तो मार्ग त्या महात्म्याच्या रक्ताच्या थारोळ्यातील देहावरून जातो, हे देखील लक्षात घ्यावे लागेल!)...ह्या पोस्टवरील एका चर्चेतून.

गांधी २५-३० वर्षे अहिंसाआंदोलन, सत्याग्रह, सविनय कायदेभंग, असहकार, चलेजाव इत्यादी बरेवाईट काहीतरी काम करीत होता. सर्वधर्मसमभाववादी काँग्रेस टिळकांच्या नंतर गांधीच्या नेतृत्वाखाली देशभर आंदोलन पेटविण्यात यशस्वी झाली.
जे क्रांतिकारक ह्या काळात क्रांतीच्या यज्ञात आहुती देते झाले , उदा. भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, अशफाकउल्लाखान तसेच सुभाषचंद्र बोस ह्यापैकी कुणीही हिंदुत्ववादी नव्हते.

तेव्हा हिंदू राष्ट्रावाले कोणते कार्य करीत होते ? कि त्या काळात पुण्यभू पितृभूसाठी करण्यासारखे काहीच नव्हते? ब्रिटीश सत्तेविरुद्ध ह्या लोकांची उदासीनता हीच त्यांच्या विचारसरणिचि मर्यादा आणि पराभव दोन्ही स्पष्ट करते.

हिंदुराष्ट्राच्या गप्पा मारणाऱ्या वीरांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात किती योगदान दिले ? राष्ट्रभक्त म्हणविता तर ब्रिटीश सत्तेविरुद्ध किती लढे उभारले? अहिंसा मान्य नव्हती तर सशस्त्र क्रांतीचे किती उठाव केले? एखाद्या जुलमी ब्रिटीश अधिकाऱ्याच 'वध' केला का? किती गोळ्या इंग्रज सत्तेवर झाडल्या? किती गोळ्या छातीवर झेलल्या? कि हिंदुत्वाचे आणि हिंदू राष्ट्राचे फक्त शाब्दिक पोकळ बुडबुडे काढण्यातच त्यांनी धन्यता मानली?

स्वा. सावरकरांच्या अंदामान्पूर्व क्रांतीकाळातील सहकारी देखील हिंदुत्वाचा विचार करीत नव्हते. मुळातच अंदमानातून स्वत:ची सुटका करून घेतल्यानंतर सावरकरांनी हिंदुत्वाची भूमिका मांडली. म्हणजेच हिंदुत्ववादि सावरकर क्रांतिकारक म्हणून निवृत्त होऊन बसले होते.

एकूणच हिंदुत्वाचा विचार मांडणारी विचारधारा क्रांतिकार्यात देखील उदासीन आणि स्वातंत्र्य लढ्यापासून देखील फटकूनच राहिली. मग गांधी जो एका मार्गाने ब्रिटीश सत्तेविरुद्ध लढला त्यावर टीका करण्याचा अधिकार कोणी दिला?

गांधीवर गोळी झाडणाऱ्यानि एखादी गोळी ब्रिटीश सत्तेवर झाडली असती किंवा स्वत: काही बलिदान स्वातंत्र्यलढ्यात दिलं असतं तर कदाचित त्यांच्या गांधीहत्येच्या भूमिकेचा विचार करता आला असता. म्हणून गांधीहत्या हि निव्वळ अतिरेकी, कट्टरतावादी, जात्यंध, धर्मांध स्वरुपाची दहशतवादी कारवाई ठरते.
कित्येकांचा गांधी केवळ गोडसे पुरताच मर्यादित राहिला आहे हेच खरे..!!! हे खरंही असेल.
पण कित्येकांची राष्ट्रभक्ती किंवा धर्माभिमान नथुराम पुरती मर्यादित आहे त्याचे काय?

तुमचा मुद्दा तसा बरोबर आहे कि काही क्षुद्र मनोवृत्तींच्या विकृत विचारांच्या क्षुल्लक लोकांचा राज्यसभेत प्रचार करायची गरज नव्हती.
पण तरीही नथुराम अतिरेकी नव्हता कारण अतिरेकी समोरून हल्ला करीत नसतात वैगैरे लंगडी समर्थने पटत नाहीत. "त्याचे कृत्य निंदनीय म्हणा वा धिक्कारार्ह पण तो अतिरेकी नव्हता" तर मग तो होता तरी कोण? देशभक्त ??? ज्याचा शौर्यदिन कि कायतरी म्हणे साजरा केला जातो?

तो स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हल्ला असल्याचे जगभर मान्य आहे, ते नाकारून बदलणार आहे काय? जे आहे ते आहे. सत्य किंवा वास्तव एकदा स्वीकारले कि मग पुढे जाता येते. नाहीतर भूतकाळातच साचून राहून डबकं होतं. माणसाने प्रवाही असावं. पुरोगामी असावं.




जगातील यच्चयावत विचारी लोक गांधीचे नाव घेऊन अहिंसेच्या मार्गावर चालतात. जगभर सर्वधर्मीय गांधीवादी त्यांचे काम यथाशक्ती करतात. तसंही काही टूक्कार कट्टरतावाद्यांनी सूर्यावर थुंकल्याने तो काही झाकोळत नाही. तरीही समस्त गांधीविरोधकांनी अफगानिस्तान, पाकिस्तान मध्ये जाऊन त्यांच्या अखंड हिंदुस्तानच्या पवित्र कार्याला वाहून घ्यायला काय हरकत आहे?
("क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.." असं समर्थ म्हणाले होते.)

गांधीची अहिंसा स्वातंत्र्योत्तर काळात काश्मीर आणि हैद्राबाद मध्ये लष्करी कारवाई करताना कुठे आड आली? गांधीएवढा कुशल आणि यशस्वी राजकारणी इंग्रजांनी तरी त्यांच्या सातासमुद्रावरील साम्राज्यात पाहिला होता काय?

पण काळ बदललाय...
अतिधोकादायक दंगलग्रस्त भागात पायी निशस्त्र फिरणारे गांधी आजही उभे राहतील. "मी सेक्युरिटी घेतली तर माझ्या कार्यकर्त्यांचे काय होईल" म्हणून आजही कुणी दाभोळकर निर्भयपणे रक्ताच्या थारोळ्यात पडेल.

पण काळ बदललाय...
इतिहासात गांधीचा मारेकरी कितीही वेषांतर करून किंवा शारीरिक बदल करून आला असेल तरी त्याच्या मुसक्या आवळल्यावर फासासमोर धोतरातच विधी उरकता झाला असेल.

पण, आज दाभोळकरांच्या मारेकऱ्याचा मागमूसही लागत नाही.
पण, पेशावरात आठवी-अ च्या वर्गात घुसलेला मारेकरी स्वत:लाच बॉम्बसह उडवतो.
काळ हा असा बदललाय...
..