Saturday, 20 December 2014

एका विमानप्रवासाची गोष्ट

९७ मधली गोष्ट. तेव्हा मी मुंबईत एका कंपनीत ज्युनियर प्रोजेक्ट इंजिनियर होतो. आमची कंपनी ऑटोमेशन सोल्युशन्स आणि सिस्टम्स बनवीत असे. हिंदुस्तान पेट्रोलीयम (एचपीसीएल) हा आमचा एक प्रेस्टीजियस कस्टमर. देशभर त्यांच्या एलपीजी बॉटलिंग प्लांटसाठी आम्ही फायर फायटिंग सिस्टमचं ऑटोमेशन करीत होतो. तो प्रोजेक्ट मी पाहत होतो.

तर, चेन्नईच्या बॉटलिंग प्लांटसाठी मी एक दोनदा तिथे जाऊन आलो होतो. दादर चेन्नई एक्स्प्रेस किंवा चेन्नई मेल पकडून सेकंड क्लासने दोन दिवसाचा प्रवास मी मजेत करीत असे.आमची कंपनी तिकीट बुकिंग वैगैरे सर्व जबाबदारी अस्मादिकांवर टाकत असे. त्यामुळे कन्फर्म तिकीट मिळणं म्हणजे फारच दूरची गोष्ट. मी वेटिंग च्या तिकिटावर निभावून नेत असे. मग ट्रेनमध्ये टीटीला पटवून सीट मिळविणे आणि नाही मिळाली तरी तसंच पुढे निघून जाणे ह्यात मी माहीर होतो. दोन सीटच्या मध्ये पेपर टाकून ताणून दिली कि सकाळी उठेपर्यंत बराच पल्ला कापलेला असे. एकदा तर सोलापूरला फलाटावरून चादर विकत घेवून ट्रेनमध्ये थंडीचा मुकाबला केल्याचे आठवते. परत येताना चेन्नई स्टेशनच्या बाहेर वेलंकिनी आणि चोलामंडलम अशी टिपिकल ट्राव्हल एजंटची दुकानं होती. तिथून मी ट्रेनची बुकिंग करून घेई. त्यातही एकदा दुसऱ्या दिवशीचं तिकीट त्या बहाद्दराने माझ्या हातात टाकलं होतं. ट्रेन पुढे निघून गेल्यावर ते लक्षात आलं. मग तसंच त्याच तिकिटावर पुढचा प्रवास पार पाडला.

पहिल्या चेन्नई व्हिजीट मध्ये मी दोनतीन दिवसात काम संपवून पळालो होतो. पटापट काम आटपून एकदाचं पळण्यात पण मी निष्णात होतो. मात्र दुसर्यांदा एचपीसीएलच्या इंजिनियर्स आणि व्यवस्थापक वर्गाशी छान मैत्री जमली होती. मग त्या भेटीत चांगलं पंधराएक दिवस माझं कमिशनिंगचं काम सुरूच होतं.तिथल्या रोडवर एका टपरीवजा हॉटेल मध्ये मिळणारे सुग्रास जेवण आजही आठवते. साध्या पत्र्याच्या शेडमध्ये कडप्पा टाकून केलेल्या बैठकीत व्हेज आणि नोन व्हेज दोन्ही प्रकार भन्नाट बनवून मिळत. आजही कधीतरी जाऊन ती चव अनुभवावी...

चेन्नई पासून साधारण दोनेक तासाच्या ट्रेनच्या अंतरावर गुमेड्डीपुंडी ह्या ठिकाणी तो प्लांट आहे. मी चेन्नई स्टेशनच्या एका हॉटेल वर राहत होतो आणि रोज प्लांट मध्ये अप-डाऊन करीत असे. पण एचपीसीएलच्या मित्रांनी माझी सोय त्यांच्या गेस्ट हाऊसवर केली. नवीन प्लांट सेटअप होत असल्याने तेही सर्वजण प्रोजेक्ट पूर्ण होई पर्यंत तिथे राहत होते.निघायचं नावच मी घेत नव्हतो आणि माझे मित्रही मला सोडत नव्हते. आणि इथे कंपनीत साहेब लोक माझ्या नावाने खडे फोडत होते! शेवटी मी एकदाचा मुंबईला परतलो.

काही दिवसांनी त्या एलपीजी प्लांटचं उद्घाटन होणार होतं. पी. चिदम्बरम ह्यांच्या हस्ते, बहुतेक. ...
आणि आदल्या दिवशी आमच्या ऑफिसमध्ये संध्याकाळी एचपिसिएल च्या मुंबई ऑफिस मधून फोन आला कि ऑटोमेशन सिस्टम फंक्शन करीत नाहीये. चेन्नैला ताबडतोब इंजिनियर पाठवा. अर्जंटली, बाय एअर, टुडे इटसेल्फ !
आमच्या साहेबानी इतक्या महत्वाच्या कामगिरीसाठी माझ्या सिनियरची निवड केली. तसंही संध्याकाळी मला घरी जायचे वेध लागत. बोरिवलीत सातची ट्रेन पकडून मी आठ वाजता केळवा रोड ला पोहचत असे. माझा सिनियर चेन्नई व्हिजीट साठी तयारीत आणि मी घरी जायच्या तयारीत असताना पुन्हा एचपिसिएल मधुन कॉल आला कि आम्हाला कुणीही सिनियर इंजिनीयर नको. वि वांट राकेश पाटील ओन्ली, द सेम इंजिनियर हु व्हिजिटेड लास्ट टाईम!

आता मात्र प्रकरण माझ्यावरच शेकलं होतं. एकतर अजूनतरी माझी कॉन्फ़िडन्स लेव्हल जरा कमी होती आणि दुसरं म्हणजे मला घरी निरोप देण्याचं काही साधन नव्हतं. तेव्हा मोबाईल नव्हते आणि आमच्या मामाकडे जिथे मी राहत होतो, त्या केळवा रोडच्या घरी फोनही नव्हता. मुळातच अशा परिस्थितीत चेन्नईला जायची मानसिकताच नव्हती. म्हणून माझ्या सिनियरवर ढकलून मी बाजूला झालो होतो. पण आता समोरून एचपिसिएलने दोर कापल्यावर काही पर्याय नव्हता.
मी कुठूनतरी घरी निरोप पोहोचविण्याची व्यवस्था केली. कंपनीचा लापटॉप घेतला आणि निघालो. तेव्हा लापटॉप देखील कृष्णधवल प्रकारचा असे! एचपिसिएलने एअर तिकीट पोहोचवलं होतं, ते घेतलं.
आणि हो, हा पहिला विमानप्रवास होता!

मुंबई एअरपोर्टवर सहा वाजताची फ्लाईट होती, बहुतेक. पण ती लेट होती, तीनचार तास.. पहिल्यांदा विमानातून उड्डाण केलं आणि अंधाऱ्या आभाळातून मागे पडणारी झगमगीत मुंबई पाहिली. चेन्नैला पोहोचलो तोच मध्यरात्रीच्या सुमारास. तिथून चेन्नई सेन्ट्रल ऑटोने आणि पुढे लोकलट्रेनने गुमेड्डीपुंडी. रात्री दोनच्या सुमारास.हिंदुस्तान पेट्रोलीयमचे सर्व अधिकारी आणि इंजिनियर मित्र माझी वाटच पाहत होते. त्याच वेळी आम्ही कामाला लागलो आणि थोड्याच वेळात फायर फायटिंग सिस्टम मधील चुका सुधारवून ऑटोमेशन सिस्टम सुरळीत केली. एअर प्रेशर कमी असल्याने सिस्टम मालफंक्शन करीत होती. बाकी काही विशेष प्रोब्लेम नसल्याने ट्रायल व्यवस्थित पार पडली. हे सर्व पार पडून नंतर पहाटे थोडा आराम केला. दुसऱ्या दिवशी मंत्री महोदय उद्घाटन करणार होते.

अर्थात, उद्घाटन यथासांग पार पडलं.
संध्याकाळी मीही निघायचं ठरवलं. हिंदुस्तान पेट्रोलीयमने माझं परतीचं एअर तिकीट बुक केलं होतं. फक्त मला ते चेन्नैतून पिकप करायचं होतं. पुन्हा दुपारची ट्रेन पकडली. चेन्नई सेन्ट्रलला पोहोचताना चार वाजले.. पाचची फ्लाईट. त्यात ते तिकीट घ्यायचं होतं. अवघा एक तास हातात.
तिथेच एक रिक्षावाला अण्णा भेटला. अगदी टिपिकल अण्णा! कृष्णवर्णीय कर्लीकेसधारी. त्याला जेमतेम हिंग्लिश मध्ये रूट सांगितला. त्यानेही आव्हान स्वीकारले. आणि तो जो सुटलाय... कितीतरी सिग्नल आणि लाल दिव्याच्या गाड्याहि पठ्ठ्याने बिनधास ओव्हरटेक केल्या. उलट जाऊन ते तिकीट मिळवलं आणि परत सुलट येउन एअरपोर्टवर रिक्षा पाचच्या आधी टच केली. मी मध्ये शिरतोय तर चेन्नई-मुंबई फ्लाईट अनाउन्समेंट होत होती ... माझ्यासाठीच झालेली खास उद्घोषणा.. मला घेऊन धावाधाव करणारे विमानतळावरील कर्मचारी... लास्ट पासेंजर फोर फ्लाईट नंबर... कि असंच काहीतरी...

धन्य तो अण्णा आणि धन्य ती रिक्षा.
चेन्नईहून सायंकाळी छान पैकी मावळता सूर्य ढगांच्या वरून पाहिला...
मुंबईला पोहोचलो. पुन्हा रिक्षा आणि लोकल ट्रेन पकडताना ह्या विमानप्रवासाची गम्मत वाटत राहिली. आजही वाटते. एकीकडे अलिशान विमानप्रवास आणि त्याला जोडून लगेच दुसरीकडे रिक्षा -ट्रेनचा खडतर प्रवास.
त्यात चेन्नईतला तो अण्णा रिक्षावाला आजही तसंच आठवतो. त्या टपरीवरची ती चव जिभेवर आजही घुटमळते.
आणि हो, हिंदुस्तान पेट्रोलीयमचा तो प्रोजेक्ट आणि तिथले ते मित्रही अगदी खासच.

No comments:

Post a Comment