Wednesday, 31 December 2014

मानवाने नव्याने उत्क्रांत व्हावे... अर्थात माणसाची 'घरवापसी'

मानवाने नव्याने उत्क्रांत व्हावे... अर्थात माणसाची 'घरवापसी'
पहिल्याप्रथम...

सर्वांनी घरवापसी करावी
अहिन्दुंनी सनातन हिंदू व्हावे
शूद्रातिशूद्र हिंदुनी स्वगृही परतून
मूलनिवासी बौद्ध व्हावे
जैनशीखद्रविड व्हावे,
शैवनागअसुर व्हावे
धर्माची झापडे गच्च बांधावी
कुणी मुस्लिम, कुणी ख्रिश्चन, ज्यू व्हावे
धर्माचे झेंडे गाडावेत... माणसाच्याच उरावर!


अवैदिकांनी वैदिक, आर्यांनी अनार्य व्हावे
मिथ्यासंस्कृतीखुळात 
सप्तसिंधू, हप्तहिंदू...जे वाटेल ते व्हावे
सेमेटिक पगान व्हावे
सुन्नी-शिया, प्रोटेस्टन्ट-केंथलिक व्हावे
माया, असिरियन, सुमेरियन व्हावे
अंतत: हरप्पा-मोहेंजोदरोत लुप्त व्हावे

कोसळावे उध्वस्त व्हावे
पार पुरातन अतिप्राचीन व्हावे
आदिम भटके टोळीवाले
जंगली रानटी होमोसेपियन व्हावे


रानटी जीवन जगावे
कच्चे मांस, कंदमुळे खावीत
पाने-फुले ल्यावी
गुहेत, झाडावर राहावे
माकड-वानर व्हावे
मस्त हिंस्त्र पशु व्हावे
कुणाचीही पिलं प्रसवावी


हाणामाऱ्यादंगे-चकमकी कराव्या
लुटमार, जाळपोळ करावी
माणसं गुलाम बनवावी
बायका पळवाव्यात
बलात्कार अत्याचार करावे
गर्भस्तने छाटून उन्मादावे
शिगा भोसकाव्या
वासनाकांडे करावीत
हत्याकांडे जळीतकांडे
नरसंहार करावेत
माणसे करवतीने चिरून फेकावी
मुले-बालके रांगेत चिरडावी
क्रौर्यकिळसतळ गाठावा


जे निघृण ते करावे
मनुष्यप्राण्याचं मांस खावं
मानवी रक्त प्यावं
पाशवी परिसीमाच गाठावी
कि पशुत्वाचाच स्फोट व्हावा
बिगबँग कि शून्यस्थित व्हावे


संस्कृतीसभ्यतेचे बंध तुटावे
जातीधर्माची कुंपणे नसावीत
राज्यबिज्य, देशबिश
उच्च-नीच, गरीब-श्रीमंत
भाषिक-प्रांतिक
साऱ्या कृत्रिम मर्यादा तुटाव्या
साऱ्या भानगडी नष्ट व्हाव्यात
सारी हार्डडिस्कच फ़ॉर्म्याट करावी






सरतेशेवटी...

वंष-वर्ण, अमकी संस्कृती,
तमका धर्म, राष्ट्र-इतिहास,
भूगोल-सीमा सारे सोडून द्यावे
सारं विस्मृतीत गाडावे


कुणी देवाचा अवतार, देवाचा पुत्र नसावा
कुणी प्रेषित, धर्मसंस्थापक नसावा
कुणी महापुरुष, युगपुरुष नसावा
महात्मा, महामानव नसावा
भीती नसावी, द्वेष नसावा
जुन्या शेपट्या गळून पडाव्या


आणि माणसाने नव्याने उत्क्रांत व्हावे
नव्याने माणूस व्हावे
माणसा-माणसांनी एकत्र यावे
अवघी सृष्टी, अवघे विश्व
आकाशापासून समुद्रापर्यंत
पृथ्वीपासून सूर्यापर्यंत
केवळ माणूसमय व्हावे

माणसांचे जग निर्माण व्हावे
माणसांची शेती करावी माणसाने
मानवता पेरावी, माणसं उगवावी
वैश्विकसुक्त रचावे माणुसकीचे
मानवतेचे मिळून गाणे गावे
माणसाची घरवापसी व्हावी
केवळ माणूसमय व्हावे

--
राकेश पाटील
(
नामदेव ढसाळ स्मृतीप्रेरणा) 

No comments:

Post a Comment