Saturday, 3 August 2013

वेडात मराठे वीर दौडले सात!



नेसरी, दि. २४ फेब्रुवारी १६७४.
सेनापती प्रतापराव गुजर आणी त्यांचे सहा शिलेदार
(विसोजी बल्लाळ, विठोजी शिंदे, विठ्ठल पिलदेव अत्रे, दीपाजी राऊतराव, सिद्दी हिलाल, कृष्णाजी भास्कर) ह्यांच्या स्वामिनिष्ठेचा, पराक्रमाचा इतिहास. 

घडले असे कि, राज्याभिषेकाच्या सुमारास आदिलशाही सरदार बेहालोल खान स्वराज्यामध्ये धुडगूस घालत होता. महाराजांनी सेनापती प्रतापराव गुजर ह्यांस खानावर धाडले. प्रताप रावांनी खानाला नेसरीच्या मैदानात चारी मुंड्या चित केले. खान शरण आला आणि तह केला. प्रताप रावांनी खानाला क्षमा करून सोडून दिले. परंतु खान पुन्हा मराठी मुलुखात धुडगूस घालू लागला. तेव्हा महाराजांनी सेनापतीस खरमरीत पत्र लिहिले ..."स्वराज्यावर चालून येणाऱ्या गनिमास गर्दीस मिळवल्याशिवाय आम्हास रायगडावर तोंड दाखवू नका..." प्रतापराव संधी शोधत होते परंतु बेहालोल खान आता २० हजार सुसज्ज फौजेसह होता. परिस्थिती अत्यंत बिकट होती कारण रायगडावर राज्याभिषेकासाठी तर सरसेनापतीस जावेच लागणार! परंतु राजांनी तर "तोंड दाखवू नका" असा इशारा दिला होता. सरनौबत कात्रीत सापडले होते. ......हेच ते कुड्तोजी गुजर ज्यांनी मिर्झा राजे जयसिंगाच्या छावणीत जाऊन त्यांच्यावर आत्मघातकी हल्ला केला होता परंतु मुत्सद्दी जयसिंगाने त्यांना सोडून दिले होते. महाराजांनी त्यांना प्रतापराव हा किताब देऊन सेनापतीपद दिले....अखेर खान पुन्हा एकदा समोर आला. परंतु त्यावेळी  प्रतापरावाकडे अवघे १२०० सैन्य होते तर खानाचा सैन्यासागर १५००० ! प्रताप रावांनी आपल्या फौजेला खानाच्या तोंडी न देता सरळ एकट्याने खानाच्या फौजेवर चालून गेले. अगदी अचानक हल्ला...क्षणमात्र विचार न करता त्यांचे सहा शिलेदार देखील पाठोपाठ आपल्या सेनापती सह दौडू लागले...सातही जण जाऊन खानाच्या फौजेला भिडले, एकच वीज तळपली आणि क्षणार्धात काळाकुट्ट अंधार!!! काय ती स्वामीनिष्ठा आणि काय तो पराक्रम! शिवरायांना आपल्या पत्रातील मजकूर प्रतापराव इतका मनाला लाऊन घेतील असे वाटले नव्हते. परंतु प्रतापरावासारखे अस्सल स्वामीनिष्ठ सेवक असेच अनोखे पराक्रम घडवून आणतात. आणि समोर पसरलेल्या गनिमी सैन्य सागरावर आपल्या सेनापती पाठी चालून जाणारे त्यांचे सहा शिलेदार म्हणजे तर स्वमिनिष्ठेचा कळस. प्रतापराव तर सुडाने पेटून उठले होते, विवेकावर वीरश्री स्वर झाली होती. मात्र हे सहा शिलेदार निव्वळ स्वामी निष्ठेने पेटून उठले होते! 

धन्य ते शिवराय,
धन्य ते सरनौबत,
धन्य ते शिलेदार,
धन्य ती स्वामीनिष्ठा,
आणि धन्य धन्य ते स्वराज्य!

शिवाजी महाराज, स्वराज्याची संकल्पना आणि त्यासाठी जीवाची बाजी लावणारे मावळे!

"महाराज, शपथ आहे तुम्हाला, तुम्ही पुढे व्हा. हा बाजी खिंडीत उभा आहे! तुम्ही गडावर पोहोचल्यावर फक्त तोफेचे इशारे द्या..." म्हणत घोडखिंडीत रक्त बंबाळ होऊन लढणारा बाजीप्रभू देशपांडे. तो तोफांचा आवाज ऐकण्यासाठी कानात प्राण आणून झुंजणारे हे वीर. त्यांचा भाऊ फुलाजी, शम्भूसिंग जाधव, ते ३०० बांदल वीर!

पन्हाळ्या वरून पळताना सिद्दी जौहरला हुलकावणी देण्यासठी महाराजांची वेशभूषा करून हसत हसत मृत्यूला कवटाळनारा वीर शिवा काशीद.

अफझल भेटी दरम्यान सय्यद बंडाला अंगावर घेऊन त्याच्या पासून महाराजांना वाचविणारा जीवा महाला.

"अरे आम्ही शिवाजीची माणसे, तुझा कौल घेतो काय?" म्हणत दिलेरखानाला आव्हान देत, बाण कंठात घुसल्यावर देखील मुघलांना अस्मान दाखवणारा मुरारबाजी.

आग्र्याहून सुटकेच्या वेळी फौलादखानाला चकवण्यासाठी महाराजांच्या जागी झोपलेला हिरोजी फर्जंद आणि त्यांचे पाय चेपणारा मदारी मेहतर.

महाराजांच्या शब्दाखातर कुतुबशहा समोर मस्तवाल हत्तीशी झुंज घेणारा येसाजी कंक.

"आधी लगीन कोंढाण्याचे..." म्हणत आपल्या मुलाचे लग्न सोडून सिंहगडावर चालून जाणारा तानाजी मालुसरे. आणि भाऊ मरून पडला तरी "अरे पळता कुठे, तुमचा बाप इथे मारून पडलाय, मी दोर कापून टाकल्यात..." म्हणत लढणारा तो सूर्याजी!

मिर्झाराजे जयसिंगच्या तंबूत घुसून त्याच्यावर आत्मघातकी हल्ला करणारा कुडतोजी गुजर! हेच ते सरनौबत प्रतापराव गुजर! महाराजांच्या शब्दाखातर तो एकटाच बेहलोल खानच्या १५ हजार सैन्यावर चालून काय जातो आणि त्याच्या मागे ते ६ शिलेदार पण साक्षात मृत्युच्या दिशेने दौड काय घेतात!

आणि असे असंख्य मावळे ज्यांनी स्वराज्याच्या स्थापनेसाठी आपला जीव ओवाळून टाकला....

कोणत्या ध्येयाने 'वेडे' झाले होते हे लोक? कोणती प्रेरणा त्यांना जीवावर उदार व्हायला भाग पडत होती? शिवाजी आणि स्वराज्य ह्या दोन शब्दासाठी ह्या लोकांनी असा दैदिप्यमान इतिहास घडवला! इतिहासाच्या पानापानात सुवर्णाक्षरांनी त्यांची नावे लिहिली गेली. अमरत्व म्हणजे तरी आणखी काय असते! 

राकेश पाटील.

3 comments:

  1. बाजीप्रभू देशपांडे. त्यांचा भाऊ फुलाजी, शम्भूसिंग जाधव, ते ३०० बांदल वीर, शिवा काशीद, जीवा महाला, मुरारबाजी, हिरोजी फर्जंद, मदारी मेहतर, येसाजी कंक, तानाजी मालुसरे या सर्व वीरांनी केलेल्या बलिदानामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना आणि त्यांनी स्थापन केलेल्या स्वराज्याला जीवदान मिळाले किंवा निश्चित स्वरूपाचा लाभ झाला. त्या सर्वांचे महाराष्ट्रावर किंबहुना सर्व हिंदू धर्मीयांवर अनंत उपकार आहेत. पण प्रतापराव गुजरांनी बलिदान करण्यात फार घाई केली असा विचार मनात येतो. ते सरसेनापती या मोठ्या जबाबदारीच्या पदावर होते. लढाईत कधी कधी काही चुका होतात, माघार घ्यावी लागते आणि संधी पाहून हल्ला करायचा असतो वगैरे रणनीती त्यांना माहीत असणार, मिर्झाराजांना मारण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरल्याचा अनुभव त्यांच्याकडे होता. महाराजांच्या एका पत्राने दुखावले जाऊन त्यांनी केलेल्या प्राणार्पणामुळे काय साध्य झाले असते असा विचार त्यांनी करायला हवा होता. प्रतापराव गुजरांनी केलेल्या त्यागाची वार्ता ऐकून छत्रपती शिवाजी महाराजांनाही अत्यंत दुःखच झाले असे त्या संदर्भात लिहिले गेले आहे. कदाचित महाराजांनी त्यांच्यावर आणखी काही मोहिमा दिल्या असत्या आणि त्यांना रणांगणामध्ये आणखी चांगली कामगिरी करायला मिळाली असती असे वाटते. या संदर्भात गीतरामायणातील एका गीताचा दाखला येईल. सीतेला सोडवून आणण्यासाठी सुग्रीवाने एकदा उड्डाण भरले होते, तेंव्हा श्रीरामांनी त्याची कानउघाडणी केली होती, "सुग्रीवा हे साहस असले, भूपतीस तुज मुळी न शोभले।।"
    सेनापती प्रतापराव गुजर आणी त्यांचे सहा शिलेदार यांच्या शौर्याबद्दल मलाही आदर आहे, पण त्यांचे बलिदान वाया गेले याचे वाईट वाटते.

    ReplyDelete
  2. धन्यवाद , आनंद घरे जी! बलिदान व्यर्थ जात नाही. प्रतापरावांच्या प्रेरणेतून हंबीरराव मोहिते हे असे सरनोबत पुढे आले ज्यांनी शिवाजी महाराजांच्या सोबतीने तसेच पुढे संभाजी राजांच्या बरोबरीने मराठेशाही चा झेंडा फडकतच ठेवला. अर्थात, प्रतापराव यांनी ते बलिदान दिले नसते तर आपण म्हटल्याप्रमाणे स्वराज्याचे मोठे नुकसान टाळले असते, हेही खरे आहे.

    ReplyDelete
  3. राकेश सर तुम्ही हे कोणत्या पुस्तकांतून घेतलं आहे... म्हणजे संदर्भ भेटतील का?

    ReplyDelete