Monday, 23 December 2013

मोदींच्या सभेचा रिपोर्ट

 23/12/2013 (फेसबुक पोस्ट)

काल पुन्हा मोदींचे भाषण ऐकायचा योग जुळून आला. रविवार असल्याने चिकन बिर्याणीवर आडवा हात मारून जरा कुठे आडवा होवून भारत-आफ्रिका टेस्ट पाहत होतो तर मुंबईत मोदीगर्जना सभा सुरु झाली.

मस्त धमाल येणार म्हणून पाहू लागलो तर आधी नमनाला घडाभर तेल तसे मुंडे, गडकरी, फडणवीस इ. मंडळी बोल बोल बोलत सुटले. नंतर राजनाथ सिंग ह्यांनी त्यांचे कीर्तन-प्रवचन आळविले. शेलार नामक कुणी अध्यक्ष बसलेल्या चिरक्या आवाजात आपली हौस भागवीत होतेच. कंटाळवाण्या होत चाललेल्या सभेला मोदी कधी एकदा आग ओकतात त्यात खरे स्वारस्य होते. मलादेखील!

सभेला बाहेरून ट्रेनने आणलेल्या दोन अडीच लाख लोकांची विक्रमी गर्दी होती. सामान्य गरीब श्रोते रणरणत्या उन्हात तर श्रीमंत श्रोते मंडपात अशी वर्णाश्रम पद्धतीची रचना शोभून दिसत होती.

देशाच्या राजकीय आणि सामजिक हिताचे खालील अत्यंत महत्वाचे मुद्दे त्यांनी मांडले.

१. सुरुवातीलाच छत्रपति शिवराय, फुले-शाहू-आंबेडकर हि पुरोगामी नावे घेवून आणि सावरकर, हेडगेवार, गोळवळकर, ठाकरे ह्या हिन्दुत्वाच्या अर्ध्वर्युना अन्नुलेखानेच मारल्याने त्यांनी तथाकथित हिंदुत्वाच्या फुग्याला जीवघेणी टोचणी लावली. तसेच व्होट फॉर इंडिया अशी घोषणा दिल्याने इंडिया शायनिंग च्या कटु आठवणि चाळविल्या गेल्या. तसेच हिंदुस्तान, हिंदू राष्ट्र इ. सुसंस्कृत भाषेचे प्रेम असलेल्या हिंदू राष्ट्रवादी संस्कृतीरक्षक मंडळींचा जीव टांगणीला लावला.

२. गुजरात आणि महाराष्ट्र ह्या राज्यांची निर्मिती एकाच दिवशी होवूदेखील आज पर्यंत गुजरातचे फक्त १४ तर महाराष्ट्राचे तब्बल २६ (!) मुख्यमंत्री झाले (?) त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणाचा बट्ट्याबोळ झाला असल्याचा नवा गणिति सिद्धांत त्यांनी मांडला.

३. चले जाव चळवळीच्या धर्तीवर त्यांनी काँग्रेस चले जाव चा नारा दिला! ब्रिटीश सरकारशी १९४२ साली चले जाव चळवळीत काँग्रेसच लढत होती तेव्हा संघ आणि हिंदुत्ववादी कोणते उद्योग करीत होते ह्याबाबत ते पुढील सभेत नवीन संशोधन मांडणार आहेत असे समजते !

४. वंशवाद, संप्रदायवाद संपविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी जाहीर केल्याने संघ-भाजप मध्ये अस्वस्थता पसरली . तसेच भ्रष्ट्राचार मुक्त भारत च्या घोषणे मूळे व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांच्या पोटात गोळा आल्याचे लक्षात आले.

५. गुजरात आणि महाराष्ट्र ह्यांच्यामधील प्रगतीची प्रचंड दरी त्यांनी त्यांच्याकडील जगप्रसिद्ध अमेरिकन आकडे वारीसाहित सिद्ध करून दाखविली!

६. सरदार पटेलांचे त्यांनी यशस्वी राजकीय अपहरण केले आहेच. त्यांचा दाखला देवून त्यांनी भाषावार प्रांत रचनेवर देशात फुट पडल्याचे टीकास्त्र सोडले! मराठी भाषिक राज्यासाठी जीवाचे रान करणारे त्यांच्याच मंडळीनि नाक दाबून बुक्क्यांचा मार सहन केल्याची चर्चा आहे.

७. वन्दे मातरम ने सभेची शेवट करताना श्रोते पळून गेल्याने व्यासपीठावरून नेतेमंडळीनि घोषणा देवून खिंड लढविली. तरीही नेहमीप्रमाणे वन्दे, वन्दे ,वन्दे असे चढत्या फ्रीक्वेन्सीने बडबडून त्यांनी शेवटी सभेला रंगत आणलीच !

मध्यंतरी बिर्याणीच्या अमलाखालि अमळ डोळा लागल्याने मोदिपुराणातिल थोड्याश्या अध्यायाना मुकलो त्याचा मला खेद आहे! तसेच इतिहास संशोधन हा विषय त्यांनी ह्यावेळी कटाक्षाने टाळला त्यामुळे माझ्यासारख्या इतिहासप्रेमी ची घोर निराशा झाली.

अहो आश्चर्यम! मोदी नावाची मुलुख मैदानी तोफ अगदीच फुसकी निघाली कि काय ? !

Saturday, 21 December 2013

देवयानी खोब्रागडे केसच्या निमित्ताने

21/12/2013 (फेसबुक पोस्ट)

कायद्याने देवयानी केसमध्ये जे व्हायचे ते होईलच. अमेरिकेचे कायदे आपण त्या देशात पाळले च पाहिजेत अन्यथा त्याची शिक्षा होईलच. तसेच देवयानीवर देखील अन्याय होता कामा नये म्हणूनच भारतीय राजनीतिज्ञ स्त्री अधिकारी म्हणून भारत सरकारने तिच्या पाठीशी खंबीर राहायची भूमिका घेतली आहेच.
त्याच न्यायाने आमच्या देशात भारत सरकारचे कायदे चालतात , अमेरिकेचे नव्हे हे देखील लक्षात असू द्या. त्या कामवाल्या बाईचे कुणी नातेवाईक (नवरा-मुले) आमच्या देशाच्या भूमीवरून तुम्ही कोणत्या कायद्याने पळवून नेलीत त्याचे आधी उत्तर द्या.


शोषण हा जर मुद्दा केला जात असेल तर भारतीय विद्वानांनी आधी त्या मोलकरीण बाई ला किती पगार दिला जात होता,किती अपेक्षित होता त्याचे आकडे डॉलर आणि रुपयाच्या किमतीत आम्हा सामान्य नागरिकांना सांगावेत . म्हणजे मुंबईत महिन्याला चार घरची धुणीभांडी करणाऱ्या आमच्या ३-४ हजार रुपये कमाविणाऱ्या शोषित महिलांना तरी ह्या शोषणाचा नक्की अंदाज येईल, काय?


 ह्या घटनेच्या निमित्ताने दिसून आलेले काही मत प्रवाह:
१. 'खोब्रागडे' बाई ना त्यांच्या आर्थिक-सामाजिक-राजकीय पार्श्वभूमीच्या आधारे पूर्वग्रहदुषित दृष्टीने आरोपीच्या पिंजर्यात उभे करून त्यांचे आरक्षणत्व, त्यांची उच्चविद्या विभूषित नवश्रीमंती, त्यांचे आणि तीर्थरुपांचे 'आदर्श' मधील कथित भ्रष्टाचार, इ. असंबद्ध बाबींना झोडपणारे मतप्रवाह.
उदा. लोकसत्ता.
२. एका भारतीय व्यक्तीला अमेरिकेने कायद्याचा बडगा दाखविल्याने देशाभिमान दुखावलेल्यांचा मतप्रवाह उदा. IBN लोकमत
३. एका दलित मागासवर्गीय स्त्रीवर अन्याय झाल्याने धार्मिक भावना दुखावलेल्यांचा मतप्रवाह. उदा. फेस्बुकीय स्टेटस
४. निवडणुका आणि मतपेट्या डोळ्यासमोर ठेवून भूमिका घेणारा मतप्रवाह उदा. राजकीय पक्ष
५. वरिल भुमिकांचि सरमिसळ असलेले बुद्धिवादी विचारवंतांचे मतप्रवाह.
६. नक्की काय खरे आणि काय खोटे ह्याच्या संभ्रमात सापडलेला 'आम आदमि' उदा. मी (आपण )

Wednesday, 18 December 2013

झाडूवाल्यांचा दिल्लीतील जोर का झटका

18/12/2013 (फेसबुक पोस्ट)

देशातील राजकीय परिस्थिती झपाट्याने बदलून गेली कि काय असे सुखद वातावरण तयार झाले आहे.
अण्णा हजारे कुठलाही झगमगाट न करता राळेगणला उपोषण करतात.
गर्दी नाही, देशभक्तीपर गाणी नाहीत, टोप्या-झेंडे नाहीत, घोषण-गर्जना नाहीत, सिलीब्रेटी नाहीत!
उपोषणाला सरकार त्वरित प्रतिसाद देते. लोकपाल बिल राज्यसभेत मांडते. काँग्रेस, राहुल गांधी कमालीची पोझीटीव भूमिका घेतात.
राज्यसभेत भाजप संपूर्ण सहकार्याची भूमिका काय घेते आणि बिल एका दिवसात पास पण होते!

इमानदारी कि भी कोई हद होती है भाई!

गेल्याच वर्षी ह्याच्या अगदी उलटे चित्र देशभर होते.
जंतरमंतर कि रामलीला वरच्या टीम अण्णा चे अद्भुत देशव्यापी आंदोलन.
कॉंग्रेस च्या कपिल सिब्बल, मनीष तिवारी ह्यांची सत्तेची उद्दाम माजोरडी वक्तव्ये.
तब्बल १३ दिवस ताणलेले ऐतिहासिक उपोषण.
रामदेव-अग्निवेश ह्यांचे घुमजाव आणि अण्णा-केजरीवाल ची काहीशी दुराग्रही, हेकेखोर भाषा !
शेवटी कोन्ग्रेस, भाजप सहित सर्व विरोधी पक्षांनीहि अण्णांच्या तोंडाला पाने पुसली आणि लोकपाल नेहमीच्या राजकीय कुट नीतीने बारगळले !

मग आता अचानक हे अद्भुत परिवर्तन सर्वच स्तरावर का दिसून येत आहे? ह्या बदलाचे रहस्य काय आहे?

अर्थातच आम आदमी पार्टीचे दिल्ली निवडणुकीतील गौरवशाली यश हेच ते रहस्य आहे.
कॉंग्रेस चे समजू शकतो कि त्यांनी चार राज्यात सपाटून मार खाल्ला आहे म्हणून त्यांची अक्कल ठिकाणावर आली आहे.
परंतु टीम अण्णा आणि भाजप ह्यांचे खरे कौतुक करायला हवे.

अण्णा आंदोलनातून बाहेर पडलेल्या केजरीवाल ने जो भीम पराक्रम गाजवला त्यामुळे टीम अण्णाला लोकपाल सदृश्य काहीतरी यश आपल्या पदरात पडणे हि काळाची गरज ठरली. त्यातून हा समजूतदारपणा , शहाणपण आला नसेल तर नवलच!

चार राज्यात कॉंग्रेसला चारी मुंड्या चित करूनही दिल्लीतील आम आदमी पार्टी च्या धडाक्यासमोर भाजपची हि पुरती भंबेरी उडून गेली. केजरीवाल खरा हिरो ठरला, मोदी नव्हे! निवडणुकीचा संपूर्ण फोकस, श्रेय आम आदमी पार्टीने हिरावून घेतल्याने सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही अशी गोची कमळाबाईची झाली. सांप्रत काळी लोकपाल ला विरोध करून आम आदमीच्या विषाची परीक्षा नको हा व्यवहारी सल्ला त्यांच्या चाणक्यांनी पक्षाला दिलेला दिसतोय!

एकूणच झाडूवाल्यांचा दिल्लीतील जोर का झटका धीरे से सबको लग रहा है !
भारतीय जनता सुद्न्य आहे आणि लोकशाहीचाच विजय निश्चीत आहे!

Monday, 9 December 2013

दिल्लीचा निवडणुकांच्या निकालाचे परिणाम

09/12/2013 (फेसबुक पोस्ट )

दिल्लीचा निवडणुकांच्या निकालांनी भल्याभल्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीच्या मतदानाची आकडेवारी खालीलप्रमाणे:
भाजप : ३३%
आम आदमी पार्टी : ३०%
कॉंग्रेस: २५%

मागील निवडणुकीत आम आदमी पार्टी अस्तित्वात नव्हती तेव्हाची आकडेवारी खालीलप्रमाणे:
भाजप : ३६ %
कॉंग्रेस: ४० %

दिल्लीत आम आदमी पक्षाला भरघोस मतदान झाले असून दोन्ही प्रस्थापित पक्षांची मतदान टक्केवारी कमी झाल्याचे दिसून येते.
सक्षम नवीन पर्याय उपलब्ध असल्यास जनता प्रस्थापित पक्षांच्या सरंजाम शाहीला झुगारून देण्यास कटिबद्ध असल्याचे सिद्ध झाले आहे.
आम आदमी पार्टी ला लोकांनी भरगोस मतदान करून भारतीय जनतेचा कौल स्पष्ट केला आहे. लोक नव्या दमाच्या, उमेदीच्या, विचाराच्या राजकारणासाठी मतदान करणार हे दाखवून दिले आहे. प्रस्थापित सर्वच पक्षांना हा स्पष्ट इशारा आहे.

काँग्रेस आणि भाजप व्यतिरिक्त विश्वासार्ह पर्यायाच्या शोधत भारतीय जनता आहे ह्यावर शिक्का मोर्तब झाले आहे.

आम आदमी पक्षाच्या अरविंद केजरीवाल ह्यांना आणि त्यांच्या सहकार्यांना शेवटच्या क्षणी अडचणीत आणणारे अण्णा हजारे आणि टीम अण्णावाले विचारवंत तसेच स्टिंग ऑपरेशन करणारे मिडीयावाले ह्यांची तोंडे पाहण्यासारखी झाली असतील. समाज सुधारणेच्या मोठ्या मोठ्या गप्पा मारणारे लोक ते काम कुणीतरी इमानदारीने आणि आपल्यापेक्षाही अधिक हुशारीने करतोय म्हटल्यावर किती संकुचित आणि दळभद्री वागू शकतात हे दिसून आले. ह्या सर्वाना मतदारांनी आपली ताकद आणि अक्कल दाखवून दिली आहे.

तिसर्या आघाडीच्या पर्यायी व्यवस्थेला पुन्हा एकदा धुमारे फुटणार हे येत्या काळात दिसेल.

काँग्रेस वाल्यांचा सुपडा साफ झाल्याने राहुल गांधी सोडून दुसरा कोण अशी चर्चा सुरु झाली आहे.
आळस सोडून इमानदारीत मेहनत करावी लागणार हे सत्ताधारी पक्षाला स्पष्ट समजले आहे. लोकांना गृहीत धरून चालणार नाही. भाजपच्या जातीयवादाचा बागुलबोवा दाखवून लोकांना आपल्याशिवाय कुणी वाली नाही अश्या भ्रमात राहून चालणार नाही हे देखील स्पष्ट झाले आहे.

मोदी नावाची कोणतीही लाट अस्तित्वात नाही आणि धर्माच्या नावाखाली कोणतेही ध्रुवीकरण इ. शक्य नाही हा स्पष्ट संदेश भाजप-संघ वाल्यांना दिला गेला आहे. पुढील काळात त्यांना आपली जातीय-धार्मिक डावपेचावर आधारित समीकरणे बदलणे भाग आहे.

दिल्लीच्या जनतेने तमाम भारतीय जनतेला, आणि एकूणच भारताच्या राजकारणाला नवीन दिशा दाखविली आहे. येत्या लोकसभेच्या निवडणुकीत ह्या नव्या समीकरणांचा प्रभाव दिसून आल्याशिवाय राहणार नाही.

Thursday, 5 December 2013

OBC-बौद्ध धर्मांतर: मुद्दे आणि गुद्दे



OBC च्या बौद्ध धर्मांतराचा मुद्दा सध्या ऐरणीवर आहे. त्याचा विचार करता काही मुद्दे मांडावेसे वाटतात.

धर्मांतर काही विशिष्ठ नियमात कायदेशीर ठरविले गेले आहे हि वस्तुस्थिती आहे. त्यामुळे कुणी बौद्ध व्हावे , कुणी ख्रिश्चन व्हावे हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा  वैयक्तिक अधिकार आहे. तसे स्वातंत्र्य घटनेने भारतीय नागरिकास प्राप्त झाले आहे.
धर्म किंवा धर्मांतर हे  विज्ञानयुगातील लोकशाहीतील आधुनिक मानवाच्या जीवनात काही विशेष बदल घडवू शकतील का, हा चिकित्सेचा विषय आहे. तरीही धर्मांतर ह्या विषयाचा उहापोह होणे गरजेचे आहे.

अलीकडील काळात भारतात ख्रिश्चन धर्मांतराचे प्रमाण सर्वाधिक असावे असा माझा अंदाज  आहे.
हिंदू, मुस्लिम , जैन, शीख इ. धर्म धर्मप्रसाराच्या बाबतीत बऱ्यापैकी उदासीन असावेत असेही म्हणायला हरकत नसावी. बौद्ध धर्म धर्मांतराच्या विषयात अतिशय जागृत आहे हेदेखील स्पष्ट आहे. अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्या महामानवाच्या ऐतिहासिक धर्मांतराची त्यास पार्श्वभूमी आहे!

ख्रिश्चन धर्माचे धर्मांतर हे एक जागतिक स्तरावरील अभियान असल्याने त्याची व्याप्ती आणि परिणामकारकता सर्वाधिक आहे हे सत्य आहे. तम-मन-धन ओतून ख्रिश्चन धर्मीय धर्मप्रसाराच्या कार्यात वाहून घेतात असे दिसून येते. 

ईशान्य भारत, केरळ, ओरिसा-आंध्र किनारपट्टी, दुर्गम आदिवासी प्रदेश, कोकण किनारपट्टी, इ. ठिकाणी ख्रिश्चन धर्मियांनी मोठ्या प्रमाणात  धर्मांतर घडवून आणले आहे हि वस्तुस्थिती आहे. ते त्यांचे धर्मप्रसाराचे यश आहे. प्रसंगी त्यासाठी त्यांना मोठी किंमत देखील चुकवावी लागली आहे.

मुंबईत ख्रिश्चन धर्मप्रसाराच्या लागलेल्या काही जाहिराती विषयी सध्या गदारोळ उठला होता. फेसबुकवर देखी चर्चा झाल्या परंतु कुणी  ख्रिश्चन धर्मीय तिथे विरोधासाठी उभा राहिला असे दिसत नाही. त्या जाहिरातीचे काय होईल ते पुढील काळात दिसेल परंतु सामाजिक सहिष्णुता किंवा सौहार्द कायम राहिल्याचेच दिसून येते. 

धर्मांतराने कुणाचे सामाजिक, आर्थिक जीवनमान सुधारत असेल आणि त्यासाठी लोक स्वखुशीने धर्मांतर करीत असतील तर ती एक नैसर्गिक प्रक्रियाच समजावी लागेल.

महत्वाचे हे आहे कि धर्मप्रसार करणार्यांनी ह्या सामाजिक सलोख्याच्या  जाणिवेचे पालन करणे अत्यावश्यक आहे. धर्मांतर घडवून तुम्ही स्वधर्माचा फायदा तर इतर धर्माचे नुकसान करीत असता हा साधा व्यवहारी नियम आहे. समोरच्या धर्माच्या अस्मितेला धक्का पोहोचणार नाही ह्याची जबाबदारी देखील लक्षात घाय्याला हवी. तरच धर्मांतर सहजशक्य होईल अन्यथा अस्मितेसाठी पेटून उठलेला समाज आपल्या तुमच्या धर्मप्रसाराला खीळ घालू शकतो, हा सरळ हिशेब आहे.

हे समजून घेऊनच  ख्रिश्चन धर्मियांनी  धर्मप्रसाराचे कार्य यशस्वी केले आहे असे सिद्ध होते.

आमच्या गावातील काही मंडळी अलीकडे ख्रिश्चन धर्माच्या प्रार्थना इ. साठी जात असल्याचे दिसून येत होते. धर्मांतराची ती सुरुवातीची प्रोसेस असावी. गावातील एक तरुण 'नेता' त्यासाठी पुढाकार घेत होता. काही दिवसांनी गावकर्यांनी ह्याला विरोध केला, लोकांचे प्रबोधन केले आणि हे धर्मांतर टळले !

तसेच शेजारील गावातील एक कुटुंब धर्मांतरित झाले आहे, स्वखुशीने! त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारून घरातील पूर्वीचे देव काढून टाकले.  परंतु समाजातील लोकांशी ते संबंध ठेऊन आहेत. कुठलाही गाजावाजा नाही कि काही समारंभ नाही, अवडंबर नाही. कुणाला त्यांच्या धर्मांतराविषयी  फारसे कळतही नाही कारण त्यांनी आपले जुने  नाव देखील कायम ठेवले आहे.

OBC -बौद्ध धर्मांतराविषयी हिंदू धर्म (?) किंवा समाज ज्याचे धार्मिक नुकसान होतेय, तो कमालीचा उदासीन आहे. हिंदू धर्माचे  तथाकथित धर्मगुरू ह्या विषयावर ब्र देखील काढताना दिसत नाहीत. तसेच स्वघोषित हिंदू धर्म संघटना, हिंदू राजकीय पक्ष, इ. मुग गिळून गप्प बसल्याचे चित्र आहे. हि उदासीनता आहे कि मग्रुरी आहे, कि सोयीस्कर दुर्लक्ष आहे कि जाणीवपूर्वक कारस्थान आहे ह्याचीदेखील चिकित्सा व्हायला हवी. धर्मलंडानि आपापले कोर्ट-खटले, कर्मकांडे, इ. मधून वेळ काढून आपली भूमिका स्पष्ट करायला नको का

OBC च्या बौद्ध धर्मांतराच्या निमित्ताने सध्या रान उठविले जात आहे. फेसबुक देखील त्यात आघाडीवर आहे. ह्या धर्मांतराचे सर्वेसर्वा श्री. हनुमंत उपरे हे आहेत. त्याला श्री. संजय सोनवणी ह्यांनी दैनिकात तसेच फेसबुकवर लेख लिहून ह्या धर्मांतरास  विरोध केला होता. त्या निमित्ताने काही बौद्ध धर्मियांनी फेसबुकवर श्री. सोनवणी ह्यांच्या विरुद्ध शिवीगाळ करायची एक मोहीमच उघडली. एखाद्या व्यक्तीचे आपल्या समाजाप्रती असलेले योगदान विसरून धर्मांतराला विरोध (मुद्द्यावर आधारित) केला म्हणून त्याला अश्लाध्य टीकेचे लक्ष करण्याची हि प्रवृत्ती कुतघ्नतेची नाही का?

इथेच ह्या तथाकथित धर्मांतराच्या वैचारिकतेचि मर्यादा स्पष्ट होते. इथे धर्मांतर हा मुद्दा आहे कि त्या निमित्ताने दळभद्री राजकारण करून आपापली पोळी भाजण्यात काही मंडळीना रस आहे हा प्रश्न देखील उपस्थीत  होतो! OBC -बौद्ध धर्मांतर हा खरच मुद्दा असेल तर संबधित धर्मप्रसारकांनी ख्रिश्चन धर्माकडून आदर्श घ्यावा. अन्यथा, ह्या धर्मांतराचे जे अवडंबर माजविले जात आहे  त्याला आमच्या आगरी भाषेत मांजरांच 'हिकाट' कमी आणि गोंगाट जास्त असे म्हणतात.

धर्मांतर हा विषय यशस्वीपणे हाताळणारे एकमेव भारतीय म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. तत्कालीन धर्मातील विषमता आणि सामाजिक अन्याय ह्याविरुद्ध बंड करून  त्यांनी एका समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी तो क्रांतिकारक मार्ग स्वीकारला होता.  परंतु आजच्या लोकशाहीच्या आणि विज्ञान युगाच्या एकविसाव्या शतकात त्या महामानवाने धर्मांतर हाच विषय राबविला असता? कि त्या दृष्ट्या नेत्याने समाजाला कोणती दिशा दिली असती, कोणता नवा विचार दिला असता ह्याविषयी आत्मपरीक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे!

राकेश पाटील