Friday, 31 January 2014

राहुल गांधीची मुलाखत: एक आशेचा किरण

31/01/2014 (फेसबुक पोस्ट)


राहुल गांधीची मुलाखत वाचून जे समजते त्यापेक्षा जास्त राहुल ती मुलाखत पाहिल्यावर समजतो.एक तरुण आणि संवेदनशील नेतृत्व म्हणून त्याची ओळख होतेच, परंतु हा माणूस वाटतो तितका बच्चा नाही हेही लक्षात येते. महत्वाची गोष्ट हि आहे कि तो वेगळा विचार करणारा आणि पारंपारिक राजकरणाला फाटा देऊन परिवर्तनवादी भूमिका घेणारा तरुण तरुण आहे. मोदी, गुजरात दंगल, इ. विषयापेक्षा देशातील राजकारण, सिस्टीम, महिला-युवा सबलीकरण, राजकीय व्यवस्थेचे पारदर्शीकरण, उत्पादन -निर्माण क्षेत्रातील प्रचंड क्षमता, इ. मुलभुत मुद्दे तो मांडतो.

दुर्दैवाने अर्नब गोस्वामी असो कि सध्याची धंदेवाईक पत्रकारिता, नव्हे आपल्या सर्वांची एकुणातील मानसिकता सवंग राजकारणामध्ये इतकी बरबटलेली आहे कि आपल्याला मुलभुत विषयावर चर्चा नकोय! TRP वाढविण्याच्या खेळापायी पत्रकार, मिडिया आणि आपणदेखील टाळ्या-घोषणा खेचणारे सवंग मुद्द्यांचे चर्वण करण्यातच धन्यता मानतो हे दुर्दैव आहे. ह्या मानसिकते बाहेर येण्याचे धैर्य राहुल गांधीने ह्या मुलाखतीत दाखविले त्याबद्दल त्यांचे स्वागत करायला हवे.

१० वर्षाच्या अनुभवातून देशाचे मुलभूत राजकारण राहुल गांधी शिकला आहे आणि ते तो मांडत आहे. प्रस्थापित व्यवस्थेची झोप उडवणारी हि मुलाखत आहे हे राजकीय, मिडिया आणि जनता ह्या सर्वांनी समजून घ्यायला हवे. राहुल गांधी ने नवा विचार मांडायचे धैर्य दाखविले हे स्वागतार्ह आहे. किमान आजवरचे सवंग मुद्दे , निर्ढावलेले राजकारण न मांडता  हा माणूस जे व्यवहार्य मुद्दे आहेत ते सातत्याने मांडतोय. प्रस्थापित व्यवस्था त्याला हे परिवर्तन करू देत नाही हे मुलाखतीमध्ये दिसते.

अर्णब गोस्वामी ह्या प्रस्थापित व्यवस्थेचे प्रतिनिधित्व करताना दिसतो तर राहुल गांधी परिवर्तनवादी भूमिकेत दिसतो. हे चित्र नक्कीच देशाच्या पुढील राजकारणाच्या दृष्टीने स्वागतार्ह आहे, नव्हे भारताचे भविष्य सुरक्षित हातात आहे असेच मी समजतो.

त्या मुलाखतीवर अवास्तव टीका झाली आणि मिडियामध्ये तसेच सर्व पत्रकार स्तरातून ज्या ओंगळवाण्या टीकेचे लक्ष राहुलला केले गेले त्याचे मुलभुत कारण हे आहे कि राहुल ने मोदी, दंगली, भ्रष्टाचार अशा सवंग मुद्द्यांवर बोलण्याचे टाळले! तो परिवर्तनवादी भूमिकेतून मुलभुत मुद्दे मांडत होता त्याची चर्चा अर्णब गोस्वामीला नको होती तसेच पत्रकार-विश्लेषक-विचारवंत ह्यांना देखील ती भूमिका पटली नाही, ह्याचा अर्थ काय? प्रस्थापित भ्रष्ट व्यवस्थेला (मिडीयासाहित) परिवर्तन कसे पटणार? १० वर्षापूर्वी राहुल नवा असेल, त्याची सुरुवात घराणे शाहीतून झाली हे मुद्दे ह्या मुलाखतीने बाद झाले आहेत. नव्या दमाचे, विचाराचे तरुण नेतृत्व राहुल गांधीच्या रूपाने सज्ज झाले आहे. हे देशाच्या भविष्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे.

Thursday, 30 January 2014

राहुल गांधीच्या मुलाखतीचे आणि प्री-पोल सर्व्हेच्या निकालाचे रहस्य

31/01/2014 (फेसबुक पोस्ट)

चार राज्यातील निवडणुका पार पडल्या आणि त्यात कॉंग्रेसचे अपेक्षित पानिपत झाले. दिल्लीत मात्र 'आप' ने अनपेक्षित यश मिळवून सर्वांची झोप उडवली. केजरीवाल चा करिष्मा असा होता कि मोदी नावाची हवा किंवा लाट अस्तित्वात नाही असे चित्र समोर आले. भाजप आणि मोदी चारी राज्यात यश मिळवून देखील लोकप्रियतेचे धनी मात्र झाडूवाले झाले होते, हा ताजा इतिहास आहे.

महिना उलटला असेल-नसेल, अचानक पुन्हा मिडिया जागा झाला. पुन्हा प्रीपोल सर्व्हे अस्तित्वात आले, 'सेफ़ोलोजि'ला महत्व आले. नवीन सर्व्हेचे 'आकडे' जाहीर झाले! काँग्रेस १०० तर भाजप २०० अशी आकडेवारी मिडीयाने जाहीर केली. वातावरण निर्माण झाले, तापवले गेले. आकडे बहाद्दरांच्या जोडीला सर्व विश्लेषक-विचारवंत पत्रकार आले. त्यांनी देखील मोदीला पंतप्रधान पदावर अभिषेक करून टाकला. काँग्रेस ला तसेच इतर सर्व पक्षानाही पार अडगळीत टाकून दिले! थोडक्यात मोदीची 'हवा' निर्माण झाली!

तब्बल १५% मते वाढवून (तीही ग्रामीण भागात) १८.५% वरून थेट ३४% मते भाजप ला मिळणार असे भविष्य आकडे वाल्या विद्वानांनी घोषित केले. हि रेकोर्ड ब्रेकिंग मतांची वाढ भाजपच्या घशात ओतताना कॉंग्रेसला मात्र मागील निवडणुकीतील मते कायम राहतील अशी गुगलिहि टाकली. गेली २०-३० वर्षे सातत्याने २-४% मते कमी जास्त मिळविणारा भाजप ह्यावेळी अचानक दुप्पट मते कुठून उत्पन्न करणार ह्याचे लोजिकल उत्तर सेफ़ोलोजि मध्ये आहे कि नाही हे त्या आकडेवालेच जाणोत !

ह्या रेकोर्डब्रेक (बोलाच्याच) विजयाने चित्र पालटून गेले. कॉंग्रेस आणि मित्र पक्षामध्येहि जहाज बुडताना उंदीर जसे प्रथम पळतात तशी घबराट पसरली. तिकडे भाजपवालेही भांबावून गेले कारण ५-६% मते तरी वाढावीत म्हणून मोदी सारख्या विवादास्पद चेहऱ्यावर जुगार खेळण्याची रिस्क घेणारे अचानक १५% मते वाढतात हे कसे पचवणार?

अशातच राहुल गांधीने अर्णब गोस्वामीला एक ऐतिहासिक मुलाखत दिली. १० वर्षात पहिलीच मुलाखत देणाऱ्या राहुलची आधी अर्णबने आणि नंतर बाकी सर्व मिडीयाने यथेच्छ धुलाई केली. मुलाखतीचे विश्लेषण सर्व विद्वानांनी शेलक्या विशेषणांनी करून राहुल गांधीला नापास घोषित करूनही टाकले!

काय घडले असावे? मिडिया काँग्रेस विरुद्ध असा आक्रमक का झाला? आधी सर्व्हे मध्ये काँग्रेस नापास, आता मुलाखतीत राहुल नापास? हि टोकाची नकारात्मकता अचानक कुठून उपटली? सर्व्हेच्या आकड्यांच्या फुग्यातुन हि 'हवा' भरायला सुरुवात झाली आणि आता राहुलच्या मुलाखतीच्या निमित्ताने त्या हवेची लाट निर्माण का केली गेली?

ह्याचे उत्तर तपासण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा चार राज्यातील निवडणुकीच्या काळात जावे लागेल. मिडिया आणि काँग्रेस चे असे काय बिनसले होते कि मिडीयाने त्याचे असे उट्टे काढावेत?
तर जनता जनार्दन हो...उत्तर ऐका!

चार राज्यातील निवडणुकीची रणधुमाळी ऐन रंगात आली असता कॉंग्रेसने रंगाचा बेरंग केला. आपल्या प्रतिनिधीना प्रीपोल आणि एक्झिट पोल वरील चर्चेट सामील न होण्याचे आदेश दिले तसेच ह्या सर्व्हे वर बंदी घालण्याची मागणी केली आणि ती निवडणूक आयोगाने मान्यहि केली. थेट मिडीयाच्या धंद्यावरच पाय देणाऱ्या कॉंग्रेसला त्या कर्माची फळे भोगावी लागणारच कि नाही? काँग्रेसला धडा शिकवायची संधी मिडियाने उत्तम साधली. ज्या सर्व्हे वर कॉंग्रेसने बंदी घालून मिडियाचे व्यावसायिक नुकसान केले त्याच सर्व्हेच्या माध्यामतून मिडीयाने कॉंग्रेसला धडा शिकविला. निवडणुका लागल्या कि पुन्हा सर्व्हे बंद पडतील. म्हणून आधीच हात साफ करून घेतला!

आजच्या काळात घराघरात पोहोचलेला मिडिया काय करू शकतो हे सर्वाना माहित आहे. त्यात असे व्यावसायिक आणि वैयक्तिक हितसंबंध गुंतले असतील तर खोटे आकडे फेकून 'हवा' तयार करण्याचा खेळ सहज खेळता येतो. कारण ह्या खेळात गोलंदाज पण तेच, फलंदाज पण तेच, आणि पंचही तेच!


मतदार राजा, सावध राहा! रात्र (नि दिवसहि) 'मिडीया' ची आहे!