Wednesday, 6 August 2014

हिंदू धर्मातील बहुजन समाजाची फसवणूक

हिंदू, हिंदू म्हणून भगवी धर्मांधता स्वत:वर लादणाऱ्यानि स्वत:चे त्या धर्मातील स्थान काय त्याचा विचार करावा. तुम्ही हिंदू धर्मातील 'शुद्र' आहात आणि वर्णाश्रमात तुम्हा पददलितांवर कायमची  गुलामगिरी लादली आहे हे जरा डोळे उघडून पहा. तुमच्या बापजाद्यांच्या पिढ्यानपिढ्या हिंदू धर्माच्या ह्या गुलामगिरीत गारद झाल्या हे नीट लक्षात ठेवा.
   
जगात शेकडो देश ख्रिश्चन किंवा मुस्लिम राष्ट्र आहेत आणि हिंदू राष्ट्र एकही का नाही असे ज्यांना वाटते त्यांच्या ह्या प्रश्नातच उत्तर दडले आहे. मुळात हिंदू हा काही धर्म नाही. ती एक जीवनपद्धती  आहे असे म्हटले जाते पण ते देखील अर्धसत्य आहे.

ह्या हिंदू धर्माने समाजातील बहुसंख्य (८०-८५%) बहुजन समाजाला बहिष्कृत केल्याने त्या धर्माची जगभर वाढ होणे कधीच शक्य नव्हते. उलटपक्षी ह्या अन्यायग्रस्त बहुजन समाजाने सातत्याने बौद्ध, शीख, जैन,  इस्लाम किंवा ख्रिश्चन असे धर्म स्वीकारून हिंदू धर्माची गुलामगिरी झिडकारण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. 

ह्या देशात जैन, बौद्ध, वैदिक, शीख, शैव असे अनेक धर्म निर्माण झाले. वैष्णव, शाक्त, वीरशैव, नाथपंथ, वारकरी, महानुभाव असे अनेक पंथ हि निर्माण झाले. आदिवासी आणि दुर्गम भागातील आदिम जमाती अनेक अज्ञात धर्म-पंथ मानतात.

परंतु 'सिंधू' नदीच्या पलीकडे राहणारे ते 'हिंदू' ('स' = 'ह') अशी हिंदू शब्दाची व्युत्पत्ती आहे. भारतातून निर्माण झालेल्या बौद्ध, शीख, जैन, आदिवासी इ. धर्म-पंथांनी स्वत:ला हिंदू न मानता आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवले आहे. परंतु इतर जे काही धर्म-पंथ होते ते कालौघात स्वत:ला हिंदू समजू लागले किंवा तसा जाणीवपूर्वक अपप्रचार केला गेला. तरी त्या सर्वांच्या भिन्न-भिन्न उपासना पद्धती, दैवते, जीवन पद्धती आजही तशाच आहेत. हा बहुसंख्य समाज प्रामुख्याने मूर्तिपूजक शैव धर्मीय आहे. देशभर पसरलेली लाखो शिवालये शैव धर्माच्या विस्तृत पुरातन संस्कृतीची साक्ष देत आहेत. दुर्दैवाने कालौघात स्वत:ची धार्मिक , सांस्कृतिक ओळख विसरून ते स्वत:ला हिंदू किंवा शुद्र समजत वैदिकांच्या गुलामीच्या पाशात अडकून पडले.

मुद्दा हा आहे कि तरीही हा तथाकथित हिंदू धर्म भारतापुरताच मर्यादित का राहिला?
आधी भारतातील बौद्ध आणि नंतर पाश्चिमात्य ख्रिश्चन किंवा मुस्लिम धर्म जगभर पसरत असताना  आपला हिंदू धर्म जगभर का पसरू शकला नाही? तर, त्यासाठी इतर धर्मांना नावे ठेवण्यापेक्षा त्याचे कारण आपल्या घरातच शोधायला हवे. स्वामी विवेकानंदानी म्हटल्याप्रमाणे मुस्लिम बाहेरून किती आले होते आणि इथलेच किती हिंदू मुस्लिम धर्मात गेले त्याची कारणे लक्षात घ्या.

वर्णाश्रामाच्या नावाखाली वैदिक धर्माने जी सामाजिक उतरंड मांडली होती ती समजून घ्या. वैदिकांनी त्यांचा वैदिक धर्म आधी तीन वर्णावर आधारित ठेवला होता. क्षत्रिय, ब्राह्मण आणि वैश्य असे हे तीन वैदिक वर्ण.  ह्या तीनही वर्णांना वेदांचे अधिकार आहेत. उर्वरित जो प्रचंड समाज (सुमारे ८०-८५%) देशभर विविध धर्म-पंथात विभागला गेला होता, त्यांना वैदिकांनी 'शुद्र' म्हणून बहिष्कृत केले होते. जसे मुस्लिम धर्मीय आताच्या हिंदुना 'काफिर' संबोधितात  तसेच वैदिकांनी तत्कालीन वैदिकेतर समाजाला 'शुद्र' म्हणून हिणविले ह्यात काही विशेष नाही. ह्याच  शूद्रांना चौथ्या वर्णात ढकलून त्यांची धार्मिक आणि सांस्कृतिक ओळखच मिटविण्याचे महान षड्यंत्र राबविले गेले आणि त्याच षड्यंत्राचे बळी आज स्वत:ला हिंदू-हिंदू म्हणून भगवे बावटे  हातात घेऊन झिंदाबादच्या घोषणा देण्यात धन्यता मानतात, हि खरी शोकांतिका आहे.

अशाप्रकारे वैदिकेतर समाजाला 'शुद्र' ह्या चौथ्या वर्णात ढकलले गेले आणि हजारो वर्षे त्यांना बहिष्कृत करून सामाजिक विषमतेचे जगभरातील सर्वाधिक निघृण कारस्थान रचले गेले. परंतु हा शूद्रातिशूद्र समाज बहुसंख्य असल्याने त्यांची संस्कृती नष्ट करू पाहणारे वैदिक स्वत:च त्या बहुजन संस्कृतीत विसर्जित होत गेले. काळाच्या ओघात ते स्वत: मूर्तिपूजक देखील बनले आणि त्यांनी बहुजन समाजाचे देव-देवताही लंपास केल्या. स्वत:ची यज्ञ संस्कृती सोडून अवैदिक समाजाची मूर्तीपूजा संस्कृती स्वीकारून आणि स्वत:चे इंद्र-वरुण आदि देव सोडून बहुजनांचे शिव, गणपती, विठ्ठल आदि दैवते स्वीकारून त्यांनी वैदिक संस्कृतीचे बहुजन संस्कृतीत विसर्जन केल्याचेच सिद्ध होत आहे. पण वैदिक धर्मीय स्वत:चा वर्चस्ववाद सातत्याने जोपासित आले आहेत आणि बहुजन समाजावर अन्याय करण्याची त्यांची हजारो वर्षाची परंपरा राहिली आहे.

आजही हिंदूंच्या पूजापाठात जे पुरुषसुक्त म्हटले जाते त्यात ब्राह्मण म्हणजे मुख, क्षत्रिय म्हणजे बाहू, वैश्य म्हणजे मांड्या असे म्हटले आहे. परंतु शुद्र हे पायापासून उत्पन्न झाले अशी सामाजिक विषमतेची भूमिका मांडली  आहे. अर्थात ते पुरुषसुक्त संस्कृत भाषेत असल्याने बहुजनांना हि फसवणूक कशी समजणार?

शूद्रांना वेदाधिकार कधीही नव्हते. असण्याचा प्रश्नच येत नाही कारण ते वैदिक नाहीत. त्यांचा धर्मच मुळात वेगळा आहे. ह्या वैदिकेतर बहुजन समाजाला वैदिकांनी गुलामगिरीत खितपत ठेवत हजारो वर्षे त्यांचे शोषण केले. शुद्रातीशुद्राना अस्पृश्य ठरवून गावाच्या बाहेर काढले. मानवतेला काळिमा फासणारे सामाजिक अत्याचार अन्याय हजारो वर्षे केले. वैदिकांची हि लबाडी समजून घ्या.

असुर नावाचा जो महान वंश जगभर प्रसिद्ध आहे त्या 'असुर' शब्दालाही बदनाम करून पद्धतशीरपणे बहुजन समाजाला सांस्कृतिक पारतंत्र्यात टाकले. असुर संस्कृतीचे अवशेष आज जगभर विखुरले आहेत. 'असिरीयन' संस्कृती अभ्यासून पहा. तेथील सर्व राजे स्वत:ला अभिमानाने असुर म्हणवून घेत असत. असुर नावाचे शहर आजही अस्तित्वात आहे. झोरोष्ट्रीयान (पारशी) धर्मात अहूर (असुर) माझ्दा हे मुख्य दैवत मानले आहे.   

भारतातही असुर संस्कृतीचा प्रचंड प्रभाव आहे. हिरण्यकश्यप, महिषासुर, रावण, बळी ह्या असुरांचा पराक्रम तर देव-देवतानाहि पुरून उरला होता. खुद्द वैदिकांच्या ऋग्वेदात इंद्र, वरुण इत्यादी त्यांच्या देवताना 'असुर' अशा आदरार्थी नावाने संबोधिले आहे. नंतरच्या काळात पद्धतशीर 'असुर' वंशाला बदनाम करणारे साहित्य लिहिण्याचे षड्यंत्र केले गेले ! ज्या बळीराजाची आपण आजही दरवर्षी पूजा करतो आणि "बळी राज्य येवो" अशी भल्या पहाटे गर्जना करतो त्या बळी राजाला फसवणुकीने मारणाऱ्या वामनाला आपणच  विष्णूचा अवतार मानतो? हे कसे शक्य आहे? सर्व असुर राजे भगवान शंकराची पूजा करीत असत आणि ते प्रजाहितदक्ष होते, मग ह्या असुरांना 'पाताळात' धाडणारे 'देव' तेवढे श्रेष्ठ कसे? इतिहास हा जितांच्या बाजूने लिहिला जातो आणि पराजीताना बदनाम केले जाते, एवढेच.

ज्या धर्माचा इतिहास हा असा लबाडीने भरलेला आहे तो धर्म जगभर कसा पसरणार? 'शुद्र' म्हणून बहुसंख्य समाजाला गुलामगिरीत ढकलणारा हा तथाकथित हिंदू धर्म. ह्या धर्मातील सामाजिक अन्यायामुळे अर्ध्याहून अधिक लोकसंख्या कधीकाळी इस्लाम धर्मात गेली. त्याआधी कधी काळी त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. म्हणजेच मुळात भारतातच तो धर्म कधीही पूर्णता: स्वीकारला गेला नाही तर जगभर त्याचा प्रसार कसा होणार? वैदिकांनी ह्या हिंदू धर्मांत 'सिंधुबंदी' केली होती. म्हणजे समुद्राचे उल्लंघन करायचे नाही, तर जगभर कसे पोहोचणार? त्यांनी धर्मबंदीही करून धर्मांतरित हिंदुना पुन्हा धर्मात परत येण्याच्या वाटा बंद करून टाकल्या होत्या. मग ह्या धर्माचा प्रसार होण्याची शक्यता कुठे होती?

एक गोष्ट कधीही विसरू नका कि महात्मा फुले, शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या सामाजिक न्यायाच्या लढ्याने वैदिकांच्या किंवा तथाकथीत हिंदू धर्माच्या सामाजिक अन्यायाला आव्हान दिले गेले.  त्यांनी दलित, पिडीत, शोषित, वंचित अशा बहुजन समाजाला हिंदू धर्माच्या गुलामगिरीतून मुक्त करण्याची प्रक्रिया सुरु केली. ब्रिटीश सरकारच्या शिक्षणाच्या प्रसाराने, आधुनिकीकरणाच्या धोरणाने आणि वैज्ञानिक दृष्टीकोनाने हिंदू धर्मातील बुरसटलेल्या सामाजिक आणि सांस्कृतिक गैरसमजुतींना हजारो वर्षानंतर सुरुंग लागला. स्वतंत्र भारतात राज्यघटनेच्या माध्यमातून स्वातंत्र्य समता बंधुता ह्या लोकशाही त्रिसूत्रीचा आधार  मिळाल्याने बहुजन समाजाचे सबलीकरण सुरु झाले. परंतु धार्मिक गुलामगिरीच्या बेड्या तोडण्याचे सोडून उलट हिंदू धर्मातील वैदिक व्यवस्थेच्या कचाट्यात हा बहुजन समाज पुन्हा पुन्हा सापडत असल्याचे चित्र आहे. त्याच हिंदू धर्माच्या नावाखाली तुम्हा शूद्रांना इतर धर्मांचा बागुलबोवा दाखवून पद्धतशिरपणे वापरले जात आहे. मंदिरे बांधण्यासाठी असो कि मशिदी तोडण्यासाठी असो कि दंगली करण्यासाठी असो… बहुजन (शुद्र) समाजाची शक्ती, संपत्ती वापरून घेतली जातेय. वैदिकीकरण केले जातेय!

म्हणून स्वत:चा सामाजिक/सांस्कृतिक इतिहास तपासून पहा. शाहू-फुले-आंबेडकर अभ्यासा,  प्रबोधनकार ठाकरे वाचा. हजारो वर्षाची वैदिक-हिंदू धर्मातील गुलामगिरी लक्षात घ्या. आपले स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी धर्मांधतेतून बाहेर पडा. हिंदू धर्म तुम्हाला 'शुद्र' मानीत असेल आणि समान सामाजिक न्याय देत नसेल तर त्याविरुद्ध लढण्याची हिम्मत ठेवा. अन्यथा  त्या समाज धुरिणांनी तुम्हाआम्हाला दिलेले स्वातंत्र्य पारतंत्र्यात बदललेले पाहावे लागेल. हिंदुत्ववादी समाजकारणाचे आणि राजकारणाचे नेमके ध्येय तेच आहे.  म्हणजे त्यांचा वर्चस्ववाद आणि तुमची गुलामगिरी, हे कधीही विसरू नका. कोणत्या धर्मात किंवा राजकीय पक्षात राहायचे हा तुमचा वैयक्तिक संविधानिक अधिकार आहे. पण, खरा धर्म म्हणजे मानवता आणि आपला धर्मग्रंथ म्हणजे राज्यघटना एवढे मात्र लक्षात ठेवा.

राकेश पाटील.

हेदेखील वाचा : (सामाजिक संशोधक संजय सोनवणी ह्यांचे ब्लॉग)
वैदिक धर्म म्हनजेच "हिंदु" धर्म ?
हा देशच शिव-शक्तीमय आहे!

No comments:

Post a Comment