Friday, 26 September 2014

होऊन जाऊदे...!

होऊन जाऊदे...!

महाराष्ट्राच्या विधासभा निवडणुकीचे चित्र पितृपक्ष सरताच अगदी सुस्पष्ट झाले आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर युती-आघाडीचे घटस्फोट होऊन नव्या संसाराच्या वेगळ्या चुली मांडण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

एकीकडे केंद्रातील मोदी-सरकारच्या ताकदीची झिंग चढल्याने भाजपच्या राज्यातील नेत्यांनी सेनेला शक्य तेवढे दाबून कुरघोडी करायचा प्रयत्न केला. सेना-नेतृत्वाने शक्यतोवर मित्र पक्षांना सामून घेत वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला परंतु भाजपच्या अवाजवी अडेलतट्टूपणामुळे युती तुटली. आता तोच भाजप जानकर, मेटे सारख्या कुबड्या घेऊन आपली नसलेली ताकद दाखविण्याचा प्रयत्न करतोय. 

दुसरीकडे राज्यात कॉंग्रेसचे नेतृत्व राजकीय दृष्ट्या अपरिपक्व लोकांकडे असल्याचे दिसते. राष्ट्रवादीसोबत वाटाघाटी चालू असताना उमेदवारांची यादी आणि त्यात चर्चा चालू असलेल्या जागा जाहीर करून कॉंग्रेसने कोणती राजकीय प्रगल्भता दाखविली? त्यात दिवसभर मुख्यमंत्री त्यांच्या मतदारसंघात गायब झाले तर प्रदेशाध्यक्षांनी चर्चेची वेळ संपल्याचे परस्पर जाहीर केले. हे एकतर दबावतंत्र होते किंवा आघाडी तोडण्याची विनाशकाले विपरीत बुद्धी होती. राष्ट्रवादीचा एक गटही आधीपासूनच सर्व पक्षांनी स्वतंत्र लढण्याची भूमिका मांडीत होता. तसेच केंद्रातील काँग्रेस-राष्ट्रवादी नेतृत्वाने सलोख्याची भूमिका न घेऊन राज्यातील आघाडी तुटू दिली. भाजपची लाट थोपविण्याचे युपी-बिहार मधील प्रयोग समोर असूनही महायुती तुटत असताना चालून आलेली सुसंधी काँग्रेस आघाडीने दवडली.

असो.

त्यानिमित्ताने राज्यातील सर्व पक्षांना आणि जनतेलाही आपापली ताकद अजमावण्याची संधी मिळाली आहे. स्वबळाच्या वल्गना कुणाच्या आणि खरी ताकद कुणाची हे आता स्पष्ट होईल. मतदारांना सर्व पर्याय उपलब्ध असतील. राष्ट्रीय पक्ष, स्थानिक पक्ष, स्थानिक आघाड्या, अपक्ष तसेच 'नोटा' चाही ऑप्शन अजमाविता येईल. आधीच्या सर्व निवडणुकांत युती-आघाडीच्या राजकारणामुळे मतदारानाही राजकीय अपरिहार्यता स्वीकारावी लागत असे. ह्यावेळी मतदारराजासमोर सर्व पर्याय खुले झाले आहेत.

मुख्यत: राज्यात भाजप आणि शिवसेनेचा नेमका मतदार किती तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा खरा जनाधार किती ह्याचा महत्वपूर्ण निकाल निवडणुकीत लागेल.

मनसे, कम्युनिस्ट, बसप, स्वाशेसं, शेकाप, रिपब्लिकन पक्ष, भारिप, बविआ, जनसुराज्य, इ. पक्षांना आणि अपक्ष उमेदवारानाही आपली ताकद प्रदर्शित करता येईल.

एकूणच महाराष्ट्रात ह्या निवडणुकीत जुन्या गणितांची अडगळ मोडून पडून नव्या राजकीय समीकरणांचे वारे वाहू लागलेत. मतदारराजा आपला निर्णय १९ तारखेला जाहीर करेल आणि त्यात लोकशाहीचा विजय निश्चित असेल.

Friday, 19 September 2014

भाजपचा सेनेला 'अल्टीमेटम'

अल्टीमेटम? आणि तोही सेनेला?? आज बाळासाहेब हयात असते तर भाजपेयींची एवढी हिम्मत झाली असती का?
खरं तर, उद्धव ठाकरेंचे नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आल्यावर बाकीच्यांनी गप्पगुमान त्यांचा पाठीशी उभे राहायला हवे होते. ठाकरे घराण्यातील व्यक्तीने मुख्यमंत्री पदाची अपेक्षा करणे हीच एक ऐतिहासिक घटना आहे. महायुतीत सर्वानुमते ह्या निर्णयाचे स्वागत व्हायला हवे होते. नव्हे, तो ठाकरे घराण्याचा कर्तुत्वसिद्ध हक्कच आहे!
पण इथे कमळाबाईने गादीसाठी आपली घोडी दामटवली. बरं, जी घोडी पुढे केलीत त्यांचं कर्तुत्व काय? फक्त सेनेच्या मतदारांनी वर्षानुवर्षे पोसलेली हि बांडगुळे...

बाळासाहेब असते तर त्यांनी गर्जना केली असती कि महाराष्ट्रात जो निर्णय घ्यायचा तो आम्ही घेऊ. दिल्लीवाल्या अतिशहाण्यांची घुसखोरी इथे सहन करणार नाही!
शिवसेना हि महाराष्ट्राच्या अस्मितेची, मराठी माणसाच्या आत्मसन्मानाची ओळख आहे. त्या स्वाभिमानासाठी दिल्लीतील 'अवजड' जोखड झुगारून द्यायची वेळ आली आहे.
भाजपच्या धर्मांध राजकारणापायी शिवसेनेची आजवर फरफटच अधिक झाली. मराठी माणसाचा मुद्दाहि दुरावला आणि जे खांद्यावर बसून मोठे झाले ते आता कानात xxx आहेत.

सेनेने पुन्हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा मुद्दा लाऊन धरावा. "पालघरमधील काँग्रेसने मंजूर केलेला सरकारी प्रकल्प ('नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कोस्टल पोलिसिंग') मोदीसरकारने गुजरातमध्ये का पळविला?" ह्या आणि अशा मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांच्या मुद्द्यावर लढा उभा करावा.
नव्हे, तेच त्यांचे आद्यकर्तव्य आणि तो त्यांचाच निसर्गदत्त अधिकारही आहे. इतर राष्ट्रीय पक्षांना स्वाभाविकपणे हे मराठी माणसाच्या अस्मितेचे शिवधनुष्य पेलणे शक्य नाही.

अवघा महाराष्ट्र ढवळून लढवावा. मराठी माणूस खंबीरपणे पाठीशी उभा राहील.

अरे, आवाsssssssssssssssssज कोणाचा........!

Thursday, 18 September 2014

'शहाणे' जावईपाहुणे

जावईपाहुणे सासुरवाडीला आले, चिडले-बोडबडले, सासऱ्याची उणीदुणी पुन्हा काढली!
पण 'शहाणे' त्या 'डायरीचं' काय झालं, ते नाही बोलले...!
सासरेबुवा मिश्किल हसत मनाततल्या मनात असंच काही गुणगुणत असतील....
"अहो जावई बापू,
उगा नका तापू...
'दोनदिस' मजा करून घ्या,
'डायरी' तेवढी देऊन जा..."

Friday, 12 September 2014

मोदी-सरकारची बनियागीरी

केंद्रातील काँग्रेस सरकारने पालघर जिल्ह्यातील खार्डी आणि विराथन ह्या गावातील ३०५ एकर जमिनीत मंजूर केलेला 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कोस्टल पोलिसिंग' हा सागरी पोलिस प्रशिक्षण केंद्राचा महत्वपूर्ण प्रकल्प दिल्लीतील मोदी-सरकारने गुजरातमध्ये पळवला असल्याची संतापजनक माहिती समोर आली आहे.

खार्डी-विराथन येथून सफाळे रेल्वेस्टेशन तसेच दातिवरे-अर्नाळा हि बंदरे सलग्न असल्याने आणि मुंबईदेखील नजीक असल्याने ह्या अतिसंवेदनशील प्रकल्पासाठी भौगोलिक आणि लष्करी दृष्टीने सोयीचे असलेल्या खार्डी-विराथन ह्या पालघर मधील जागेच्या निवडीचा निर्णय केंद्रातील काँग्रेस सरकारने घेतला होता!
परंतु सत्तेवर येताच सर्व निकष धाब्यावर बसवून आणि महाराष्ट्राच्या अस्मितेलाही फाटा देवून मोदी-सरकारने हा जो उपद्व्याप केला आहे त्याचा तीव्र निषेध!
मोदी-सरकारचा आणि त्यांच्या बनियागीरीचा धिक्कार असो!

- राकेश पाटील
मु. खार्डी, पो. दातिवरे,
ता. जी. पालघर.

Saturday, 6 September 2014

मास्तर मास्तर तीरकोंबडा...

आजच्या ग्लोबलायझेशनच्या जमान्यात शिक्षणाचा परीघ ग्रामीण भागातही खोलवर विस्तारला असेल असे गृहीत धरूया. पण पंचवीस तीस वर्षापूर्वीच्या ग्रामीण भागात शिक्षकदिनी काय घडत असेल त्याची कल्पना करा.

चौथीपर्यंत गावात शाळा. तिथेच अर्ध्याअधिक जणांचे शिक्षण आटपे. दहावीपर्यंत शाळा पुढच्या गावात. हे विद्यार्थी म्हणजे छानपैकी दाढीमिशा असलेले तरणेबांड तरुण असत. तिथे जाऊन दहावीपर्यंत पोहोचणारे अगदी मुठभर. एसेस्सी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जवळजवळ शून्यच! रेल्वे, टेलिफोन, शिक्षण, इ. क्षेत्रात तरीही काही लोक चिकटून जात. शैक्षणिक पात्रता हा मुद्दा तेव्हा गौण होता.

थोडीफार मोसमी शेतमजुरी, खाडीतील मासेमारी, शेळ्या-गाई-म्हशीपालन, मासेमारीच्या बोटीवरील नोकऱ्या, वीटभट्टीचा रोजगार, मिठागारावरील कामे, इ. पोटापाण्याची कामे गावात चालत. तरीही गावात रिकामटेकड्या उसाट तरुणांची कमी नसे. गावातील दोनेक घरात चोविस्तास पत्त्यांचा डाव मांडून हि मंडळी बारमाही पडीक असत.

गावाच्या शाळेतील मास्तर ह्या लोकांचा फार जिव्हाळ्याचा विषय असे. त्यावेळी मास्तर बहुधा सातवी पास असे. त्यातच काही मास्तर म्हणजे नमुने असत. असे नमुने हाती लागले कि मग गावातील मंडळी त्यांना सोडत नसत.

असेच एक मास्तर गावातील शाळेत येउन-जाऊन असत. बाटलीचा नाद असल्याने सदासर्वदा झिंगलेले मास्तर गावातील मंडळीसाठी खास आकर्षण होते. शाळेतील मुलेही मास्तरांना ओळखून होती. त्यात मास्तर फार मारकुंडे. कान उपटून निघेपर्यंत कानाला पकडत. छडीचा सर्रास वापर करीत. त्यांच्या हाताखालून गेलेली, बाजूच्या गावात हायस्कूलला जाणारी मुलेसुद्धा मास्तरांवर विशेष लक्ष ठेवून असत.
तर, दुपारच्या शाळेसाठी मास्तर गावात शिरले कि एक आरोळी कुठूनतरी घुमत असे...

"मास्तर मास्तर तीरकोंबडा
पोरं पळाली घे 'x x डा' !"

मास्तर संतापून चरफडून धाव घेई. कोण बोलला त्यापाठी धावत सुटे. अर्थात कुणीही कधीही हाती लागत नसे. त्रेधातिरपीट होऊन शिव्याशाप देत मास्तर निघून जात. जाता-येता हा एपिसोड न चुकता घडे...
आज नव्या मास्तरांची शाळा भारत असेल... भले कुणी आधुनिक मास्तर टीव्हीवरून शिकवीत असेल... पण गावातील ती हुश्शार मंडळी आजही मास्तरांचा तसाच सत्कार करीत असेल काय? आणि जर ती आरोळी घुमली तर तो मास्तर तरी काय करणार?

"मास्तर मास्तर तीरकोंबडा
पोरं पळाली घे 'x x डा' !"

Friday, 5 September 2014

शिक्षणक्षेत्रातील अशा स्मृती-विस्मृती

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ह्या थोर तत्वज्ञ आणि मुत्सद्दी नेत्याचा जन्मदिवस ५ सप्टेंबर 'शिक्षकदिन' म्हणून साजरा केला जातो. ते भारताचे दुसरे राष्ट्रपती होते आणि भारतरत्न ह्या सर्वोच्च बहुमानाने त्यांना सन्मानित केले गेले होते.
स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री (मानवसंसाधन/मनुष्यबळ) मौलाना आझाद ह्या थोर विद्वान नेत्याचा जन्मदिवस ११ नोव्हेंबर 'राष्ट्रीय शिक्षणदिन' म्हणून साजरा केला जातो. त्यानाही भारतरत्न ह्या सर्वोच्च बहुमानाने त्यांना सन्मानित केले गेले आहे.
एकूणच शिक्षण क्षेत्रातील आपली महान परंपरा अनेक एकापेक्षाएक सरस उच्चविद्याविभूषित महनियांनी गौरवित करून ठेवली आहे. त्या परिप्रेक्षात आजचे आपले शिक्षणक्षेत्र (मनुष्यबळ/मानवसंसाधन) कुठे आहे?
मा. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात शिक्षणक्षेत्रातील अशा स्मृती-विस्मृतीवर थोडाफार प्रकाश टाकायला हवा!