Friday, 26 September 2014

होऊन जाऊदे...!

होऊन जाऊदे...!

महाराष्ट्राच्या विधासभा निवडणुकीचे चित्र पितृपक्ष सरताच अगदी सुस्पष्ट झाले आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर युती-आघाडीचे घटस्फोट होऊन नव्या संसाराच्या वेगळ्या चुली मांडण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

एकीकडे केंद्रातील मोदी-सरकारच्या ताकदीची झिंग चढल्याने भाजपच्या राज्यातील नेत्यांनी सेनेला शक्य तेवढे दाबून कुरघोडी करायचा प्रयत्न केला. सेना-नेतृत्वाने शक्यतोवर मित्र पक्षांना सामून घेत वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला परंतु भाजपच्या अवाजवी अडेलतट्टूपणामुळे युती तुटली. आता तोच भाजप जानकर, मेटे सारख्या कुबड्या घेऊन आपली नसलेली ताकद दाखविण्याचा प्रयत्न करतोय. 

दुसरीकडे राज्यात कॉंग्रेसचे नेतृत्व राजकीय दृष्ट्या अपरिपक्व लोकांकडे असल्याचे दिसते. राष्ट्रवादीसोबत वाटाघाटी चालू असताना उमेदवारांची यादी आणि त्यात चर्चा चालू असलेल्या जागा जाहीर करून कॉंग्रेसने कोणती राजकीय प्रगल्भता दाखविली? त्यात दिवसभर मुख्यमंत्री त्यांच्या मतदारसंघात गायब झाले तर प्रदेशाध्यक्षांनी चर्चेची वेळ संपल्याचे परस्पर जाहीर केले. हे एकतर दबावतंत्र होते किंवा आघाडी तोडण्याची विनाशकाले विपरीत बुद्धी होती. राष्ट्रवादीचा एक गटही आधीपासूनच सर्व पक्षांनी स्वतंत्र लढण्याची भूमिका मांडीत होता. तसेच केंद्रातील काँग्रेस-राष्ट्रवादी नेतृत्वाने सलोख्याची भूमिका न घेऊन राज्यातील आघाडी तुटू दिली. भाजपची लाट थोपविण्याचे युपी-बिहार मधील प्रयोग समोर असूनही महायुती तुटत असताना चालून आलेली सुसंधी काँग्रेस आघाडीने दवडली.

असो.

त्यानिमित्ताने राज्यातील सर्व पक्षांना आणि जनतेलाही आपापली ताकद अजमावण्याची संधी मिळाली आहे. स्वबळाच्या वल्गना कुणाच्या आणि खरी ताकद कुणाची हे आता स्पष्ट होईल. मतदारांना सर्व पर्याय उपलब्ध असतील. राष्ट्रीय पक्ष, स्थानिक पक्ष, स्थानिक आघाड्या, अपक्ष तसेच 'नोटा' चाही ऑप्शन अजमाविता येईल. आधीच्या सर्व निवडणुकांत युती-आघाडीच्या राजकारणामुळे मतदारानाही राजकीय अपरिहार्यता स्वीकारावी लागत असे. ह्यावेळी मतदारराजासमोर सर्व पर्याय खुले झाले आहेत.

मुख्यत: राज्यात भाजप आणि शिवसेनेचा नेमका मतदार किती तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा खरा जनाधार किती ह्याचा महत्वपूर्ण निकाल निवडणुकीत लागेल.

मनसे, कम्युनिस्ट, बसप, स्वाशेसं, शेकाप, रिपब्लिकन पक्ष, भारिप, बविआ, जनसुराज्य, इ. पक्षांना आणि अपक्ष उमेदवारानाही आपली ताकद प्रदर्शित करता येईल.

एकूणच महाराष्ट्रात ह्या निवडणुकीत जुन्या गणितांची अडगळ मोडून पडून नव्या राजकीय समीकरणांचे वारे वाहू लागलेत. मतदारराजा आपला निर्णय १९ तारखेला जाहीर करेल आणि त्यात लोकशाहीचा विजय निश्चित असेल.

No comments:

Post a Comment