Tuesday, 24 February 2015

मुफ्ती मोहम्मद इलियास : देहदंडचा फतवा

अलीकडे जमीयत उलेमा या मुस्लिम संघटनेचे मुफ्ती मोहम्मद इलियास ह्यांनी "भगवान शंकराला पैगंबर मानण्यास मुस्लिमांची काहीच हरकत नाही. आमचे आई-वडील एक आहेत, त्यांचं रक्त एक आहे, त्या नात्यानं आमचा धर्मही एकच आहे," असं वक्तव्य करून "हिंदू राष्ट्राला मुस्लिमांचा अजिबात विरोध नाही. ज्याप्रमाणे चीनमध्ये राहणार चिनी, अमेरिकेत राहणारा अमेरिकी तसा हिंदुस्थानात राहणारा प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे. हे तर आमच्या देशाचं नाव आहे." अशीही भूमिका मांडली होती.
त्यावर आमच्या काही विद्वान मित्रांनी त्या भूमिकेमागच्या छुप्या अजेंड्याचा पर्दाफाश करून ते वक्तव्य म्हणजे पद्धतशीर इस्लामिकरणाचा धर्मांध डाव असल्याचा शोध लावला होता.
कालच कोणत्या तरी मुस्लिम संघटनेने त्या मुफ्ती मोहम्मद इलियासविरुद्ध सिरकलम फतवा काढल्याचे ऐकले.
मग आता त्या मुफ्ती मोहम्मद इलियासला खालीलपैकी कोणत्या वर्गात बसवायचं?
१. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के इशारे पर शरीयत के खिलाफ उलटा-सीधा बयान देनेवाला इस्लामविरोधक ?
२. हिंदूंचे इस्लामीकरण करू पाहणारा हिंदुद्वेष्टा ?
३. सामाजिक सौहार्दासाठी कट्टर धार्मिकता सोडून व्यापक आणि क्रांतिकारक भूमिका मांडणारा आधुनिक अवलिया ?

 ऑल इंडिया फैजान-ए-मदीना काउंसिलचे अध्यक्ष मुईन सिद्दिकी ह्यांनी मुफ्ती इलियासला देहदंडचा फतवा सुनावला आहे! इस्लामच्या कट्टर धर्मगुरूना ते वक्तव्य इतकं टोकाचं इस्लामविरोधी आणि आक्षेपार्ह वाटतेय आणि आमचे काही विद्वान त्यावर संशोधन करून ते हिंदूविरोधी आणि इस्लामीकरणाचा डाव इत्यादी असल्याचं सांगताय. ह्या विरोधाभासाचा अर्थ काय? ते वक्तव्य दोन्ही बाजूंसाठी अडचणीचं का ठरावं?
मग पर्याय ३ जास्त विश्वासार्ह वाटतोय.

 
अर्थात मुफ्ती इलियास हा सामाजिक सौहार्दासाठी कट्टर धार्मिकता सोडून व्यापक भूमिका मांडणारा आधुनिक अवलिया असल्याचे चित्र समोर येते.
त्याचं किमान हिंदू वर्गाकडून तरी तहेदिल स्वागत व्हायला हवे होते. पण तसं झालेलं दिसत नाही. अशी प्रागतिक भूमिका मांडणाऱ्या मुफ्तीला दोन्ही बाजूकडून उडवून लावण्यात आले. कदाचित ती भूमिका दोन्ही बाजूंच्या सोयीची नसावी, एवढंच.

Sunday, 22 February 2015

आपले खड्डे आपणच खोदतोय : कॉम्रेड पानसरेंची हत्या


आणखी एका वयोवृद्ध तपोवृद्ध व्यक्तीवर भ्याडहल्ला. म्हाताऱ्या लोकांवर गोळ्या झाडण्याची आपली उज्ज्वल परंपराच आहे आणि असल्या हल्लेखोरांचे कायदा, सरकार, इ. मंडळी काही उपटू शकत नाही, हेदेखील दाभोळकर हत्येतून स्पष्ट झालंय. भेकडांना हिंसेचे आकर्षण असते असं म्हणतात, ते तंतोतंत खरं ठरवणारे भेकड आपल्या समाजात आहेत. हे भ्याड हल्लेखोर समाजातील वयोवृद्ध, निशस्त्र धुरिणांवर गोळ्या झाडून पळून जातात आणि हल्ल्याची जबादारी घेण्याची तात्विक बांधिलकी देखील ते दाखवू शकत नाहीत, हे त्यांच्या भेकडगिरीचे व्यवच्छेदक लक्षण आहे. त्या भ्याडपणातच त्यांच्या सनातन अपयशाचे रहस्य आहे.
विझल्या चितांचे निखारे धुमसत असताना अजून किती वधस्तंभ रक्त मागत उठणार आहेत? ...आणिअशा काळरात्रीत आयुष्याच्या मशाली पेटविण्याची आम्हाला जाग येत नसेल तर, कॉम्रेड पानसरे, माफ करा...आम्ही निद्रिस्त प्रेते आहोत. आमचा सूर्य अंधाराच्याच पखाली वाहणार आहे!
 
दुसरीकडे संवेदनशिलतेच्या मुद्द्यावरून मा. मुख्यमंत्री अडचणीत आल्याचे दिसते. कॉम्रेड कोल्हापुरात उपचार घेत होते तेव्हा ते सांगलीत असूनही त्यांना भेटू शकले नाहीत. तर, मुंबईत कॉम्रेडांची प्राणज्योत माळवली तेव्हा, नंतर विमानतळावर आणि कोल्हापुरात अंत्यसंस्कार झाले तेव्हा मा. मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी ह्यांनी जी सरकारी अनास्था दाखविली, त्यामुळे एकूणच भाजप सरकारच्या संवेदनशिलतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिलंय!

एकूणच समाजातील दुभंगलेली मानसिकता कॉम्रेड पानसरेंच्या निघृण हत्येने फेसबुकवरही ठळकपणे प्रदर्शित होतेय. एका मोठ्या समाजघटकाची एकूणच संवेदनशीलता हरवल्याचे धक्कादायक वास्तव पुन्हा समोर येतेय. एकीकडे ह्या समाजसुधारकांच्या निघृण हत्येने स्तब्ध झालेला समाज आणि त्या समाजातील पुरोगामी, सेकुलर, परिवर्तनवादी, विवेकवादी विचाराचे बुद्धिमंत. तर दुसरीकडे त्या भ्याड हल्ल्यांच्या निषेधावरच आक्षेप घेणारा एक समाज आणि त्यांचे पुरोगामी, सेकुलर अशा शब्दांवरच फुली मारणारे उजव्या विचाराचे बुद्धिमंत, असं समूळ दुभंगलेलं समाजचित्र स्पष्टपणे पाहता येईल.

कॉम्रेड पानसरे ह्या विशिष्ठ समाजाच्या 'धार्मिक भावना' दुखावत होते असा एकंदरीत पलीकडचा सूर आहे. डॉ. दाभोळकर हत्येच्या वेळीही त्या प्रवृत्तीने असंच मतप्रदर्शन मांडलं होतं. खरंतर भारतीय राज्यघटनेतील समाजवाद, धर्मनिरपेक्षता, वैज्ञानिक दृष्टिकोण या मूल्यांचा प्रचार, प्रसार करण्याचे काम हे पुरोगामी, परिवर्तनवादी नेते, कार्यकर्ते समाजाच्या भल्यासाठीच करीत असतात. त्यांनी कुणाच्या धर्मावर आक्रमण केले नाही कि धर्मिक बाबीत हस्तक्षेप केला नाही. पण त्यांच्या समाज जागृतीच्या घटनात्मक कार्याने कुणाच्या 'धार्मिक भावना' वगैरे दुखावल्याचा प्रपोगंडा पलीकडल्या समर्थकांमध्ये पसरवला जात असेल तर ते त्यांचंच दुर्दैव आहे.

ही ज्ञानी मंडळी त्यांच्या विचारसरणीच्या समाजाला कोणते बाळकडू पाजणार आणि त्यातून कोणती विषवल्ली निपजणार ते वेगळं सांगायला नको. विचारवंतानी साहित्यातून निकोप समाजमनाच्या दृष्टीने तरी राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून समाजाचं दिग्दर्शन करायचं कि समाजाची वैचारिक दिशाभूल करावी? आणि मुळातच त्या विध्वंसक प्रवृत्तीचं एकतर सर्रास उदात्तीकरण करून किंवा छुपी वकिली करून एका विकृतीला पाठीशी घातलं जातेय, हे जास्त चिंताजनक नाही काय?

डॉ. दाभोळकरांच्या हत्येनंतर वर्षभरातच घडवलेली हि दुसरी निघृण हत्या. एकंच मोडस ओपरंडी दोन्ही हत्यांमध्ये वापरली गेली, हे तर उघड आहे. म्हणजे दोन्ही हत्यामागील सूत्रधार देखील एकंच असण्याची शक्यता तरी स्पष्ट दिसतेय. डॉक्टरांच्या हत्येवेळी वैयक्तिक वाद, जमिनीचे विवाद इत्यादी क्षुल्लक बाबींचा आधार घेणारे कॉ. पानसरेंच्या हत्येत टोल-राजकारणाकडे अंगुलीनिर्देश करू पाहतात. पण दोन्ही हत्येतील सुसूत्रता एकंच कॉमन मोटिव्ह असल्याकडेच लक्ष वेधू पाहतेय, त्याचं काय? दोन्ही प्रकरणातील ती एकसमानता म्हणजे दोन्ही समाजसेवकांनी धर्मांध कट्टरतावादी सनातनी प्रवृत्तीविरुद्ध उभा केलेला लढा, असंच सकृतदर्शनी दिसतंय.

अर्थातच, कॉ. पानसरेंच्या हत्येत ह्या सनातनी प्रवृत्तींचा हात असण्याची स्पष्ट प्रतिक्रिया समाजामध्ये पुन्हा उमटली. त्यावर विरोधी बाजूची नकारात्मक सनातनी मानसिकता देखील पुन्हा उघड झाली. त्यातून असल्या भ्याड हल्ल्यांचे हेतुपुरस्सर छुपे समर्थनच केले जाते हे पुन्हा स्पष्ट झाले. कॉम्रेड पानसरेंवर हल्ला झाल्यावर सनातनी नथुरामि प्रवृत्तीविरुद्धवर टीकेची पुन्हा झोड उठल्याने काहींचा पारंपारिक पोटशूळ जागा झाला. ह्या मंडळींची संवेदनशिलताच मरून गेली कि काय असा प्रश्न पडतो. दाभोळकरांपासून पानसरेंपर्यंत दिवसढवळ्या जे खून पडल्यात त्याची दाहकता तीव्रतेने गांधीहत्येची आठवण करून देते, हे साहजिकच आहे.

धर्मांध कट्टरतावादी आणि त्यांच्या टार्गेटवर असलेले समाजसेवक ह्यांचे ऐतिहासिक वैर उघड आहे. ह्या लढ्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा विस्तृत कालखंड आहे. गांधीहत्येच्याही (आणि नथुरामाच्याही) पलीकडे त्याची सनातन पाळेमुळे पसरली आहेत. गांधींच्या खुनाप्रमाणेच दाभोळकरांपासून पानसरेंपर्यंत हल्लेखोरांनी वयोवृद्ध समाजसेवकांवर भ्याड खुनी हल्ले केल्याने त्या संदर्भात नथुराम आठवणे स्वाभाविकच आहे. उलटपक्षी गांधींचा लढा इंग्रजांसारख्या खऱ्या अर्थाने सुसंस्कृत शत्रूशी होता आणि म्हणूनच इंग्रजांची पाठ पडताच लगोलग आपल्या महान भारतीय संस्कृतीच्या गांडूबगीच्यात त्या महात्म्याची हत्या झाली, असंच म्हणावे लागेल. आज आपण तद्दन रानटी लोकांच्या तालिबानी संस्कृतीत वावरतोय आणि विन्स्टन चर्चिलने स्वातंत्र्य देताना आपलं जे मुल्यांकन केलं होतं त्याची वास्तविकताच आपण सिद्ध करतोय.

एकंदरीत आपलं कठीण आहे, मितंरों... आपले खड्डे आपणच खोदतोय. असो.
सबको सन्मति दे भगवान...!

Wednesday, 18 February 2015

तंबाखूजन्य कॅन्सर: एक चर्चा

तंबाखू, गुटखा, सिगारेट आणी तत्सम तंबाखूजन्य व्यसनांमुळे समाजाचे प्रचंड नुकसान होत आहे. कॅन्सरसारख्या दुर्धर रोगांना सामान्य लोकच नव्हे तर राजकीय नेतेही बळी पडत आहेत. म्हणून तंबाखूवर बंदी घालायची मागणी होत आहे. पण पुढे काय?

१०-१२ वर्षापूर्वीची घटना. भाटवडेकर नावाचे माझे मित्र आहेत. आम्ही एका प्रोजेक्टवर काम करत होतो. त्यांच्या पार्ल्यातल्या घरी नेहमी भेटत असू. तेव्हा त्यांनी सांगितलेली गोष्ट. त्यांचा एक जवळचा आप्त कॅन्सरग्रस्त झाला होता. बिच्चारा दिवसभर खुर्चीवर शांत बसून असे... नि:शब्द ! का? तर म्हणे त्याचं स्वरयंत्रच काढून टाकावं लागलं. घशाचा कॅन्सर होता आणि नेमका स्वरयंत्रावरच पसरला होता, वगैरे. पण महत्वाची गोष्ट हि, कि त्या सद्गुणी माणसाने आयुष्यात कधी तंबाखू, सिगारेट वगैरेना स्पर्शहि केला नव्हता. साधा सज्जन पापभिरू देवाधर्मातला माणूस, जो कधी दारूलाहि शिवला नव्हता. उदाहरणार्थ सुपारीच्या खांडाचंही व्यसन नसलेला सच्छील माणूस. 
वरील प्रकरचा कॅन्सर तंबाखू मुळे झाला नव्हता हे खरे असले तरीही कॅन्सर किंवा कर्करोग आणि तंबाखू ह्यांचा घनिष्ठ संबंध आहेच. बर्याच प्रकारचे कॅन्सर तंबाखूमुळे होतात आणि त्यावर तंबाखूजन्य व्यसने टाळणे हाच उपाय आहे.
महत्वाची गोष्ट ही गुटखा, तंबाखू, सिगारेट, मशेरी, इत्यादी व्यसने सहज उपलब्ध होणारी आहेत. अगदी कोणत्याही रस्त्याच्या बाजूला टपरीवर सिगारेट ४-५ रुपयात मिळते. (आता जरा महागली आहे.) त्यातही सहज चाळा (स्टाइल) म्हणून ओढणारेच अधिक असतात. चेनस्मोकर्स नावाचे अट्टलसिगरेटी हा एक वेगळा उच्चभ्रू वर्ग असतो. ते ग्रेट लोक्स असतात.  

पण डोक्याला चालना मिळावी म्हणून सिगारेट मारणारे बहुधा हौशी कलाकारच अधिक असतात. सॉफ्टवेअर, प्रोग्रामिंग, इंजिनियरिंग ह्या क्षेत्रातील मंडळी हटकून डोकं चालण्यासाठीच्या निमित्ताने सिगारेट मारताना दिसतील. थोड्याफार फरकाने तोच प्रकार बुद्धिजीवी, कलाकार, आदि मंडळीतही आणि इतरत्रही दिसेल. हा खरंतर फक्त त्या मानसिकतेचा पगडा असतो. बहुधा काहीतरी शुल्लक टाईमपास म्हणून सिगारेट हातात येते. त्याजागी कटिंग, चहा, कॉफी, चुइंगगम असलं काहीही चालू शकते. मध्यंतरी लंचनंतर सिगरेटची सवय लागली होती. सवयच ती... सोडली. आता बाहेर जाऊन टपरीवरचा कटिंग मारतो. सिगरेट आठवतदेखील नाही.
तंबाखू, बिडी, इ. प्रकार अंगमेहनतीची कामे करणारा शेतमजूर, कामगार वर्गामध्ये जास्त आढळतात. तर मशेरी गावाकडच्या स्त्रियामध्ये प्रचलित असते. गुटखा हा प्रकार मात्र ग्रामीण-शहरी असल्या सीमारेषा पलीकडचा आहे. खर्रा, मावा, पान हे तंबाखूजन्य पदार्थांचे आणखी काही नमुने. आपल्या तंबाखूची आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा अशी कि आमचे काही मित्र परदेशात जाताना अगदी आठवणीने तंबाखूच्या पुड्या सोबत घेऊन जातात, तिकडे पंचाईत नको म्हणून.  

तंबाखू आणि दारू हि दोन्ही व्यसने असलेले लोक पुष्कळ आहेत. पण फक्त बियर किंवा फक्त सिगारेट अश्याही प्रकारात बरेच लोक येतात. पण "आयुष्यात कधीच दारूला शिवलो नाही" असं म्हणणार्या सिगरेटग्रस्तांपेक्षा "सिगरेटला स्पर्शही करीत नाही" म्हणणारे दारूबाज अधिक फायद्यात असल्याचं लक्षात येईल. तसंही सिगारेट मधून ओढणाऱ्याला कोणतं मोठं सुख मिळते?... तर दारूतून पिणाऱ्याला मिळणारं सुख वादातीत असतं...! असा अस्मादिकांचा अनुभव आहे.
दारू किंवा बियरचे दुष्परिणाम होत नाहीत असे नाही. अल्कोहोलच्या अतिसेवनाने लिव्हरवर घातक दुष्परिणाम होऊन अनेकांचे जीवन उध्वस्त होते. अकाली मृत्यू ओढवतो. पण मर्यादित मद्यसेवन शरीरास तेवढं घातक नाही. उलट मर्यादित तंबाखूसेवन किंवा मर्यादित सिगरेटओढ देखील तेवढंच कॅन्सरजन्य घातक ठरू शकते.

समजा, तंबाखू, सिगरेट, गुटखा आणि तत्सम कॅन्सरजन्य पदार्थ बंद करून त्याजागी ५ रु., १० रु. किमतीची बियरची पाऊच आपद्ग्रस्तांसाठी टपरीवर उपलब्ध करून देण्यात आली तर? किमान फावल्या वेळेत (किंवा कामाच्या वेळेतही ) काहीतरी टिवल्याबावल्या कराव्यात म्हणून टपरीवर सहज मिळणारी सिगारेट ओढणारी जी प्रवृत्ती आहे, तिला पायबंद घालता येईल? एका व्यसनाला दुसऱ्या व्यसनाने आळा घालण्याची हि शक्कल लढवून निदान कॅन्सरच्या विळख्यातून तरुण सुशिक्षित सिगरेटग्रस्त पिढीला तरी बाहेर काढता येईल???

Friday, 6 February 2015

" नही अंकल...नही अंकल...नही अंकल...": एका मोबाईलचोराची गोष्ट

परवाची गोष्ट. वसई रेल्वेस्टेशन . वेळ साधारण संध्या. ७ वा.

डहाणू लोकल ४ नंबरवर येत होती. मी एका मित्रासोबत गप्पा मारीत उभा होतो. सुशील मला रिलायन्सच्या नव्या इन्शुरन्सबद्दल सांगत होता. लोकल आल्यावर गर्दी उसळली. उतरणारे, चढणारे सगळ्यांचा झुंबडगुंता नेहमी होतो तसाच झाला. पहिल्या दरवाज्यात गर्दी जास्त दिसते म्हणून आम्ही मागच्या दरवाज्याकडे गेलो. सुशील चढला. मी चढत होतो. इतक्यात...काहीतरी विचित्र खुसफुस मला जाणवली. क्षणात शर्टच्या खिशाकडे लक्ष गेलं तर मोबाईल गायब! खालचे खिसे तपासले, पण मोबाईल इथे नव्हताच. दुसऱ्याच क्षणाला मागे पाहतो तर दरवाजातून त्या गर्दीत मिसळणारी एक टिपिकल संशयित व्यक्ती. हाच तो असावा... माझ्या सहाव्या कि कोणत्यातरी सेन्सने मला झटकन अलर्ट केलं. 

पुढच्याच क्षणाला मी ट्रेनमधून उतरून त्याच्या मागे. तो झपझप पुढे सटकण्याच्या प्रयत्नात. मी त्याला नजरेच्या टप्प्यात ठेवण्याच्या धडपडीत... जर मी धावतो किंवा ओरडतो तर कदाचित तो उडी मारून पलीकडे उभ्या असलेल्या दिवा लोकलकडे गायब होण्याची शक्यता... मागे वळूनही न पाहता काहीशा अधिरतेने तो जिन्याकडे वळाला.

इथेच त्याला गाठण्याची शक्यता होती कारण जिन्यावर गर्दी होती. धावत जात मी त्याच्यावर हात टाकला. तो गर्दीत अडकला होता. कॉलर पकडून बाहेर खेचला आणि हातातून प्लास्टिकची पिशवी कि काहीतरी काढली तर त्यात गुंडाळलेला माझा मोबाईल बाहेर आला. फक्त १०-१५ सेकंदाचा खेळ.

मागून सुशील धावत आलाच होता. गर्दी जमली. तो ओरडून सांगतोय, " नही अंकल, नही अंकल...." बस्स... दोनचार जणांनी त्याला पकडून पोलिसात देण्यासाठी वर जिन्यावर घेऊन गेले. अगदी १२-१३ वर्षाचा मुलगा होता. चांगल्या घरातला कि काय म्हणतात तश्यातला....

आम्ही परत तीच ट्रेन पकडली. आमच्या साठीच जणू जरा जास्तच थांबली होती. मध्ये येउन पाहतो तर त्या ५-१० सेकंदात त्याने मोबाईल स्विचऑफ केला होता. मधली पब्लिक म्हणाली कि मी चढलो तेव्हा माझ्या खांद्यावरून त्याने ती प्लास्टिकची पिशवी टाकली. त्यामुळे समोरच्यांना तो खिशातून मोबाईल काढतोय कि काय ते समजलेच नाही आणि ती खुसफुस मला जाणवली तोपर्यंत तो उतरून चालू पडला...

दोन क्षण मि विचार करीत बसतो किंवा ट्रेन मध्ये शोधाशोध करतो किंवा कॉल लाऊन पाहतो तर खेळ खल्लास... आजपर्यंत मुंबई मध्ये किंवा इतरत्र प्रवासात माझ्यावर कधीही कुणीही हात टाकला नव्हता. हे पहिल्यांदाच असं घडल्याने मीही धक्क्यात. कुणीतरी म्हणालं आज तुझ नशीब चांगलं होतं. कुणी म्हणालं त्याला पकडून पोलिसांकडे द्यायला हवं होतं कारण त्यांची टोळी कि ऱ्याकेट असते ते सापडलं असतं. कुणी म्हणलं मोबाईल गेला तर नुकसान होतं ते वेगळं; पण फोनबुक, डेटा, फोटो, इत्यादी महत्वाची माहिती गेल्याने मनस्ताप खूप होतो.

विरार आलं. भांबावलेला असूनही विजयी अविर्भावात मी घरी परतलो.

नंतर रात्री विचार करत होतो... स्साला आपण खिशातून ४० हजार रुपयांचा मोबाईल मिरवायचा आणि समोरून आमंत्रण द्यायचं शर्विलकबंधूना. कि एकीकडे आपण स्वत:च प्रचंड महागडे होत चाललोय आणि दुसरीकडे आर्थिक विषमतेच्या खाईत कोसळत चाललेल्या ह्या समाजाचा तो एक भरकटलेला प्रतिनिधी...? कोण होता तो? नावही नाहि विचारलं.. कुठे राहत असेल...?

" नही अंकल...नही अंकल...नही अंकल..." हा आवाज तीव्र होत जातो आणि नंतर कधीतरी मी सर्वकाही विसरून शेवटी झोपी जातो....