Sunday, 22 February 2015

आपले खड्डे आपणच खोदतोय : कॉम्रेड पानसरेंची हत्या


आणखी एका वयोवृद्ध तपोवृद्ध व्यक्तीवर भ्याडहल्ला. म्हाताऱ्या लोकांवर गोळ्या झाडण्याची आपली उज्ज्वल परंपराच आहे आणि असल्या हल्लेखोरांचे कायदा, सरकार, इ. मंडळी काही उपटू शकत नाही, हेदेखील दाभोळकर हत्येतून स्पष्ट झालंय. भेकडांना हिंसेचे आकर्षण असते असं म्हणतात, ते तंतोतंत खरं ठरवणारे भेकड आपल्या समाजात आहेत. हे भ्याड हल्लेखोर समाजातील वयोवृद्ध, निशस्त्र धुरिणांवर गोळ्या झाडून पळून जातात आणि हल्ल्याची जबादारी घेण्याची तात्विक बांधिलकी देखील ते दाखवू शकत नाहीत, हे त्यांच्या भेकडगिरीचे व्यवच्छेदक लक्षण आहे. त्या भ्याडपणातच त्यांच्या सनातन अपयशाचे रहस्य आहे.
विझल्या चितांचे निखारे धुमसत असताना अजून किती वधस्तंभ रक्त मागत उठणार आहेत? ...आणिअशा काळरात्रीत आयुष्याच्या मशाली पेटविण्याची आम्हाला जाग येत नसेल तर, कॉम्रेड पानसरे, माफ करा...आम्ही निद्रिस्त प्रेते आहोत. आमचा सूर्य अंधाराच्याच पखाली वाहणार आहे!
 
दुसरीकडे संवेदनशिलतेच्या मुद्द्यावरून मा. मुख्यमंत्री अडचणीत आल्याचे दिसते. कॉम्रेड कोल्हापुरात उपचार घेत होते तेव्हा ते सांगलीत असूनही त्यांना भेटू शकले नाहीत. तर, मुंबईत कॉम्रेडांची प्राणज्योत माळवली तेव्हा, नंतर विमानतळावर आणि कोल्हापुरात अंत्यसंस्कार झाले तेव्हा मा. मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी ह्यांनी जी सरकारी अनास्था दाखविली, त्यामुळे एकूणच भाजप सरकारच्या संवेदनशिलतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिलंय!

एकूणच समाजातील दुभंगलेली मानसिकता कॉम्रेड पानसरेंच्या निघृण हत्येने फेसबुकवरही ठळकपणे प्रदर्शित होतेय. एका मोठ्या समाजघटकाची एकूणच संवेदनशीलता हरवल्याचे धक्कादायक वास्तव पुन्हा समोर येतेय. एकीकडे ह्या समाजसुधारकांच्या निघृण हत्येने स्तब्ध झालेला समाज आणि त्या समाजातील पुरोगामी, सेकुलर, परिवर्तनवादी, विवेकवादी विचाराचे बुद्धिमंत. तर दुसरीकडे त्या भ्याड हल्ल्यांच्या निषेधावरच आक्षेप घेणारा एक समाज आणि त्यांचे पुरोगामी, सेकुलर अशा शब्दांवरच फुली मारणारे उजव्या विचाराचे बुद्धिमंत, असं समूळ दुभंगलेलं समाजचित्र स्पष्टपणे पाहता येईल.

कॉम्रेड पानसरे ह्या विशिष्ठ समाजाच्या 'धार्मिक भावना' दुखावत होते असा एकंदरीत पलीकडचा सूर आहे. डॉ. दाभोळकर हत्येच्या वेळीही त्या प्रवृत्तीने असंच मतप्रदर्शन मांडलं होतं. खरंतर भारतीय राज्यघटनेतील समाजवाद, धर्मनिरपेक्षता, वैज्ञानिक दृष्टिकोण या मूल्यांचा प्रचार, प्रसार करण्याचे काम हे पुरोगामी, परिवर्तनवादी नेते, कार्यकर्ते समाजाच्या भल्यासाठीच करीत असतात. त्यांनी कुणाच्या धर्मावर आक्रमण केले नाही कि धर्मिक बाबीत हस्तक्षेप केला नाही. पण त्यांच्या समाज जागृतीच्या घटनात्मक कार्याने कुणाच्या 'धार्मिक भावना' वगैरे दुखावल्याचा प्रपोगंडा पलीकडल्या समर्थकांमध्ये पसरवला जात असेल तर ते त्यांचंच दुर्दैव आहे.

ही ज्ञानी मंडळी त्यांच्या विचारसरणीच्या समाजाला कोणते बाळकडू पाजणार आणि त्यातून कोणती विषवल्ली निपजणार ते वेगळं सांगायला नको. विचारवंतानी साहित्यातून निकोप समाजमनाच्या दृष्टीने तरी राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून समाजाचं दिग्दर्शन करायचं कि समाजाची वैचारिक दिशाभूल करावी? आणि मुळातच त्या विध्वंसक प्रवृत्तीचं एकतर सर्रास उदात्तीकरण करून किंवा छुपी वकिली करून एका विकृतीला पाठीशी घातलं जातेय, हे जास्त चिंताजनक नाही काय?

डॉ. दाभोळकरांच्या हत्येनंतर वर्षभरातच घडवलेली हि दुसरी निघृण हत्या. एकंच मोडस ओपरंडी दोन्ही हत्यांमध्ये वापरली गेली, हे तर उघड आहे. म्हणजे दोन्ही हत्यामागील सूत्रधार देखील एकंच असण्याची शक्यता तरी स्पष्ट दिसतेय. डॉक्टरांच्या हत्येवेळी वैयक्तिक वाद, जमिनीचे विवाद इत्यादी क्षुल्लक बाबींचा आधार घेणारे कॉ. पानसरेंच्या हत्येत टोल-राजकारणाकडे अंगुलीनिर्देश करू पाहतात. पण दोन्ही हत्येतील सुसूत्रता एकंच कॉमन मोटिव्ह असल्याकडेच लक्ष वेधू पाहतेय, त्याचं काय? दोन्ही प्रकरणातील ती एकसमानता म्हणजे दोन्ही समाजसेवकांनी धर्मांध कट्टरतावादी सनातनी प्रवृत्तीविरुद्ध उभा केलेला लढा, असंच सकृतदर्शनी दिसतंय.

अर्थातच, कॉ. पानसरेंच्या हत्येत ह्या सनातनी प्रवृत्तींचा हात असण्याची स्पष्ट प्रतिक्रिया समाजामध्ये पुन्हा उमटली. त्यावर विरोधी बाजूची नकारात्मक सनातनी मानसिकता देखील पुन्हा उघड झाली. त्यातून असल्या भ्याड हल्ल्यांचे हेतुपुरस्सर छुपे समर्थनच केले जाते हे पुन्हा स्पष्ट झाले. कॉम्रेड पानसरेंवर हल्ला झाल्यावर सनातनी नथुरामि प्रवृत्तीविरुद्धवर टीकेची पुन्हा झोड उठल्याने काहींचा पारंपारिक पोटशूळ जागा झाला. ह्या मंडळींची संवेदनशिलताच मरून गेली कि काय असा प्रश्न पडतो. दाभोळकरांपासून पानसरेंपर्यंत दिवसढवळ्या जे खून पडल्यात त्याची दाहकता तीव्रतेने गांधीहत्येची आठवण करून देते, हे साहजिकच आहे.

धर्मांध कट्टरतावादी आणि त्यांच्या टार्गेटवर असलेले समाजसेवक ह्यांचे ऐतिहासिक वैर उघड आहे. ह्या लढ्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा विस्तृत कालखंड आहे. गांधीहत्येच्याही (आणि नथुरामाच्याही) पलीकडे त्याची सनातन पाळेमुळे पसरली आहेत. गांधींच्या खुनाप्रमाणेच दाभोळकरांपासून पानसरेंपर्यंत हल्लेखोरांनी वयोवृद्ध समाजसेवकांवर भ्याड खुनी हल्ले केल्याने त्या संदर्भात नथुराम आठवणे स्वाभाविकच आहे. उलटपक्षी गांधींचा लढा इंग्रजांसारख्या खऱ्या अर्थाने सुसंस्कृत शत्रूशी होता आणि म्हणूनच इंग्रजांची पाठ पडताच लगोलग आपल्या महान भारतीय संस्कृतीच्या गांडूबगीच्यात त्या महात्म्याची हत्या झाली, असंच म्हणावे लागेल. आज आपण तद्दन रानटी लोकांच्या तालिबानी संस्कृतीत वावरतोय आणि विन्स्टन चर्चिलने स्वातंत्र्य देताना आपलं जे मुल्यांकन केलं होतं त्याची वास्तविकताच आपण सिद्ध करतोय.

एकंदरीत आपलं कठीण आहे, मितंरों... आपले खड्डे आपणच खोदतोय. असो.
सबको सन्मति दे भगवान...!

No comments:

Post a Comment