Friday, 6 February 2015

" नही अंकल...नही अंकल...नही अंकल...": एका मोबाईलचोराची गोष्ट

परवाची गोष्ट. वसई रेल्वेस्टेशन . वेळ साधारण संध्या. ७ वा.

डहाणू लोकल ४ नंबरवर येत होती. मी एका मित्रासोबत गप्पा मारीत उभा होतो. सुशील मला रिलायन्सच्या नव्या इन्शुरन्सबद्दल सांगत होता. लोकल आल्यावर गर्दी उसळली. उतरणारे, चढणारे सगळ्यांचा झुंबडगुंता नेहमी होतो तसाच झाला. पहिल्या दरवाज्यात गर्दी जास्त दिसते म्हणून आम्ही मागच्या दरवाज्याकडे गेलो. सुशील चढला. मी चढत होतो. इतक्यात...काहीतरी विचित्र खुसफुस मला जाणवली. क्षणात शर्टच्या खिशाकडे लक्ष गेलं तर मोबाईल गायब! खालचे खिसे तपासले, पण मोबाईल इथे नव्हताच. दुसऱ्याच क्षणाला मागे पाहतो तर दरवाजातून त्या गर्दीत मिसळणारी एक टिपिकल संशयित व्यक्ती. हाच तो असावा... माझ्या सहाव्या कि कोणत्यातरी सेन्सने मला झटकन अलर्ट केलं. 

पुढच्याच क्षणाला मी ट्रेनमधून उतरून त्याच्या मागे. तो झपझप पुढे सटकण्याच्या प्रयत्नात. मी त्याला नजरेच्या टप्प्यात ठेवण्याच्या धडपडीत... जर मी धावतो किंवा ओरडतो तर कदाचित तो उडी मारून पलीकडे उभ्या असलेल्या दिवा लोकलकडे गायब होण्याची शक्यता... मागे वळूनही न पाहता काहीशा अधिरतेने तो जिन्याकडे वळाला.

इथेच त्याला गाठण्याची शक्यता होती कारण जिन्यावर गर्दी होती. धावत जात मी त्याच्यावर हात टाकला. तो गर्दीत अडकला होता. कॉलर पकडून बाहेर खेचला आणि हातातून प्लास्टिकची पिशवी कि काहीतरी काढली तर त्यात गुंडाळलेला माझा मोबाईल बाहेर आला. फक्त १०-१५ सेकंदाचा खेळ.

मागून सुशील धावत आलाच होता. गर्दी जमली. तो ओरडून सांगतोय, " नही अंकल, नही अंकल...." बस्स... दोनचार जणांनी त्याला पकडून पोलिसात देण्यासाठी वर जिन्यावर घेऊन गेले. अगदी १२-१३ वर्षाचा मुलगा होता. चांगल्या घरातला कि काय म्हणतात तश्यातला....

आम्ही परत तीच ट्रेन पकडली. आमच्या साठीच जणू जरा जास्तच थांबली होती. मध्ये येउन पाहतो तर त्या ५-१० सेकंदात त्याने मोबाईल स्विचऑफ केला होता. मधली पब्लिक म्हणाली कि मी चढलो तेव्हा माझ्या खांद्यावरून त्याने ती प्लास्टिकची पिशवी टाकली. त्यामुळे समोरच्यांना तो खिशातून मोबाईल काढतोय कि काय ते समजलेच नाही आणि ती खुसफुस मला जाणवली तोपर्यंत तो उतरून चालू पडला...

दोन क्षण मि विचार करीत बसतो किंवा ट्रेन मध्ये शोधाशोध करतो किंवा कॉल लाऊन पाहतो तर खेळ खल्लास... आजपर्यंत मुंबई मध्ये किंवा इतरत्र प्रवासात माझ्यावर कधीही कुणीही हात टाकला नव्हता. हे पहिल्यांदाच असं घडल्याने मीही धक्क्यात. कुणीतरी म्हणालं आज तुझ नशीब चांगलं होतं. कुणी म्हणालं त्याला पकडून पोलिसांकडे द्यायला हवं होतं कारण त्यांची टोळी कि ऱ्याकेट असते ते सापडलं असतं. कुणी म्हणलं मोबाईल गेला तर नुकसान होतं ते वेगळं; पण फोनबुक, डेटा, फोटो, इत्यादी महत्वाची माहिती गेल्याने मनस्ताप खूप होतो.

विरार आलं. भांबावलेला असूनही विजयी अविर्भावात मी घरी परतलो.

नंतर रात्री विचार करत होतो... स्साला आपण खिशातून ४० हजार रुपयांचा मोबाईल मिरवायचा आणि समोरून आमंत्रण द्यायचं शर्विलकबंधूना. कि एकीकडे आपण स्वत:च प्रचंड महागडे होत चाललोय आणि दुसरीकडे आर्थिक विषमतेच्या खाईत कोसळत चाललेल्या ह्या समाजाचा तो एक भरकटलेला प्रतिनिधी...? कोण होता तो? नावही नाहि विचारलं.. कुठे राहत असेल...?

" नही अंकल...नही अंकल...नही अंकल..." हा आवाज तीव्र होत जातो आणि नंतर कधीतरी मी सर्वकाही विसरून शेवटी झोपी जातो....

No comments:

Post a Comment