Saturday, 16 September 2017

'चकटफू घबाडाची फुकटेगिरी' हेच मोदी सरकारचे व्हिजन

' बिनलाभाच्या घबाडाचे सरकार' वगैरे नावाचा लेख माजी अर्थमंत्री चिदंबरम ह्यांनी दोनेक वर्षाआधी लिहिला होता. क्रूड ऑईलच्या घसरत्या बाजारभावामुळे मोदीसरकारच्या तिजोरीत सुमारे दोन-अडीच लाख कोटींचे 'घबाड' वर्षाकाठी जमा होते, त्याबद्दल. आजही दोन वर्षांनंतर पेट्रोल ८० रुपयाच्या वरती आणि क्रूड ऑइल मात्र ५० डॉलरच्या आसपास हेच चित्र कायम आहे त्याचे कारण म्हणजे ते 'घबाड' होय. मोदी सरकाराच्या पायगुणाने ते घबाड लाभले असे दस्तुरखुद्द माननीय मोदीजींचं वक्तव्य आहे. तर सुरुवात अशी इथून झाली.

त्यांनतर चार-पाच लाख कोटींचे घबाड नोटबंदीमुळे हाती लागेल अशी महत्वाकांक्षी योजना मोदीसरकारने आखली. ती काही फलद्रुप होताना दिसत नाही असे स्पष्ट होताच तीन लाख कोटींचे घबाड बँकेत जमा झालेल्या 'सस्पिशियस' खात्यांतुन उकळता येईल काय ह्याकडे घबाडयांचे लक्ष वळले. म्हणजे तसे मा. मोदीजी स्वतः:च अलीकडे लाल किल्लेकि प्राचिरसे राष्ट्राला संबोधताना म्हणाले. जगातले आजवरचे सर्वोत्कृष्ठ अर्थमंत्री असलेले अरुण जेटली म्हणाले कि सुमारे एक लाखाचा जिएसटी पहिल्याच महिन्यात जमा झाला, हेही एक घबाडच, कारण प्रत्त्येक घबाडाची जाहिरात करायची सरकारची एक विशिष्ठ पद्धत आहे त्यात हेही बसते. आजची बातमी अशी आहे कि जीएसटीच्या ९५ हजार कोटी महसुलापैकी ६५ हजार कोटी 'इनपुट क्रेडिट' च्या रूपात करदात्यांना परतावा मिळणार आहे. गेलं हेही घबाड बोंबलत! शेवटी आदरणीय महामहिम प्रधानसेवक जपान कडून बुलेट ट्रेनही फक्त पॉईंट वन पर्सेंटच्या व्याजाने म्हणजे खरंतर 'फुक्कटच' मिळणार आहे असे कालच अहमदाबादेतून राष्ट्राला उद्देशून म्हणले. ह्यावर लोकसत्ताने 'महान फुकटेगिरी' नावाचा अग्रलेख लिहिलाय. एकूण 'चकटफू घबाडाची फुकटेगिरी' हे मोदीसरकारचे आजवरचे ठळक वैशिष्ट्यच.

अलीकडे जिएस्टीच्या जगड्व्याळ फाइलिंगच्या व्यापाने वैतागून आधीच्या दीडशे क्लाएंट पैकी फक्त पन्नासएक क्लाएंटचेच काम सध्या पाहत असेलला एक टॅक्स कन्सल्टन्ट भेटला होता. पूर्वाश्रमीचा पक्का मोदीभक्त. तीन वर्षांपूर्वी मोदींसाठी त्यांच्या गुजरात मॉडेलचे महत्व दिसेल त्याला भेटेल तिथे सांगत फिरणारा. आज अगदीच मेटाकुटीला येऊन 'ह्यांना काही व्हिजनच नाही.." वगैरे बोलत होता.
तर मित्रो 'चकटफू घबाडाची फुकटेगिरी' हेच मोदी सरकारचे व्हिजन होय हे त्याला मी आता सांगणार आहे!

No comments:

Post a Comment