Saturday, 26 April 2014

मतदानाचा एक दिवस

पहाटे साडेचार वाजता उठणे म्हणजे माझ्या सारख्या सूर्य-पूजकाला मोठे आव्हान होते. प्रीतीची मतदान केंद्र-अधिकारी म्हणून नेमणूक झाल्याने हे आव्हान उभे राहिले होते. साडेपाच वाजता नाला सोपारा विभागातील आचोळे गावातील शाळेत प्रीतीला पोहोचायचे होते. नाला सोपारा स्टेशन पर्यंत तिला इतर निवडणूक अधिकाऱ्यांसोबत सोडून परत फिरलो. घरी येउन पुन्हा ताणून दिली.

तासभर झोप काढून केळवा रोडला जायची तयारी सुरु केलि. तिथे मामाकडे लग्न आहे. तिथून आमच्या खार्डी गावात जाऊन मतदानहि करायचे होते. ११ ची डहाणू लोकल पकडण्यासाठी विरार रेल्वे स्टेशन मध्ये पोहोचलो. ट्रेन अजून आली नव्हती. ओव्हर ब्रिज वरील गर्दी पाहून सब-वे कडे मोर्चा वळविला. त्या अंधार्या सबवे मधून बाहेर पडत असताना पायरी जवळ एक कुत्रा शांत झोपल्याचे पहिले. त्याच्याकडे पाहत पायऱ्या चढत होतो...काहीतरी चुकल्यासारखे वाटले. तो शांत झोपला नव्हता...निपचित पडला होता! जखमी आणि असहाय्य!

अरेरे...बिच्चारा...हा काही जगात नाही आता असे मनात आले. कुत्तेकी मौत!
'कुत्तेका पिल्ला' गाडीखाली आला तरी मनाला चटका बसणारा आपला संवेदनशील समाज हि उगाच आठवला!

मी फलाटावर आलो. पाच मिनिटात ट्रेन येणार होती. मला लोकशाहीतील महत्वपूर्ण मताधिकार पार पाडण्यासाठी जायचे होते. जागृत नागरिक असल्याचे कर्तव्य बजावायचे होते. एव्हाना मित्रांची मतदाने आटपून फेसबुकवर फोटोही अपलोड झाले होते! साला आपल्याला का हे वेळेवर काम करणं जमत नाही?

लोकशाही, निवडणूक, मतदान ह्याचे विचार डोक्यात घुमत असताना मनाच्या कोपर्यातून पुन्हा त्या असहाय कुत्र्याची वेदना उफाळली.
काय होईल त्याचं? जगेल कि मरेल? आपण काय करू शकतो?
काहीतरी करायला पाहिजे!

पावले पुन्हा सबवे च्या दिशेने वळली. तो गलितगात्र कृष्णवर्णी श्वानराज तसाच पडून होता. जवळ जाऊन परिस्थिती पहिली. अवघड जागी झालेली दुर्धर जखम पार चिघळली होती. नाकाच्या वर झालेल्या जखमेने एव्हाना एक डोळाहि जायबंदी केला होता. अशा अवघड जागी झालेल्या जखमेने बिच्चारा काळूराम अगदीच निकामी होऊन गेला होता. थोबाड पोखरून त्याचा ताबा परजीवी किड्यांनी घेतला होता! किती दुर्दैवी असहाय्यता!

क्षणभरात मी निर्णय घेतला. माणुसकीने नागरिक शास्त्रावर मत केली. मी ट्रेन सोडली. सबवे मधून सरळ  विरार पश्चिमेला बाहेर पडलो. उन्हाळा मी म्हणत होता.
छ्या...निवडणुका मार्चमध्ये घ्यायला हव्या होत्या...

घामाघुम होऊन दोन तीन मेडिकल स्टोर पालथी घातली तेव्हा कुठे एक औषधी स्प्रे उपलब्ध झाला. २०० रुपयात काम झाले. पुन्हा स्टेशन गाठले. सब वे कडे आलो. काळूराम निपचित पडून होता. जवळ जाऊन त्याच्या जखमेवर स्प्रे फवरला! तो तिरमिरून उठला आणि पळू लागला. मी त्याचा पाठीमागे...पायऱ्या चढून तो बाहेर पडत होता तोपर्यंत मी पुन्हा-पुन्हा स्प्रे फवारला. तो बाहेर पडून रोडच्या कडेला गेला. तिथेही जाऊन शक्य तेवढा स्प्रे वापरला. बस्स...!

अजून जास्त काही करणे शक्य नव्हते. मी परतलो. सबवेतून स्टेशनवर आलो. साडे अकराची शटल लागली होती. फर्स्ट क्लास मध्ये शिरलो. घामाने शर्ट ओलाचिंब झाला होता आणि नखशिखांत भिजलो होतो. पाण्याने स्वच्छ हात, चेहरा धुवून बसलो.

वाचेल का तो? माझा प्रयत्न किती अपुरा होता! त्याची गरज खरतर फार मोठी होती. मी शक्य तेवढी मदत केली होती. तो वाचायला हवा!

क्षणभर मनात विचार आला... किती रुबाबदार आणि इमानदार प्राणी...कुत्रा! परंतु किती भयानक असहाय्यता!

लोकशाहीलाही कुणीतरी लुत-भरल्या कुत्र्याची उपमा दिली आहे!

देशाच्या लोकशाहीची तरी काय वेगळी परिस्थिती आहे? तिलादेखील किती पोखरून टाकली आहे! हा देश अशाच परपोशी किड्यांनी पोखरून टाकला आहे. पार घायकुतीला आला आहे. अगदी असहाय्य आहे...काळूराम सारखाच.

धर्मांध दंगलखोरी, भ्रष्टाचार, सामाजिक-आर्थिक विषमता, गरिबी-बेकारी, कुपोषण, आतंकवाद, इ. समस्यांनी आमच्या लोकशाहीच्या इमानदार कुत्र्याला खल्लास केले आहे. खरतर भारतीय लोकशाही हि एखाद्या अवाढव्य हत्तीप्रमाणे आहे. परंतु अवघड जागी झालेल्या दुर्धर जखमांनी हा हत्ती जराजर्जर झाला आहे.

क्षुद्र आणि घाणेरड्या किड्यांनी त्या हत्तीच्या शरीरात त्यांच्या किळसवाण्या वस्त्या उभ्या केल्या आहेत. तरीही त्या किड्यांना पिढ्या-न-पिढ्या आपल्या शरीरावर पोसून हा हत्ती वणवण करतोय.
चला...इथेही आपल्याला स्प्रे मारायला हवा. व्होटिंग मशीनवर बटन दाबून मी तो स्प्रे मारू शकतो!

लोकशाहीच्या अंगावरील चिघळत्या जखमेत दडून बसलेल्या धर्मांध दंगलखोर किड्यांवरती तो स्प्रे मारायला हवा.

केळवा रोडला पोहोचलो. लग्नाची तयारी पहिली. दुपारी रणरणत्या उन्हाची काहिली संपून सूर्य पश्चिमेला ढळला आणि आम्ही निघालो. मतदान केंद्रावर साडेपाच वाजता पोहोचलो आणि बटन दाबले. लोकशाही, धर्म-निरपेक्षता, स्वातंत्र्य-समता-बंधुता, राज्यघटना ह्यांना साक्षी ठेऊन मतदान केले. स्प्रे मारल्याचे समाधान मिळाले!

माझ्या स्प्रे मुळे परजीवी घाणेरडे किडे मारतील का? चिघळलेली जखम बरी होईल? अशा किती जखमा लोकशाहीच्या हत्तीच्या किंवा इमानदार कुत्र्याच्या अवघड जागी चिघळून राहिल्या आहेत. किळसवाण्या किड्यांच्याही वस्त्या नव्हे सरंजामशाह्या लोकशाहीच्या जखमेत नांदत आहेत. माझा स्प्रे त्या परजीवी किड्यांचा किती बंदोबस्त करणार? हे प्रश्न अनुत्तरीत आहेत. परंतु काळूराम असेल किंवा लोकशाहीचा हत्ती असेल, दोघानाही आज माझ्या स्प्रेची गरज होती. ते कर्तव्य पार पडल्याचे समाधान माणूस म्हणून, नागरिक म्हणून, मला मिळाले!


हेही वाचा: वाघ्याचा टायगर व्हायला हवा!

Saturday, 5 April 2014

लाभार्थी असूनही असंतुष्ट आणि म्हणून लोभार्थी असलेलेला नव्या मध्यमवर्गाचा वर्ग

गेल्या १० वर्षात हि जी अत्याधिक हिंस्त्र मानसिकता समाजात निर्माण झाली आहे त्याला समाजातील तथाकथित नवश्रीमंत आणि अभिजनवर्ग जबाबदार आहे.

प्रचंड मोठ्या प्रमाणात मध्यमवर्ग आणि नवश्रीमंत वर्ग ह्या UPA सरकारच्या काळात झपाट्याने पुढे आला. औद्योगीकरण, मल्टीन्याशनल्स, इन्फ्रास्ट्रक्चर, कन्स्ट्रकशन, एन्टरटेनमेंट, हौस्पीटालिटी अशा नवनवीन क्षेत्रामध्ये मोठमोठी गुंतवणूक होऊन रोजगार-धंद्याच्या संधी उपलब्ध झाल्याने एक फार मोठा वर्ग कनिष्ठ मध्यमवर्गातून मध्यमवर्गात सरकल्याचे चित्र आहे. सहावा वेतन आयोग आल्याने सरकारी आणि निमसरकारी क्षेत्रातही हे नवश्रीमंतीचे संक्रमण दिसून येते.

ह्याचे आपण बहुजन-अभिजन अभिसरण असेही समाज शास्त्रीय भाषेत वर्णन करू शकतो.
परंतु हा जो नव अभिजन वर्ग समजत निर्माण झाला आहे त्याची मानसिकता ह्या १० वर्षात कोणत्या दिशेने गेली? ज्या काँग्रेस सरकारच्या काळात आपले सामाजिक उत्थान झाल्याचे त्यानाही दिसत आहे त्याबद्दल त्यांचे विचार काय आहेत? ह्याचे उत्तर अत्यंत नकारात्मक आहे. काँग्रेस सरकारला ठामपणे नाकारण्याची भूमिका घेऊन हाच नवश्रीमंत वर्ग आज मोदींच्या पाठीमागे उभा राहिल्याचे दिसते. म्हणजेच कॉंग्रेसची धर्म-निरपेक्षता अमान्य करून भाजपची धर्माधारित हिंदुराष्ट्रवादी भूमिका त्यांनी सोयीस्कर रित्या स्वीकारलेली दिसते. त्याचे प्रतिबिंब सोशल मिडीयावर आपल्याला पाहायला मिळते.

हा नव्या मध्यमवर्गाचा अत्यंत प्रभाव शाली असलेलेला वर्ग अशा प्रकारे लाभार्थी असूनही असंतुष्ट आणि म्हणून लोभार्थी होऊन जी नकारात्मक भूमिका समाजात घेत आहे त्याचे परखड विश्लेषण जेष्ठ पत्रकार विचारवंत कुमार केतकर ह्यांनी एका चर्चासत्रात केले आहे.

समाजशास्त्राप्रमाणे बहुजन-अभिजन हे जे अभिसरण होत असते त्यातून घडलेला जो अभिजनवर्ग आहे त्याने बहुजन वर्गापुढे आपल्या कर्तुत्वाने, विचाराने आदर्श निर्माण करावा जेणेकरून बहुजन वर्ग त्यांना अनुसरून वाटचाल करू शकेल; तरच ते अभिसरण यशस्वी होते.
अर्थातच हे नवे अभिसरण लौकिकार्थाने यशस्वी दिसत असले तरी ते सामाजिक दृष्ट्या अयशस्वी आणि धोकादायकही आहे असे म्हणवे लागेल.

Thursday, 3 April 2014

मिशन २०१४: UPA कि NDA ?

मा. शरद पवार साहेबानिदेखील भाजप क्रमांक १ चा पक्ष असेल असे विधान केले आहे. परंतु NDA ला बहुमत मिळत नाही हेदेखील त्यांनी सांगितले. मोदिसाहेब कोणत्याही परिस्थितीत दिल्लीत जात नाहीत असा त्याचा अर्थ आहे.
पवार साहेबांच्या ह्या विधानाचे विश्लेषण आकडेवारीच्या हिशेबात खालीलप्रमाणे करता येईल.

भाजप: १४५-१५५
काँग्रेस: १४०-१५०
UPA : १९०-२००
NDA : १७०-१८०

UPA आघाडीतील राष्ट्रवादी (NCP) आणि राष्ट्रीय जनता दल (RJD) ह्यांच्या महाराष्ट्र आणि बिहार मधील प्रत्येकी १५-२० अशा लक्षणीय यशामुळे UPA २००च्या घरात पोहोचत असल्याचे दिसते.

भाजपने जर राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेशात कॉंग्रेसचा क्लीन स्वीप केला तरच वरील विधान प्रत्यक्षात उतरू शकते हेदेखील लक्षात घ्यायला हवे. कॉंग्रेसने जर राजस्थान आणि मध्य प्रदेशात आपली शक्ती पणाला लावली तर मात्र भाजप १३०-१४० अशा क्रमांक २ वर फेकला जाईल हे निश्चित!

अशा परिस्थितीत कॉंगेस प्रणीत UPA आणि सपा, बसपा, डावी आघाडी, BjD, JDU, YSR, TRS, DMK , TMC , ई. स्थानिक पक्ष मिळून आघाडीचे सरकार बनवतील. धर्मनिरपेक्षता हाच मुद्दा लक्षात घेऊन मोदींच्या नेतृत्वाखालील सांप्रदायिकवादी भाजपला सत्तेपासून रोखाण्याचेच सर्वांचे प्रयत्न असतील. मोदींचे वादग्रस्त नेतृत्व हे भाजपच्या दृष्टीने अवघड जागेतले दुखणे ठरेल.
 

 विशेषत: कॉंग्रेसला जो फटका ह्या निवडणुकीत बसत आहे तो भाजपच्या प्रभावामुळे नव्हे तर कॉंग्रेसच्या स्वत:च्या धोरणात्मक चुकांमुळे बसत असल्याचे दिसून येते.

आंध्र प्रदेशात तेलंगण निर्मितीचे घोंगडे भिजत ठेवल्याने काँग्रेस अडचणीत आली. तत्पूर्वी जगन्मोहन रेड्डी ह्यांचे पिताश्री मुख्यमंत्री Y.S. राजशेखर रेड्डी ह्यांच्या अपघाती निधनानंतर आंध्रच्या नेतृत्वाविषयी घोळ घालून आणि जगन्मोहन कुटुंबियांना दुर्लक्षित ठेवल्याने काँग्रेस मध्ये उभी फुट पडून जगन्मोहन रेड्डींची YSR काँग्रेस अस्तित्वात आली. आज सिमान्ध्र मध्ये जगन्मोहन रेड्डी आणि चंद्राबाबू नायुडू अशी लढत असल्याने मागील निवडणुकीत ३३ जागा मिळवणारा काँग्रेस तेलंगाना मध्ये १०-१२ जागा मिळविण्याच्या खटपटीत अडकला आहे. कॉंग्रेसच्या मतविभाजनाचा फायदा तेलगु देसमला होऊन चंद्रबाबुना (NDA) १०-१५ जागांचे लक्षणीय यश मिळू शकते.

तमिळनाडूत द्रमुकच्या युतीमुळे मागी
निवडणुकीत ८ जागा कॉंग्रेसला मिळाल्या होत्या. परंतु द्रमुकने आघाडीतून अंग काढून घेतल्याने ह्यावेळी कॉंग्रेसला २-३ जागा मिळतील कि नाही अशी परिस्थिती आहे. दुसरीकडे भाजप ने स्थानिक छोट्या-छोट्या पक्षांची आघाडी स्थापन करून ७-८ जागा (NDA)च्या खिशात घातल्याचे चित्र आहे.

राजस्थान मध्ये मागील निवडणुकीत २० जागा मिळवल्यानंतर आणि कॉंग्रेसचे अशोक गेहलोत सरकार असूनही कॉंग्रेसला राज्यसरकारच्या वादग्रस्त प्रतिमेमुळे फटका पडून राज्य सरकार गमवावे लागले. ह्या निवडणुकीतही कॉंग्रेसला नुकसान आणि भाजपला फायदा असेच चित्र दिसत आहे.

हिंदुत्वाच्या राजकारणाचे गड असलेल्या मध्य प्रदेश आणि गुजरात मध्ये मागील निवडणुकीत १२ आणि ११ जागा मिळाल्या होत्या परंतु इथे मात्र मोदींच्या प्रभावामुळे इथे कॉंग्रेसला मोठा फटका पडू शकतो.

उत्तर प्रदेश आणि बिहार मध्ये भाजपला काही जागा (३०-४०) मिळतील परंतु ओपिनियन पोल दाखवीत असल्याप्रमाणे ७०-८० जागा कोणत्याही परिस्थितीत मिळणार नाहीत हेदेखील स्पष्ट झाले आहे.

युपी मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रीय लोक दल आघाडी १५-२० जागा जिंकू शकते. समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष मिळून ४०च्या आसपास जागा जिकू शकतात. म्हणजेच भाजपला २०-२५ पर्यंत मजल मारता येईल.

बिहारमध्ये काँग्रेस-RLD -NCP अशी आघाडी झाल्याने सर्वाधिक जागा त्यांना मिळताना दिसतात. भाजप आणि JDU ह्यांच्या मतविभाजनाचा सरळ फायदा होऊन RLD १५-२० जागा खिशात घालेल.
JDU आणि भाजपला अनुक्रमे ६-८ आणि ८-१२ जागांवर समाधान मानावे लागेल.

छत्तिसगढ आणि झारखंड मध्ये देखील कॉंग्रेसला फायदा होऊन भाजपच्या जागा कमी होतील.
केरळ आणि कर्नाटकात कॉंग्रेसला फायदा होताना दिसतो.
महाराष्ट्रात काँग्रेस -राष्ट्रवादी आघाडी ३०-३५ जागी विजयी होण्यासारखी परिस्थती असल्याचे दिसते. विशेषत: राष्ट्रवादीच्या जगामध्ये लक्षणीय वाढ होताना दिसते.

पंजाब, हरयाणा, हिमाचल, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर तसेच आसाम, ईशान्य भारत इथे सर्वसाधारण परिस्थिती राहील असे चित्र आहे. बंगाल आणि ओरिसा मध्ये देखील परिस्थिती सर्वसाधारण राहील.

एकूणच देशातील चित्र हे भाजप आणि कॉंग्रेसमध्ये लढत असल्याचे दिसत असले तरी सरकार बनविण्याच्या दृष्टीने UPA आणि धर्मनिरपेक्षतावादी इतर पक्ष ह्यांनाच प्राधान्य असल्याचे लक्षात येईल.

देशात जर कुणाची लाट कधीकाळी होती तर ती एकाच व्यक्तीची- इंदिरा गांधींची!

आपल्या देशात आजवर झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांत एखादी 'लाट' असल्याने कोणा एका पक्षाला दणदणीत विजयी बहुमत अलीकडे तरी कधीही मिळाले नाही.
ह्या देशात जर कुणाची लाट कधीकाळी होती तर ती एकाच व्यक्तीची- इंदिरा गांधींची! स्वातंत्र्योत्तर भारतातील एकमेव नेता!




१९८४ साली इंदिरा गांधींच्या हत्येनंतर जी लाट उसळली तेव्हा कॉंग्रेसने विक्रमी ४१६ जागा जिंकल्या.
१९८० साली जनता पार्टीचे अयशस्वी सरकार गडगडल्यावर इंदिरालाटेमध्ये कॉंग्रेसला ३७४ जागांचे प्रचंड बहुमत मिळाले होत
१९७१ साली इंदिरा गांधींच्या लाटेमध्ये 'गरिबी हटाव' च्या घोषणेत कॉंग्रेसने ३५२ जागा जिंकून बहुमत मिळविले.

१९७७ मध्ये देशात आलेल्या  'इंदिरा हटाव' च्या लाटेत काँग्रेस १५३ जागा मिळून पराभूत झाली. वादग्रस्त आणीबाणी आणि जयप्रकाशजींचे नेतृत्व ह्यामुळे विरोधकांनी एकत्र येउन स्थापन केलेल्या जनता पार्टीला २९८ जागांचे बहुमत मिळाले.  एका अर्थान तीही इंदिरा गांधींचीच (विरोधी) लाट होती असे म्हणावे लागेल.

इंदिरायुगानंतर म्हणजे १९८९ पासूनच्या निवडणुकांमध्ये कोणत्याही पक्षाची किवा नेत्याची कोणतीही लाट कधीही असल्याचे दिसत नाही. एकाच पक्षाला निर्विवाद बहुमत मिळण्याचे दिवसही इंदिरायुगाच्या अस्तानंतर इतिहासजमा झाले आणि आघाड्यांची खिचडी सरकारे अस्तित्वात आली.

सध्याच्या निवडणुकीतील मोदींची हवा किंवा मोदींची लाट हे तर निव्वळ थोतांड आहे.

डॉ. मनमोहन सिंग: जागतिक स्तरावर भारताला अग्रेसर करणारे पंतप्रधान




आपल्या देशात सलग १० वर्षे किंवा दोन टर्म देशाचे नेतृत्व करण्याचे भाग्य लाभलेले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि मनमोहन सिंग ह्यांची नावे घ्यावी लागतील.
२००४ ते २०१४ अशी १० वर्षांची प्रदीर्घ कारकीर्द पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग ह्यांच्या वाट्याला आली.

२००४ च्या निवडणुकीत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वाजपेयी सरकारचा पराभव करून काँग्रेस प्रणीत  UPA ने देशाची सूत्रे ताब्यात घेतली आणि २००९ मध्ये निर्णायक यश मिळवून दुसर्यांदा सरकार स्थापन केले.

२००४ मध्ये वाजपेयींसारखे लोकप्रिय पंतप्रधान आणि फील गुड, शायनिंग इंडिया, इ. जाहिरातबाजी तेव्हाही असूनदेखील लोकांनी काँग्रेस मध्ये विश्वास दाखविला. अडवाणींच्या नेतृत्वाला तर २००९ मध्ये देशातील जनतेने स्पष्टपणे नाकारले.

केंद्रात आघाड्यांचे सरकार स्थापन करून ते चालवायची मानसिकता ह्या काळात कॉंग्रेसने स्वीकारली हे देखील अत्यंत महत्वाचे आहे.

NDA सरकारच्या काळात१९९९-२००४ देशातील प्रगती आणि UPA  सरकारच्या काळात २००४-२००९ मध्ये झालेली प्रगती हि वार्षिक सकल उत्पन्नाच्या (GDP) आलेखावरून स्पष्ट होते.

२००९-२०१४ मध्ये देखील प्रगतीचा आलेख उंचावला परंतु जगभरातील मंदीचा फटका  देखील देशाच्या अर्थव्यवस्थेला बसला हे मान्य करावे लागेल. परंतु जगभरातील अर्थव्यवस्था कोलमडत असतानाही भारत टिकून राहिल्याचेही दिसून येईल.

मनमोहन सिंग ह्यांनीच नरसिंह राव सरकारमध्ये अर्थमंत्री असताना देशाला मुक्त अर्थव्यवस्थेचा मार्ग खुला करून दिला होता. त्याच मार्गावर जागतिक स्तरावर भारताला अग्रेसर करण्याचे महत्वपूर्ण कार्य पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग ह्यांनी आपल्या १० वर्षाच्या कारकिर्दीत पार पाडले.

अत्यंत मितभाषी आणि संवेदनशील व्यक्तिमत्वाच्या ह्या कर्तबगार पंतप्रधानाला टीकेचे लक्ष्य विरोधकांनी केले ते केवळ कॉंग्रेसला लक्ष्य करण्यासाठी!

पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग ह्यांचे योग्य मूल्यमापन भारतीय जनतेनेच करायला हवे.