Thursday, 26 March 2015

विश्वचषकातील भारतीय संघाच्या पराभवाचे गुन्हेगार कोण?

पोस्टमार्टेम रिपोर्ट
विश्वचषकातील भारतीय संघाच्या पराभवाचे गुन्हेगार कोण, हा आजचा कळीचा मुद्दा आहे. एकही सामना न हरणारी टीम इंडिया तब्बल १०० धावांनी का पराभूत झाली? त्याची कारणे तपासून पहिली तर काही चुका स्पष्ट दिसून येतात.

यादव-शमिने १० षटकात ५० धावा देऊन वॉर्नरचा महत्वाचा बळी घेऊन छान सुरुवात केली. पण नंतरच्या गोलंदाजांनी (अश्विन, जडेजा, मोहित) २० षटकांत फक्त गोलंदाजीच्या पाट्या टाकल्या. मधल्या ओव्हर्समध्ये जेव्हा फलंदाज आक्रमक नसतात तेव्हा आपल्या वाट्याच्या ओव्हर्स खपवून बाजूला होणारे गोलंदाज काय कामाचे ? ३५व्या षटकात परत येउन यादवने स्मिथचा बळी घेतला तोपर्यंत ओस्ट्रेलियाच्या २०० धावा फलकावर लागल्या होत्या. उर्वरित १५ षटकांत ते हाणामारी करून धावांचा डोंगर रचणार हे स्पष्टच दिसत होते.

तसेच फलंदाजीत रोहित आणि शिखरने छान सुरुवात करून दिल्यावर आणि तद्नंतर शिखर, विराट, रोहित हे स्टार फलंदाज पाठोपाठ बाद झाल्यावर रैना, जडेजा हि लोअरमिडलऑर्डर राहणे-धोनीसोबत उभी राहिली नाही. हा भारतीय संघातील ठळक लूपहोल होता, जो आजच्या महत्वाच्या सामन्यात उघडा पडला.
साखळी फेरीतील सामन्यात आपल्या टीम मधले हे कच्चे दुवे बदलण्याची गरज होती. सुरुवातीचे सामने जिंकल्यानंतर आणि क्वार्टरफायनलमध्ये जागा पक्की झाल्यांवर आपल्याकडे दोन सामने उपलब्ध होते. त्यात हि कमजोर कडी बदलता आली असती. हि कमजोर कडी म्हणजे रवींद्र जडेजा होता, हे स्पष्ट होते. एकतर फिरकी गोलंदाज म्हणून तो प्रभावी ठरत नव्हता आणि फलंदाज म्हणून त्याच्याकडून कामगिरीची अपेक्षाही नव्हती. संघ जिंकत असल्याने हि कमजोरी उघड होत नव्हती आणि ते छुपं ठेवण्यातच संघव्यबस्थापनाने चूक केली.

इंडिया क्वार्टरफायनलमध्ये पोहोचली तोपर्यंतची कामगिरी पाहता जी धोक्याची घंटा वाजत होती ती कुणी लक्षात घेतलि नाही. भारताची फलंदाजी मुख्यत: रोहित, धवन, कोहली ह्या स्टार फलंदाजांवर अवलंबून आहे. त्यातला एकहीजण खेळला तर आपली धावसंख्या चांगला आकार घेते. पण ते जर लवकर तंबूत परतले तर आपली तळाची फलंदाजी कशी ढेपाळते ते वेस्ट इंडीज विरुद्धच्या सामन्यातही पाहायला मिळाले होते. मोजक्या धावांचे आव्हान असूनही रैना, जडेजा हे मधल्या फळीतले फलंदाज खेळपट्टीवर उभे राहू शकले नाहीत. उसळत्या चेंडूवर त्यांची फलंदाजी अक्षरश: उघडी पडताना आपण नेहमी पाहतो. अर्थात, पुढच्या बाद फेरीत न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया ह्या मातब्बर संघांसमोर त्यांची काय अवस्था होईल त्याचा विचार करता, संघात काही बदल अपेक्षित होते.

पहिले चार फलंदाज आणि यादव, शमी हे द्रुतगती गोलंदाज हि आपली बलस्थाने आहेत. कर्णधार धोनी स्वत: एक वादातीत शक्तीस्थान आहेच. पण भारतीय संघात एक चेन्नई सुपरकिंग्स नावाचा उपसंघ आहे. धोनी आणि त्याचे शिलेदार (अश्विन, जडेजा,रैना, मोहित) हा तो उपसंघ. पैकी अश्विन सध्या बरी स्पिन टाकत होता. मोहित शर्मा मूळ संघात नव्हता, तरीही तो मिळालेल्या संधीचे सोने करीत होता. रैनादेखील खेळपट्ट्या फलंदाजीस पोषक असल्याने चांगली कामगिरी करीत होता.

पण प्रश्न होता जडेजाच्या लोअर मिडलऑर्डर फलंदाजीचा आणि पाचव्या गोलंदाजाचा. हि संघातील कमजोर कडी होती. परंतु त्या उपसंघाचा आपसात किती विश्वास असतो ते जडेजाने जेव्हा रिव्ह्यू मागितला तेव्हा दिसले. धोनीला खात्री नसूनही केवळ जाडेजाच्या आग्रहाखातर त्याने तो रिव्ह्यू कसा घेतला ते पाहता, चेन्नई सुपरकिंगच्या खेळाडूंसाठी संघाला दुय्यम महत्व दिले जाते कि काय, अशी शंका घ्यायला जागा आहे.
खेळपट्टी फिरकीला साथ देणारी असेल तर जडेजाची स्पिन अयशस्वी ठरल्याने जाडेजाच्या जागी अक्षर पटेलला खेळविणे गरजेचे होते. किंवा खेळपट्टी जर तेज गोलंदाजीला पोषक असेल तर भुवनेश कुमारला चौथ्या बॉलरच्या स्वरुपात संघात घेऊन आक्रमणाची धार वाढविता आली असती. तसंही गेल्या दोन वर्षातील तो भारताचा सर्वाधिक यशस्वी गोलंदाज असूनही त्याला दुर्लक्षित ठेवून काय साध्य झाले? किंवा बिन्नीला संधी देवून त्याच्या फलंदाजीचाही तळाला फायदा करून घेत आला असता. किवा कदाचित इशांत शर्माच्या जागी बदली खेळाडू घेतला गेल तेव्हाच अनफिट जाडेजाच्या जागी युवराजसिंगचा विचार करण्याची संधी होती, ती संघ-व्यवस्थापनाने दवडली. इथेही सीएसके कनेक्शन संघाच्या आड आले असंच दिसून येईल. आज जेव्हा एक विकेट लवकर पडल्यावर ओस्ट्रेलियाने १८० धावांची मोठी भागीदारी केली तेव्हा भुवि किंवा अक्षरसारखा विकेटटेकिंग गोलंदाज महत्वपूर्ण ठरला नसता काय?

तसेच रैना हाणामारीच्या षटकांत निर्णायक फटकेबाजी करू शकतो. पण चार विकेट लवकर पडल्या तर वरच्या क्रमांकावर त्याची हतबलता पाहता एक्स्ट्रा फलंदाज खेळवून रैनाला खालच्या क्रमांकावर आणणे गरजेचे होते. मग आपल्याला पाचव्या क्रमांकावर रायुडूला घेऊन आणि रैनाला सहाव्या क्रमांकावर पाठवून फलंदाजीची खोली वाढवता आली असती का? ते दोघे मिळून १० षटके टाकतील तर ते शक्य झाले असते. तसंही रैनाने मागच्या एक सामन्यात एकट्यानेच १० षटके टाकली होती. म्हणजेच आज गरज असताना रायुडूच्या स्वरुपात आपल्याला पाचव्या क्रमांकावर एक विश्वासार्ह फलंदाज मधल्या फळीत मिळाला असता आणि रैना तळाला सहाव्या क्रमांकावर धोनीसोबत मोठे फटके खेळू शकला असता.
असे असताना भूवीच्या स्विंग वर विश्वास का ठेवला नाही ? किंवा अक्षर पटेलच्या प्रभावी फिरकीचा ऑप्शन का वापरला गेला नाही? किंवा बिन्नीच्या अष्टपैलू खेळाचा पर्याय का चाचपडून पहिला नाही?
खरंतर रायुडूच्या रूपाने एक अधिक फलंदाज घेऊन रैना आणि इतरांच्या गोलंदाजीचा पर्याय सर्वाधिक उपयुक्त ठरला नसता?

पण बादफेरीत पोहोचल्यावरही उर्वरित दोन सामन्यात वरीलपैकी कोणताही बदल न करून संघव्यवस्थापनाने नक्की काय साधले? ह्या प्रश्नाचे उत्तर स्पष्ट आहे आणि ते म्हणजे भारतीय संघावर असलेला अंधश्रद्धेचा प्रचंड पगडा. जी टीम जिंकतेय तिच्यात मुळीच बदल करायचा नाही, ह्या सुपरस्टीशनच्या आहारी कोण गेले होते, ते स्पष्ट व्हायला हवे. आपले आजीमाजी दिग्गज खेळाडूदेखील ह्या अंधविश्वासाच्या जाळ्यात पूर्वापार फसलेले असतात. ह्या सुपरस्टीशनच्या प्रभावामुळेच संघात आवश्यक बदल केले गेले नाहीत, असंच दिसते. संधी असूनही तसा प्रयोगदेखील केला गेला नाही.क्रिकेट हा माईंडगेम, प्रेशरगेम , टेम्परामेंटगेम वगैरे असतो. पण व्यावसायिकता सोडून आपला संघ असा अंधश्रद्धाळू बनला. मग तिथे प्रोफेशनल ओस्ट्रेलियाच्या पुढे असल्या भोंगळ संघाचा कसा निभाव लागणार? अर्थात टीम इंडियाचे संघव्यवस्थापन म्हणजेच कर्णधार धोनी, रविशास्त्री, आदि तज्ञमंडळी ह्या पराभवाचे खरे गुन्हेगार आहेत.

Wednesday, 25 March 2015

सचिनवर विनाकारण आगपाखड करणाऱ्याचे काय होते?

सचिनवर विनाकारण आगपाखड करणाऱ्याचे काय होते?

उदाहरणार्थ एक हेन्री ओलोंगा नावाचा गुणी खेळाडू होता. आधीच्या सामन्यात सचिनला एक अनप्लेयेबल उसळता चेंडू टाकून त्याने बाद केले आणि त्या जोशात त्याने सचिनचं फ़ेअरवेल सुद्धा सिलेब्रेट केलं. मग पुढच्याच सामन्यात सचिनने ओलोंगाला बॉस कोण ते दाखवून दिलं. ओलोंगाला मैदानाच्या चारी बाजूना असा काही फोडून काढला कि भांबावलेल्या ओलोंगाचा ठिक्करचेहरा आजही कित्येकांना आठवत असेल.
अँडी कँडीक नावाचा एक इंग्लिश बॉलरने सुद्धा सचिनबद्दल अशाच काही वल्गना केल्या होत्या. पुढच्याच सामन्यात सचिनने त्याला मिडविकेट वरून असा काहि स्टेडीयमच्या बाहेर फेकला कि पुन्हा कधी क्याडिक हे नाव क्रिकेट मध्ये दिसले नाही.

तसंच शोएब अख्तरलासुद्धा पॉइन्ट वरून मैदानाच्या बाहेर पाठवून सचिनने त्याची जागा दाखवून दिली होती. एकूणच काय, ओलोंगाभौ असो कि क्याडिकभाऊ...सचिनवर फाल्तूची आगपाखड करणाऱ्यांची हि अशीच गत होते.
.....अ पु र्ण

Monday, 23 March 2015

"आजादी बिना खड्ग बिना ढाल"???

" साबरमती के संत के संत तूने कर दिया कमाल" हे काव्य गांधीजींसाठी लिहिलंय. मग त्यात कवी प्रदीप ह्यांनी सदर काव्यात क्रांतिकारकांचा अपमान करण्याचा संबंध कुठे येतो?
गांधींच्या अहिंसावादी आणि सत्याग्रही मार्गाला "आजादी बिना खड्ग बिना ढाल" नाही म्हणायचे ?
कवीने गांधींच्या अहिंसावादी आणि सत्याग्रही मार्गाला "आजादी बिना खड्ग बिना ढाल" अस संबोधले आहे. त्याला क्रांतिकारकांच्या सशस्त्र लढ्याशी जोडण्यात चूक होईल.
क्रांतिकारकांवर असंच काव्य प्रदीपनी लिहिलं असतं तरी तोच आशय प्रकटला असता

"आजादीकि जंगमें तुमने दिया बलिदान
भगत राजगुरू सुखदेव तुम महान."
असंच काहीतरी कवींनी लिहिलं असतं, नाही का?

कवी प्रदीप ह्यांचे मूळ गीत असे आहे:
दे दी हमें आज़ादी बिना खड्‌ग बिना ढाल
साबरमती के संत तूने कर दिया कमाल
आंधी में भी जलती रही गांधी तेरी मशाल
साबरमती के संत तूने कर दिया कमाल
धरती पे लड़ी तूने अजब ढब की लड़ाई
दागी न कहीं तोप न बंदूक चलाई
दुश्मन के किले पर भी न की तूने चढ़ाई
वाह रे फकीर खूब करामात दिखाई
चुटकी में दुश्मनों को दिया देश से निकाल
साबरमती के संत तूने कर दिया कमाल
शतरंज बिछा कर यहां बैठा था ज़माना
लगता था कि मुश्किल है फिरंगी को हराना
टक्कर थी बड़े ज़ोर की दुश्मन भी था दाना
पर तू भी था बापू बड़ा उस्ताद पुराना
मारा वो कस के दांव कि उल्टी सभी की चाल
साबरमती के संत तूने कर दिया कमाल
जब जब तेरा बिगुल बजा जवान चल पड़े
मजदूर चल पड़े थे और किसान चल पड़े
हिन्दू व मुसलमान सिख पठान चल पड़े
कदमों पे तेरे कोटि कोटि प्राण चल पड़े
फूलों की सेज छोड़ के दौड़े जवाहरलाल
साबरमती के संत तूने कर दिया कमाल
मन में थी अहिंसा की लगन तन पे लंगोटी
लाखों में घूमता था लिये सत्य की सोंटी
वैसे तो देखने में थी हस्ती तेरी छोटी
लेकिन तुझे झुकती थी हिमालय की भी चोटी
दुनियां में तू बेजोड़ था इंसान बेमिसाल
साबरमती के संत तूने कर दिया कमाल
जग में कोई जिया है तो बापू तू ही जिया
तूने वतन की राह में सबकुछ लुटा दिया
मांगा न कोई तख्त न तो ताज ही लिया
अमृत दिया सभी को मगर खुद ज़हर पिया
जिस दिन तेरी चिता जली रोया था महाकाल
साबरमती के संत तूने कर दिया कमाल
- कवी प्रदीप

गांधीजींच्या जीवितकार्याचे यथार्थ वर्णन कवी प्रदीप ह्यांनी ह्या गीतात केले आहे.
ह्याच प्रदीपनि " ए मेरे वतन के लोगो.." लिहिलंय. तसंच त्यांनी "आज हिमालय कि चोटीसे फिर हमने ललकारा है, दूर हटो ए दुनियावालो हिंदोस्तान हमारा है." हे काव्य लिहिलंय.
प्रत्येक काव्याला वेगळा आशय-विषय असतो. त्यातून कुतर्क काढून काय मिळणार आहे?
पण गांधी जयंती असो कि पुण्यतिथी किंवा शहीद दिवस असो. गांधींची आठवण झाल्याशिवाय त्यांच्या विरोधकांनाहि चैन पडत नाही, हेच महात्म्याच्या यशाचे चिरंतनरहस्य असावे.
असो.

Friday, 20 March 2015

स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित 'जयोस्तुते' हे स्वातंत्र्यगीत.

'जन गण मन' हे भारताचे राष्ट्रगीत आहे तर 'वन्दे मातरम' हे राष्ट्रीय गीत आहे. दोन्ही बद्दल उलटसुलट चर्चा नेहमीच ऐकायला मिळतात. मुख्यत: देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात कोणतेही योगदान नसलेल्या तथाकथित हिंदुत्ववाद्यांकडून मुस्लिमविरोधाचे साधन म्हणून ह्या वादाचा उपयोग केला जातो. 'वन्दे मातरम' वरून मुस्लिम समुदायाला लक्ष्य करण्याची सुवर्णसंधी अशा लोकांना प्राप्त होते हे उघड आहे. तसेच काँग्रेस, सेक्युलर वगैरे मंडळीना झोडपण्याची संधी 'जन गण मन' ला वादग्रस्त ठरवून प्राप्त होते! पण मुळात देशाच्या स्वातंत्र्यलढ्यापासून दोन हात लांब राहून उलटपक्षी ब्रिटीश सत्तेशी सोयीस्कर सलोखा ठेवणारे हिंदुत्ववादी कोणत्या अधिकाराने हि उठाठेव करतात? भारतमातेच्या स्वातंत्र्यहोमात 'वन्दे मातरम' किंवा 'जन गण मन' पैकी कोणतेही गीत त्यांनी गायले नाही हे वास्तव कसे विसरता येईल?

पैकी 'वन्दे मातरम' बंकिमचंद्र चाटर्जी ह्यांच्या १८८२ मधील आनंदमठ ह्या कादंबरीतून प्रसिद्ध झाली. तर 'जन गण मन' गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी १९११ मध्ये लिहिले. ('अमर सोनार बांगला' हे बांगलादेशचे राष्ट्रगीतदेखील रबिन्द्रनाथ टागोरानि १९०५ मध्ये लिहिलेल्या एका गाण्यातून घेतले गेले आहे.)
दोन्ही गीतांचे आजच्या परिप्रेक्षात तटस्थ विश्लेषण केले तर काही वेगळा विचार करता येईल.
पैकी वन्दे मातरम मध्ये 'वन्दे मातरम' हे दोन शब्द सोडता मातृभूमीचे वर्णन करणारी कविता एवढेच तिचे स्वरूप आहे असे दिसेल.

उदाहरणार्थ :
सुजलां सुफलाम्, मलयजशीतलाम्, शस्यशामलाम्
शुभ्रज्योत्स्नापुलकितयामिनीम्, फुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनीम्
'जन गण मन' देखील भारतभूमीच्या भौगोलिक समृद्धीचे वर्णन करणारे काव्य असल्याचे दिसते.

उदा.
पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड़ उत्कल बंग
विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छलजलधितरंग
इक्बाल लिखित 'सारे जहाँ से अच्छा हिन्दोस्तान हमारा' देखील ह्याच पठडीतले आणखी एक गीत.
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात वन्दे मातरमचे योगदान अनन्यसाधारण असेच आहे, ह्याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. 'वन्दे मातरम' हे दोनच शब्द अक्षरश: भारतीय स्वातंत्र्याची प्रेरणा ठरले. असे असूनही राष्ट्रगीत म्हणून 'वन्दे मातरम' ऐवजी 'जन गण मन' ची निवड करावी लागली हि वस्तुस्थिती आहे. देशातील काही जनसमूहांचा 'वन्दे मातरम'ला विरोध असून भारतीयराष्ट्राच्या विविधतेच्या संकल्पनेचा संकोच होत असल्याने राष्ट्रगीत म्हणून ते मागे पडले, हे स्पष्ट आहे. काळाच्या ओघात कित्येक महान संकल्पना मर्यादित होऊ शकतात आणि ते मान्य करण्यात काही गैर नाही.

तसेच 'जन गण मन' देखील तत्कालीन भारतभाग्यविधाता पंचम जॉर्जच्या भारतातील आगमनाप्रीत्यर्थ लिहिले गेल्याचा आक्षेप घेतला जातो. त्यात तथ्य देखील असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात कालपटलावर त्यालाही मर्यादा पडल्याचे मान्य करावे लागेल.
इथे आणखी एका गीताचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. ते म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित 'जयोस्तुते' हे स्वातंत्र्यगीत.

"जयोस्तु ते श्रीमहन्मंगले, शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवति, त्वामहं यशोयुतां वंदे "
भारतभूमीच्या स्वातंत्र्याचे मूर्तिमंत काव्यस्वरूप ह्या गीताच्या शब्दाशब्दातून उमटते आणि प्रत्येक भारतीयाच्या रोमारोमातून ते स्फुरण पावत राहते.
"स्वतंत्रते भगवती I चांदणी चमचम लखलखशी"
आणि
"तूं सूर्याचे तेज उदधिचे गांभीर्यहि तूंची"
अशी महान देशप्रेमाची उधळण देखील त्यात आहे.
"गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली"
किंवा
"जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर तेंतें"
अशी मातृभूमीवरील मंगल प्रेमाची कवितासुद्धा आहे.
"हिमालयाच्या हिमसौधाचा लोभ शंकराला..."
किंवा
"स्वतंत्रते, ह्या सुवर्णभूमीत कमती काय तुला?
कोहिनूरचे पुष्प रोज घे ताजें वेणीला.. "
असे उज्ज्वल ऐतिहासिक-भौगोलिक समृद्धीचे गाणे दिसेल.
त्यात राष्ट्रप्रेमाचे, अत्युच्च बलिदानाचे स्तोत्र देखील आहे.
"हे अधम रक्त रंजिते I सुजन-पुजिते ! श्रीस्वतंत्रते
तुजसाठिं मरण तें जनन
तुजविण जनन ते मरण.."

सावरकरांच्या हिंदुत्व किंवा तत्सम राजकीय प्रणालीशी कितीही वैचारिक वाद असेल, किंबहुना त्यांच्या तथाकथित हिंदुत्वाला प्रखर विरोधच राहील. परंतु एक राष्ट्रभक्तीपर काव्य म्हणून विचार केला तर "जयोस्तु ते.. " एक परिपूर्ण आणि केवळ ग्रेटच सिद्ध होते. माझ्या मते हे एक गीत भारतदेशाचे राष्ट्रगीत, राष्ट्रीयगीत इत्यादी स्तरांवर शोभेल अश्या सर्वाधिक योग्यतेचे आहे.

(अर्थात हिंदुत्ववाद्यांना अशा मुलभूत गोष्टीत रस नसतो. सावरकरांचे 'जात्युच्छेदक निबंध' किंवा 'विज्ञाननिष्ठ निबंध' हे कालातीत विचार बाजूला ठेवून हिंदुत्वासारख्या कालबाह्य प्रणालीवर पोळ्या भाजण्यात ते दंग असतात.)

Saturday, 7 March 2015

भारताचे विश्वचषकातील आव्हान: महत्वपूर्ण बदल अपेक्षित

इंडिया क्वार्टरफायनलमध्ये पोहोचलीय. पण आतापर्यंतची कामगिरी पाहता जी धोक्याची घंटा वाजतेय ती कुणी लक्षात घेत नाही.

कालच्या वेस्ट इंडीज विरुद्धच्या सामन्यात देखील हि धोक्याची घंटा वाजली. भारताची फलंदाजी मुख्यत: रोहित, धवन, कोहली, राहणे ह्या चारजणांवर अवलंबून आहे. त्यातला एकहीजण खेळला तर आपली धावसंख्या चांगला आकार घेते. पण ते चारहीजण जर लवकर तंबूत परतले तर आपली तळाची फलंदाजी कशी ढेपाळते ते कालही पाहायला मिळाले. मोजक्या धावांचे आव्हान असूनही रैना, जडेजा हे मधल्या फळीतले फलंदाज खेळपट्टीवर उभे राहू शकले नाहीत. उसळत्या चेंडूवर त्यांची फलंदाजी अक्षरश: उघडी पडताना आपण पाहतो. अर्थात, पुढच्या बाद फेरीत न्यूझीलंड, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया ह्या मातब्बर संघांसमोर त्यांची काय अवस्था होईल त्याचा विचार करता, संघात काही बदल अपेक्षित आहेत.

पहिले चार फलंदाज आणि यादव, शमी हे द्रुतगती गोलंदाज हि आपली बलस्थाने आहेत. कर्णधार धोनी स्वत: एक वादातीत बलस्थान आहेच. पण भारतीय संघात एक चेन्नई सुपरकिंग्स नावाचा उपसंघ आहे. धोनी आणि त्याचे शिलेदार (अश्विन, जडेजा,रैना, मोहित) हा तो उपसंघ. धोनी सोडता बाकीचे सर्वजण श्रींनी किंवा धोनीच्या कृपाशीर्वादाने संघात आहेत, हे स्पष्ट आहे. पण सध्या ते वर्ल्डकप खेळत आहेत, हि वस्तुस्थिती स्वीकारून त्यांचे विश्लेषण करावे लागेल.

अश्विन सध्या बरी स्पिन टाकतोय. मोहित शर्मा मूळ संघात नव्हता, तरीही तो मिळालेल्या संधीचे सोने करतोय. पण त्याची जागा भुवनेश कुमार घेऊ शकतो.

प्रश्न आहे ती रैना आणि जडेजा ह्या लोअर मिडलऑर्डरचा. हि संघातील कमजोर कडी आहे. रैना हाणामारीच्या षटकांत निर्णायक फटकेबाजी करू शकतो. पण चार विकेट लवकर पडल्या तर वरच्या क्रमांकावर त्याची हतबलता चिंताजनक आहे. जडेजा देखील तिथे उपयुक्त नाही. जडेजाची स्पिन देखील परिणामकारक नाही. जाडेजाच्या जागी अक्षरला खेळवावे तर त्याच्याही फलंदाजीबद्दल शाश्वती देत येत नाही. बिन्नी देखील फलंदाजीत यशस्वी ठरलेला नाही.

मग आपल्याला पाचव्या क्रमांकावर रायुडूला घेऊन आणि रैनाला सहाव्या क्रमांकावर पाठवून फलंदाजीची खोली वाढवता येईल का? ते दोघे मिळून १० षटके टाकतील तर ते शक्य आहे. अन्यथा रैनाच्या जागी अक्षर किंवा जडेजा किंवा बिन्नी पैकी एकाची खेळपट्टीचे स्वरूप पाहून निवड व्हावी. पण रायुडूच्या विश्वासार्हतेची मधल्या फळीत आत्यंतिक गरज आहे. पुढच्या दोन सामन्यात रैना-जडेजाच्या बदलीचे प्रयोग करून बादफेरीतील संघ निश्चित करावा लागेल. भारताचे विश्वचषकातील आव्हान ह्या महत्वपूर्ण बदलावर अवलंबून असेल.

Wednesday, 4 March 2015

गोवंशहत्याबंदीच्या फतव्यावरील चर्चेतून ...

गोवंशहत्याबंदीच्या फतव्यावरील चर्चेतून ...

गावी माझ्याही घरात बैल होते. बैलगाडीला जुंपणारे आणि शेतात नांगर ओढणारे बैल. खूप प्रेमाने जोपासलेली बैलजोडी. म्हसा, घोटी अशा लांबच्या बाजारातून बैल हौसेने खरेदी करून आणले जात. दुधदाती, दोनदाती, चारदाती अशा प्रकारचे आणि तत्सम अनेक गुण-दोष पारखून बैलांचे सौदे होत असत. आमचे अण्णा बैल ह्या विषयातले मनस्वी जाणकार. वर्षभरात फक्त घरच्या शेतीसाठी वापरल्याने आमचे बैलदेखील देखणे, धष्टपुष्ट राहत. शेजारच्या गावातून हौशी लोक ते बैल पाहण्यासाठी येत.

एकदा असाच आमचा एक बैल शेजारच्या गावी विकला गेला. तांबड्या-पांढऱ्या (तांबाबाळा) रंगाचं उमदं जनावर. सुडौल शिंगे. त्याचा आम्हाला आणि त्यालाही खूप लळा लागला होता. त्याचा नवा मालक बैलगाडी घेऊन गावात आला तर हा गाडी खेचत घेऊन घरी येई. नित्यनेमाने त्या गावातून पळून तो आमच्या घरी येई. आमच्या ह्या पाहुण्याचा मग सणच साजरा होई. जो तो त्याला शक्य असेल ते खायला प्यायला देई. आई त्याला सुपात तांदूळ खायला देईल तर बाबा त्याला तेल पाजत. कुणीतरी पेंढा आणून त्याच्या पुढ्यात टाकी तर कुणी त्याला पेंड खायला घाली. असा सोहळा चालत असताना त्याचा मालक धापा टाकत येई. ह्याने तोडलेला दोर (दावे) हातात घेऊन तो आला कि पुन्हा निरोपाचा हृदयद्रावक प्रसंग उभा राही. कित्येक वर्षे न चुकता तो पाहुणा घरी येतच राहिला...

पण ह्याच बैलांच्या खुरांमध्ये जेव्हा रोग होऊन किडे पडतात तेव्हा त्याची किती निगा राखावी लागते? पावसाळ्यात त्या बैलांच्या गोठ्यातून मच्छर डासांचा प्रादुर्भाव होतो, तेव्हा रात्रीतून कितीदा उठून धूर करून त्यांची काळजी घायवी लागते? त्यांच्या रोजच्या चारावैरण, पाण्यासाठी किंवा गोठ्यातून शेण काढून स्वच्छता ठेवण्यासाठी, उन्हाळा असो कि पावसाळा, किती मेहनत घ्यावी लागते? (अत्यंत जिकीरीचे आणि तेवढेच खर्चिक असणारे हे बैलांचे लोढणे मी अलीकडे मोठ्या शिताफीने किंवा निष्ठुरपणे काढून टाकायला लावले...)

पण ह्याच बैलांना बडवण्याचा 'अमानुष' कार्यक्रम कुणी पहिला असता तर... किंवा त्यांची शिंगे छाटण्याचा 'रक्तरंजित हिंस्त्र' प्रसंग अनुभवला असता तर... संवेदनशील वर्गाच्या जीवाचा थरकाप होईल. आणखी किती कायदे करावे लागतील? शेतकरी दिवाळीत बैलांना अग्नीवरून उड्या मारायला लावतो, म्हणून काही लोक त्या अंधश्रद्धेच्या नावाने पोस्ट टाकतात. पण शेतकरी पोटच्या अपत्याप्रमाणेच आपल्या गुराढोरांवर प्रेम करतो. दिवाळीत स्वत:हि बैलांच्या सोबत आगीवरून उड्या मारतो. सणासुदीला बैलांच्या शिंगाना गेरुचा (का होईना!) रंग लावून, स्वत:च्या सोबत त्यानाही सणासुदीत सामावून घेतो, हे कुणी लक्षात घेत नाही.

गावात आमच्या शेजारी एक नथू राहत असे. त्याचा गुरेढोरे पाळायचा धंदाच होता. बाहेरच्या गावातील लोकही त्याच्याकडे गाई ठेवत असत. गाय व्याली कि नथुला ठरलेले पैसे देऊन ते गाई घेऊन जात, अशा प्रकारचा धंदा चाले. सदैव अठरा विश्वे दारिद्र्यात नांदणाऱ्या नथूच्या गोठ्यात दुधदुभत्यांची कधीच कमी नसे! कधीतरी नथूसुद्धा एखाद दुसरी गाय कसायला विकत असे. त्यामुळे आमच्या संवेदनशील घरात नथूबद्दल असंतोष पसरत असे. नथुने असं निर्दयी कृत्य करायला नको अशी आमची ठाम समजूत होती.

पण नथुचि व्यथा काय असते, ते माझा मित्र शरद पाटीलच्या अस्सल ग्रामीण कृषीवल जीवनानुभवातून ऐका...
" कसायाच्या हातात हरण्याला देताना आबाच्या पोटात गोळाच आला होता. आबानं हरण्याचं कासरं खांद्याला लावलं कसायानं दिलेलं पैसं न मोजताच खिशात सारलं आणि घरची वाट चालायला आबानं सुरवात केली. अंधारून आलं होतचं,गाव तसं जवळचं होतं आबा पाय पण झपाझप उचलत होता पण वाट तुटता तुटतं नव्हती. मागचं सहा महिने असचं होतं होतं,बाजारात हरण्याला आबा घेवून यायचा....आणि संध्याकाळी परत त्याला घरला घेवून जायचा.
चित्र्या आणि हरण्या बैलजोडीनं आबाचं घर वर आणलं होतं. दोन वर्षापूर्वी घसारतीला गाडी उधळल्याचं निमित्त झालं..आणि चित्र्या हरण्याच्या पायांना दुखापती झाल्या. चित्र्या तीन चार महिन्यात दगावला पण हरण्या मात्र वाचला. पण त्याच्या पायाची दुखापतं त्याला खंगवत होती. आबाला आणि घरच्यांना ते हाल बघवतं नव्हते आणि हरण्याला बाजाराला न्यायला आबा तयार झाला पण कसायाच्या हातात कासरा द्यायला त्याचं मन धजावत नव्हतं. आठ दहा बाजार असेच गेले. आणि आज शेवटी हरण्याला कसायाकडं सोपवून आबा घरच्या रस्त्याला लागला.
वस्तीवर पोहचेपर्यंत आबाला रात्रीचे दहा वाजले होते. घरात शिरतानाच पायांच्या आवाजनं बाजवरं पडलेल्या तात्यांच्या हाथरूणात जरा हालचाल जाणवली. रोज नऊ साडे नऊ वाजता झोपणारा बा आज दहा वाजून गेलं तरी हाथरूणात कुशी बदलत पडून होता. आबाला कसंनुसचं वाटलं. सोप्यात पायतान काढून आबा आत गेला, बायको मदघरात कापडांच्या घड्या घालतं होती...,"येळ केला यायला..." असं काही तरी तीनं विचारलं असं आबाला वाटून गेलं. फक्त हम्म असा अस्पष्टसा हुंकार आबाच्या तोंडातनं बाहेर पडला.मोरीत जावून आबानं हातपाय धुतलं आणि कमरेला टाॅवेल गुंडाळून आबा बाहेर आला. बायकोच्या शेजारीचं तिच्या मांडीवर डोकं ठेवून आबाचा लेक,चिन्या झोपला होता. चिन्याच्या गालावर रडलेल्याच्या खूणा आबाला लांबून ही ओळखता आल्या,बायको ही मान खाली घालूनच कापडांच्या घड्या घालत होती. तिथूनचं आबाचं लक्ष स्वयंपाकघरात, चुलीकडं गेलं तर चुल थंड होती...काय झालं माहीत नाही. आबाला अचानक भरून आलं गळ्यातला हुंदका तसाच दाबून धरून आबा घराबाहेर आला आणि घराशेजारच्या सपरात येवून हरण्या उभा असायच्या रिकाम्या जागेकडे बघून हमसून हमसून रडू लागला....." (... Sharad Patil )

शोभेची भारी कुत्री घरात बाळगणाऱ्या शहरीवर्गाला गुरेढोरे पाळणाऱ्या शेतकऱ्याची व्यथा कशी कळावी? ह्या संवेदनशील (!) वर्गाने धार्मिक श्रद्धेच्या भाकडकथा सांगाव्यात आणि त्यासाठी सरकारने कायद्याचे बडगे उगारावेत?

म्हणून प्रकाश झावरे पाटील सरांच्या पोस्टमाधील दाहक अगतिकता मनाला चटका लावून जाते:
" शेतकरी गाय विकत घेतो. संगोपनावर खर्च करतो. ती त्याची खाजगी मालमत्ता आहे. कोणत्याही धर्माची किंवा धर्म मार्तंडांच्या बापाची नाही. त्या मालमत्तेचा विनियोग करण्याचा हक्क त्याचा स्वत:चाच असणे नैसर्गिक न्यायाचे आहे. कोणत्याही धर्माचा संस्कृतीचा समाजाचा व शासनाचा त्यामधील हस्तक्षेप ही हुकुमशाहीच असेल.
तुमचे घर जुने पडके झाले तरी विक्रीच करता दिड शहाण्यांनो..! कारण ते तुम्ही विकत घेतलेले असते.
शेतकर्याला "दानधर्मात " गायींची प्राप्ती होत नाही. त्याला मोफत गायी द्या ..संगोपनाचा खर्च द्या तो त्या भाकड असल्या तरी सांभाळीलच..कसायाला विकणार नाही. तुमच्या सर्वांपेक्षा तो दयाळू आहे..
शेतकर्यांनो भारतीय वंशाच्या दिवसभरात घरदार खाऊन जास्तीत जास्त 2 ते 2.5 लिटर दूध देऊन 10 लिटर मुतणार्या गायी पाळू नका. बँकेतून कर्ज मिळवा विदेशी बिज असलेली " होस्टेन " गाय घ्या. किंवा म्हैस घ्या..आधुनिक शेळी पालन करा. शेती भाडोत्री यंत्रांनी करा. बैलांचा आग्रह धरु नका. पशुपालन प्रचंड खर्चिक आहे. कोणत्याही पाप पुण्याचा विचार न करता भाकड जितराबांना व त्यांच्या मवाली धर्मसंहितेला तुमच्या प्रपंचातून गचांडी मारा.
" गोहत्त्या बंदी " या मवाली निर्णयावरील शेवटची पोस्ट..!!" (...Prakash Zaware Patil)

Sunday, 1 March 2015

'खोट्यावर खोटे'

'खोट्यावर खोटे' नावाची एक गोष्ट चांदोबामध्ये तीसेक वर्षापूर्वी वाचली होती.

तर, एका भल्या माणसाची बायको भारी कजाग होती. तिला खोटं बोलायची लयभारी खोड. एक खोटं बोलायचं आणि मग ते लपवायला खोट्यावर खोटं बोलत जायचं, अशी तिची आदत होती. नवऱ्याने कितीही समजावलं तरी ती त्याचे सल्ले नेहमी उडवून लावीत असे. ह्या भांडकुदळ आणि जहांबाज बाई पुढे नवऱ्याने बिचाऱ्याने अक्षरश: हात टेकले होते. तसंच शेजारी-पाजारी, गावकरी सर्वजण तिच्या खोट्या भाईगिरीने त्रस्त झाले होते.
....शेवटी खोटं बोलायच्या खोडीने ती स्वत: मोठ्या संकटात सापडते आणि तिचं पितळ उघडं पडते. 

अशी ती चांदोबामध्ये लहानपणी वाचलेली गोष्ट. त्यातलं ते चित्र मला आजही आठवते. शेवटी गयावया करणारी ती बाई आणि तिला सल्ल्यांची आठवण करून देणारा तो भला माणूस, असं ते छान चित्र होतं.

त्याचं असं झालं कि, 'मी मराठी लाइव्ह' ह्या नव्या दैनिकात शनिवारी एक तोरसेकरी खुसपट प्रसिद्ध झालंय. तसं पाहता ते खुसपट म्हणजे फिलॉसोफीचा उत्तम नमुना आहे, असा आभास होईल. पण एका नव्या दैनिकाच्या दुसऱ्याच अंकात तो विषयच मुळात 'गैरलागू' ठरतो आणि त्यातली 'भामटेगिरी' अधिकच ठळकपणे जाणवू लागते.

म्हणजे, हे तत्वज्ञान प्रिंट मीडियात प्रसवण्याची पार्श्वभूमी लक्षात घेतली तर गेल्या काही दिवसातील सोशल मिडीयावर त्यांनी जी गरळ ओकलेय , त्याचाच प्रभाव त्या तत्वज्ञानावर आहे, असं दिसेल. कॉम्रेडहत्येनंतर नथुरामि प्रवृत्तींच्या वकिलीसाठी जी खोटं बोलायची उबळ लागली, तिचेच ठसके तोरसेकरी फिलॉसोफीतहि उमटले आहेत. त्यामुळे 'तुमच्याकडून हिच अपेक्षा होती' असंच शीर्षक खरंतर असायला हवं होतं. असो.

अर्थात, त्यांचं जे काही चाललंय ते दुसरं तिसरं काही नसून 'खोट्यावर खोटं' ह्या चांदोबातल्याच गोष्टीची नवी आवृत्ती आहे, एवढंच.

( ता.क. :सॉक्रेटिस सुद्धा बायकोच्या त्रासाने प्रभावित होऊन तत्वज्ञान वगैरे लिहू लागला कि काय असा विचार उगाच मनात येउन गेला. )
('अपूर्ण'...)