Saturday, 7 March 2015

भारताचे विश्वचषकातील आव्हान: महत्वपूर्ण बदल अपेक्षित

इंडिया क्वार्टरफायनलमध्ये पोहोचलीय. पण आतापर्यंतची कामगिरी पाहता जी धोक्याची घंटा वाजतेय ती कुणी लक्षात घेत नाही.

कालच्या वेस्ट इंडीज विरुद्धच्या सामन्यात देखील हि धोक्याची घंटा वाजली. भारताची फलंदाजी मुख्यत: रोहित, धवन, कोहली, राहणे ह्या चारजणांवर अवलंबून आहे. त्यातला एकहीजण खेळला तर आपली धावसंख्या चांगला आकार घेते. पण ते चारहीजण जर लवकर तंबूत परतले तर आपली तळाची फलंदाजी कशी ढेपाळते ते कालही पाहायला मिळाले. मोजक्या धावांचे आव्हान असूनही रैना, जडेजा हे मधल्या फळीतले फलंदाज खेळपट्टीवर उभे राहू शकले नाहीत. उसळत्या चेंडूवर त्यांची फलंदाजी अक्षरश: उघडी पडताना आपण पाहतो. अर्थात, पुढच्या बाद फेरीत न्यूझीलंड, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया ह्या मातब्बर संघांसमोर त्यांची काय अवस्था होईल त्याचा विचार करता, संघात काही बदल अपेक्षित आहेत.

पहिले चार फलंदाज आणि यादव, शमी हे द्रुतगती गोलंदाज हि आपली बलस्थाने आहेत. कर्णधार धोनी स्वत: एक वादातीत बलस्थान आहेच. पण भारतीय संघात एक चेन्नई सुपरकिंग्स नावाचा उपसंघ आहे. धोनी आणि त्याचे शिलेदार (अश्विन, जडेजा,रैना, मोहित) हा तो उपसंघ. धोनी सोडता बाकीचे सर्वजण श्रींनी किंवा धोनीच्या कृपाशीर्वादाने संघात आहेत, हे स्पष्ट आहे. पण सध्या ते वर्ल्डकप खेळत आहेत, हि वस्तुस्थिती स्वीकारून त्यांचे विश्लेषण करावे लागेल.

अश्विन सध्या बरी स्पिन टाकतोय. मोहित शर्मा मूळ संघात नव्हता, तरीही तो मिळालेल्या संधीचे सोने करतोय. पण त्याची जागा भुवनेश कुमार घेऊ शकतो.

प्रश्न आहे ती रैना आणि जडेजा ह्या लोअर मिडलऑर्डरचा. हि संघातील कमजोर कडी आहे. रैना हाणामारीच्या षटकांत निर्णायक फटकेबाजी करू शकतो. पण चार विकेट लवकर पडल्या तर वरच्या क्रमांकावर त्याची हतबलता चिंताजनक आहे. जडेजा देखील तिथे उपयुक्त नाही. जडेजाची स्पिन देखील परिणामकारक नाही. जाडेजाच्या जागी अक्षरला खेळवावे तर त्याच्याही फलंदाजीबद्दल शाश्वती देत येत नाही. बिन्नी देखील फलंदाजीत यशस्वी ठरलेला नाही.

मग आपल्याला पाचव्या क्रमांकावर रायुडूला घेऊन आणि रैनाला सहाव्या क्रमांकावर पाठवून फलंदाजीची खोली वाढवता येईल का? ते दोघे मिळून १० षटके टाकतील तर ते शक्य आहे. अन्यथा रैनाच्या जागी अक्षर किंवा जडेजा किंवा बिन्नी पैकी एकाची खेळपट्टीचे स्वरूप पाहून निवड व्हावी. पण रायुडूच्या विश्वासार्हतेची मधल्या फळीत आत्यंतिक गरज आहे. पुढच्या दोन सामन्यात रैना-जडेजाच्या बदलीचे प्रयोग करून बादफेरीतील संघ निश्चित करावा लागेल. भारताचे विश्वचषकातील आव्हान ह्या महत्वपूर्ण बदलावर अवलंबून असेल.

No comments:

Post a Comment