Friday, 20 March 2015

स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित 'जयोस्तुते' हे स्वातंत्र्यगीत.

'जन गण मन' हे भारताचे राष्ट्रगीत आहे तर 'वन्दे मातरम' हे राष्ट्रीय गीत आहे. दोन्ही बद्दल उलटसुलट चर्चा नेहमीच ऐकायला मिळतात. मुख्यत: देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात कोणतेही योगदान नसलेल्या तथाकथित हिंदुत्ववाद्यांकडून मुस्लिमविरोधाचे साधन म्हणून ह्या वादाचा उपयोग केला जातो. 'वन्दे मातरम' वरून मुस्लिम समुदायाला लक्ष्य करण्याची सुवर्णसंधी अशा लोकांना प्राप्त होते हे उघड आहे. तसेच काँग्रेस, सेक्युलर वगैरे मंडळीना झोडपण्याची संधी 'जन गण मन' ला वादग्रस्त ठरवून प्राप्त होते! पण मुळात देशाच्या स्वातंत्र्यलढ्यापासून दोन हात लांब राहून उलटपक्षी ब्रिटीश सत्तेशी सोयीस्कर सलोखा ठेवणारे हिंदुत्ववादी कोणत्या अधिकाराने हि उठाठेव करतात? भारतमातेच्या स्वातंत्र्यहोमात 'वन्दे मातरम' किंवा 'जन गण मन' पैकी कोणतेही गीत त्यांनी गायले नाही हे वास्तव कसे विसरता येईल?

पैकी 'वन्दे मातरम' बंकिमचंद्र चाटर्जी ह्यांच्या १८८२ मधील आनंदमठ ह्या कादंबरीतून प्रसिद्ध झाली. तर 'जन गण मन' गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी १९११ मध्ये लिहिले. ('अमर सोनार बांगला' हे बांगलादेशचे राष्ट्रगीतदेखील रबिन्द्रनाथ टागोरानि १९०५ मध्ये लिहिलेल्या एका गाण्यातून घेतले गेले आहे.)
दोन्ही गीतांचे आजच्या परिप्रेक्षात तटस्थ विश्लेषण केले तर काही वेगळा विचार करता येईल.
पैकी वन्दे मातरम मध्ये 'वन्दे मातरम' हे दोन शब्द सोडता मातृभूमीचे वर्णन करणारी कविता एवढेच तिचे स्वरूप आहे असे दिसेल.

उदाहरणार्थ :
सुजलां सुफलाम्, मलयजशीतलाम्, शस्यशामलाम्
शुभ्रज्योत्स्नापुलकितयामिनीम्, फुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनीम्
'जन गण मन' देखील भारतभूमीच्या भौगोलिक समृद्धीचे वर्णन करणारे काव्य असल्याचे दिसते.

उदा.
पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड़ उत्कल बंग
विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छलजलधितरंग
इक्बाल लिखित 'सारे जहाँ से अच्छा हिन्दोस्तान हमारा' देखील ह्याच पठडीतले आणखी एक गीत.
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात वन्दे मातरमचे योगदान अनन्यसाधारण असेच आहे, ह्याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. 'वन्दे मातरम' हे दोनच शब्द अक्षरश: भारतीय स्वातंत्र्याची प्रेरणा ठरले. असे असूनही राष्ट्रगीत म्हणून 'वन्दे मातरम' ऐवजी 'जन गण मन' ची निवड करावी लागली हि वस्तुस्थिती आहे. देशातील काही जनसमूहांचा 'वन्दे मातरम'ला विरोध असून भारतीयराष्ट्राच्या विविधतेच्या संकल्पनेचा संकोच होत असल्याने राष्ट्रगीत म्हणून ते मागे पडले, हे स्पष्ट आहे. काळाच्या ओघात कित्येक महान संकल्पना मर्यादित होऊ शकतात आणि ते मान्य करण्यात काही गैर नाही.

तसेच 'जन गण मन' देखील तत्कालीन भारतभाग्यविधाता पंचम जॉर्जच्या भारतातील आगमनाप्रीत्यर्थ लिहिले गेल्याचा आक्षेप घेतला जातो. त्यात तथ्य देखील असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात कालपटलावर त्यालाही मर्यादा पडल्याचे मान्य करावे लागेल.
इथे आणखी एका गीताचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. ते म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित 'जयोस्तुते' हे स्वातंत्र्यगीत.

"जयोस्तु ते श्रीमहन्मंगले, शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवति, त्वामहं यशोयुतां वंदे "
भारतभूमीच्या स्वातंत्र्याचे मूर्तिमंत काव्यस्वरूप ह्या गीताच्या शब्दाशब्दातून उमटते आणि प्रत्येक भारतीयाच्या रोमारोमातून ते स्फुरण पावत राहते.
"स्वतंत्रते भगवती I चांदणी चमचम लखलखशी"
आणि
"तूं सूर्याचे तेज उदधिचे गांभीर्यहि तूंची"
अशी महान देशप्रेमाची उधळण देखील त्यात आहे.
"गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली"
किंवा
"जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर तेंतें"
अशी मातृभूमीवरील मंगल प्रेमाची कवितासुद्धा आहे.
"हिमालयाच्या हिमसौधाचा लोभ शंकराला..."
किंवा
"स्वतंत्रते, ह्या सुवर्णभूमीत कमती काय तुला?
कोहिनूरचे पुष्प रोज घे ताजें वेणीला.. "
असे उज्ज्वल ऐतिहासिक-भौगोलिक समृद्धीचे गाणे दिसेल.
त्यात राष्ट्रप्रेमाचे, अत्युच्च बलिदानाचे स्तोत्र देखील आहे.
"हे अधम रक्त रंजिते I सुजन-पुजिते ! श्रीस्वतंत्रते
तुजसाठिं मरण तें जनन
तुजविण जनन ते मरण.."

सावरकरांच्या हिंदुत्व किंवा तत्सम राजकीय प्रणालीशी कितीही वैचारिक वाद असेल, किंबहुना त्यांच्या तथाकथित हिंदुत्वाला प्रखर विरोधच राहील. परंतु एक राष्ट्रभक्तीपर काव्य म्हणून विचार केला तर "जयोस्तु ते.. " एक परिपूर्ण आणि केवळ ग्रेटच सिद्ध होते. माझ्या मते हे एक गीत भारतदेशाचे राष्ट्रगीत, राष्ट्रीयगीत इत्यादी स्तरांवर शोभेल अश्या सर्वाधिक योग्यतेचे आहे.

(अर्थात हिंदुत्ववाद्यांना अशा मुलभूत गोष्टीत रस नसतो. सावरकरांचे 'जात्युच्छेदक निबंध' किंवा 'विज्ञाननिष्ठ निबंध' हे कालातीत विचार बाजूला ठेवून हिंदुत्वासारख्या कालबाह्य प्रणालीवर पोळ्या भाजण्यात ते दंग असतात.)

No comments:

Post a Comment