Saturday, 12 September 2015

...आणि मग पुन्हा प्रा. शेषराव मोरेंना "कॉंग्रेसने आणि गांधीजीनी अखंड भारत का नाकारला?" सारखी सुंदर उपरती होईल

प्रा.शेषराव मोरे ह्यांचे "अखंड भारत का नाकारला?" हे संपूर्ण अभ्यासातून सिद्ध झालेले महत्वपूर्ण संशोधन आहे. प्रचंड सावरकरवादी असलेल्या मोरेंनी ह्या ग्रंथात अखंड हिंदुस्तान, फाळणी ह्या हिंदुत्ववाद्यांच्या, सावरकरवाद्यांच्या कळीच्या मुद्द्यावर अत्यंत अभ्यासपूर्ण विश्लेषण केलंय. काँग्रेस, गांधी-नेहरू, लीग, जिना, राष्ट्रवादी मुस्लिम, आझाद, बाबासाहेब, नेताजी इत्यादी सर्व घटकांना त्यांनी विस्तृत कव्हरेज देऊन आपले सिद्धांत पक्के मांडले आहेत. परंतु एक घटक ह्या ग्रंथात आश्चर्यकारकरित्या उपेक्षित राहिलाय, तो म्हणजे मोरेंचाच लाडका सावरकरवाद किंवा अखंडहिंदुस्तांवादी हिंदुत्ववाद!

त्यांच्या सध्याच्या वैचारिक गोंधळाला मोरेसमर्थक हिंदुत्ववादी 'विचारकलह' म्हणू शकतात. कारण मोरेमास्तर आधीच्या पुस्तकांत फाळणीला कॉंग्रेसला जिम्मेदार ठरवीत असत. पण पुढे त्यांनी फाळणीचा साद्यंत इतिहास अभ्यासला आणि सत्याच्या दिव्य प्रकाशात त्यांची बुद्धी दिपून गेली किंवा अक्षरश: वेड लागायची पाळी आली ( असं तेच म्हणतात) ...आणि मग "कॉंग्रेसने आणि गांधीजीनी अखंड भारत का नाकारला?" हि उत्कृष्ठ संशोधनात्मक साहित्यकृती प्रकाशित झाली.

अखंड हिंदुस्तान हा कळीचा मुद्दा असूनही प्रा..मोरेंनी आपल्या ग्रंथात  सावरकरवाद किंवा हिदुत्ववाद उपेक्षित का ठेवला हा प्रश्न महत्वाचा आहे. त्याचा मागोवा घेतल्यास ह्या ग्रंथातून काही तथ्ये स्पष्ट होतात.

ह्या ग्रंथात सुरुवातीलाच स्वत:च्या अखंड भारताच्या भाबड्या आणि भावनिक समजुतीबद्दल प्रा. मोरे मनोगत व्यक्त करताना म्हणतात...
"...पूर्वी आम्हीही कडवे अखंड भारतवादीच होतो... फाळणी करून कॉंग्रेसने देशाचा घात केला असे मानीत होतो...आमच्या १९८८च्या ग्रंथात तसे स्पष्ट लिहिलंय...पण तेव्हा आमचा फाळणी विषयक अभ्यासच झाला नव्हता...!" इति. प्रा. मोरे
पृष्ठ क्र. ४ (अखंड भारत का नाकारला? (मनोगत))

हि स्पष्ट कबुली देणारे प्रा. मोरे समस्त सावरकरवादी हिंदुत्ववादी विद्वानांचे प्रतिनिधित्वच करीत आहेत हे सुज्ञांच्या लक्षात आलेच असेल.

आपल्या स्वतंत्र भारतात अखंड हिंदुस्तान आणि फाळणीबद्दल आत्यंतिक जाज्ज्वल्य वगैरे राष्ट्रभक्ती बाळगून असलेले जी मंडळी आहे त्यांच्यासाठी ह्या महत्वपूर्ण ग्रंथात प्रा. मोरे लिहितात...

"...काँग्रेस व्यतिरिक्त अन्य हिंदू संघटनांनी व व्यक्तींनी ( अर्थात संघ, हिंदू महासभा, सावरकर प्रभूती) फाळणीचा पर्याय म्हणून मांडलेल्या अखंड भारताविषयी एखादे प्रकरण ह्या ग्रंथात असावे असा काही अभ्यासू मित्रांचा (?) सल्ला होता. पण ग्रंथ मर्यादेमुळे (???) तसे न करता सामारोपातच त्याची दखल घ्यावी लागली...!"
पृष्ठ क्र. १६ (अखंड भारत का नाकारला? (प्रास्ताविक))

...आणि समारोपात हा हिंदुत्ववाद्यांच्या हिंदुस्तानचा अस्तित्वाचा प्रश्न अवघ्या दोनचार ओळीत गुंडाळूनही टाकतात...!

"...सावरकरांच्या अखंड भारताच्या योजनेत मुस्लिमांना लोकसंख्येच्या प्रमाणात लोकसभेत वाटा मिळणार होता... त्यानुसार आजच्या लोकसभेत सुमारे ३८% खासदार मुसलमान असते...आजच्या राज्यघटनेत मुस्लिमांसाठी एकही राखीव जागा नाही...आजच्या राज्यघटनेची कल्पनाही हिंदुत्ववादी करू शकले नव्हते... सावरकरांचे 'हिंदुराष्ट्र' हिंदूंसाठी घातक ठरले असते!..." इति. प्रा. मोरे.
 ("...सावरकरांचे 'हिंदुराष्ट्र' हिंदूंसाठी अघातक ठरले नसते!..." असं मोरेंचे मूळ वाक्य आहे. मी ते सरळ भाषेत लिहिलंय.)
पृष्ठ क्र. ६८३ (अखंड भारत का नाकारला? (समारोप))

आता पाचशे-हजार पानांच्या ह्या ग्रंथात ग्रंथ-मर्यादा कुठून उद्भवली? मुस्लिम लीग, राष्ट्रवादी मुस्लिम ह्यांच्यावर चार-चार प्रकरणे लिहित असताना हिंदुत्ववादी आणि विशेषत: सावरकरवादी भूमिकेवर एखादे प्रकरण तरी सहज बसवता आले असते! पण ती भूमिका मुळातच फोल, भोंगळ असल्याने कदाचित ह्या ग्रंथात आणखी विस्तृतपणे मांडायची तर स्वत:च्याच विचारप्रणालीचे वाभाडे काढावे लागले असते. म्हणून ते अवघड काम त्यांनी दोनचार ओळीतच आटपून टाकले असावे. "...अखंड भारत का नाकारला?" हि अशी एक सुंदर उपरती आहे.

अलीकडे प्रा. मोरेंच्या सावरकरप्रेमाने अंदमानात पुन्हा उचल खाल्ली किंवा पुन्हा 'विचारकलह' सुरु झालेला दिसतोय. ह्यावेळी सावरकरबदनामीसाठी त्यांनी पुरोगामी, काँग्रेस आदि घटकांना जिम्मेदार ठरवून वैचारिक गोंधळ घातलाय. त्यासाठी पुरोगामी विचाराची  दहशतवादाशी तुलना करून ते स्वत:  'पुरोगामी' , 'सेक्युलर' इ. शब्दांवरदेखील हिंस्त्र हल्ला चढविणाऱ्या कंपूचे म्होरके झाले आहेत. 

वरील विवेचनातून एक गोष्ट स्पष्ट होईल कि प्रा. मोरे पुरोगामी विचार, गांधी हत्या आणि सावरकरवाद ह्या विषयाचा संपूर्ण अभ्यास करतील तर पुन्हा विचारकलहातून त्यांची मते बदलु शकतील. पूर्ण अभ्यासांती सावरकरांच्या कथित बदनामीची अकथित केंद्रे प्रा. मोरेंना उलगडतील आणि दहशतवादाची केंद्रेही सापडतील. पुरोगामी विचाराचा लक्ख इतिहास पुन्हा त्यांची बुद्धी उजळून टाकील!... आणि मग प्रा. मोरेंना कदाचित पुन्हा एक सुंदर उपरती होईल.

Saturday, 5 September 2015

टीचर्स डे

पहिलाच दिवस होता, वसई पॉलीटेक्निकमध्ये आणि एपिएम (Applied Mechanics) शिकवायला देशमुख सर होते. मूर्ती लहान पण एकदम कडक, खरंतर चिडखोर स्वभावाचे सर होते. (अलीकडेच ते अपघातात गेले बहुधा.) :(

 तर पहिल्याच दिवशी सर काहीतरी शिकवीत होते. मी आणि बिपीन Mhatre पहिल्याच बेंचवर बसलो होतो. (दोघेही कॉलेजच्या एसेस्सिच्या मेरीट लिस्टमध्ये पहिल्या दोन नंबरवर होतो...! पण शाळेतल्या मेरीटच्या भव्यदिव्य आठवणींपेक्षा पॉलीटेक्निकचे तंत्रमय दिवस संघर्षाचे होते, बरं. ) लेक्चर चालू होतं आणि पाठीमागून कुणीतरी खोडसाळपणा केला... आणि इथेच माझी शाळेतली पारंपारिक खोड पुन्हा आडवी आली. म्हणजे मी हसलो. :)

 देशमुख सर आधीच चिडखोर. त्यात मी पुढे बसून दात काढतोय म्हटल्यावर त्यांचा पारा आणखी चढला. खाडकन माझ्या समोर आले, डेस्क वरची माझी नोटबुक घेतली आणि दिली क्लासबाहेर भिरकावून... हो, अक्षरश: हाकलून काढलं मला, वर्गातून...पहिल्याच दिवशी.

त्या देशमुखसरांच्या स्मृतींना टीचर्स डे निमित्त अभिवादन.

Thursday, 13 August 2015

३८ वर्षांची तपस्या आणि विश्वामित्री पवित्रा

३८ वर्षांची तपस्या आणि विश्वामित्री पवित्रा
विश्वामित्राच्या कठोर तपश्चर्येने घाबरून जाऊन स्वर्गाधिपती इंद्राने स्वर्गसुंदरी अप्सरा मेनकेला भूतलावर पाठवून दिले. मेनकेच्या मादक सौंदर्याने घायाळ होऊन तापसी विश्वामित्राचे चित्त विचलित झाले. ब्रह्मश्रीपदाचे विस्मरण होऊन आणि त्यासाठीची तपश्चर्या सोडून त्याने मेनेकेसोबत संसार थाटला. शकुंतलेचा जन्म झाला आणि मेनका स्वर्गलोकी परतण्यास निघाली. तेव्हा विश्वामित्राचे डोळे खाडकन उघडले आणि त्याला आपली तपश्चर्या भंग झाल्याचे लक्षात आले.
(हि कथा सर्वश्रुत आहेच. मात्र, त्यापुढे घडलेला प्रसंग असा:)
तेव्हा अत्यंत क्रोधायमान होऊन विश्वामित्राने शापवाणी उच्चारली:

विश्वामित्र: हे मेनके, तू माझी तीन तपांची तपश्चर्या भंग केलीस. मी तुला शाप देतो. ज्या सौंदर्याचा गैरवापर करून तू हे पापकृत्य केलेस ते तुझे स्त्री-सौंदर्य नष्ट होईल. कलियुगात तू मृत्युलोकी पुरुष जन्म घेशील आणि काळीकुरूप होशील. तुझे काळे तोंड आणि काळे धन घेवून तू मृत्युलोकी सैरावैरा पळत सुटशील.
ह्या शापवाणीने मेनका क्षणभर गांगरली. पण दुसर्याच क्षणी स्वत:ला सावरून तिने विश्वामित्राकडे उषा:प मागितला.

मेनका: हे राजर्षी, मी ह्या जन्मी आपली सेवाच केली. पुढील जन्मी मृत्युलोकी आपली सेवा करण्याची संधी द्यावी. मला उषा:प द्यावा.

विश्वामित्र: (निश्चयपूर्वक) कदापि नाही. ह्यापुढे तुला माझ्या राज्यात स्थान नसेल. तुझी रवानगी रसातळाला अर्थात आर्यावर्ताबाहेर दूर आंग्लदेशी पोर्तुप्रांती होईल.
ह्यावर सात्विक संतापाने मेनका क्रुद्ध झाली. आणि तिनेहि विश्वामित्राला प्रतीशाप दिला.

मेनका : हे राजन, तू माझ्या स्त्रीजन्माची कुचेष्टा केली आहे. माझ्या शापाने तू कलियुगात मृत्युलोकी स्त्री होशील... तू विश्वामित्री पवित्रा घेत स्वत:च्या राज्यात सैरभैर होशील...आणि मी ललितरूप घेऊन दूरदेशी राहूनदेखील तुझी तीन तपांची, ३८ वर्षांची तपस्या पुन्हा भंग करीन.

(काल्पनिक)

Wednesday, 24 June 2015

....विनोद तावडे ह्यांनी कोणती चूक केली?

विनोद तावडे ह्यांनी कोणती चूक केली?

 १९८० साली त्यांनी कथित ज्ञानेश्वर विद्यापीठात प्रवेश घेवून चार वर्षात तो तथाकथित इंजिनियरिंगचा कोर्स पूर्ण केला आणि ती डिग्री प्राप्त केली. 1963 साली जन्मलेले तावडे तेव्हा जेमतेम बारावी होऊन बाहेर पडलेले १७-१८ वयाचे एक विद्यार्थी असावेत. अशा गरजू विद्यार्थ्यांची कशी फसवणूक केली जाते ह्याचे तावडे हे खरंतर ज्वलंत उदाहरणच आहेत!

गेल्या वर्षी स्मृती इराणींच्या शैक्षणिक पात्रतेविषयी गदारोळ मजला होता तेव्हा, ह्या विषयावर मी खालील पोस्ट टाकली होती:

"ओपन युनिव्हर्सिटी , Distant Education Courses, Correspondence Courses, ह्यांचा प्रचंड गैरवापर केला जात असल्याचे सातत्याने निदर्शनास येते. BA, B.Com सोडा, इंजीनियारिंगच्या B.Tech, B. E., B.Sc., M.Sc, M.Tech ते Ph.D. पर्यंतच्या सर्व शाखातील 'डिगऱ्या' स्वस्तात उपलब्ध आहेत.
ह्या तथाकथित विश्वविद्यालयांच्या शाखांमधून कोणत्या परीक्षा(?) घेतल्या जातात ते पाहाल तर खूप मनोरंजन होईल. अत्यंत हास्यास्पद, संतापजनक आणि भ्रष्ट असा हा उघड शिक्षणाचा बाजार शहरी भागात मांडला गेला आहे." इति.
राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडेंच्या शैक्षणिक पात्रतेच्या निमित्ताने हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मुद्दा हा आहे कि इंजिनियरिंग, वैद्यकीय, तंत्रशिक्षण, विज्ञान इत्यादी महत्वाच्या क्षेत्रात घुसलेल्या या मुक्तशिक्षण घोटाळ्याचा पुनर्विचार व्हायला हवा.

मुळात ज्ञानेश्वर विद्यापीठासारख्या 'समांतर व्यवस्थेला' BE , BTech , ME , MTech , BSc , MSc ह्या उच्चशिक्षणाशी संबधित असलेल्या पदव्या अगदी शब्दश: जशाच्या तश्या वापरण्याची परवनागी कशी मिळते? त्यांच्या कोर्सच्या पदव्या वेगळ्या नावाच्या असायला हव्यात, जेणेकरून विद्यार्थ्याची आणि इतरांचीही फसवणूक होता कामा नये. पण हि धूळफेक जाणीवपूर्वक केली जाते कि काय हा खरा मुद्दा आहे! उदा. तावडे ह्यांना 'कोर्स इन इलेक्ट्रोनिक्स इंजिनियरिंग' वगैरे नावाची डिग्री द्यायला कुणाची हरकत नसावी. परंतु हटकून "BE डिग्री इन इलेक्ट्रोनिक्स इंजिनियरिंग" हा इंजिनियरिंगच्या मुख्य प्रवाहातीलाच शब्दप्रयोग वापरला गेला कारण तिथे धूळफेक अपेक्षित आहे.
हि समांतर विद्यापीठे अशा धूळफेकीसाठीच पैदा केली गेली असावीत. ह्या खोट्या डिग्र्या कुणाला उपयोगी पडतात? खासगी उद्योगजगतात अशा विद्यार्थ्यांना कोणताही स्कोप नाही कारण त्यांच्याकडे अपेक्षित ज्ञान, कौशल्य असण्याची सुतराम शक्यता नसतेच. मग ह्या डिग्र्या कुठे वापरल्या जातात? त्याचे उत्तर आहे सरकारी आणि निमसरकारी क्षेत्रातील नोकऱ्या...! वेगवेगळ्या राज्यांच्या नावाने उत्पन्न झालेल्या अशा ज्ञानेश्वर विद्यापीठासारख्या युनिव्हरसीट्या ह्या काळ्याबाजारात फोफावल्या आहेत. BE , BTech , ME , MTech , BSc , MSc ह्या उच्चशिक्षणाशी संबधित असलेल्या पदव्या त्याच नावाने बहाल केल्या जातात. काही अंशी सरकारी मान्यता देखील असल्याने उदारतेने सरकारी नोकऱ्या, पदोन्नती इत्यादी साठी ह्या मुक्तडिग्र्या सढळहस्ते वापरल्या जातात. खासगी क्षेत्रातही थोडीफार धूळफेक होते, पण मुख्यत्वे शिक्षणाच्या ह्या काळ्याबाजाराचा डोलारा सरकारी नोकर्यांशी संबधित आहे.

चारचार वर्षाचे हे कोर्सेस फक्त दरवर्षी मोठी फीस भरून अटेंड केले जातात. कोणत्याही प्रकारची उपस्थिती, लेक्चर, प्रात्यक्षिक मुळातच अपेक्षित नसते. फक्त वर्षाच्या शेवटी नियमितपणे परीक्षा अटेंड (!)करायची, म्हणजे उत्तरपत्रिका भरायच्या कारण त्यावर कोणीही परीक्षक, पर्यवेक्षक वगैरे नसतोच. अशा प्रकारे चार वर्षाच्या फीसा भरल्या कि तुमची डिग्री तुमच्या हातात. असा हा प्रचंड मोठा घोटाळा आहे. मुख्य शहरे, तालुक्याच्या ठिकाणी हि शिक्षणाची गटारगंगा पाहायला मिळेल.
इंजिनियरिंगची डिग्री बाहेरून मिळवायची तर त्यासाठी AMIE नावाचा कोर्स उपलब्ध आहे. अगदी BE च्याच तोडीचा कोर्स. किती सरकारी बाबू AMIE करतात , हा संशोधनाचा विषय आहे. किंवा कितीजण ज्ञानेश्वर विद्यापीठ टाईप काळ्या डिग्र्या विकत घेतात हे पाहणे मनोरंजक असेल.

मुद्दा हा आहे कि ह्या तथाकथित विद्यापीठांना BE , BTech , ME , MTech , BSc , MSc हि नावे वापरायला बंदी घालायला हवी. त्यांच्या कोर्सेसना त्यांनी त्यांच्या विद्यापीठाची नावे द्यावीत. उदा. इलेक्ट्रोनिक्स इंजीनियरिंग कोर्स फ्रोम ज्ञानेश्वर युनिव्हरसिटी वगैरे. तसेच अशा तथाकथित डिग्र्याची सरकार दरबारी नोकऱ्या-पदोन्नती साठी गैरलागू ठरवायला हव्या.

तावडे नावाचा विद्यार्थी वयाच्या १७-१८व्या वर्षी जर ह्या १९८० साली ह्या घोटाळ्याचा शिकार झाला असेल तर आज कित्येक विद्यार्थी BE , BTech , ME , MTech , BSc , MSc ह्या नावाच्या वलयाने नागवले जात असतील? म्हणून खरा मुद्दा हा आहे कि इंजिनियरिंग, वैद्यकीय, तंत्रशिक्षण, विज्ञान इत्यादी महत्वाच्या क्षेत्रात घुसलेल्या ह्या मुक्तशिक्षण घोटाळ्याची हकालपट्टी व्हायला हवी, तावडेंची नव्हे!

Monday, 22 June 2015

हातभट्टीच्या दारूतून विषबाधा होण्याचे रहस्य काय

हातभट्टीच्या दारूतून विषबाधा होऊन शेकडो लोक मृत्युमुखी पडल्याची घटना कालच घडली. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत हि घटना घडली. हि विषारी दारू ठाणे जिल्ह्यातून किंवा गुजरातमधून आल्याच्याही बातम्या प्रसिद्ध झाल्या. ह्या पार्श्वभूमीवर हातभट्टीच्या दारूतून विषबाधा होण्याचे रहस्य काय असा प्रश्न उभा राहतो.
महागडी देशी-विदेशी दारू न परवडणारा गरीब मजूर वर्ग गल्लीबोळातील हातभट्टीच्या दारूचा ग्राहक आहे. त्यामुळे हातभट्टी अर्थातच बेकायदेशीर असूनही तिचा मोठा पारंपारिक उत्पादक-ग्राहक वर्ग देशात अस्तित्वात आहे, हे वास्तव आहे. त्याची उत्पादनाची पद्धत गावठी तरीही वैज्ञानिक म्हणजेच उर्ध्वपातन म्हणजेच डीस्टीलेशनच आहे.

पारंपारिक हातभट्टीमध्ये उसाची मळी किंवा (काळा गुळ) आणि नवसागर (अमोनियम क्लोराइड NH4Cl )हे मिश्रण काही दिवस आंबवून त्याचे उर्ध्वपातन केले कि गावठी दारू तयार होते. ह्या 'पिव्वर दारू'त विशिष्ठ प्रमाणात पाणी मिक्स करून दारूचे उत्पादन ग्राहकांना उपलब्ध होते. ग्रामीण भागात आणि शहरी गल्लीबोळात हीच गावठी दारू बहुधा उपलब्ध असते. हातभट्टीच्या त्या मिश्रणात संत्री, मोसंबी, आंबा, जांभूळ, इत्यादी फळे टाकल्यास त्या त्या फळाच्या अर्काची चव प्राप्त होते.
मोह किंवा जांभळे टाकून उत्तम प्रतीची दारू बनविली जाते आणि दारूतले दर्दी शौकीन ह्या दारूला 'इंग्लिश दारू'पेक्षाही उच्च दर्जाची मानतात!
मग प्रॉब्लेम कुठे येतो? तर मोठ्या प्रमाणत (हजारो लिटर) ह्या हातभट्टीच्या दारूचे उत्पादन करणारे जे मोठे व्यावसायिक निर्माण झाले आहेत, त्यांनी ह्या दारूच्या उत्पादनाच्या पारंपारिक पद्धतीत लबाड्या करायला सुरुवात केली. त्यासाठी रसायनांचा भडीमार केला जाऊ लागला. युरिया सारखे खत आणि ब्याटरिची (सेल) पावडर देखील हातभट्टीत वापरले जाऊ लागले. अर्थात पारंपारिक उर्ध्वपातनाच्या शास्त्रात आधुनिक रसायनशास्त्राने मोठी घुसखोरी केली... आणि त्यातून विषारी रासायनिक दारूची प्रकरणे गेल्या काही वर्षात उद्भवली.
हातभट्टीच्या दारूत अलीकडे मिथेनॉल ह्या रसायनामुळे प्रचंड जीवघेणी विषारी भेसळ सुरु झाली. हे मिथेनॉल का वापरले जाते?

वर उल्लेख केल्यानुसार उर्ध्वपातनातून निर्माण झालेल्या 'पिव्वर दारू'त विशिष्ठ प्रमाणात पाणी मिक्स करून गावठी दारू ग्राहकापर्यंत पोहोचत असे. नेमका इथे मिथेनॉलने खेमिकल लोचा केला. ह्या 'पिव्वर दारू'त फक्त दोन थेंब मिथेनॉल टाकल्यास सुमारे सातपट जास्त गावठी दारू तयार होऊ लागली! 'थेंबाची दारू' ह्या नावाने हि मिथेनॉलदारू ओळखली जाते. आता खेडोपाडी आणि गल्लीबोळातून हे मिथेनॉल संशोधन पसरल्याने छोटेमोठे हातभट्टीवालेहि सर्रास मिथेनॉलदारूचे उत्पादन करू लागले. त्यातून मिथेनॉलचे 'थेंबाचे' प्रमाण साहजिकच अनियंत्रित होऊ लागले. मिथेनॉलच्या अनियंत्रित वापराने गावठी दारूचे जीवघेण्या विषारी दारूत रुपांतर होत गेले. ह्या विषारी मिथेनॉलदारूचे दुष्परिणाम मुंबईतील मालवणी येथील दुर्घटनेतून पुन्हा उघड झाले.

अर्थात, ह्या गावठी दारूच्या धंद्यावर (तो बेकायदेशीर असल्याने) बंदी आणून हा प्रश्न सुटेल हे फक्त स्वप्नरंजन आहे. हातभट्टीची हजारो वर्षांपासून परंपरा आहे आणि आजही ती टिकून आहे कारण त्याचे मागणी आणि गरजचे अर्थकारण. ग्रामीण (आणि शहरीही) भागातील मोलमजुरी करणाऱ्या फाटक्या लोकांना कायदेशीर कारखान्यातील दारू उपलब्ध आणि परवडणार असेल तर प्रश्नच नाही, परंतु तेही संपूर्ण दारूबंदिसारखे स्वप्नरंजनच आहे. एकीकडे दारूवर प्रचंड कर लादून ती महागडी करून टाकायची, दारूची कारखानदारी वाढवायची आणि दुसरीकडे गरीब श्रमिकांच्या श्रमपरीहाराला विषारीरसायनयुक्त जीवघेणं बनवायचं, ह्या मूर्खाच्या नंदनवनातून बाहेर येण्याचा उपाय काय?

Thursday, 26 March 2015

विश्वचषकातील भारतीय संघाच्या पराभवाचे गुन्हेगार कोण?

पोस्टमार्टेम रिपोर्ट
विश्वचषकातील भारतीय संघाच्या पराभवाचे गुन्हेगार कोण, हा आजचा कळीचा मुद्दा आहे. एकही सामना न हरणारी टीम इंडिया तब्बल १०० धावांनी का पराभूत झाली? त्याची कारणे तपासून पहिली तर काही चुका स्पष्ट दिसून येतात.

यादव-शमिने १० षटकात ५० धावा देऊन वॉर्नरचा महत्वाचा बळी घेऊन छान सुरुवात केली. पण नंतरच्या गोलंदाजांनी (अश्विन, जडेजा, मोहित) २० षटकांत फक्त गोलंदाजीच्या पाट्या टाकल्या. मधल्या ओव्हर्समध्ये जेव्हा फलंदाज आक्रमक नसतात तेव्हा आपल्या वाट्याच्या ओव्हर्स खपवून बाजूला होणारे गोलंदाज काय कामाचे ? ३५व्या षटकात परत येउन यादवने स्मिथचा बळी घेतला तोपर्यंत ओस्ट्रेलियाच्या २०० धावा फलकावर लागल्या होत्या. उर्वरित १५ षटकांत ते हाणामारी करून धावांचा डोंगर रचणार हे स्पष्टच दिसत होते.

तसेच फलंदाजीत रोहित आणि शिखरने छान सुरुवात करून दिल्यावर आणि तद्नंतर शिखर, विराट, रोहित हे स्टार फलंदाज पाठोपाठ बाद झाल्यावर रैना, जडेजा हि लोअरमिडलऑर्डर राहणे-धोनीसोबत उभी राहिली नाही. हा भारतीय संघातील ठळक लूपहोल होता, जो आजच्या महत्वाच्या सामन्यात उघडा पडला.
साखळी फेरीतील सामन्यात आपल्या टीम मधले हे कच्चे दुवे बदलण्याची गरज होती. सुरुवातीचे सामने जिंकल्यानंतर आणि क्वार्टरफायनलमध्ये जागा पक्की झाल्यांवर आपल्याकडे दोन सामने उपलब्ध होते. त्यात हि कमजोर कडी बदलता आली असती. हि कमजोर कडी म्हणजे रवींद्र जडेजा होता, हे स्पष्ट होते. एकतर फिरकी गोलंदाज म्हणून तो प्रभावी ठरत नव्हता आणि फलंदाज म्हणून त्याच्याकडून कामगिरीची अपेक्षाही नव्हती. संघ जिंकत असल्याने हि कमजोरी उघड होत नव्हती आणि ते छुपं ठेवण्यातच संघव्यबस्थापनाने चूक केली.

इंडिया क्वार्टरफायनलमध्ये पोहोचली तोपर्यंतची कामगिरी पाहता जी धोक्याची घंटा वाजत होती ती कुणी लक्षात घेतलि नाही. भारताची फलंदाजी मुख्यत: रोहित, धवन, कोहली ह्या स्टार फलंदाजांवर अवलंबून आहे. त्यातला एकहीजण खेळला तर आपली धावसंख्या चांगला आकार घेते. पण ते जर लवकर तंबूत परतले तर आपली तळाची फलंदाजी कशी ढेपाळते ते वेस्ट इंडीज विरुद्धच्या सामन्यातही पाहायला मिळाले होते. मोजक्या धावांचे आव्हान असूनही रैना, जडेजा हे मधल्या फळीतले फलंदाज खेळपट्टीवर उभे राहू शकले नाहीत. उसळत्या चेंडूवर त्यांची फलंदाजी अक्षरश: उघडी पडताना आपण नेहमी पाहतो. अर्थात, पुढच्या बाद फेरीत न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया ह्या मातब्बर संघांसमोर त्यांची काय अवस्था होईल त्याचा विचार करता, संघात काही बदल अपेक्षित होते.

पहिले चार फलंदाज आणि यादव, शमी हे द्रुतगती गोलंदाज हि आपली बलस्थाने आहेत. कर्णधार धोनी स्वत: एक वादातीत शक्तीस्थान आहेच. पण भारतीय संघात एक चेन्नई सुपरकिंग्स नावाचा उपसंघ आहे. धोनी आणि त्याचे शिलेदार (अश्विन, जडेजा,रैना, मोहित) हा तो उपसंघ. पैकी अश्विन सध्या बरी स्पिन टाकत होता. मोहित शर्मा मूळ संघात नव्हता, तरीही तो मिळालेल्या संधीचे सोने करीत होता. रैनादेखील खेळपट्ट्या फलंदाजीस पोषक असल्याने चांगली कामगिरी करीत होता.

पण प्रश्न होता जडेजाच्या लोअर मिडलऑर्डर फलंदाजीचा आणि पाचव्या गोलंदाजाचा. हि संघातील कमजोर कडी होती. परंतु त्या उपसंघाचा आपसात किती विश्वास असतो ते जडेजाने जेव्हा रिव्ह्यू मागितला तेव्हा दिसले. धोनीला खात्री नसूनही केवळ जाडेजाच्या आग्रहाखातर त्याने तो रिव्ह्यू कसा घेतला ते पाहता, चेन्नई सुपरकिंगच्या खेळाडूंसाठी संघाला दुय्यम महत्व दिले जाते कि काय, अशी शंका घ्यायला जागा आहे.
खेळपट्टी फिरकीला साथ देणारी असेल तर जडेजाची स्पिन अयशस्वी ठरल्याने जाडेजाच्या जागी अक्षर पटेलला खेळविणे गरजेचे होते. किंवा खेळपट्टी जर तेज गोलंदाजीला पोषक असेल तर भुवनेश कुमारला चौथ्या बॉलरच्या स्वरुपात संघात घेऊन आक्रमणाची धार वाढविता आली असती. तसंही गेल्या दोन वर्षातील तो भारताचा सर्वाधिक यशस्वी गोलंदाज असूनही त्याला दुर्लक्षित ठेवून काय साध्य झाले? किंवा बिन्नीला संधी देवून त्याच्या फलंदाजीचाही तळाला फायदा करून घेत आला असता. किवा कदाचित इशांत शर्माच्या जागी बदली खेळाडू घेतला गेल तेव्हाच अनफिट जाडेजाच्या जागी युवराजसिंगचा विचार करण्याची संधी होती, ती संघ-व्यवस्थापनाने दवडली. इथेही सीएसके कनेक्शन संघाच्या आड आले असंच दिसून येईल. आज जेव्हा एक विकेट लवकर पडल्यावर ओस्ट्रेलियाने १८० धावांची मोठी भागीदारी केली तेव्हा भुवि किंवा अक्षरसारखा विकेटटेकिंग गोलंदाज महत्वपूर्ण ठरला नसता काय?

तसेच रैना हाणामारीच्या षटकांत निर्णायक फटकेबाजी करू शकतो. पण चार विकेट लवकर पडल्या तर वरच्या क्रमांकावर त्याची हतबलता पाहता एक्स्ट्रा फलंदाज खेळवून रैनाला खालच्या क्रमांकावर आणणे गरजेचे होते. मग आपल्याला पाचव्या क्रमांकावर रायुडूला घेऊन आणि रैनाला सहाव्या क्रमांकावर पाठवून फलंदाजीची खोली वाढवता आली असती का? ते दोघे मिळून १० षटके टाकतील तर ते शक्य झाले असते. तसंही रैनाने मागच्या एक सामन्यात एकट्यानेच १० षटके टाकली होती. म्हणजेच आज गरज असताना रायुडूच्या स्वरुपात आपल्याला पाचव्या क्रमांकावर एक विश्वासार्ह फलंदाज मधल्या फळीत मिळाला असता आणि रैना तळाला सहाव्या क्रमांकावर धोनीसोबत मोठे फटके खेळू शकला असता.
असे असताना भूवीच्या स्विंग वर विश्वास का ठेवला नाही ? किंवा अक्षर पटेलच्या प्रभावी फिरकीचा ऑप्शन का वापरला गेला नाही? किंवा बिन्नीच्या अष्टपैलू खेळाचा पर्याय का चाचपडून पहिला नाही?
खरंतर रायुडूच्या रूपाने एक अधिक फलंदाज घेऊन रैना आणि इतरांच्या गोलंदाजीचा पर्याय सर्वाधिक उपयुक्त ठरला नसता?

पण बादफेरीत पोहोचल्यावरही उर्वरित दोन सामन्यात वरीलपैकी कोणताही बदल न करून संघव्यवस्थापनाने नक्की काय साधले? ह्या प्रश्नाचे उत्तर स्पष्ट आहे आणि ते म्हणजे भारतीय संघावर असलेला अंधश्रद्धेचा प्रचंड पगडा. जी टीम जिंकतेय तिच्यात मुळीच बदल करायचा नाही, ह्या सुपरस्टीशनच्या आहारी कोण गेले होते, ते स्पष्ट व्हायला हवे. आपले आजीमाजी दिग्गज खेळाडूदेखील ह्या अंधविश्वासाच्या जाळ्यात पूर्वापार फसलेले असतात. ह्या सुपरस्टीशनच्या प्रभावामुळेच संघात आवश्यक बदल केले गेले नाहीत, असंच दिसते. संधी असूनही तसा प्रयोगदेखील केला गेला नाही.क्रिकेट हा माईंडगेम, प्रेशरगेम , टेम्परामेंटगेम वगैरे असतो. पण व्यावसायिकता सोडून आपला संघ असा अंधश्रद्धाळू बनला. मग तिथे प्रोफेशनल ओस्ट्रेलियाच्या पुढे असल्या भोंगळ संघाचा कसा निभाव लागणार? अर्थात टीम इंडियाचे संघव्यवस्थापन म्हणजेच कर्णधार धोनी, रविशास्त्री, आदि तज्ञमंडळी ह्या पराभवाचे खरे गुन्हेगार आहेत.

Wednesday, 25 March 2015

सचिनवर विनाकारण आगपाखड करणाऱ्याचे काय होते?

सचिनवर विनाकारण आगपाखड करणाऱ्याचे काय होते?

उदाहरणार्थ एक हेन्री ओलोंगा नावाचा गुणी खेळाडू होता. आधीच्या सामन्यात सचिनला एक अनप्लेयेबल उसळता चेंडू टाकून त्याने बाद केले आणि त्या जोशात त्याने सचिनचं फ़ेअरवेल सुद्धा सिलेब्रेट केलं. मग पुढच्याच सामन्यात सचिनने ओलोंगाला बॉस कोण ते दाखवून दिलं. ओलोंगाला मैदानाच्या चारी बाजूना असा काही फोडून काढला कि भांबावलेल्या ओलोंगाचा ठिक्करचेहरा आजही कित्येकांना आठवत असेल.
अँडी कँडीक नावाचा एक इंग्लिश बॉलरने सुद्धा सचिनबद्दल अशाच काही वल्गना केल्या होत्या. पुढच्याच सामन्यात सचिनने त्याला मिडविकेट वरून असा काहि स्टेडीयमच्या बाहेर फेकला कि पुन्हा कधी क्याडिक हे नाव क्रिकेट मध्ये दिसले नाही.

तसंच शोएब अख्तरलासुद्धा पॉइन्ट वरून मैदानाच्या बाहेर पाठवून सचिनने त्याची जागा दाखवून दिली होती. एकूणच काय, ओलोंगाभौ असो कि क्याडिकभाऊ...सचिनवर फाल्तूची आगपाखड करणाऱ्यांची हि अशीच गत होते.
.....अ पु र्ण